विशेष
जगदीश काबरे
नुकतीच वर्धा इथे ब्राईट्स सोसायटीतर्फे नास्तिक परिषद पार पडली. नास्तिक हा विषय गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये धर्मवादाचे प्रस्थ वाढले असून नास्तिक मंडळींवर ते अनीतीमान असल्याचा आरोप केला जातो. म्हणूनच नास्तिकता म्हणजे काय? पाश्चात्य नास्तिकता आणि भारतीय नास्तिकता यात नेमका कोणता फरक आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
भारतीय आणि पाश्चात्य नास्तिकता या दोन्ही परंपरांचा जन्म, विकास आणि उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. नास्तिकता म्हणजे केवळ ‘देव नाकारणे’ एवढेच नसून ती विश्व, मनुष्य आणि नैतिकतेविषयीची स्वतंत्र विचारपद्धती आहे.
भारतीय परंपरेत नास्तिकता ही अत्यंत प्राचीन आहे. वैदिक धर्मात देववाद अस्तित्वात असतानाच ‘चार्वाक’, ‘लोकायत’, ‘आजीवक’, ‘बौद्ध’ आणि ‘जैन’ अशा नास्तिक पंथांचा उदय झाला. या नास्तिक मतांमध्ये ‘देव’, ‘आत्मा’ आणि ‘परलोक’ या संकल्पनांना नकार देऊन प्रत्यक्ष अनुभूती आणि तर्क यांना सत्याचे मापदंड मानले गेले. चार्वाकांनी स्पष्ट सांगितले की – “प्रत्यक्षमेव प्रमाणं” म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हेच खरे ज्ञानाचे साधन. त्यांच्या मते देवादिक कल्पना म्हणजे शोषक वर्गाने निर्माण केलेले आभास आहेत. बुद्धांनीही वेदांचे आणि देवांच्या अधिकाराचे खंडन केले, परंतु त्यांनी नैतिकता आणि करुणा यांवर आधारीत नास्तिक विचारप्रणाली निर्माण केली. म्हणूनच भारतीय नास्तिकतेत देव नाकारला गेला तरी धर्मनिरपेक्ष आचारसंहितेचा पाया घातलेला होता.
पाश्चात्य नास्तिकता मात्र भौतिकशास्त्र, विज्ञान आणि तर्कवादाच्या विकासातून उदयास आली. मध्ययुगीन ख्रिस्ती धर्माच्या अंधश्रद्धेला प्रतिसाद म्हणून डार्विन, हक्सले, स्पिनोझा, नित्शे, मार्क्स, फ्रॉयड, रसेल इत्यादी विचारवंतांनी देवाची संकल्पना नाकारली. पाश्चात्य नास्तिकतेत ‘God is Dead’ हा नित्शेचा घोष धार्मिक दडपशाहीविरुद्धच्या बौद्धिक क्रांतीचे प्रतीक ठरला. या नास्तिकतेने धार्मिक संस्थांना विरोध करून विज्ञान, मानवी स्वातंत्र्य आणि भौतिक प्रगतीला आधार दिला.
भारतीय नास्तिकता सामाजिकदृष्ट्या सहिष्णू आणि तत्त्वज्ञानप्रधान होती; ती अध्यात्मिकतेला विरोध करत नव्हती, तर त्यातील अंधश्रद्धेबाबत प्रश्न उपस्थित करत होती. पाश्चात्य नास्तिकता मात्र अधिक क्रांतिकारक आणि वैज्ञानिक स्वरूपाची होती. ती राजकीय आणि सामाजिक क्रांतीशी जोडलेली होती.
नास्तिक संकल्पनेचा भारतीय अर्थ
एवंगुणवैशिष्ट्य फरकामुळे ‘नास्तिक’ हा शब्द ऐकला की, अनेक भारतीयांच्या मनात लगेच नास्तिक म्हणजे धर्मविरोधी किंवा ईश्वर नाकारणारी व्यक्ती अशी प्रतिमा उभी राहते. पण हा खूप वरवरचा अर्थ झाला. कारण भारतीय आणि पाश्चात्य विचारसरणीत नास्तिकतेचा अर्थ आणि त्याचे उपयोजन फार वेगळे आहे. भारतीय नास्तिकता ही तत्त्वचिंतनात्मक आणि आध्यात्मिक प्रश्नांची चिकित्सा करणारी आहे, तर पाश्चात्य नास्तिकता ही मुख्यत्वे ईश्वराच्या अस्तित्वाचा निषेध करणारी भूमिका घेते. म्हणून नास्तिक या एकाच शब्दाच्या पौर्वात्य आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानात अर्थछटा भिन्न आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात पारंपरिक अर्थाने नास्तिक म्हणजे ‘जो वेदांना प्रमाण मानत नाही तो...’ त्यामुळे चार्वाक, बौद्ध, जैन ही नास्तिक दर्शने मानली जातात. कारण त्यांनी वेदांचे प्रामाण्य नाकारले. पण या नास्तिक संप्रदायांनी धर्म, नैतिकता, मोक्ष, आत्मा आणि कर्म यांसारख्या संकल्पनांवर मंथन केलेले आहे. म्हणजेच, ते धार्मिक नसले तरी तात्त्विक आहेत.
