जपानी गोपुरांच्या सावलीत 
अक्षररंग

जपानी गोपुरांच्या सावलीत

जपानमधील मंदिरांच्या आवारात प्रवेश करताच मनात शांतता, मंगलभाव आणि दिव्यतेची अनुभूती जागृत होते. सेन्सो-जीसारख्या प्राचीन मंदिरांपासून ते मेजी जिंगूपर्यंत, भव्य वास्तुशिल्प, आख्यायिका आणि पारंपरिक विधी अनुभवताना जपानी धर्म, संस्कृती आणि भटकंतीचा अद्भुत संगम इथे दिसतो.

नवशक्ती Web Desk

जगतवारी

मेधा आलकरी

जपानमधील मंदिरांच्या आवारात प्रवेश करताच मनात शांतता, मंगलभाव आणि दिव्यतेची अनुभूती जागृत होते. सेन्सो-जीसारख्या प्राचीन मंदिरांपासून ते मेजी जिंगूपर्यंत, भव्य वास्तुशिल्प, आख्यायिका आणि पारंपरिक विधी अनुभवताना जपानी धर्म, संस्कृती आणि भटकंतीचा अद्भुत संगम इथे दिसतो.

एखाद्या वास्तूच्या आवारात प्रवेश करताक्षणी मंगल भाव जागृत व्हावा, दिव्यत्वाची प्रचिती आणि मनःशांतीची अनुभूती यावी अशा प्रार्थनास्थळांना भाविकांच्या मनात एक अढळ स्थान असतं. मग भले तिथलं आराध्य दैवत वेगळ्या धर्माचं किंवा वेगळ्या पंथाचं का असेना ! जपानमधील पर्यटनात या अशा मंदिरांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचं वास्तुशिल्प अतिशय कलात्मक, परिसर फारच मनमोहक आणि आख्यायिका मोठ्या मनोरंजक ! मला या मंदिरांच्या नावामागे लागणाऱ्या ‘जी’ या प्रत्ययाचं खूप कुतूहल होतं. हिंदीतलं आदरार्थी जी आणि जपानी जी मध्ये काही साम्य आहे का याचा शोध घेतला तेव्हा कळलं की जपानी जी चा अर्थच मुळी आहे मंदिर.

टोकियोतील असाकुसा भागातील सेन्सो-जी हे भव्य आणि प्राचीन मंदिर पाहताना त्याच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या, अवाढव्य कागदी कंदिलानं आमचं लक्ष दुरूनच वेधून घेतलं. जपानमधील सगळ्याच मंदिरांची प्रवेशद्वारं भव्य आणि आपापलं वेगळेपण जपलेली. सेन्सो-जी मंदिराच्या प्रवेशद्वाराला म्हणतात मेघगर्जना द्वार ! म्हणूनच त्यावर लटकलेल्या कागदी कंदिलावर लिहिलेली जपानी लिपीतील अक्षरं काळ्या आणि लाल रंगात रंगवली आहेत. काळा पावसाळी मेघांचा; तर लाल चमकणाऱ्या सौदामिनीचा प्रतीकात्मक रंग ! प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर मंदिराच्या मुख्य वास्तूकडे नेणारा दोनशे मीटरचा रस्ता (नाकामीशे स्ट्रीट) आपल्याकडील तमाम मंदिरांसमोरील चिंचोळ्या वाटेची आठवण करून देतो. लहान मुलांनी हट्ट करावा आणि पर्यटकांनी मोहात पडावं अशा छोट्या मोठ्या वस्तूंनी ही गल्ली फुलली आहे. किमोनो, युकाटा हे जपानी स्त्रीपुरुषांचे पोशाख, कोरीवकाम केलेले जपानी पंखे, चॉपस्टिक्स या पारंपरिक वस्तूंबरोबरच तिथे आधुनिक टी शर्ट आणि मोबाईल यांनीही हजेरी लावलेली दिसली. इथे विठोबाच्या आधीच पोटोबाची सोय आहे.

सेन्सो-जी या प्राचीन मंदिराची एक आख्यायिका आहे. ६२८ साली सुमीदा नदीत मासेमारी करत असताना दोन कोळी बंधूंना ही क्षमाशील बुद्धाची सोन्याची मूर्ती सापडली. त्यांनी वारंवार नदीत सोडूनही ती पुन्हा पुन्हा त्यांच्या जाळ्यात येत राहिली. त्यांनी मग त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हे मंदिर बांधलं. दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याला पुनरुज्जीवित केलं गेलं. तेव्हापासून हे मंदिर पुनर्जन्माचं आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. भाविकांच्या सुख, शांती, समाधान आणि सौहार्द अशा मनोकामना इथे पूर्ण होतात.

दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाटलं की आपण कित्येक शतकं मागे, प्राचीन जपानमध्ये आलो आहोत. पारंपरिक परिधानात कित्येक स्त्री पुरुष वावरत होते. मला वाटलं, आज बहुदा त्यांचा कुठलातरी महत्त्वाचा सण असावा किंवा जपानी नववर्ष असावं. म्हणून ठेवणीतले सणासुदीचे कपडे घालून माणसं देवदर्शनाला आली असावीत. गाईडकडे चौकशी केली असता तो म्हणाला, ‘हे सगळे हौशी पर्यटक, यातील एकही जण जपानी नाही.’ मी माझी जीभ चावली. आदल्या दिवशी संध्याकाळी हॉटेलच्या लॉबीत पर्यटकांसाठी ठेवलेला किमोनो मोठ्या हौसेनं परिधान करून अस्मादिकांनी घेतलेले फोटो आठवले आणि ओठांवर एक स्मित झळकलं. या किमोनोत काहीतरी जादू आहे नक्कीच !

पंचमहाभूतांचं प्रतीक समजला जाणारा, सगळ्या बौद्ध मंदिरांच्या परिसरात हटकून दिसणारा पाच मजली पॅगोडा इथेही दिमाखात विराजमान होता. चटकदार रंगातील मुख्य मंदिराची वास्तू, टोकाला वळवलेल्या पीळदार मिशांची आठवण करून देणाऱ्या त्याच्या छताच्या कडा आणि उदबत्त्यांच्या धुराची वलयं यामुळे तिथलं वातावरण धीरगंभीर वाटत होतं. बरीच मंडळी तो धूर आपल्या अंगावर घेत होती. आजार बरे करणारा हा धूर आरोग्यदायी असतो अशी जपानी लोकांची श्रद्धा!

या मंदिराच्या आवारातच भविष्य सांगणारे काही स्टॉल आहेत. त्यांना ‘ओ मिकूजी’ असं नाव आहे. आपल्या चोचीनं नेमका पत्ता ओढून अचूक भविष्य सांगणाऱ्या भारतीय पोपटाचं काम इथे विशिष्ट प्रकारच्या लांब काड्या करतात. धातूच्या नळकांड्यात असलेल्या या काड्या जोरजोरात हलवून त्यातली एक काडी आपण उचलायची. त्यावरील नंबर जुळणारी चिठ्ठी आपलं भविष्य वर्तवते. गंमत अशी की आपल्याला न रुचणारं भविष्य वर्तवलं गेलं की ती चिठ्ठी तिथल्या झाडावर बांधून ठेवायची. बुद्धाची कृपानजर म्हणे अशा कमनशिबी लोकांवर पडते आणि त्यांचं नशीब फळफळतं. पांढऱ्या रंगावर काळी किंवा लाल जपानी अक्षरं काढलेले सुंदर कागदी कंदील एका ओळीत लटकावलेला एक स्टॅन्ड मंदिराच्या आवारात पाहिला. मोठी धनराशी मंदिराला दान केलेल्या धनिकांच्या नावाच्या फरश्या आपल्या देवळामध्ये लावतात त्याचेच हे भाऊबंद.

टोकियोच्या योयोगी नावाच्या उपनगरात वसलेल्या शिन्तो पंथाच्या मेजी जिंगू मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला चाळीस फूट उंच प्रवेशद्वारातून आत शिरावं लागतं. शिन्तो पंथात या ‘टोरी’ला (प्रवेशद्वाराला) अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऐहिक जीवन बाहेर सोडून, पवित्र मनानं या पवित्र जागेत प्रवेश करण्याची आठवण ही भव्य प्रवेशद्वारं करून देतात. त्या टोरीतून प्रवेश करत दुतर्फा वृक्षराजी असलेल्या रस्त्यावरून चालत आम्ही मेजी मंदिराकडे निघालो. मध्येच पानांच्या सळसळीचं संगीत आणि पक्ष्यांच्या मंजुळ लकेरी ऐकू येत होत्या. मंदिरात शिरण्यापूर्वी डावीकडे लाकडी ओगराळी आणि वाहत्या पाण्याचे हौद असलेली एक मुखप्रक्षालनाची जागा सुनिश्चित केलेली दिसली. जपानी प्रथेप्रमाणे मुखप्रक्षालन करून स्वच्छ तनमनाने आम्ही मंदिरात प्रवेश केला. या मंदिरात जपानचा धर्मपरायण लोकप्रिय सम्राट मेजी आणि त्याची सदाचारी पत्नी सम्राज्ञी शोकेन यांचे अवशेष ठेवलेले आहेत. शिन्तो पंथाच्या प्रथेनुसार मनोकामना, नवसपूर्ती, ईश्वराप्रती कृतज्ञता यांसाठी इष्ट देवतेला खाजगी प्रार्थना लिहिली जाते. त्यासाठी तिथे लाकडाच्या छोट्या पाट्या आहेत. जपानीत त्याला ‘एमा’ म्हणतात. या पाट्यांच्या दुकानाशेजारी ‘लकी चार्म’ विकणारं एक दुकान आढळलं. शिष्यवृत्ती मिळावी, स्पर्धा जिंकावी, आरोग्य उत्तम राहावं यासाठी असलेले हे ताईत मनगटाभोवती बांधले जातात. त्या दुकानात वाहतूक कोंडीत अडकू नये या कारणासाठीचा ताईत बघून आमचं खूप मनोरंजन झालं. या देवळातच आम्ही शिंतो नमस्काराची विशिष्ट पद्धत शिकलो. प्रथम मनोभावे पेटीत पैसे टाकायचे. कंबरेत लवून दोनदा नमस्कार करायचा. दोनदा टाळी वाजवायची. मनात प्रार्थना म्हणायची आणि पुन्हा दोनदा कंबरेत वाकून नमस्कार करायचा.

