वाळवंटातील विविधता 
अक्षररंग

वाळवंटातील विविधता

वाळवंट म्हटलं की डोळ्यांसमोर उष्ण वाळू, पाण्याचा अभाव आणि निर्जीव प्रदेश उभा राहतो. पण ही वाळवंटे नेमकी कशी निर्माण होतात आणि ती खरोखरच ओसाड असतात का, यामागचं विज्ञान आणि निसर्गाचं वैविध्य तितकंच रंजक आहे.

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

वाळवंट म्हटलं की डोळ्यांसमोर उष्ण वाळू, पाण्याचा अभाव आणि निर्जीव प्रदेश उभा राहतो. पण ही वाळवंटे नेमकी कशी निर्माण होतात आणि ती खरोखरच ओसाड असतात का, यामागचं विज्ञान आणि निसर्गाचं वैविध्य तितकंच रंजक आहे.

गेल्याच आठवड्यात आपण वाळवंटे शुष्क तरीही जिवंत कशी असतात याची काही उदाहरणे बघितली. पण मुळात वाळवंट निर्माणच कशामुळे होते ? एक सर्वसाधारण समजूत असते की, जंगलांचा नाश झाला, झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली गेली की, तो भाग उजाड, मोकळा, रखरखीत होतो. त्यामुळे तिथे वनस्पती उगवत नाहीत आणि मग वाळवंट तयार होतं. पण आपल्या पृथ्वीच्या पाठीवर अमेरिका खंडापासून ते ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत जी वेगवेगळी वाळवंटे बघायला मिळतात ती तर माणसाने निसर्ग नाश करण्याच्या आधीपासून आहेत. म्हणजे फक्त माणसाने झाडे तोडली, जंगले नष्ट केली म्हणून वाळवंट तयार होत नाही हे नक्की. उदाहरण म्हणून आफ्रिका खंडातील आणि जगातील उष्ण कटिबंधातील आकाराने सर्वात मोठे वाळवंट असलेल्या सहाराची जन्मकथा पाहूया.

आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात सुमारे ९२ लाख चौरस किलोमीटरच्या परिसरात सहारा वाळवंट पसरलेले आहे. हे वाळवंट आफ्रिका खंडातील पावसाचे चक्र बदलल्याने (बिघडल्याने?) निर्माण झाले असे संशोधकांच्या लक्षात आले. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतील मान्सूनने आपली दिशा बदलली आणि त्यामुळे उत्तर आफ्रिकेतील पावसाचे प्रमाण अगदीच कमी झाले. त्या आधीच्या हिमयुगाच्या शेवटी म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व ८००० ते ६००० या काळात या भागावर जे बर्फाचे आवरण होते, ते वितळल्यानंतर हा भाग कोरडा झाला. या सगळ्यामुळे इथली हिरवाई, पाणी नष्ट झाले आणि वाळवंट तयार झाले. मात्र हे वाळवंट तयार होण्याचेही एक चक्र आहे आणि संशोधकांच्या अंदाजानुसार आणखी पंधरा हजार वर्षांनी सहारा वाळवंटाचे रूपांतर पुन्हा हिरव्यागार प्रदेशात होईल.

पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलिया खंडातल्या एकूण भूभागापैकी १८% भूभाग वाळवंटाने व्यापलेला आहे. मात्र त्याच्या दुप्पट आकाराच्या भूभागावर इतका कमी पाऊस पडतो की एकत्रितपणे हा सगळाच भाग ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट म्हणून ओळखला जातो. खरे म्हणजे या भागात सरासरी सुमारे १० इंच पाऊस पडतो, पण पाण्याचे बाष्पिभवन अतिशय झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हा भाग कोरडा पडतो. पश्चिम ऑस्ट्रेलियातील सागरकिनाऱ्यावरच्या थंड प्रवाहांमुळे

तिथे पाण्याचे ढगच तयार होत नाहीत. शिवाय ऑस्ट्रेलियात आकाशातले पाण्याचे ढग अडवू शकतील अशा पर्वतरांगाही नाहीत. त्यामुळे जमीन वैराण, ओसाड होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र अशा उजाड, ओसाड वाटणाऱ्या वाळवंटी प्रदेशात इथले स्थानिक जमातींचे लोक सुमारे ५० हजार वर्षांपासून राहात आले आहेत. वाळवंटाच्या विविध भागात उपलब्ध असणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांचा उपयोग करून हे स्थानिक आपलं भटकं आयुष्य जगतात. या खंडात युरोपमधून गोरे लोक येण्याआधी इथल्या वाळवंटांमध्ये सुमारे १०३ प्रजातींचे सस्तन प्राणी राहात होते. मानवी हस्तक्षेपामुळे त्यातील जवळपास १९ जातींचे प्राणी नष्ट झाले. पण कांगारूंचे प्रकार, वॉलबींचे प्रकार, डिंगो (रानकुत्र्यांची एक जात), सरड्यांचे विविध प्रकार, कीटकभक्षी वटवाघळे असे प्राणी आजही पाहायला मिळतात. मानवी वस्तीबरोबर आलेले आणि मुळात इथले नसलेले उंटही या वाळवंटाचे रहिवासी बनले आहेत. शिवाय ३०० प्रकारचे पक्षी इथे आहेत. त्यात एमू, कोकॅटो, घुबडे, पोपट आणि शिकारी पक्ष्यांचा समावेश होतो. या वाळवंटात उगवणारी 'हनी ग्रेव्हिले' ही वनस्पती इथल्या स्थानिक आदिवासींसाठी अन्न आहे. या वनस्पतीच्या काट्यांसारख्या पिवळ्या फुलांचं हे लोक सरबत करतात.

या वाळवंटातल्या स्ट्रीप मिंटबुश या झाडाच्या पानांना पुदिन्याचा वास तर येतोच, पण हे झाड औषधीही आहे. सर्दी आणि तापावर या झाडापासून औषध बनवतात तसेच जखम भरून यायलाही या झाडाचा वापर केला जातो. आशियातील चीन आणि मंगोलियात मिळून पसरलेले गोबीच वाळवंट अनोखे आहे, कारण इथल्या खडकाळ, रेताड भूभागावर हिवाळ्यात काही वेळा बर्फही पडतो.

उन्हाळ्यात इथले तापमान ४५ अंशांपर्यंत जातं, तर हिवाळ्यात ते उणे ४० अंशांपर्यंत खाली घसरते. हा सगळा भूभाग सुमारे दोन ते चार हजार फूट उंचीवर असल्याने इथले हवामान थंडच असते. त्यामुळे गोबीचे वाळवंट शीत वाळवंटापैकी मानले जाते. मात्र या वाळवंटातही वैविध्यपूर्ण वन्यजीव पाहायला मिळतात.

सायबेरियन आयबेक्स, कोरसॅक फॉक्स, आशियाई रान गाढवे, काळ्या शेपटीचे चिंकारा, अरगली मेंढ्या या प्राण्यांबरोबरच माणसाळलेले बॅक्ट्रिअन कॅमेल्स अर्थात दोन मदारींचे उंटही गोबीच्या वाळवंटात आहेत.

सँड्ङ्ग्राऊजपासून ते गिधाडांपर्यंत अनेक प्रकारचे पक्षीही या वाळवंटात राहतात. इतर अनेक वाळवंटांप्रमाणेच गोबीचे वाळवंटही विस्तारत आहे. त्याच्या या विस्तारण्याचा त्रास चीनला मोठ्या प्रमाणावर भोगावा लागत आहे. एका पाहणीनुसार दरवर्षी चीनमधील सुमारे ३६०० चौ.कि.मी.चा परिसर गोबीच्या वाळवंटात समाविष्ट होत आहे. तसेच आणखी एका पाहणीनुसार दरवर्षी या वाळवंटातून उठणाऱ्या धुळीच्या वादळांमुळे चीनमधील दोन हजार चौ.कि.मी. परिसरातील जमिनीवरचा सुपीक मातीचा थर उडून जातो आणि जमीन नापीक होते. या सगळ्या गोष्टींमुळे चीनच्या शासनाने गोबीचे वाळवंट रोखण्यासाठी झाडांची हिरवी भिंत उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. १९७८ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प २०५० मध्ये पूर्ण होईल. या अंतर्गत ४८२८ किलोमीटर लांबीची झाडांची भिंतच वाळवंटाच्या समोर उभी करण्यात येईल.

आजपर्यंत सुमारे ६६ अब्ज झाडे यासाठी लावून झाली आहेत. मानव निर्मित अरण्याची ढाल वापरून वाळवंटाला अडवण्याची कल्पना नावीन्यपूर्ण असली तरी या प्रकल्पाचे स्थानिक निसर्गावर होणारे गैरपरिणाम आता दिसू लागले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे लावल्यामुळे जमिनीच्या खालची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे, आधीच हा भाग अल्प पावसाचा असल्याने मुळात इथे पाण्याची टंचाई असते, त्यात या प्रकल्पातील झाडांमुळे आणखी भर पडली आहे. त्याचबरोबर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी फक्त झपाट्याने वाढणाऱ्या झाडांचेच रोपण करण्यात येत असल्याने 'मोनो कल्चर' वनिकरण झाले आहे. त्यामुळे परिसरातील जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. या नव्याने लावलेल्या झाडांमध्ये अनेक परदेशी झाडे असून त्यामुळे स्थानिक वनस्पतींवर गदा आली आहे.

जगाच्या पाठीवर असलेल्या वेगवेगळ्या भूभागातील आणि हवामानातील वाळवंटे ही जगाच्या जैविक विविधतेचा हिस्सा आहेत. या वाळवंटांच्या आधाराने माणसांप्रमाणे अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती नांदतात. त्यामुळे वाळवंट म्हणजे केवळ रेताड, रुक्ष आणि ओसाड भाग नाही हे विसरता कामा नये.

निसर्ग अभ्यासक व लेखक makarandvj@gmail.com

Instagram वरील बाल लैंगिक शोषणासंबंधी जाहिराती हटवा; Meta ला केंद्र सरकारची नोटीस

Mumbai Rain: मुसळधार पावसाने मुंबईची गती मंदावली; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर संथ वाहतूक; अनेक भाग जलमय, VIDEO

Mumbai : रुळावर अडकलेल्या भटक्या कुत्र्यासाठी मोटरमनने थांबवली लोकल; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

पावसाचा ठाणे-पालघर-रायगडला तडाखा! २४ तासांत सरासरी ८५.९ मिमी बरसला; पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर

मुंबई परिसरात दमदार, धरण क्षेत्रात 'संथ'धार; धरण क्षेत्रात दमदार इनिंगची प्रतीक्षाच, पाणी पातळीत किंचित वाढ