भातुकलीचं शहर : मोदुरोडम (Photo-amsterdamtips)
अक्षररंग

भातुकलीचं शहर : मोदुरोडम

डच इंजिनीअरिंगची कमाल दाखवणारे मादुरोडॅम उद्यान, अ‍ॅमस्टरडॅममधील मॅडम तुसाऊद म्युझियम आणि डेल्फची पारंपरिक 'ब्लू पॉटरी' या हॉलंडमधील प्रमुख आकर्षणांची सफर घडवणारी एक सुंदर सफर.

नवशक्ती Web Desk

जगतवारी

मेधा आलकरी

डच इंजिनीअरिंगची कमाल दाखवणारे मादुरोडॅम उद्यान, अ‍ॅमस्टरडॅममधील मॅडम तुसाऊद म्युझियम आणि डेल्फची पारंपरिक 'ब्लू पॉटरी' या हॉलंडमधील प्रमुख आकर्षणांची सफर घडवणारी एक सुंदर सफर.

हॉलंडच्या संविधानाप्रमाणे ऍमस्टरडॅम ही हॉलंडची अधिकृत राजधानी असली तरी त्यांचा राजप्रासाद आणि ‘राज्य’ निवास (प्रशासकीय व्यवहार व सरकार ) हेग या शहरात वसलेला आहे. त्यांची संसद, सर्व सरकारी मंत्रालयं आणि सर्वोच्च न्यायालयही हेग शहरातच आहे. हेग म्हटलं की तेथील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आणि जगप्रसिद्ध असलेल्या मात्र कालांतरानं वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तींना ठेवलेला तुरुंग आठवतो. (सर्बियाचे माजी अध्यक्ष, लायबेरियाचे माजी अध्यक्ष). हेग शहराचा एक धावता दौरा करून, या इमारती बाहेरूनच बघून, आम्हाला मादुरोडॅम येथील हॉलंडच्या प्रमुख स्थळांच्या इवल्या इवल्या प्रतिकृती बघायला जाण्यात जास्त रस होता. अवघ्या एका तासात संपूर्ण हॉलंडची सफर होणार होती आमची. देशाचा इतिहास, संस्कृती आणि अभियांत्रिकी या एकाच ठिकाणी एकवटली आहे.

मादुरोडॅममध्ये प्रवेश केला आणि प्रथम दृष्टीस पडलं ते हॉलंडचं शिफॉल विमानतळ. आम्ही बऱ्याचदा या विमानतळावरून ये जा केलेली होती. विमानांच्या हालचाली आणि आवाज या बारकाव्यांसकट त्याची हुबेहूब प्रतिकृती आमच्या समोर उभी ठाकली होती. तिथला दीपस्तंभ तर अगदी नमुनेदार. मादुरोडॅममधल्या एकंदर एकशे सत्तर वास्तू १:२५ या प्रमाणात बनवलेल्या आहेत. म्हणजे जर एखादी इमारत २५ फूट असेल तर तिची प्रतिकृती इथे १ फूट इतकी असेल. त्या प्रत्येक इमारतींचा खोल आणि बारीक तपशील इथे विचारात घेतला असल्यामुळे ती अगदी जिवंत वाटत होती. यातील काही प्रतिकृती तर म्हणे मुख्य इमारत बांधायला घेतल्यावर लगेचच करायला घेतल्या होत्या. इमारतींच्या बाजूचा सभोवतालसुद्धा त्या त्या प्रमाणात उभा केला होता. झाडं बोन्साय तंत्रज्ञानानं कापून इमारतींच्या उंचीइतकी वाढवली होती. हे किती जिकिरीचं काम आहे! हॉलंडमधील नागरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांतील प्रमुख आकर्षणं इथे पाहायला मिळाली. विमानतळ पाहून झाल्यावर आम्ही पवनचक्की पाहायला गेलो. प्रत्येक प्रतिकृतीसमोर उभं राहिल्यावर ‘किती हुबेहूब!’ ही एकच प्रतिक्रिया तोंडातून बाहेर पडत होती. बॅरक्सच्या मॉडेलमधील जवानांची परेड, त्यांची एका रेषेत पडणारी पावलं, घोडदळ, पायदळ, सगळं अगदी तंतोतंत मिळतंजुळतं. रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहत थांबलेले प्रवासी, बॅगा, टीसी, तिकीटघर इतकंच नव्हे तर रुळांवरून भोंगा देत फिरणारी, पुलावरून, बोगद्यातून वाट काढत धावणारी अगीनगाडीही आहे इथे. बागेच्या परिघावर असलेल्या रुळांवरून ही फिरते आणि स्टेशन आलं की थांबते.

