नवलनगरी
सोनाली कोलारकर-सोनार
मैत्रीला वय नसतं, हे आपण ऐकलंय! पण दोन देशांमधील मैत्रीला चक्क शंभर वर्षे पूर्ण झाली, तर? भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील खेळांची मैत्री यंदा शंभर वर्षांची झाली आहे. हॉकीच्या मैदानावर सुरू झालेली ही मैत्री क्रिकेटसह अनेक खेळांमधून अधिक घट्ट झाली. चला, या शंभर वर्षांच्या रंजक प्रवासातील काही भन्नाट गोष्टी जाणून घेऊया!
बालमित्रांनो, एखादी व्यक्ती, संस्था, पूल, इमारत, वस्तू अशा गोष्टींना शंभर वर्षे झाल्याचे आपण बरेचदा ऐकतो! त्या गोष्टीचे मग छान सेलिब्रेशनही करतो. पण या महिन्यात एक वेगळीच नवलकथा दोन देशांनी साजरी केली आहे! आणि ती आहे खेळांच्या मैत्रीला झालेली शंभर वर्षे! म्हणजे काय बुवा? तर ऐकाच!
भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांचे कायमच सगळ्याच बाबतीत एकदम चांगले संबंध आहेत आणि या वर्षी यांच्यातील क्रीडा संबंधांना १०० वर्षे पूर्ण झालीत! तर झालं असं की, १९२६ मध्ये भारतीय लष्कराच्या हॉकी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला होता. २६ जून १९२६ रोजी क्राइस्टचर्च येथे खेळवला गेलेला या दौऱ्यातील सामना भारताच्या इतिहासातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना मानला जातो.
या ऐतिहासिक १९२६ च्या दौऱ्यात तरुण मेजर ध्यानचंद सामील होते. त्यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला गोल केला आणि संपूर्ण दौऱ्यातील २१ सामन्यांत भारतीय संघाने केलेल्या १९२ गोलांपैकी तब्बल ८० गोल एकट्या ध्यानचंद यांनी केले होते. यावर्षी, २०२६ ला, या ऐतिहासिक घटनेला शंभर वर्षे झालीत.
या शंभर वर्षांत भारत आणि न्यूझीलंडने क्रीडाविश्वात आपली मैत्री अधिकच घट्ट केली. या दोन देशांमध्ये फक्त हॉकी आणि क्रिकेट नाही, तर इतरही खेळ अतिशय खिलाडूवृत्तीने खेळले गेले. दोन्ही देशांनी एकमेकांकडून खेळाच्या अनेक नवीन गोष्टी शिकल्या आणि एकमेकांना शिकवल्या आणि म्हणूनच या शंभर वर्षांचा उत्सव साजरा करणारा आणि ही खिलाडूवृत्ती वृद्धिंगत करणारा शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला.
१९२६ चा तो पहिला दौरा न्यूझीलंड हॉकी असोसिएशनचे तत्कालीन सचिव हॅव्हिलाह डाऊन यांनी आयोजित केला होता. तब्बल १०० वर्षांनंतर, २०२६ मधील या शताब्दी सोहळ्याचे नेतृत्व त्यांचे नातू पीटर मिस्किमिन यांनी केले आणि मेजर ध्यानचंद यांच्या वंशजांशी संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दोन्ही देशांतील क्रीडासंबंध १९२६ मध्ये हॉकीने सुरू झाले असले, तरी क्रिकेटच्या मैदानावर दोन्ही देश पहिल्यांदा १९ नोव्हेंबर १९५५ रोजी हैदराबाद येथे आमनेसामने आले. भारत-न्यूझीलंडच्या पहिल्या कसोटी सामन्यालाही ७१ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने न्यूझीलंड क्रिकेटने ‘कोटाहितांगा’ नावाची विशेष आवृत्तीची एकदिवसीय जर्सी सादर केली आहे. या महिन्यात भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा संघ ही जर्सी घालून खेळणार आहे.
या जर्सीवर भारतीय आणि पारंपरिक माओरी कलाकृतींचा संगम आहे. यामध्ये कमळाची फुले, मंडला कला आणि भारतीय वास्तुकलेतील नमुन्यांसोबतच माओरी ‘कोव्हायव्हाय’ आणि ‘हाएहाए’ हे न्यूझीलंडचे नक्षीकाम आहे. जर्सीवर ‘खेळातून एकतेची १०० वर्षे, न्यूझीलंड आणि भारत’ असा संदेश आहे आणि न्यूझीलंडच्या पांढऱ्या फर्नसोबत भारतीय सांस्कृतिक चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे. बेन थॉमसन, शिव नारंदस आणि जय पांचा या तीन कलाकारांनी मिळून ही जर्सी डिझाइन केली आहे.
