जगतवारी
मेधा आलकरी
इस्तंबूलमधील टोपकापी आणि डोल्माबाचे हे महाल म्हणजे ऑटोमन साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार! सुलतानांचे ऐश्वर्य, हारेममधील सत्ताकारण आणि टर्किश बाथचा अनोखा अनुभव यांतून उलगडलेली ही सफर.
जुन्या इस्तंबूल शहरात चर्च आणि मशिदींनंतर पर्यटकांना आकर्षित करतो तो सुलतानाचा टोपकापी महाल. चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत ज्या सुलतानांनी टर्कीवर राज्य केलं, त्यांचं वास्तव्य या महालात होतं. अठराव्या शतकानंतरच्या सुलतानांनी मात्र आपल्या वैभवाचं प्रतीक अशा युरोपियन धाटणीच्या आलिशान ‘डोल्माबाचे’ महालात वास्तव्य करायचं ठरवलं. इस्तंबूल शहरातील हा जुना टोपकापी महाल खूपच प्रशस्त! अगदी प्रत्येक खोलीला भेट द्यायची नाही आणि प्रत्येक पाटी खोलात जाऊन वाचायची नाही असं ठरवलं तरी गाठीशी अर्धा दिवस हवा.
महालाचा दिंडी दरवाजा पार करून, ज्याला दिल्लीच्या लाल किल्ल्याचा ‘दिवाने आम’ म्हणता येईल अशा परिसरात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या हाताला शाही मुदपाकखाना आहे. कलाकुसर केलेली चांदीची मोठाली भांडी पाहत पाहत आम्ही चिनीमातीच्या भांड्यांच्या दालनात येऊन पोहोचलो. चीनमधून भेटीदाखल आलेल्या या पोरिसिलीनच्या भांड्यात विषारी अन्न वाढलं की, त्याचा रंग बदलत असे. रासायनिक प्रक्रियेचं ज्ञान तेव्हापासून या चिनी कुंभारांना होतं म्हणायचं! त्या काळी सत्तेच्या हव्यासापोटी अन्नातून विषबाधेचे प्रकार सर्रास घडत असत. त्यापासून संरक्षण करणारी ही चिनी करामत!
‘दिवाने आम’च्या शेजारी असलेला ‘टॉवर ऑफ जस्टीस’ हा मनोरा आणि त्याच्या तळाशी असलेली समारंभांसाठी राखून ठेवलेली मंत्रिमंडळाच्या बैठकीची खोली ही राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाची जागा. परकीय पाहुण्यांचं, राजदूतांचं स्वागत इथंच होत असलं तरी इथे खरा दबदबा वजिराचा. सुलतानाची हजेरी नाहीच. मनोऱ्यातील जाळीतून एक नजर टाकली की तो आपल्या अय्याशीसाठी मोकळा.
‘दिवाने खास’ या आतील भागात मात्र फक्त खास लोकांना प्रवेश असे. सुलतानाच्या दरबारातील सिंहासनाला १५००० मोती जडलेले होते. या महालात सुलतान स्वकियांकडून नजराणे स्वीकारत असे. परकीय पाहुण्यासोबतच्या वार्तालापासाठी मात्र वजिराची मध्यस्थी आवश्यक असे. कारण तो एक शाही शिष्टाचार होता. सुलतानाच्या पोशाखांच्या आणि खजिन्यातील मौल्यवान वस्तूंच्या प्रदर्शनाच्या खोलीत डोकावलो असता तिथे जगातील पाचवा मोठा हिरा पाहायला मिळाला. तसेच पाचूने मढलेला सोनेरी खंजीरही तिथे कडक बंदोबस्तात ठेवलेला होता. १९६४ साली प्रदर्शित झालेला, या खंजिराच्या रहस्याभोवती फिरणारा ‘टोपकापी’ नावाचा इंग्रजी चित्रपट तेव्हा फारच लोकप्रिय झाला होता. त्या चित्रपटातील काही दृश्यांच्या फोटोंचं प्रदर्शनही त्याला लागूनच असलेल्या खोलीत भरलं होतं. दिवाने खासजवळील एका खोलीत मोहम्मद पैगंबरांचे काही अवशेष, दाढीचा केस, पदचिन्ह, तलवार, दात वगैरे काचेच्या पेटीत जपून ठेवले आहेत. मक्का नगरीतून आणलेला एक कोरीव दरवाजा बघून आम्ही तिथल्या ट्युलिप गार्डनमध्ये गेलो. अठराव्या शतकातील सुलतान तिसरा अहमद याच्यावर या ट्युलिप पुष्पांची मोहिनी होती.
सुलतानाच्या महालापेक्षाही तेथील ‘हारेम’ पाहण्याची उत्सुकता पर्यटकांमध्ये अधिक असते. त्यासाठी अधिक शुल्क भरून वेगळी संचलित टूर करावी लागते. हारेम म्हणजे सुलतानाच्या अय्याशीचं प्रदर्शन, कलावंतीणीचे मुजरे, सोनमोहरांच्या थैल्यांची, मोत्याच्या माळांची बिदागी, सोनेरी सुरया, त्यातून सळसळणारं मद्य, हुक्क्यातून येणारा गुडगुड आवाज, असं काहीतरी मदमस्त चित्र माझ्या मनात होतं. प्रत्यक्षात पाहिलेलं हारेम हे सुलतानाचं राहतं घर होतं. त्याच्या राण्यांबरोबर तिथे त्याच्या बहिणी, लेकी, सुना, ‘वालिदे सुलतान’ म्हणजे राजमाता यांचे महाल होते. सुलतानाच्या या कामाचा पसारा उपसण्यासाठी परदेशी गुलाम स्त्रिया विकत आणल्या जात. हारेममध्ये आल्यावर त्यांना इस्लाम धर्माचं, तुर्की संस्कृतीचं, भाषेचं, पोशाखाचं, सजण्या-धजण्याचं, लिहिण्या-वाचण्याचं, गाण्या-बजावण्याचं, भरतकाम-विणकामाचं आणि नृत्याचं शिक्षण दिलं जाई. प्रावीण्यानुसार त्यांना सुलतानाच्या कुटुंबीयांच्या अथवा खुद्द सुलतानाच्या सेवेत रूजू केलं जाई. हारेमची खरी मालकीण वालिदे सुलतान! गादीवर विराजमान सुलतानाची जन्मदात्री. हारेममध्ये ती म्हणेल ती पूर्व दिशा. सुलतानासाठी बेगमांची आणि रखेल्यांचीही निवड यात तिची मुखत्यारी. तिच्याकडे इतकी सत्ता असे की हारेममध्ये बसून ती वजीरावरही हुकूम चालवू शकत असे. सुरुवातीला या राजघराण्यातील मोठ्या राजकुमारालाच सुलतानपद मिळेल असा रिवाज नव्हता. त्यामुळे आपल्या मुलासच राजगादी मिळावी व त्यायोगे आपल्याला वालिदे सुलतानाचा मान मिळावा या महत्त्वाकांक्षेपोटी ‘काका मला वाचवा’सारखी अनेक कारस्थानं हारेममध्ये शिजली जात असत. इथे स्त्रियांचा निवास असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी निग्रो नपुंसक राखणदारांची एक पलटण नियुक्त केली जात असे.
१८४० नंतर हळूहळू ऑटोमन साम्राज्यावर लक्ष्मी रूसू लागली. बहुतांश संपत्ती युरोपियन बँकांमध्ये गहाण पडली होती. प्रजा अधेमध्ये बंड पुकारू लागली होती. युरोपियन राहणीमान, विचारधारा यांचं वारं वाहू लागलं होतं. प्रजेची दिशाभूल करून नागरिकांच्या मनातील संशयाचं निराकरण करण्यासाठी आणि आपल्या विद्यमान ऐश्वर्याचं प्रदर्शन म्हणून सुलतानाने एकोणिसाव्या शतकात ‘डोल्माबाचे’ नावाचा युरोपियन धाटणीचा राजमहाल बांधला. या दिखाऊपणामुळे खजिन्यातली उरलीसुरली संपत्तीही खर्ची पडली. रंगीत ठिगळ लावून लक्तरं झालेली गोधडी झाकण्याचा हा प्रकार! मोठ्या खोल्या, उंची फर्निचर, क्रिस्टलची भांडी, हजार-दोन हजार किलो वजनाची झुंबरं आणि फ्रेंच क्रिस्टलचा कठडा असलेला जिना, सगळं कसं झकपक! या साऱ्याचा परिपोष म्हणजे डोल्माबाचेमधील ग्रँड हॉल. बघताक्षणीच स्वतःची छाप पाडणारा, खरोखरच ग्रँड! सुंदर चित्रं, महागडे गालिचे आणि चार हजार किलो वजनाचं झुंबर, सगळंच उच्च अभिरुचीचं द्योतक! राजेशाही!! डोल्माबाचेचा इतिहास आधी वाचला नसता, तर या साऱ्याचं खूप अप्रूप वाटलं असतं. आता मात्र हा सारा नखरा पोकळ वाटत होता. महाल जितका वैभवशाली तितका तिथला हारेम काही परिणामकारक वाटला नाही. काही फर्निचर तर अगदीच साधं, बिना कोरीवकामाचं. धाटणी मात्र तीच, बाळंतिणीच्या खोल्या आणि भले थोरले पलंग!
सुलतानाच्या महालांचा दौरा करताना पर्यटकांना आवर्जून तिथल्या ‘हमाम’मध्ये घेऊन जातात. हमाम म्हणजे न्हाणीघर; साबण नव्हे! (आमच्या लहानपणी हमाम नावाचा साबण होता.) सुलतानाचं हे संगमरवरी स्नानगृह चांगलं चारपाच खोल्यांचं. आम प्रजेसाठीसुद्धा ही सार्वजनिक स्नानगृहं इस्तंबूलमध्ये सर्वत्र दिसून आली. स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी. स्त्रियांच्या हमाममध्ये स्त्री कर्मचारी, तर पुरुषांच्या हमाममध्ये पुरुष कर्मचारी असतात. हमाममधील अंघोळ हा बहुतेक सुट्टीच्या दिवशीचा ‘जुम्मे के जुम्मे’ कार्यक्रम असावा. बुडबुड गंगे… म्हणत डोक्यावरून पाण्याचे चार तांबे ओतणं म्हणजे अंघोळ ही या हमामी अंघोळीची व्याख्या नव्हे! तिथे मुख्यतः चार खोल्या असतात. पहिली ‘गरम’ खोली. खोलीच्या मध्यभागी असलेल्या गरम ओट्यावर बसून अक्षरशः अंगातला घाम गाळायचा. कातडीवरील छिद्र अशाप्रकारे मोकळी झाली की दुसऱ्या खोलीत प्रवेश! इथे खरीखुरी अंघोळ सुरू होते. हमाममध्ये अंघोळ केली जात नाही, घातली जाते. या खोलीतील मालिश करणारे प्रशिक्षित कर्मचारी प्रथम गरम पाण्याचे घडेच्या घडे अंगावर रिते करतात. नंतर सर्वांगावर साबणाचा फेस पसरवतात. त्यानंतर सुरू होतो एका खरखरीत कापडाचा गुडघे, कोपरं आणि मान यावर होणारा हल्लाबोल! घासून रगडून मळकुट्या काढल्या जातात. कधी उलथं, तर कधी पालथं झोपवतात. गुडघ्यातून पाय आणि कोपऱ्यातून हात दुमडून, मान डावी उजवीकडे करत चांगलं मालिश करतात. मग सुगंधी शॅम्पूचा मुलायम फेस आणि पुन्हा गरम पाण्याचे घडे. हमाममधील नळाचं पाणी अविरत चालू असतं. पिसासारख्या हलक्या झालेल्या शरीराने तरंगतच ‘गार’ खोलीत प्रवेश करायचा असतो. इथे अंग पुसून, डोळे मिटून थोडावेळ पडून राहायचं. चौथ्या खोलीत या अंघोळीनंतर थकलेल्या शरीराला टर्किश ‘शाय’ किंवा कॉफी दिली जाते. एका ब्राह्ममुहूर्ती आम्ही या ‘टर्किश बाथ’चा हा आगळावेगळा अनुभव घेतला आणि त्यानंतर आमची चांगली चारपाच तास ब्रह्मानंदी टाळी लागली होती.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com