मंदिराच्या आवारात पार्क केलेल्या गाडीतून वधू-वर उतरताना दिसले म्हणताना आम्ही तिथे थोडे थबकलो. जुन्या मॉडेलची चकचकीत काळ्या रंगाची गाडी होती ती. ड्रायव्हरने दार उघडण्यासाठी हॅण्डल पकडलं तर ते दार छतासकट वर उचललं गेलं आणि पारंपरिक वेशातली वधू आपल्या घोळदार झग्याचा घेर सांभाळत आणि उंच टाचांच्या बुटांवर आपला भार तोलत खाली उतरली. एरवी मनमोहक रंगांचे किमोनो घालून फिरणाऱ्या जपानी बायकांचा वधूवेश मात्र साधाच वाटला मला. मोतिया रंगाच्या झग्याला मागे एक टोपरं होतं. त्या सलज्ज वधूचा डोईवरील पदर असावा तो. वराचे कपडे तर अगदीच साधे. काळ्या रंगाचा अंगरखा आणि खाली राखाडी रंगाचा पायघोळ पायजमा. डोक्यावर फेटा वगैरे काही दिसला नाही, मात्र वरात निघाली तेव्हा वधूवरांच्या मस्तकावर लाल छत्र घेऊन एक माणूस चालत होता. शुद्धतेचं, मांगल्याचं प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाच्या वेशात वधू सजली होती आणि करवल्याही! पायजमा मात्र भडक लाल रंगाचा घालून त्या करवल्यांनी आपली समारंभात मिरवण्याची हौस पुरवून घेतली असावी. शिन्तो पद्धतीनं साजऱ्या होणाऱ्या लग्नात मोजकीच जवळची मंडळी असतात. त्याच्या दुप्पट तिप्पट तर पर्यटकच होते.

मंदिराच्या प्रवेशद्वारापासून निघालेली वरात म्हणजे शिस्तीत चालणारी परेड जणू ! पुढे पुरोहितगण, त्यांच्यामागे करवल्या, नंतर छत्रधारी वधुवर आणि मग काळ्या सुटातले आणि काळ्या-पांढऱ्या किमोनोमधले वऱ्हाड. लग्नासाठी राखून ठेवलेल्या खास गाभाऱ्यात होणारा लग्नविधी खूप साधा असतो. मात्र तो बंद दरवाजापलीकडे होतो. आम्ही त्याचे साक्षी होऊ शकलो नाही तरी त्या विधीची माहिती आम्हाला गाईडने समजावून सांगितली. सुरुवात पवित्र जलसिंचनाने होते. त्यांच्या भावी आयुष्यात मंगल घडो अशी प्रार्थना केली जाते. गाभाऱ्यातील पुजारीणबाई (मिको) यांनी ओतून ठेवलेल्या तीन छोट्या कपांमधील ‘साके’ या भातापासून बनवलेल्या पेयाचं जोडीनं प्राशन केलं जातं. नवरदेव मग ‘देवाब्राह्मणांच्या’ साक्षीने वधूला दिल्या जाणाऱ्या वचनांचं पठण करतो. मुद्रिकांची अदलाबदल होते. आणि त्यानंतर मिको देवासमोर नृत्य सादर करते. ‘तामागूशी’ या पवित्र झाडाची फांदी देवाला अर्पण करून हा विधी संपतो. ही वरात पाहणं हा आमच्यासाठी एक छानसा सांस्कृतिक अनुभव होता.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

Mumbai : आजपासून मिठी नदीतील गाळ उपसणार; अखेर कंत्राटदाराची नियुक्ती

राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक

विवाहित पुरुष आणि प्रौढ महिला यांचे लिव्ह-इन-रिलेशन हा गुन्हा नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल

वेळेत भूसंपादन न झाल्यास जमीन मालकाचीच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा