अक्षररंग

मातृभाषेचं जतन म्हणजे घरट्याचं रक्षण

मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळे मेंदूचा विकास अधिक गतीने होतो, हे सिद्ध झालेले असतानाही प्राथमिक स्तरावर मातृभाषा नीट शिकण्यापूर्वीच इतर भाषांचे ओझे मुलांवर लादणे केवळ चुकीचेच नसून मानसशास्त्राच्या, शिक्षणशास्त्राच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राचा आग्रह आजही कायम असताना प्राथमिक स्तरावर मातृभाषा बळकट होणे का आवश्यक आहे, त्याविषयी मानसशास्त्र काय सांगते, ते समजून घेणे गरजेचे आहे.

नवशक्ती Web Desk

हितगुज

डॉ. शुभांगी पारकर

मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळे मेंदूचा विकास अधिक गतीने होतो, हे सिद्ध झालेले असतानाही प्राथमिक स्तरावर मातृभाषा नीट शिकण्यापूर्वीच इतर भाषांचे ओझे मुलांवर लादणे केवळ चुकीचेच नसून मानसशास्त्राच्या, शिक्षणशास्त्राच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राचा आग्रह आजही कायम असताना प्राथमिक स्तरावर मातृभाषा बळकट होणे का आवश्यक आहे, त्याविषयी मानसशास्त्र काय सांगते, ते समजून घेणे गरजेचे आहे.

मूल ज्या भाषेत आईच्या कुशीत गुंजन करते, ती त्याची आईची भाषा, म्हणजेच मातृभाषा. भाषा ही केवळ संवादाची जुळवाजुळव नसते; तर ती बालकाच्या विचारांचा, भावनांचा, संस्कृतीचा आणि ओळखीचा पाया असते. मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे त्यांच्या आकलनात्मक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी महत्त्वाची असतात. म्हणूनच, शिक्षणाच्या पहिल्या पायरीवर भाषा ही मुलांच्या विकासातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. गेली काही वर्षे जागतिक स्तरावरही मातृभाषेचे महत्त्व समजून घेतले जात आहे. म्हणूनच मातृभाषेच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक महत्त्वाकडे पुन्हा लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

जागतिक पातळीवरील संशोधनातून असे दिसून आले आहे की, जेव्हा मुलांना त्यांना परिचित असलेल्या मातृभाषेत शिकवले जाते तेव्हा त्यांच्यामध्ये शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्याची आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता जास्त असते. याव्यतिरिक्त, जेव्हा मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवले जाते तेव्हा शिकलेली माहिती स्मृतीत टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. यामुळे त्यांच्या भविष्यातील शिक्षणाचा पाया मजबूत होतो.

मातृभाषा : हृदय आणि मनाची भाषा

माणसाच्या ओळखीचा पाया त्याच्या आईच्या भाषेमध्ये उगम पावतो. हीच आईची भाषा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची पहिलीवहिली ओळख करून देते. आपली पहिली भावना, पहिले शब्द उच्चारण, पहिला विचार... हे सगळे आपण मातृभाषेतच अनुभवतो. व्यक्तीच्या जडणघडणीला, विचार व भावनांना आकार देण्यात मातृभाषा महत्त्वाची भूमिका बजावते. मुलाचे जगाविषयीचे पहिले आकलन, संकल्पना आणि परिचय, त्याला प्रथम कळलेल्या भाषेमधूनच सुरू होते. मातृभाषा आईच्या दुधासारखी असते. जसे आईचे दूध शिशूच्या शरीराला पोषण देते, तसे मातृभाषा त्याच्या मनाला, विचारांना आणि भावविश्वाला घडवत असते. त्यामुळेच मातृभाषेचा वापर आपण कसा करतो, याला फार मोठे महत्त्व आहे.

बालपण हा आयुष्यातला सर्वात कोवळा, संवेदनशील आणि मनावर खोल परिणाम करणारा काळ असतो. या काळातच आपल्या भावना, संस्कार आणि विचारांची मुळे रुजतात. हृदय, मेंदू आणि भाषा यांच्यातली नाळ ही मातृभाषेतूनच बांधली जाते. मातृभाषाच आपली विचार करण्याची, स्वप्न पाहण्याची, भावना व्यक्त करण्याची भाषा असते.