पाणी अडवण्याचं अभियांत्रिकी तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी आपल्याला इथे प्राप्त होते. हॉलंडचा बराचसा भाग हा समुद्रसपाटीच्या खाली असल्यामुळे डच लोकांनी पाण्यावर विजय कसा मिळवला हे सांगणारे काही खेळ तिथे बघायला मिळाले. ऑस्टरशेलडे या प्रसिद्ध बांधाच्या मॉडेलचे दरवाजे वेळीच बंद केल्याने पाण्याच्या अवाढव्य प्रवाहापासून कसा बचाव केला जातो हे पर्यटकांना प्रत्यक्ष सहभागी झाल्यामुळं लगेच कळतं. तसेच खालच्या पातळीवर साचलेलं पाणी पंपाच्या साहाय्याने वरच्या कालव्यात कसं ढकलायचं हा प्रयोग प्रत्यक्ष पाहिल्यावर ‘पोल्डर लँड’ ही संकल्पना स्पष्ट होते.

संध्याकाळ झाली आणि आम्ही निघायच्या बेतात असताना या छोट्या घरांमध्ये आणि रस्त्यावर पन्नास हजारांहून अधिक दिवे उजळले आणि ती सारी बाग एखाद्या स्वप्ननगरीसारखी भासली. बाहेर आल्यावर मादुरोडॅमच्या प्रवेशद्वाराजवळ पाहिलेलं हॅन्झ ब्रिन्कर या छोट्या मुलाचं स्मारक पुन्हा निरखून पाहिलं. या पुतळ्यात हा छोटा मुलगा धरणाच्या छिद्रात बोट घालून पाणी अडवताना दिसतो. त्याच्या सतर्कतेने संपूर्ण गाव बुडण्यापासून वाचलं होतं. गंमत म्हणजे ही एक दंतकथा आहे. तो मुलगा एका अमेरिकन लेखिकेच्या काल्पनिक कथेतील पात्र आहे. पण त्याच्या लोकप्रियतेमुळे हा पुतळा इथे उभारला गेला. तिथे असलेल्या पाटीवरील संदेश महत्त्वाचा- हे स्मारक समुद्राशी लढा देत आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या डच तरुणांच्या जिद्दीचं प्रतीक आहे.

या सगळ्या वास्तूंमध्ये एक सौंदर्य आहे. त्यात खुजेपण दिसत नाही, तर भातुकलीतली खेळणी पाहून होणाऱ्या निर्मळ आनंदाची अनुभूती येते. जॉर्ज मादुरो या वीरपुत्राच्या स्मरणार्थ त्याच्या पालकांनी हे उद्यान उभारण्यासाठी निधी देऊ केला. आजही या उद्यानाच्या उत्पन्नाचा विनियोग गरीब मुलांच्या कल्याणार्थ होत असतो. या कल्पनेच्या जननी आहेत मिसेस बून. त्यांनी इंग्लंडमध्ये ‘बेकनस्कॉट’ नावाच्या अशा पिटुकल्या प्रतिकृतींचं गाव पाहिलं होतं. डच क्षयरोग निवारण संस्थेसाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देणाऱ्या साधनांच्या शोधात त्या होत्या. जॉर्ज मादुरो यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी आपल्या पुत्राच्या स्मरणार्थ हा निधी आनंदाने देऊ केला आणि १९५२मध्ये या उद्यानाचा जन्म झाला.

हुबेहूब प्रतिकृती पाहून अचंबित होण्याचं आणखी एक ठिकाण म्हणजे ऍमस्टरडॅम येथील डॅम स्क्वेअरवर असलेलं मेणाच्या पुतळ्यांचं संग्रहालय. खरंतर मला दिवाणखान्याची शोभा वाढवण्यासाठी पेंढा भरून लटकवलेली जनावरांची मुंडकी तितकीशी आवडत नाहीत. पण मॅडम तुसाऊद संग्रहालयातल्या मेणाच्या प्रतिकृती मात्र त्याला अपवाद आहेत. या संग्रहालयातील काम अतिशय उच्च दर्जाचं. शरीराचं प्रमाण, हावभाव, पोशाख, केस सगळं अगदी नैसर्गिक ! पुतळे नाहीतच ते, जिवंत माणसंच समोर उभी आहेत असा भास होतो. एका अधांतरी झोक्यावर बसलेल्या अल्बर्ट आइन्स्टाइनला तर मी शंभरपैकी दोनशे मार्क देईन. डायना इतकी सुंदर की पापणी न लवता तिच्याकडे पाहत राहावं. हा चार्ली चॅप्लिन इतका शांत कसा उभा? आता काहीतरी टिवल्या बावल्या करून आपल्याला हसवेल असं वाटतं. आपल्या बॉलिवूडकरांना, ऐश्वर्या आणि शाहरुख यांना तिथे पाहून अभिमान वाटला. मागे मी डिस्कव्हरी वाहिनीवर एक अनुबोधपट पाहिला होता. त्यात हे पुतळे कसे तयार केले जातात त्याची माहिती होती. प्रथम त्या व्यक्तीच्या शरीराची पाचशेहून अधिक मोजमापं घेतली जातात. डोळ्यांचा रंग, केसांचा पोत आणि कांती जुळवण्यासाठी अत्यंत सूक्ष्म काम केलं जातं. डोक्यावरचे केस किंवा दाढीचे वाढवलेले खुंट हे खरेखुरे मानवी केस असतात आणि ते चिकटवले नसून एकेक छिद्र करून त्यात खोवले जातात. अपार मेहनत आणि अफाट चिकाटी लागते एकेका पुतळ्यास उभा करण्यासाठी. या संग्रहालयाच्या संस्थापिका मेरी तुसाऊद या एक फ्रेंच कलाकार होत्या. त्यांच्या वारसांनी या व्यवसायाचा विस्तार करून जगातील प्रमुख शहरात त्यांच्या नावाने ही संग्रहालयं उभी केली आहेत.

म्युझियमच्या बाहेरील चौकात आलो आणि तिथे दोन-तीन ‘पुतळे’ उभे असलेले पाहून थबकलो. अंगाला ऑइलपेंटसारखा पुतळी रंग फासून, पुतळी वेष धारण करून तासनतास उभी असलेली ही जिवंत माणसं होती. अगदी निश्चल उभी. पापणीही हालत नव्हती त्यांची. धातूचा रंग अगदी केसापासून पायापर्यंत फासला होता तसाच वेषही पुतळी दिसावा म्हणून काही रसायनं वापरून कडक बनवला होता. वाऱ्याने त्याचं एखादं टोक हललं असतं तर पुतळ्याच्या आभासाला धक्का पोहोचला असता. पर्यटक त्यांच्या बरोबर उभं राहून फोटो काढायचे आणि बदल्यात त्यांच्यासमोर ठेवलेल्या हॅट मध्ये खुर्दा जमा व्हायचा. त्याच वेळेला अचानक हालचाल करून ते सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देतात. केवढा विरोधाभास ! आतल्या म्युझियममध्ये मेणाचे पुतळे अगदी जिवंत वाटतात आणि बाहेर जिवंत माणसं हुबेहूब पुतळ्यासारखी. दोन्ही कलाकार कौतुकास पात्र !

जगभरातील म्युझियममध्ये निळ्या-पांढऱ्या रंगसंगतीची चिनीमातीची मोठाली भांडी पाहिली की ती चिनी राजघराण्यांकडून मिळालेली भेट असावी असा निष्कर्ष आपण निःशंकपणे काढतो. परंतु हेग जवळील डेल्फ शहर हेही या ‘ब्लु पॉटरी’ करता प्रसिद्ध आहे हे ऐकून ती पाहण्याची आमची उत्सुकता वाढली. सतरावं शतक हा डचांचा सुवर्णकाळ ! तिथल्या व्यापाऱ्यांनी चीनमधून ही भांडी विक्रीसाठी आणली आणि बघता बघता ती खूप लोकप्रिय झाली; परंतु त्याची किंमत सगळ्यांच्याच खिशाला परवडण्यासारखी नव्हती. डेल्फ शहरातील कुंभारांनी मग तशीच भांडी बनवण्याचा चंग बांधला. १६५३ मध्ये स्थापन झालेल्या आणि अजूनही पारंपरिक पद्धतीनं आपलं हस्तकौशल्य जपणाऱ्या ‘रॉयल डेल्फ’ या फॅक्टरीत आम्ही गेलो. मशीनचा किंवा साच्याचा वापर नसल्यामुळे येथील प्रत्येक नमुना वेगळा दिसला. त्यावरील नक्षीकामात पवनचक्क्या, ट्युलिप, बूट, ग्रामीण जीवन या डच संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या गोष्टी चित्रित केल्या होत्या. हा इतका सुंदर निळा रंग एका रासायनिक प्रक्रियेचं रूप आहे हे एक नवलच ! कारागीर जेव्हा या भांड्यांवर नक्षी काढतात तेव्हा त्याचा रंग काळा असतो. पण जेव्हा त्याला हजार डिग्रीपेक्षा अधिक तापमानाच्या भट्टीची आंच लागते; तेव्हा त्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे त्याचं सुंदर निळ्या रंगात रूपांतर होतं. मला आपल्या पंढरीच्या ‘वेड्या कुंभाराची’ आठवण झाली. सावळ्याचा तोच स्वर्गीय निळा रंग!

लेखिका आणि ट्रॅव्हलर

Mumbai : बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

पाकिस्तानातील क्वेट्टा येथे भीषण स्फोट; रेल्वे ट्रॅकजवळील हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

Bhayandar : पोलिसांकडूनच वृक्षतोड; उत्तनमधील प्रकार, पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार