सह्याद्रीचा बीजपुत्र 
अक्षररंग

सह्याद्रीचा बीजपुत्र

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत अति दुर्मिळ स्थानिक बियांचे संवर्धन करण्यासाठी स्वतःच्या सुखी आयुष्याची समिधा अर्पण करणाऱ्या ध्येयवेड्या धनंजय कोकाटे यांच्या निष्ठेची ही एक रंजक आणि प्रेरणादायी गाथा.

नवशक्ती Web Desk

विशेष

क्रांती गोडबोले-पाटील

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत अति दुर्मिळ स्थानिक बियांचे संवर्धन करण्यासाठी स्वतःच्या सुखी आयुष्याची समिधा अर्पण करणाऱ्या ध्येयवेड्या धनंजय कोकाटे यांच्या निष्ठेची ही एक रंजक आणि प्रेरणादायी गाथा.

मुळे रुजतात, माती घट्ट धरून ठेवतात...

खोडे वाढतात, लाकूड बनतात,

पाने बहरतात, प्राणवायू सोडतात.

फुले फुलतात, सुगंध देतात.

फळे पिकतात, आनंद देतात.

झाडांचे सगळेच कुटुंबीय

माणसासाठी किती झटतात!

मागेच वाचनात आलेली ही सुंदर कविता आपल्याला निसर्गाच्या अनंत उपकारांची जाणीव करून देते. दरवर्षी ५ जून उजाडतो, ‘जागतिक पर्यावरण दिन’ येतो आणि आपण सिमेंटच्या जंगलात उभं राहून निसर्गाच्या ऱ्हासावर मोठमोठी, अलंकारिक भाषणं देतो, लिहितो, पोस्टाळतो, स्टेटस ठेवतो. परंतु, प्रत्यक्षात काय घडतं? निसर्गाचं हे परोपकारी कुटुंब मानवासाठी अहोरात्र झटत असताना, माणूस म्हणून आपण मात्र अत्यंत कृतघ्नपणे वृक्षतोड करत सुटलो आहोत. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा हा जो संहार सुरू आहे, त्याचाच परिणाम म्हणून आज उष्मा प्रचंड वाढला आहे, पावसाचं चक्र कोलमडलं आहे, अवकाळीचं संकट उभं ठाकलं आहे आणि मातीचा श्वास गुदमरतो आहे. वृक्षतोड हा केवळ लाकूड तोडण्याचा प्रकार नाही, तर तो मातीचा आवाज घुसमटवणारा आणि निसर्गाचा ताल मोडणारा एक अक्षम्य गुन्हा आहे. याउलट, वृक्ष आणि बीज संवर्धन हीच खऱ्या माणुसकीची आणि संस्कृतीची ओळख आहे. पर्यावरणाच्या या भयावह ऱ्हासाची असंख्य कारणं डोळ्यांसमोर असताना, आजही काही अशी देवमाणसं आहेत जी या पृथ्वीची हिरवाई टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावत आहेत. अशाच एका अवलिया, ध्येयवेड्या पर्यावरण संवर्धकाची ही रंजक आणि प्रेरणादायी गाथा आहे, ज्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत बियांचं संवर्धन करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची समिधा अर्पण केली आहे- ते नाव म्हणजे धनंजय कोकाटे.