हॉकीच्या मैत्रीला शंभर वर्षे झाल्यानिमित्त शताब्दी विशेष हॉकी मालिका देखील आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ नोव्हेंबर २०२६ मध्ये ऑकलंड येथे विशेष ‘शताब्दी हॉकी मालिका’ खेळली जाणार आहे, ज्यात भारतीय सशस्त्र दलाचा संघही सहभागी झाला आहे.
या शंभर वर्षांत अनेक गमती घडल्या. त्यातील काही निवडक-
१९२६ पूर्वी न्यूझीलंडचा संघ चेंडू लांबवर मारण्याच्या (Long Hitting) शारीरिक शैलीत हॉकी खेळायचा. मात्र, भारतीय संघाचे अचूक पासिंग आणि बॉल कंट्रोल पाहून न्यूझीलंडने आपली शैली बदलली. या बदलाचा फायदा त्यांना पुढे १९७६ च्या माँट्रियल ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताना झाला.
१९२६ च्या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू हेवी बूट घालण्याऐवजी साधे कॅनव्हासचे शूज किंवा अनवाणी पायाने मैदानावर उतरायचे. न्यूझीलंडच्या थंड आणि ओल्या मैदानांवर भारतीय खेळाडूंचा वेग आणि बॉलवरील नियंत्रण पाहून तिथले प्रेक्षक आणि समालोचक अवाक झाले होते.
१९२६ च्या दौऱ्यात भारतीय लष्कराच्या हॉकी संघाने न्यूझीलंडच्या स्थानिक संघांविरुद्ध इतका जबरदस्त खेळ केला की, एका सामन्यात त्यांनी २०-१ अशा फरकाने विजय मिळवला. संपूर्ण दौऱ्यातील २१ सामन्यांपैकी भारताने १८ सामने जिंकले, २ अनिर्णित राहिले आणि फक्त एकाच सामन्यात त्यांचा पराभव झाला.
त्या काळात न्यूझीलंडमध्ये भारतीय वंशाचे लोक खूपच कमी होते. त्यामुळे जेव्हा भारतीय हॉकी संघ तिथे पोहोचला, तेव्हा स्थानिक वर्तमानपत्रांनी त्यांचे वर्णन “आशियातील दुर्मिळ प्रवासी” असे केले होते.
मेजर ध्यानचंद यांच्या खेळण्याची जादू जगप्रसिद्ध होण्याची सुरुवात याच १९२६ च्या न्यूझीलंड दौऱ्यापासून झाली. तिथल्या माध्यमांनी त्यांच्या स्टिकवर्कचे इतके कौतुक केले की, त्यांच्या खेळाची कीर्ती थेट युरोप आणि ऑलिम्पिक समितीपर्यंत पोहोचली.
भारत आणि न्यूझीलंड क्रिकेटमध्ये नेहमीच खिलाडूवृत्तीसाठी ओळखले जातात. १९६८ मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडच्या भूमीवर आपला पहिला परदेशी कसोटी विजय नोंदवला होता, तर २०१९ च्या विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतरही भारतीय चाहत्यांनी केन विल्यमसन आणि न्यूझीलंड संघाच्या शांत स्वभावाचे जगभरात कौतुक केले.
गेल्या शतकभरात दोन्ही देशांतील संबंध इतके घट्ट झाले की, आज न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व अनेक भारतीय वंशाचे खेळाडू करत आहेत. यात रचिन रवींद्र, अजाज पटेल (ज्याने भारताविरुद्ध एकाच डावात १० बळी घेतले), ईश सोधी आणि जितन पटेल यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
भारत आणि न्यूझीलंड हे असे दोन संघ आहेत, ज्यांनी आयसीसीच्या तिन्ही प्रमुख स्पर्धांच्या (वनडे वर्ल्ड कप, टी-२० वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) बाद फेरीत एकमेकांविरुद्ध अत्यंत रोमांचक सामने खेळले आहेत.
माओरी ‘हाका’ आणि भारतीय संस्कृतीचा संगम
२०२६ मधील या शताब्दी सोहळ्यादरम्यान न्यूझीलंडच्या खेळाडूंनी पारंपरिक ‘हाका’ नृत्य सादर करून भारतीय संघाचे स्वागत केले, तर भारतीय संघाने तिरंग्याच्या साक्षीने त्यांना मानवंदना दिली. आहे ना खूपच प्रेरणादायी नवलकथा! दोन देश जर खेळताना इतकी खिलाडूवृत्ती शंभर वर्षे जपू शकतात, तर आपण आपल्या मित्रमंडळासोबत तर नक्कीच आनंदाने मैदानात खेळू शकतो! हो ना? मग चला, या दोन देशांना मानाचा मुजरा करायला मोबाईल खाली ठेवून मैदानात जाऊ या!
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक
sonalikolarkarsonar@ gmail.com