मातृभाषा : संस्कृतीचा दुवा

आपण आपले कुटुंब आणि आप्तेष्ट यांच्याशी मातृभाषेतून संवाद साधतो. हीच भाषा आपल्याला आपल्या संस्कृतीशी, परंपरांशी, मूल्यांशी आणि ओळखीशी जोडते. संस्कृती आणि मातृभाषा यांच्यात गहिरी वीण असते. म्हणूनच ज्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेचे ज्ञान नसते, त्यांना आपली संस्कृती आणि मुळांशी नाते जुळवणे कठीण जाते. घरातील कथा, म्हणी, बडबड गीतं, सणांची गोडी- हे सर्व मातृभाषेतूनच हृदयाच्या गाभ्यात पोहोचते. दिवाळी हा सण जगभर साजरा होतो, पण मराठीतले ‘फटाके’, ‘अभ्यंगस्नान’, ‘फराळ’, ‘रांगोळी’ हे शब्द जी भावनात्मक गुंतवणूक व्यक्त करतात, तसे परकीय भाषेतले शब्द करत नाहीत. भाषा बदलली की सणाचा अनुभव, त्यातील अर्थ आणि त्याच्याशी असलेली आपली नाळही काही प्रमाणात बदलते. जर आपली मातृभाषा लुप्त झाली, तर केवळ शब्दच नाहीसे होणार नाहीत, तर आपला सांस्कृतिक वारसा आणि परंपराही हरवतील. म्हणूनच, मातृभाषेचे जतन म्हणजे आपल्या घरट्याचे रक्षण.

संज्ञानात्मक आणि शैक्षणिक विकास

विविध भाषा शिकण्याची प्रक्रिया मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देते. मात्र यासाठी पहिला पाया मजबूत हवा आणि तो पाया म्हणजे आईभाषा. संशोधनातून असे दिसून आले आहे की, मातृभाषेत शिक्षण घेतल्याने संज्ञानात्मक विकास चांगला होतो आणि शैक्षणिक यश मिळते. ज्या मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिले जाते त्यांच्याकडे भाषा कौशल्यांचा पाया मजबूत असतो, जो त्यांच्या एकूण शिकण्याच्या क्षमतेवर सकारात्मक परिणाम करू शकतो. शिकण्यासाठीची सर्वोत्तम भाषा म्हणजे आपल्या मनाची भाषा. म्हणूनच शैक्षणिक दृष्टिकोनातूनही मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शास्त्रीय संशोधन सांगते की, लहान मुले त्यांच्या मातृभाषेत शिकल्यास त्यांची समज अधिक चांगली होते, आकलनक्षमता वाढते, ज्ञान टिकून राहते आणि विचारशक्ती विकसित होते. त्यामुळे अनेक देशांनी ‘मातृभाषा-आधारित बहुभाषिक शिक्षण’ (Mother Tongue-Based Multilingual Education-MTB-MLE) हा युनेस्कोने शिफारस केलेला प्रस्ताव स्वीकारला आहे, या पद्धतीमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने शिकू लागतात. भारताच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये (२०२०) देखील या संकल्पनेला महत्त्व देण्यात आले असून, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर मातृभाषेच्या वापरावर भर दिला गेला आहे. त्यामुळे शिक्षण समजून घेणे, विचार प्रक्रियेचा विकास होणे आणि इतर भाषा आत्मसात करणे या बाबी अधिक प्रभावीपणे होतात.

भावनिक बंध आणि सर्जनशील प्रेरणेचा गाभा

मातृभाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही. साहित्य, कविता, संगीत व अन्य कला या मातृभाषेतूनच मनाच्या गाभ्याला भिडतात, कारण त्या भाषेत संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली असतात. सर्जनशील अभिव्यक्तीसाठी मातृभाषा आवश्यक असते. आपल्या कलात्मक योगदानातून कोणतीही भाषा सांस्कृतिक जगात महत्त्वाचे स्थान प्राप्त करत असते. भाषा ही सक्षमीकरण आणि समावेशकतेचे साधन आहे. एखाद्याला जर सार्वजनिक चर्चेत भाग घेता आला, माहिती मिळवता आली आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होता आले, तरच समाजात त्याचा आवाज ऐकला जातो. हा असा प्रत्येकाचा आवाज ऐकला गेला तरच समतोल साधला जातो. मातृभाषेमुळेच सार्वजनिक जीवनात अधिक सक्षमतेने सहभागी होता येते. स्थानिक बाजारपेठा, व्यवसाय आणि सामाजिक गट यांच्याशी संवाद साधण्यासाठी मातृभाषेवरील प्रभुत्व नवीन आर्थिक व सामाजिक संधी निर्माण करते. मातृभाषा केवळ व्यक्तिगतच नाही, तर सामाजिक जीवनातही सुरक्षिततेची भावना निर्माण करते. म्हणूनच, मातृभाषेचे जतन व संवर्धन करणे ही केवळ भावनिक गरज नसून, ती संपूर्ण समाजाच्या सृजनशील, सामाजिक व मानसिक आरोग्याची हमी आहे. सशक्त मातृभाषेच्या माध्यमातूनच आपण परस्पर जोडलेल्या जागतिक समाजाचे नागरिक होऊ शकतो.