नास्तिक संकल्पनेचा पाश्चात्य अर्थ
पाश्चात्य नास्तिकता मात्र मुख्यतः ईश्वराच्या अस्तित्वाच्या निषेधावर आधारलेली आहे. म्हणजेच, ‘God doesn't exist’ ही त्यांची मुख्य भूमिका असते. त्यामुळे तिथे नास्तिकता ही बहुधा धर्मविरोधी आणि कधी-कधी अध्यात्मविरोधी सुद्धा असते. पाश्चात्त्य नास्तिकतेचा आधार विज्ञान, तर्क आणि स्वातंत्र्य हाच असतो.
चार्वाकांचे तत्वज्ञान
चार्वाक संप्रदाय ‘प्रत्यक्ष ज्ञान’ (इंद्रियज्ञान) हाच ज्ञानाचा एकमेव खरा स्रोत मानतो. ‘जे दिसतं, तेच खरं’ ही त्यांची मूलभूत भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, मोक्ष, हे सगळे फेटाळले. तसेच वेद, यज्ञ, कर्मकांड ही भोंदूगिरी आहे, असे सांगत त्यांना नाकारले.
या दृष्टिकोनाने मांडण्यात आलेल्या नास्तिक विचारांना विरोध झालेला असला तरी, त्यांना तत्त्वचिंतनाचे स्थान मिळाले आहे. पाश्चात्य देशांमध्ये मात्र नास्तिकतेकडे अनेकदा धर्मविरोधी बंडखोरी म्हणून पाहिले जाते. अजूनही काही पाश्चात्य समाजात नास्तिकांकडे संशयाने पाहिले जाते. गेल्या दहा वर्षात हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर भारतातही हीच परिस्थिती उद्भवलेली आहे, एक हे खेदाने नमूद करणे भाग आहे. एकूणच सध्याची परिस्थिती ही विचारकलहाला घाबरणारी आणि वैचारिक प्रश्नांना बगल देणारी आहे.
थोडक्यात काय तर, भारतीय नास्तिकता म्हणजे एक तत्त्वज्ञानप्रवृत्त, आत्मशोध करणारी, सामाजिक आणि वैचारिक प्रणाली आहे. पाश्चात्य नास्तिकता मात्र धर्मविरोध आणि ईश्वरनिषेधाच्या चौकटीत अधिक वेळा अडकलेली असते. त्यामुळे ‘नास्तिक’ या शब्दाचा अर्थ समजून घेताना त्याच्या सांस्कृतिक संदर्भांची जाणीव असणे आवश्यक आहे. ज्यांना ही जाणीव नसते ते नेहमीच भारतीय आणि पाश्चात्य नास्तिकतेचे तत्वज्ञान यात सरमिसळ करण्याची गल्लत करत असतात आणि वादवितंड घालत असतात. त्यांना अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नास्तिक म्हणतात.
नास्तिक कोणाला म्हणावे?
या विवेचनावरून आपल्या लक्षात आलेले असेलच की, ‘नास्तिक’ या शब्दाचा अर्थ ‘जे वेदाला नकार देतात ते नास्तिक’, असा आहे. पण सध्या आपण पाश्चात्य तत्वज्ञांप्रमाणे ‘देवाला नकार देणारे ते नास्तिक’ असे मानू लागले आहोत. खरे पहाता, माणूस नास्तिकतेच्या विचारांपर्यंत पोहोचतो ते तो तारतम्याने विचार करू शकतो म्हणूनच. त्यामुळे नास्तिक व्यक्ती ही कुठलाही धर्म मानत नाही. ज्या व्यक्ती ‘मी हिंदू नास्तिक आहे’, ‘मी बौद्ध नास्तिक आहे’, ‘मी मुस्लिम नास्तिक आहे’, ‘मी ख्रिश्चन नास्तिक आहे’, असे म्हणतात ते पूर्णपणे नास्तिक नसतातच. कारण धर्म आला म्हणजे त्या धर्माचे भलेबुरे सगळे यम-नियम मान्य करावे लागतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा धर्म जवळचा वाटत असेल तर ती व्यक्ती पूर्णपणे नास्तिक नसते. कारण नास्तिक माणूस कुठलाच धर्म मानत नसतो. नास्तिक व्यक्ती म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहत, घेतलेल्या निर्णयाचे परिणाम स्वीकारत समाजात जबाबदारीने जगणारी धर्मनिरपेक्ष व्यक्ती असते.
वैज्ञानिक प्रयोगानंतरच निर्णय
विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जी गोष्ट सिद्ध झालेली नाही, ती अस्तित्वात आहे, असे मानता येत नाही. विज्ञानामध्ये एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आहे हे सिद्ध करण्यासाठी आधी विविध प्रयोग करून ती गोष्ट अस्तित्वात कशी नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण जेव्हा असे सगळे प्रयोग फोल ठरतात, तेव्हाच त्या वस्तूचे अस्तित्व आहे, ती गोष्ट अस्तित्वात आहे हे सिद्ध होते. ईश्वराच्या बाबतीत वैज्ञानिक प्रयोगाने अजून तरी त्याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडलेले नाहीत, म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणारी माणसे ईश्वराचे अस्तित्व नाकारतात.
उत्क्रांतीवाद आणि सनातनी मत
विज्ञानाच्या नियमानुसार एखाद्या गोष्टीचा दावा करणाऱ्या माणसालाच ‘आपला दावा खरा कसा आहे’, हे सिद्ध करून दाखवायचे असते. जर त्यांना तसे सिद्ध करता आले नाही तर त्यांचे म्हणणे खोटे ठरते. आस्तिकांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही, म्हणूनच आस्तिकांचा ईश्वराच्या अस्तित्वावरचा विश्वास खोटा आहे हे सिद्ध होते. तसेही उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्ताने देवाच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सनातनी मनाचे लोक मूलत: उत्क्रांतीवादाचे द्वेष्टे असतात. क्रमाक्रमाने ज्ञान वाढते आहे, माणूस अधिकाधिक परिपूर्ण होत आहे, त्याची उत्पादकता वाढत आहे, हेच त्यांच्या सनातनी मताला मान्य नसते. त्यांच्या दृष्टीने भूतकाळात कुठेतरी समाजाची परिपूर्ण अवस्था असते. संपूर्ण ज्ञान-विज्ञान पूर्वीच कधीतरी परिपूर्ण झालेले असून त्यात आता काहीच भर पडू शकत नाही, असे त्यांना उगीचच वाटत असते. आधुनिक विज्ञानाचे सर्व शोध आमच्या प्राचीन ऋषी-मुनींना ज्ञात होते, पाश्चात्यांनी आमची शास्त्रे चोरली व स्वत:ची प्रगती करून घेतली, असे सांगताना त्यांना अभिमान व समाधान वाटत असते. खरे तर ज्यांना वर्तमानात आपली बुद्धिमत्ता सिद्ध करता येत नाही, ते मग अशा पद्धतीने भूतकाळातील पूर्वजांच्या गौरवीकरणात समाधान मानून आत्ममग्न होत असतात. एकेक जुनी कल्पना घेऊन ती आधुनिक विज्ञानाने बरोबर असल्याचे सांगावयाचे, हा सुधारणाविरोधी सनातनी मनाचा आवडता छंद आहे. त्यापैकीच एक म्हणजे वर्णव्यवस्था कशी वैज्ञानिक आहे (सैद्धांतिक निर्दोषत्व) हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. ते निसर्गातील विविधतेलाच विषमता समजत असल्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील विषमता ही वैज्ञानिकच आहे, असे ठामपणे सांगण्याचे वेडे धाडस करत असतात.
मानवकेंद्री विचारप्रणाली
थोडक्यात भारतीय नास्तिकता ही ईश्वराचा शोध घेताना निर्माण झालेली मनोवस्था आहे, तर पाश्चात्य नास्तिकतेमध्ये ईश्वराला सरळसरळ नाकारले आहे. सारांश असा की, भारतीय नास्तिकता जीवनाला व्यावहारिक बुद्धी आणि नैतिकतेच्या चौकटीत पाहते, तर पाश्चात्य नास्तिकता विज्ञान, तर्क आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून देवविहिन जगाची रचना करते. भारतीय नास्तिकतेत ‘धर्माशिवाय नीती’ आहे, तर पाश्चात्य नास्तिकतेत ‘विज्ञानाशिवाय देवाचे अस्तित्व नाही’ हा विचार ठळक दिसतो. या दोन्ही नास्तिक परंपरा मानवकेंद्री विचारप्रणालीकडे झुकतात आणि सांगतात की, देव नाकारल्याने जग संपत नाही, उलट माणूस स्वतःच्या विचाराने आणि कृतीने जगाचा अर्थ निर्माण करू शकतो.
विज्ञान विषयाचे अभ्यासक व अंनिसचे कार्यकर्ते