शिक्षणगूज
युवराज माने
गुरुजी म्हणून गेल्या दोन दशकांच्या प्रवासात मला शिकण्याची अनेक मर्मं सापडली. ती पुस्तकांतून नाहीत, तर लेकरांच्या छोट्या-छोट्या कृतीतून, त्यांच्या प्रश्नांतून, चुकांतून आणि जिद्दीमधून उलगडली. विविध प्रसंगांनी मला शिक्षणाची खरी गूज शिकवली.
शिकणं म्हणजे गुणांची शर्यत नाही, तर समजून घेण्याची प्रक्रिया आहे; शिस्त म्हणजे भीती नाही, तर आपुलकीतून घडलेली सवय आहे; आणि गुरुजी म्हणजे सांगणारा नव्हे, तर समजून घेणारा साथीदार आहे. हीच शिक्षणगूज या सदरातून मांडण्याचा छोटासा प्रयत्न.
पल्याला एखादी गोष्ट जमू लागली, येऊ लागली तर आपल्याला कसं वाटतं? या सृजनात्मक प्रश्नातून गुरुजी आणि लेकरांमध्ये घडलेली ही चर्चा—
सकाळी वर्गात आल्याबरोबर खुशी माझ्याजवळ आली आणि हसत म्हणाली, “गुरुजी, मला कसंतरीच होतंय.”
क्षणभर मला वाटलं, तिची तब्येत बरी नसेल. पण ती थोडी लाजत, आनंद दडवत म्हणाली, “गुरुजी, माझ्या मनात नुसत्या गुदगुल्या होत आहेत.”
मी चकित झालो. हातातलं काम बाजूला ठेवून विचारलं, “आता सांग बरं, काय झालंय नेमकं?”
तेव्हा खुशी म्हणाली, “गुरुजी, मला आता इंग्रजी वाचता येऊ लागलाय. वाचताना इतका आनंद होतो की मनात गुदगुल्या होतात.”
हे सगळं खुशी सांगत होती, पण ऐकताना माझ्याच मनात गुदगुल्या सुरू झाल्या. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्यातला गुरुजी चिंब चिंब भिजून गेला. त्या लेकराला गळ्याशी धरलं… आणि त्या क्षणी जाणवलं—तीनं एक नवं आकाश जिंकलं होतं.
दुपारपर्यंत आम्ही दोघं एकमेकांकडे पाहून हसत होतो. त्या लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यात जे सुख मिळत होतं, ते शब्दांत मांडणं कठीण होतं.
वाचनाच्या तासाला राहवेना म्हणून मी तो प्रसंग सगळ्या लेकरांना सांगितला आणि विचारलं, “मुलांनो, आपल्याला एखादी गोष्ट जमू लागली तर आपल्याला कसं वाटतं?”
क्षणात अनेक हात वर गेले…
कल्याणी म्हणाली, “आता मला सगळे टेन्स येतात. वाचता येतंय, त्यामुळे पंख फुटल्यासारखं वाटतं. आकाशात उडतेय असं वाटतं.”
स्वाती म्हणाली, “मला गणित जमतंय, पाढे पाठ झालेत, अक्षर छान येतंय… खुशीसारखंच माझ्याही मनात गुदगुल्या होतात.”
दिशा म्हणाली, “शाळेत पाहुणे आले की मी आभार मानते, तेव्हा मला खूप आनंद होतो.”
मनीषा म्हणाली, “काहीतरी नवं जमलं की उड्या माराव्याशा वाटतात. जणू मोठं बक्षीस मिळाल्यासारखं वाटतं.”
वर्ग सातवीत शिकणारी अंजूताई म्हणाली, “गुरुजी, आता मला मराठी आणि इंग्रजी वाचता येतंय, त्यामुळे खूप आनंद होतो.”
शीतल वेगळ्याच शैलीत म्हणाली, “असं काही जमलं की नाचावं, गाणं म्हणावंसं वाटतं.”
चुळबुळी साक्षी म्हणाली, “गणित सुटलं किंवा प्रश्नाचं उत्तर सापडलं की माझा आनंद गगनात मावत नाही.”
प्रयास म्हणाला, “प्रश्नाचं उत्तर दिलं की वाटतं आपण खूप हुशार आहोत. माझ्या चित्राचं कौतुक झालं की भारी वाटतं.”
बराच वेळ शांत बसलेली ममता लाजत म्हणाली, “गुरुजी, तुम्ही आम्हाला जवळ घेता, शाबासकी देता… तेव्हा खूप आनंद होतो. आता मला छान वाचता-लिहिता येतंय.”
असे आनंदाचे असंख्य तुषार माझ्यावर बरसत होते. मी चिंब चिंब आनंदात न्हाऊन निघालो होतो. त्या क्षणी पुन्हा एकदा खात्री पटली—जिथे आनंद आहे, तिथेच खरं शिक्षण रुजतं.
गूज वाक्य—
शिकण्याचा खरा मापदंड गुणपत्रिकेत नसतो; तो लेकरांच्या डोळ्यांत दिसणाऱ्या आनंदात आणि मनात उमटणाऱ्या गुदगुल्यांत असतो.
लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत.
‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते
शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात.
....................
जरा डोकं चालवा
डोळे आहेत पण बघू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही—ओळखा पाहू मी कोण?
लिहतो पण पेन नाही, चालतो पण गाडी नाही, टिक टिक करतो पण घड्याळ नाही—सांगा बरं मी कोण आहे?
अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला फ्रीमध्ये मिळते पण हॉस्पिटलला गेल्यावर विकत घ्यावी लागते?
अशा एका भाजीचे नाव सांगा ज्या भाजीच्या नावामध्ये एका प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे?
असे कोणते ठिकाण आहे जिथे खूप जण बसलेले असतात तरी सुद्धा तुम्हाला एकटे एकटे वाटते?
उत्तरे—
बाहुली, की-बोर्ड, ऑक्सिजन, शिमला मिरची, परीक्षा हॉल