एक मनोचिकित्सक म्हणून मला अनेकदा विचारले जाते की, “ज्यावेळी सगळे जग इंग्रजीने व्यापलेले आहे, त्यावेळी आमच्या मुलांनी का म्हणून मातृभाषेवर लक्ष केंद्रित करावे?” आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी ही केवळ एक भाषा न राहता शिक्षण, व्यवसाय आणि डिजिटल संवादाचे प्रमुख साधन ठरली आहे. केंब्रिज इंग्लिशच्या अहवालानुसार, जिथे इंग्रजी ही अधिकृत भाषा नाही अशा देशांमध्येही ९५ टक्क्यांहून अधिक लोक इंग्रजीचे महत्त्व मान्य करतात. उच्च शिक्षण, आंतरराष्ट्रीय संशोधन, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकऱ्या, तसेच आंतरसंवादी व्यासपीठांवरील संधी यासाठी इंग्रजीवरील प्रभुत्व आवश्यक आहे. आज जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन, चित्रपट, संगीत, साहित्य हे प्रामुख्याने इंग्रजीतून उपलब्ध आहे. त्यामुळे इंग्रजी ही भाषा माहिती, ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अथांग सागराकडे नेणारे प्रवेशद्वार ठरते. तिचे महत्त्व नाकारता येत नाही.

पण म्हणून मुले त्यांच्या मातृभाषेपूर्वीच इंग्रजी शिकू शकतात का? तुमची मातृभाषा चांगली असेल तरच तुम्ही इंग्रजी भाषेवर किंवा दुसऱ्या कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळ‌वू शकता. मातृभाषेतील शिक्षणामुळे केवळ भाषेचाच नव्हे, तर मेंदूचा विकासही अधिक गतिमान होतो.

शाळेत जाणाऱ्या १७,००० ब्रिटिश मुलांवर केलेल्या आतापर्यंतचा सर्वात मोठ्या अभ्यासातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे, जे विद्यार्थी वयाच्या अकराव्या वर्षी फ्रेंच भाषा शिकायला सुरुवात करतात, ते आठव्या वर्षी सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा भाषेतील प्रावीण्य चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी करतात. या निरीक्षणांतून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो - भाषा शिकवण्याच्या बाबतीत ‘लवकर म्हणजे चांगले’ हे समीकरण अचूक ठरत नाही. प्रत्यक्षात वय वाढल्यावर मुलांच्या आकलनक्षमतेचा विकास अधिक झालेला असतो. त्यामुळे त्या वयात मुलं व्याकरणात्मक पातळीवर आणि संदर्भांच्या स्तरावर अधिक समजूनउमजून भाषा आत्मसात करू शकतात. या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की, लहान वयात अपरिचित भाषा शिकवण्याचा आग्रह धरला गेला तर तो एकप्रकारचा बोजा ठरू शकतो. भाषेची गोडी, उपयोग आणि शिकण्याची आतून उत्पन्न होणारी प्रेरणा ही मुलांच्या बौद्धिक पातळीशी आणि सामाजिक संदर्भांशी सुसंगत असली पाहिजे. त्यामुळेच, कोणतीही भाषा मुलांवर थोपवली जाऊ नये. भाषा शिकण्याची प्रक्रिया नैसर्गिक, आनंददायी आणि सभोवतालच्या वातावरणाशी सुसंगत असली तरच ती खरी प्रभावी ठरते.

बहुभाषिकतेचं ओझं

कोणतीही नवीन भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याआधी एक मूलभूत प्रश्न विचारला गेला पाहिजे - ही भाषा मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्रत्यक्षात कितपत पोषक ठरणार आहे? केवळ धोरणात्मक किंवा राजकीय निर्णय म्हणून किंवा ‘बहुभाषिकता चांगली’ या गृहितकावर आधारित पद्धती ही शिक्षणाबाबत मूलभूत प्रश्न उपस्थित करणारी ठरते. ज्या भाषेला स्थानिक सांस्कृतिक वातावरणात आधार नसेल, डिजिटल युगात तिचा व्यावहारिक/तांत्रिक वापर कमी असेल किंवा भविष्यात त्या भाषेच्या कौशल्यामुळे मुलांना शिक्षण, रोजगार किंवा सामाजिक संवादात काही विशेष लाभ होणार नसेल, तर अशी भाषा शिकवणे हा केवळ वेळेचा अपव्यय ठरतो. नावापुरत्या बहुभाषिकतेसाठी अशा भाषा शिकविल्या गेल्यास त्याचा उपयोग न होता उलट मुलांसाठी ते एक मानसिक ओझं बनते. अशावेळी अशा एखाद्या भाषेचा अभ्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात काही ठोस भर घालतो का, याचा विचार करणे नितांत गरजेचे आहे.

भाषा म्हणजे संवाद, आत्मविश्वास, संधी आणि सांस्कृतिक समृद्धीचा सेतू असतो. मात्र ही संपन्नता तेव्हाच फलद्रूप ठरते जेव्हा ती भाषा जीवनाशी आणि विकासाशी जोडलेली असते. म्हणूनच, कोणतीही नवी भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट करताना तिचा सांस्कृतिक, सामाजिक व विकासात्मक उपयोग अभ्यासूनच निर्णय घेतला गेला पाहिजे. अन्यथा ही कृती फक्त मुलांच्या शैक्षणिक तणावात भर घालणारी ठरेल.

ज्येष्ठ मनोचिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास