साधक-बाधक
क्रांती गोडबोले-पाटील
ज्या मुलीच्या हातातून वडिलांनी एकेकाळी घुंगरू फेकून दिले होते, तिनेच आज 'इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड'पर्यंत मजल मारली आहे. मानसीताईचा हा प्रवास केवळ नृत्याचा नसून तो घरचा विरोध, संसारातील चढ-उतार आणि गंभीर शारीरिक व्याधींवर मात करत स्वतःचं अस्तित्व शोधणाऱ्या एका रणरागिणीचा आहे. जागतिक नृत्य दिनानिमित्त, घुंगरांच्या नादात आयुष्याची लय शोधणाऱ्या या अष्टपैलू नृत्यांगनेचा हा प्रेरणादायी प्रवास...
या पायात पुन्हा चाळ बांधायचे नाहीत!’ हे वाक्य जेव्हा एखादे वडील आपल्या मुलीला ठणकावून सांगतात आणि रागाच्या भरात घुंगराची बॅग अंगणात फेकून देतात, तेव्हा मनाच्या चिंधड्या होतात. मानसी ताईच्या (पूर्वाश्रमीच्या मंजिरी गोखले) आयुष्यात हे वादळ वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच आलं होतं. वडील स्वतः गायक, प्रचंड आध्यात्मिक आणि दत्तभक्त होते, पण नृत्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्या काळच्या मध्यमवर्गीय चौकटीत अडकलेला होता. घराण्यात शंभर पिढ्यांत कुणीही नृत्याची वाट धरली नव्हती. मुलीने गाणं शिकावं, वाद्य शिकावं, पण 'नाचू' नये; कारण नृत्य करणाऱ्या मुलीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन तेव्हा काहीसा कलुषित होता. मुलीचं लग्न ठरेल की नाही, ही भीती पालकांच्या मनात घर करून होती. पण 'आई' नावाच्या माऊलीने या कलेच्या ठिणगीला आपल्या पदराआड जपलं. आई नोकरीवर जाताना मानसीला मावशीकडे सोडून जायची आणि तिथून चोरून मानसीताई क्लासला जायची. वडील कामावरून घरी येण्यापूर्वी चोरपावलांनी घरी येणं, कधी 'ट्रेन लेट झाली' तर कधी 'रिक्षा मिळाली नाही' अशी गोड कारणं सांगून वडिलांपासून ही साधना लपवणं... हा लपाछपीचा खेळ केवळ खोडकरपणा नव्हता, तर ती एका महान कलेची पायाभरणी होती. वडिलांच्या ड्युटीच्या वेळा बघून तालाचा अभ्यास करण्याची ती कसरत आज विचार करतानाही अंगावर काटा आणते.
त्या काळातील डोंबिवलीतल्या अंगणात 'लवंगी मिर्ची'च्या गाण्यावर ठेका धरणारी ती लहानगी मानसी आज 'इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड' अचीव्हर आहे. हा पल्ला गाठताना तिने डोंबिवलीतील ज्येष्ठ कथकगुरु किशोरी शेटे , गुरु ज्योत्स्नाताई, गुरु चारुताई, गुरु ज्योतीताई यांच्यापासून ते थेट पद्मश्री सितारा देवींच्या कन्या डॉ. जयंती माला मिश्र आणि तालयोगी सुरेश तळवलकरजींपर्यंत अनेकांकडून विद्यार्जन केलं. पण तिची ही कला केवळ तांत्रिक बोलांपुरती मर्यादित राहिली नाही. मानसीचा लढा हा दुहेरी होता—एक समाजातील रुढींच्या विरोधात आणि दुसरा नशिबाच्या क्रूर खेळाशी.
लग्नानंतर तिला अत्रे कुटुंबाचा मोठा पाठिंबा मिळाला. पती सचिन अत्रे हे स्वतः शास्त्रीय गायक असल्याने कलेचं वातावरण घरात होतंच. ज्या वडिलांनी एकेकाळी घुंगरू फेकून दिले होते, तेच वडील पुढे जेव्हा आपल्या मुलीसाठी पहाटे पाच वाजता डान्स ऑडिशनच्या रांगेत उभे राहिले आणि तिला 'ऑल द बेस्ट' म्हटलं, तो क्षण मानसीताईच्या आयुष्यातल्या कोणत्याही 'रेकॉर्ड'पेक्षा मोठा होता. कलेने केवळ माणसाचं शरीर नाही, तर मनही बदललं होतं. हा क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं प्रमाणपत्र ठरला.
आयुष्यातला एक टप्पा असा आला जेव्हा पतीची नोकरी सुटली. संसार आणि कलेची साधना एकाच वेळी पणाला लागली होती. अशा वेळी "कलेचा काय उपयोग?" असा प्रश्न विचारणाऱ्यांना मानसीने आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिलं. 'पडेल ते काम करणे' हा वडिलांनी दिलेला संस्कार तिने प्रमाण मानला. नऊवारी साड्या शिवणं असो, ब्युटी पार्लरचं काम असो, टेलरिंग असो किंवा 'तुळजा केटरर्स'च्या माध्यमातून शंभर माणसांचा स्वयंपाक करणं असो; मानसीताईने कोणत्याही कामाला 'छोटं' मानलं नाही. तिच्यातील ही उपजत सर्जनशीलता तिच्या नृत्यातही डोकावते. ती आपल्या विद्यार्थिनींना नृत्यातील 'प्रेझेंटेशन'चं महत्त्व पटवून देताना केटरिंगमधील सजावटीचं आणि निरनिराळ्या रेसिपीज् चं उदाहरण देते. जसे एखाद्या दागिन्यात मोती गुंफले जातात, तशीच लडी कथकच्या तत्कारात शब्दांनी गुंफायची असते, हे ती अत्यंत सोप्या भाषेत पटवून देते. "दहा दगडांवर पाय ठेवू नकोस" असं म्हणणाऱ्यांना तिने हे दाखवून दिलं की, जर तुमचा कलेचा पाया पक्का असेल, तर तुम्ही जीवनाच्या कोणत्याही रणांगणावर पाय घट्ट रोवून उभं राहू शकता. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा मोठ्या कंपन्यांमधले पगार थांबले, तेव्हा तिच्या हातातील या 'अष्टपैलू' गुणांनीच तिला आर्थिक स्थैर्य दिलं.
नृत्य हे मानसीताईसाठी केवळ मनोरंजन नाही, तर ती एक 'थेरपी' आहे. तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे उजव्या बाजूच्या डोळ्याच्या नसांमध्ये झालेलं क्लॉटिंग. ज्यात नर्तकीला तालावर नजर स्थिर ठेवायची असते, तिला सगळं काही 'डबल' दिसू लागलं होतं, बुबुळांची जागा बदलली होती आणि चेहऱ्याचा काही भाग पॅरालाईज्ड झाला होता. पण मानसीताईच्या नृत्याने त्यावेळी तिला तारलं. न्यूरोसर्जननी तिला नृत्यातील 'दृष्टीभेद' आणि 'शिरोभेद' करण्याचं सुचवलं.
मानसीताई सांगते की, नृत्यामुळे झालेला डोळ्यांचा व्यायाम आणि मानसिक विल पॉवर यामुळेच ती या गंभीर व्याधीतून बाहेर पडू शकली. नृत्य हे केवळ शारीरिक हालचाल नसून ते तणावमुक्तीचं साधन आहे, हे तिने स्वतःच्या अनुभवातून सिद्ध केलं. कथक नर्तक जेव्हा एखादी कथा सादर करतो, तेव्हा तो कधी कृष्ण होतो तर कधी राधा. त्या भूमिकेची गरज म्हणून त्याला तसे हावभाव करावे लागतात. रंगमंचावर तो पात्र जगत असला तरी, पडद्यामागे तो एक स्वतंत्र व्यक्ती असतो. अभिनयाची ही जाण ज्याला असते, त्याच्या नैसर्गिक व्यक्तिमत्त्वावर कलेचा कोणताही विपरित परिणाम होत नाही. उलट, या कलेमुळे व्यक्तीमध्ये एक प्रकारची शिस्त आणि संयम निर्माण होतो.
कथकच्या क्षेत्रात तिने केलेला ''जीवनियाँ'' हा ऑडिओ-व्हिडिओ प्रोजेक्ट तिच्या गाढ्या अभ्यासाची पावती देतो. कथकचं मूळ उत्तर प्रदेशात असून ते मंदिरांमधून विकसित झालं. 'कथा कहे सो कथक कहावे' या उक्तीप्रमाणे कथा सांगणारा तो कथक. कथकच्या परीक्षेत ज्येष्ठ गुरूंची माहिती महत्त्वाची असते, पण ही माहिती विखुरलेली होती. मुलांनी ती केवळ पाठांतर करू नये, तर त्या गुरूंचे कष्ट आणि त्यांचं कर्तृत्व त्यांना दिसावं, यासाठी मानसीने आठ - आठ भागांच्या इंग्रजी आणि मराठी भाषेतील व्हिडीओ मधून तिच्या यूट्यूब चँनलवर या प्रकल्पात पन्नासहून अधिक गुरूंची माहिती संकलित केली. वयाच्या साठीनंतर तेरा तास नृत्य करणाऱ्या आदरणीय सितारा देवी किंवा बालदमा असूनही नऊ तास नाचणारे आदरणीय गोपीकृष्ण अशा अनेक मेहनती गुरुंची उदाहरणं आजच्या पिढीला मेहनत आणि जिद्द शिकवणारी आहेत, हे त्यातून विद्यार्थ्यांना सांगितलं. कथक हे मंदिरांमधील भक्तीपासून ते मोगल आक्रमणांनंतर राजाश्रयापर्यंत कसं बदललं, याचा तिने सखोल अभ्यास केला आहे. मोगल काळात पेहरावात झालेले बदल जसे की चुडीदार पायजमा- घेरदार अंगरखा याकडे ती कलेची प्रगती म्हणून पाहते. कथक हे सर्व नृत्यांचं मूळ मानलं जातं, कारण ज्याला कथकचे ताल, लय आणि हस्तकांचे ज्ञान आहे, तो जगातील कोणताही नृत्यप्रकार सहज आत्मसात करू शकतो.
आजच्या पालकांबाबत मानसीचे विचार तितकेच स्पष्ट आहेत. "कलेचा बाजार करू नका," असं ती कळकळीने सांगते. आजच्या झटपट प्रसिद्धीच्या आणि 'रील'च्या जमान्यात पालकांना वाटतं की आपल्या मुलांनी रातोरात रिअॅलिटी शोमध्ये झळकावं. या हट्टापायी मुलांवर अवाजवी दडपण टाकणाऱ्या पालकांना ती सावध करते. कलेकडे करिअर म्हणून पाहण्यापूर्वी ते मनोरंजनाचं आणि आनंदाचं साधन असावं. मुलांचं वेळापत्रक इतकं 'टाइट' करू नका की त्यांना श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही. "डेमो क्लासमध्ये नृत्याची परीक्षा होऊ शकत नाही," हे तिचं वाक्य आजच्या पालकांसाठी डोळे उघडणारं आहे. नृत्य ही शाळा नाही, तर ती पेशन्सने शिकण्याची गोष्ट आहे. पालकांनी नृत्याच्या गुरूंवर विश्वास ठेवावा, अशी तिची अपेक्षा आहे. कलेमुळे माणसाचं हृदय परिवर्तन होतं आणि मुलांना जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाण्याची ताकद मिळते.
जागतिक नृत्य दिनानिमित्त तिची एक इच्छा आहे की, गायनाच्या रिअॅलिटी शोप्रमाणेच 'प्युअर क्लासिकल' नृत्याचा शो व्हावा, जिथे जिम्नॅस्टिकला नृत्य समजण्याची चूक केली जाणार नाही. शास्त्रीय नृत्य हे सर्व नृत्यांचा पाया आहे. एकदा शास्त्रीय नृत्य अवगत झालं की, पाश्चात्य किंवा लोकनृत्याचे कोणतेही प्रकार सहज साध्य होतात. मानसीताईच्या मते, कथक हे एक प्रकारचे व्यसन आहे, पण ते सर्जनशीलतेचं आणि आनंदाचं व्यसन आहे. अनेक दिग्गजांची तर अशी इच्छा असते की, आपला शेवटचा श्वासही रंगमंचावर नृत्य करतानाच जावा. यावरूनच या कलेची ओढ किती तीव्र असू शकते, याची प्रचिती येते. गेल्या २७ वर्षांपासून मानसीताई नृत्यवर्गांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडवत आहे आणि तिने नऊ शाखा सुरु करून तिथे ती आज विद्यार्थ्यांना स्वतः नृत्याचे धडे देते.
मानसीताईचा हा प्रवास म्हणजे जणू एखादी 'भ्रमरी' आहे. जशी नर्तकी एका पायावर गिरकी घेताना स्वतःचा तोल सावरते, तसा तिने संसाराचा गाडा, शारीरिक व्याधी आणि कलेची साधना यांचा सुंदर तोल सांभाळला आहे. नृत्याशिवाय ती स्वतःचं अस्तित्व कल्पू शकत नाही. नृत्याने तिला केवळ प्रसिद्धी दिली नाही, तर जगण्याचं बळ दिलं, संकटात साथ दिली आणि एक समृद्ध दृष्टिकोन दिला. कला ही सतत शिकत राहण्याची प्रक्रिया आहे, हे मानसीताई आजही सिद्ध करत आहे. स्वतः गुरु असूनही ती आजही नवीन गोष्टी शिकायला कचरत नाही. कलेची ही अविरत साधना, सामाजिक बांधिलकी आणि नृत्याप्रती असलेलं समर्पण मानसीताईला खऱ्या अर्थाने 'नृत्यगुरु' बनवतं.
खरं तर ठुमरी लिहिणं ही एक साधनाच आहे. मानसीताईने नृत्याबरोबरीने ठुमरीही लिहिल्या आणि तिच्या या रचनांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कीजींनी चाल लावली आहे. या ठुमरी तिचे पतिदेव सचिनजींच्या आवाजात रेकॉर्ड झाल्या, तेव्हा त्या शब्दांना खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाला असं ती आवर्जून सांगते. या ठुमरी सर्व ऑफिशियल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्या आहेत आणि रसिकांपर्यंत पोहोचत आहेत, याचा तिला खूप आनंद वाटतो. पण आनंदाची गोष्ट फक्त एवढीच नाहीये... आई-वडिलांकडून मिळालेला हा कलेचा वारसा तिचा मुलगा तन्मय अत्रे ह्याने सुद्धा तितक्याच ताकदीने पुढे नेलाय. तन्मयने आजवर स्वतःची तीन गाणी रिलीज केली आहेत. विशेष म्हणजे, ही गाणी त्याने स्वतःच लिहिली आहेत, संगीतबद्ध केली आहेत आणि गायली सुद्धा आहेत! त्यामुळे कला ही मानसीताईसाठी श्वास आहे.
जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने तिचा हा प्रवास सर्व कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. नृत्याच्या या घुंगरांच्या नादात आयुष्याची लय कशी शोधावी, हे मानसी अत्रे यांच्या प्रवासातून शिकण्यासारखं आहे. कलेचा मार्ग हा केवळ आनंदासाठी नसून तो जगण्याचं बळ देणारा असतो. घुंगरांच्या आवाजातून स्वतःचं अस्तित्व शोधणाऱ्या मानसीताईने केवळ नृत्यच केलं नाही, तर आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला नृत्यातील तालाप्रमाणे झेललं. तिच्या या प्रवासात आईचा संघर्ष, वडिलांचे आशीर्वाद, नवऱ्याची भक्कम साथ आणि स्वतःची जिद्द या सर्वांचा समावेश आहे. तिच्या या अफाट कार्याला आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेला आजच्या दिनी मानाचा मुजरा! कलेचा वारसा असाच पिढ्यानपिढ्या प्रवाहित राहो, हीच सदिच्छा. ही कला मानवी आत्म्याला थेट स्पर्श करते आणि मानसी अत्रे यांच्यासारखं व्यक्तिमत्व या कलेला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवतं.
krantip183@gmail.com