धनंजय कोकाटे हे एक ग्राफिक डिझायनर, आर्टिस्ट म्हणून नामांकित कंपनीमध्ये काम करत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील हा शांत स्वभावाचा अबोल माणूस. पण पेज लेआऊट करताना निसर्गविषयक काही काम आलं की ते फारच एफर्ट्स घेऊन ते पेज लावायचे. धनंजय सरांचं निसर्गाशी असलेलं नातं सुरुवातीपासूनच घट्ट होतं. हेकटीक लाईफमध्ये कामाचा ताण एका लेवलनंतर नको वाटतो आणि अशावेळी माणूस आपसूकच निसर्गाकडे ओढला जातो. धनंजय सर जेव्हा कॉर्पोरेट जगातील एका मोठ्या पगाराची, सुखवस्तू नोकरी सोडून या क्षेत्रात उतरले, तेव्हा ती केवळ एक तात्पुरती आवड नव्हती; तर ‘कोणीतरी हे केलं पाहिजे’ या आंतरिक भावनेतून जन्माला आलेली एक तीव्र ऊर्मी होती. सिमेंट-काँक्रीटच्या निर्जीव जंगलांपेक्षा निसर्गाचं हे जिवंत, हिरवंगार वैभव कितीतरी पटीने सुंदर आहे आणि ते आपण टिकवलं पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला. नोकरीत असताना वीकेंडला ट्रेकिंग करायला जाणं, किल्ले पाहाणं यातून त्यांच्या या प्रवासाची सुरुवात झाली. सुरुवातीला सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनाही आंबा, पेरू, चिकू अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच झाडं माहीत होती. पण जंगलात भटकताना त्यांना झाडांचे वेगवेगळे आकार, त्यांची पानं आणि त्यांचं अस्तित्व आकर्षित करू लागलं. सह्याद्रीच्या जंगलांचा सखोल अभ्यास करताना त्यांच्या असं लक्षात आलं की, अनेक दुर्मिळ झाडं आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘आययुसीएन’च्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या जगभरातील दुर्मिळ प्रजातींचा त्यांनी शोध सुरू केला. पुस्तकं वाचली, जंगलात मैलोन्मैल भटकंती केली आणि जसाजसा एका एका झाडाचा उलगडा होत गेला, तसतसं ते त्या झाडांच्या प्रेमातच पडले. चाळीशी ओलांडल्यानंतर, स्थिरस्थावर आयुष्य सोडून जेव्हा त्यांनी स्वतःला २४ तास या कामात झोकून दिलं, तेव्हा सुरुवातीला घरच्यांनी त्यांना ‘वेडा’ म्हटलं. एका झटक्यात ते आर्थिक पातळी ढासळली, पण मुंबईच्या त्या जीवघेण्या धावपळीतून बाहेर पडून निसर्गाची सेवा करण्यात त्यांना जे परमसुख मिळालं, ते पैशात मोजता येणारं नव्हतं.

आजच्या काळात रासायनिक शेती आणि हायब्रीड संकरित बियाणांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. अशा परिस्थितीत, स्थानिक आणि पारंपरिक बियाणांचं संवर्धन करणं पर्यावरणासाठी वरदान ठरत आहे. पारंपरिक बियाणं हे स्थानिक हवामान आणि मातीशी पूर्णपणे अनुकूल झालेलं असतं. त्यामुळे या बियाणांपासून येणाऱ्या या पिकांना रोग आणि कीड लागण्याचा धोका खूप कमी असतो. परिणामी, शेतात रासायनिक कीटकनाशकं नी कृत्रिम खतांचा वापर करण्याची गरज भासत नाही, ज्यामुळे जमिनीचं व पाण्याचं प्रदूषण रोखलं जातं आणि मातीची नैसर्गिक सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते. याव्यतिरिक्त, बीज संवर्धनामुळे जैवविविधता टिकून राहण्यास मोठी मदत होते. निसर्गात जितकी विविधतेची पिकं असतील, तितकीच तिथली परिसंस्था मजबूत बनते. जर आपण फक्त काही मोजकीच संकरित बियाणे वापरली, तर एकाच रोगामुळे संपूर्ण पिकं नष्ट होण्याचा धोका असतो. परंतु, बीज संवर्धनामुळे पिकांमध्ये जनुकीय विविधता कायम राहते, जी भविष्यातील अन्न सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या हवामानाचा आणि जागतिक तापमानवाढीचा विचार केला, तर आपली पारंपरिक बियाणं ही अत्यंत काटक आणि सहनशील असतात. ती कमी पाण्यात किंवा तीव्र दुष्काळातही तग धरून ठेवू शकतात. बाजारातील संकरित बियाणांच्या निर्मिती प्रक्रियेत आणि वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च होते आणि कार्बन उत्सर्जन वाढतं. याउलट, बीज संवर्धन हे स्थानिक पातळीवर शेतकरी स्वतः करत असल्यामुळे कोणतीही अतिरिक्त ऊर्जा खर्च होत नाही आणि कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होते.

झाडांचा अभ्यास करताना धनंजय सरांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली, ती म्हणजे झाडांचं हॅबिटॅट म्हणजेच त्यांचा नैसर्गिक अधिवास होय. आपण सहसा मानवी सोयीनुसार कोकणातला नारळ उचलून विदर्भात लावतो. पण प्रत्येक झाडाची स्वतःची एक माती असते, ठराविक वातावरण असतं. हा निसर्गाचा नियम समजून घेत त्यांनी गुजरातपासून कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या संपूर्ण सह्याद्रीच्या बेल्टचा अभ्यास केला. जंगलाच्या वाटा धुंडाळताना अनेक अडचणी आल्या, अगदी विषारी साप चावण्याचे प्रसंगही घडले, पण त्यांचा हा सिलसिला थांबला नाही. आज बाजारू रोपवाटिकांमध्ये अशी झाडं तयार केली जातात जी भरभर वाढतात आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स लगेच हिरवेगार दिसतात. पण जंगलातील दुर्मिळ झाडं वाढवण्याचे कष्ट कोणी घेत नाही. म्हणूनच धनंजय सरांनी ठरवलं की, आपण केवळ दुर्मिळ झाडांवरच काम करायचं. आज त्यांच्या पुण्यातील रोपवाटीकेत तब्बल १५० ते २०० प्रकारच्या अति दुर्मिळ झाडांची यादी आहे. जगातील ३६ महत्त्वाच्या जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक असलेला पश्चिम घाट म्हणजेच आपला सह्याद्री हा हजारो वनस्पतींचा आदिम अधिवास आहे. धनंजय कोकाटे यांनी सह्याद्रीतील दुर्गम जंगलांमध्ये भटकंती करताना अनेक अति दुर्मिळ आणि संकटग्रस्त वृक्षप्रजातींची नोंद केली आहे आणि त्यांचं संवर्धन केलं आहे. या बियांवर असणारे संशोधनपर पेपर्स वाचून, अत्यंत कष्टाने त्यांनी या कठीण आणि टणक बिया रुजवल्या आहेत. जोपर्यंत या दुर्मिळ रोपांची मुळं स्वतःच्या बळावर मातीत घट्ट उभी राहण्याइतकी ताकदवान होत नाहीत, तोपर्यंत ती त्यांच्या देखरेखीखाली राहतात आणि नंतर त्यांना पुन्हा त्यांच्याच मूळ अधिवासात नेऊन लावलं जातं.

या निसर्गाने त्यांच्यात वैयक्तिक पातळीवरही अद्भूत बदल घडवून आणला. सुरुवातीला धनंजय सरांना उंचावरून खाली बघण्याची प्रचंड भीती वाटायची, चालताना दम लागायचा. शहराच्या गजबजाटात आणि प्रदूषणात राहिल्यामुळे ही भीती कायम होती. पण जेव्हा ते सह्याद्रीच्या कुशीत गेले, तिथली शुद्ध हवा त्यांच्या श्वासात भिनली, तेव्हा त्यांची उंचीची भीती कायमची नाहीशी झाली. कधी कधी ते जंगलात एकटेच राहायचे. त्या एकांताने त्यांना निसर्गाच्या अधिक जवळ आणले आणि तिथूनच एका खऱ्या पर्यावरण संवर्धकाचा जन्म झाला. निसर्गासाठी काम करण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. जंगलाच्या वाटा धुंडाळताना अनेक अडचणी आल्या. अगदी विषारी साप चावण्याचे प्रसंगही घडले, पण धनंजय सरांचा हा सिलसिला थांबला नाही. त्यांनी सुरुवातीला प्रत्येक झाडाचा ऋतू अभ्यासला; कोणत्या मोसमात त्याला फुलं येतात, बिया येतात, फळं लागतात, याच्या अचूक नोंदी ठेवल्या.

बिया गोळा करताना धनंजय सर निसर्गाच्या एका अत्यंत संवेदनशील चक्राचा आदर करतात. ते कधीही झाडाखालच्या सर्व बिया गोळा करत नाहीत. कारण, प्रत्येक झाडाखाली एक जैविक चक्र असतं; तिथे मुंग्या असतात, कीटक असतात, ते पक्षांचं खाद्य असतं. जर माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी तिथल्या सर्व बिया उचलून आणल्या, तर ते निसर्गाचं चक्र तुटतं. निसर्गाचं हे चक्र पूर्ण करण्यासाठी माणसानं निसर्गाकडून जेवढं हवं तेवढंच घेतलं पाहिजे, हा मोलाचा संदेश ते देतात. आज एक मोठी शोकांतिका आपल्या समाजात घडत आहे. गावाकडचा माणूस रोजगारासाठी शहरात स्थलांतरित झाला. त्यांच्या पहिल्या पिढीला, म्हणजे आजोबांना जंगलातील झाडांचं, वनस्पतींचं अफाट ज्ञान होतं. पण त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी शहरात वाढल्यामुळे त्यांना झाडांची ओळखच उरली नाही. जंगलात असणारे मसाल्याचे पदार्थ, औषधी वनस्पती यांना आज आपण केवळ जंगली झाडं म्हणून दुर्लक्षित करतो किंवा जागा कमी पडते म्हणून ती तोडून टाकतो. हे पारंपरिक ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातूनच लहान मुलांना प्रत्येक झाडाची माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. लहान मुलांचे हे कुतूहल जर योग्य वयातच जोपासलं गेलं, तर ती मुलं भविष्यात झाडं तोडणार नाहीत, तर किमान एक तरी झाड लावून ते जगवतील.

भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, तुंगारेश्वर, कामिनी घाट, माळशेज घाट अशा संपूर्ण महाराष्ट्रातील घाटांमधून आणि जंगलांमधून धनंजय कोकाटे सरांचा हा प्रवास कोणत्याही ऋतूत अविरत सुरू असतो. निसर्गाच्या याच ओढीमुळे झाडांचे मोठे अभ्यासक श्रीकांत इंगळे सर यांच्यासारख्या दिग्गजांनी धनंजय सरांच्या कामाची निष्ठा पाहून त्यांना मोलाची साथ दिली. धनंजय कोकाटे नेहमी म्हणतात की, आज आपण वाचवलेलं प्रत्येक दुर्मिळ झाड म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी जपलेला नैसर्गिक वारसा आहे. संवर्धन ही केवळ एक सामाजिक जबाबदारी नसून निसर्गाप्रती असलेली आपली आंतरिक कृतज्ञता आहे. धनंजय सर सह्याद्रीच्या कुशीतील अति दुर्मिळ बियांना जपत आहेत, त्यांचं संवर्धन करत आहेत. या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या या स्तुत्य आणि ध्येयवेड्या प्रवासाला मानाचा मुजरा.

krantip183@gmail.com

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

Mumbai : नेस्को प्रकरणाची पुनरावृत्ती वरळीतील कॉन्सर्टमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरू

World Poha Day: नागपुरात ३ हजार किलो तर्री पोहा अन् मोफत वाटप चर्चेत; शेफ विष्णू मनोहरांच्या या डिशची खासियत काय?

Mumbai : बीकेसीत दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक वापरा; MMRDA चे आवाहन

Mumbai : उत्पन्नाची लपवालपवी करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका; पत्नीला पोटगी देण्याचे आदेश