'एआय' ने बनविलेली प्रतिमा
अक्षररंग

शिमगोत्सव का होत नाही महाराष्ट्रातील ‘कार्निव्हल’

कोकणातील शिमगा म्हणजे केवळ सण नव्हे तर तो लोककला आणि श्रद्धेचा मिलाप आहे. गोव्यातील कार्निवल तसेच कर्नाटक सरकारच्या कदंब आणि करावली या उत्सवाप्रमाणेच कोकणातील शिमगोत्सवही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरू शकतो. गोव्यातील कार्निव्हलकरिता तेथील सरकार जय्यत तयारी करते. कोकणात तसे काही होत नाही.

नवशक्ती Web Desk

विशेष

सतीश पाटणकर

कोकणातील शिमगा म्हणजे केवळ सण नव्हे तर तो लोककला आणि श्रद्धेचा मिलाप आहे. गोव्यातील कार्निवल तसेच कर्नाटक सरकारच्या कदंब आणि करावली या उत्सवाप्रमाणेच कोकणातील शिमगोत्सवही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरू शकतो. गोव्यातील कार्निव्हलकरिता तेथील सरकार जय्यत तयारी करते. कोकणात तसे काही होत नाही.

कोकणातील शिमगा म्हणजे केवळ सण नव्हे तर तो लोककला आणि श्रद्धेचा मिलाप आहे. होळी धुलीवंदन म्हणजेच कोकणात शिमगोत्सव आणि धुळवड म्हणून साजरी केली जाते. सिंधुदुर्गात गाव होळ्या, देव होळ्या, राखणे होळ्या उभ्या केल्या जातात. होळीच्या दिवशी आंबा, नारळ, सावर, हेळा, सागवान अशा विविध झाडांची होळी उभारत पारंपारिक पद्धतीने धार्मिक कार्यक्रम होळी उत्सवात साजरे केले जातात. हा रंगतदार उत्सव केवळ मिरवणूक, संगीत आणि नृत्यापुरता मर्यादित नसून तो कोकणाच्या मुक्त, आनंदी आणि बहुसांस्कृतिक जीवनशैलीचे प्रतीक मानला जातो. कोकणातील प्रत्येक गावामध्ये साजऱ्या होणाऱ्या शिमगोत्सवाच्या परंपरा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या शिमगोत्सवाला पर्यटनाची जोड देण्याचा विषय गेली काय वर्षे चर्चेत आहे. नाचत-नाचत माडहोळी आणणे , नमनाचे खेळे, रोंबाट, संकासूर, आंब्याची पाने व विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेली होळी, ढोल ताशाच्या गजरात आरोळ्या ठोकत ग्रामदेवतेच्या पालख्या मानकऱ्यांच्या घरी नेणे या साऱ्या नावीन्यपूर्ण चालीरीतींचा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो. गोव्यातील कार्निवल तसेच कर्नाटक सरकारच्या कदंब आणि करावली या उत्सवाप्रमाणेच कोकणातील शिमगोत्सव ही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरू शकतो. सुदैवाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे कोकणातीलच आहेत. शेजारच्या गोवा राज्यातील ‘कार्निव्हल‘ साठी जगभरातून पर्यटक येत असतात. त्यासाठी तेथील राज्य सरकार जय्यत तयारी करीत असते. कोकणात तसे काही होत नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणनजिकच्या आंगणेवाडी येथील भराडी देवीची प्रसिध्द जत्रा संपन्न झाली. लाखो लोकांनी त्या निमित्ताने भराडी देवीचे दर्शन घेतले. २०-२५ वर्षापूर्वी आंगणेवाडी हे ठिकाण दक्षिण कोकणाच्या बाहेर फारसे परिचित नव्हते. मात्र आता ते कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील थोरा-मोठ्यांना माहित झाले आहे. त्यामुळे तेथे प्रचंड संख्येने येणाऱ्या भक्तांमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने ती एक पर्वणी ठरली आहे. परंतु स्थानिक स्वरूपाच्या कोकणातील अशा उत्सवांचा पर्यटनाच्या वृध्दीसाठी फारसा प्रयत्न केला गेलेला नाही. शिमगोत्सव म्हणजे कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा सण. कोकणात फाक पंचमीच्या दिवशीच शिमगोत्सवाला प्रारंभ होतो. गावाचे गावकर आणि मानकरी ग्रामदेवतेच्या मंदिरात जमतात आणि सुरु होतो देवांना पालखीत विराजमान करण्याचा सोहळा. कोकणात याला पालखीला रुप लावण्याचा सोहळा म्हटलं जातं. वर्षातून ठराविक दिवशीच देव पालखीत विराजमान होतात. त्यांना पालखीत कोणी बसवायचं, त्याचं पूजन कोणी करायचं याचे मान निश्चित असतात. देवाच्या आकर्षक मूर्ती वस्त्रालंकारासह विराजमान होताच शिमगोत्सवाचं पाहिलं गाऱ्हाणं घातलं जातं आणि इथूनच शिमगोत्सवाला प्रारंभ होतो. फाक पंचमीच्या दिवशी ग्रामस्थ होळीकरिता जंगलातून झाड तोडून आणतात. ढोलताशांच्या गजरातच ही होळी वाजत गाजत आणली जाते. रात्री उशिरा गावातील ग्रामस्थ नाचवतच ही होळी गावात घेऊन येतात. या होळीला मग निशाण-मानाचे नारळ लावले जातात. मग वर्षानुवर्षे ठरलेल्या जागी ही होळी उभी केली जाते. मानकरी होळीची पूजा करतात आणि याच होळी भोवती होम पेटवला जातो. फाक पंचमीपासून धुलीवंदनापर्यंत दररोज रात्री ग्रामस्थ या होळीभोवती जमतात, होम पेटवला जातो आणि मग अस्सल कोकणी ठेक्यात एकमेकांच्या नावाने शिमग्याच्या आणि आपल्या ग्रामदेवतेच्या फाका घातल्या जातात. याच दरम्यान प्रत्येक गावाच्या ग्रामदेवतांच्या पालख्या मंदिराबाहेर पडतात. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. विशेष म्हणजे कोकणातील प्रत्येक गावामध्ये साजऱ्या होणाऱ्या शिमगोत्सवाच्या परंपरा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दक्षिण कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. अनेक ठिकाणी विविध लोककला याच काळात सादर केल्या जातात. अख्खा गाव त्यासाठी गोळा होतो. रोंबाट हे सगळीकडे प्रमुख वैशिष्ट्य, त्यात अंगात येणारे संचार, त्यांचे घुमणे, ढोलांचे आवाज यांनी या काळात सारा गाव दुमदुमलेला असतो.

दोडामार्गाचा गाडा उत्सव

दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथील श्रीदेवी सातेरी देवीचा ‘ गाडा उत्सव ‘ आणि बांदा तसेच पाट्येमधील घोड्यांचे मुखवटे परिधान करीत दोन पायांवर घोड्यांचे नृत्य करणारा ‘ घोडेमोडणी ‘ हा प्रकारही विलोभनीय असतो. गाडा उत्सवात भाविक देवीच्या मूर्तीला मंदिराची प्रतिकृती असलेल्या, सजवलेल्या लाकडी गाड्यामध्ये ठेऊन तो दोरीच्या सहाय्याने ओढत नेतात. जड असलेला हा गाडा श्रद्धेच्या ताकदीपुढे हलका होऊन ओढला जातो. यासाठी भाविकांत चढाओढ लागते. असनिये येथील  शिमगोत्सवाला होळी पौर्णिमेच्या आठव्या दिवशी सुरवात होते. त्या दिवशी सायंकाळी गावातील प्रत्येक घरात राधा, कृष्ण, गोपी आणि दशावतारातील सोंगांचा नाच होतो. असनिये गावात वर्षभर दारू पिण्यास बंदी असते. मात्र या दिवशी त्या मद्यबंदीला सुट्टी दिली जाते.

नेरुरचा वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव

कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील शिमगोत्सव  हा आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. होळीच्या तिसऱ्या दिवशी होणारा कुडाळ तालक्यातील नेरूर गावचा मांड उत्सव. माड़ उत्सव हा स्थानिकाच्या कलेला एक अविष्कार आहे. गावच रोंबाट ढोलताशांच्या गजरात श्री देव कलेश्वराच्या भेटीस येते. याला गोडा रोंबाट असं म्हटलं जातं. त्यानंतर हे रोबाट सायचे टेब येथे आल्यावर या ठिकाणी गारांही मांडली जातात. त्यानंतर सुरु होतो तो मांड उत्सव. अक्राळ विक्राळ देखावे, विविध प्रकारचे सोंगाडे मेस्त्री कुटुंबीय आपल्या कल्पनेने तयार करुन या मांडावर सादर करतात. नेरूरमधील सुतारवाडीत घराघरांतून पुराणातील कथानकांवर आधारित वेगवेगळे हलते देखावे अवाढव्य स्वरूपात तयार केले जातात. त्या देखाव्यातील एकेक कथानक तिथल्या मांडावर उत्तर रात्रीपर्यंत सादर केले जाते. उपस्थितांना नुसत्या देखाव्यावरून त्यामागच्या कथानकाची कल्पना येत नसल्यामुळे ते ध्वनिक्षेपकावरून सविस्तरपणे सांगितलेही जाते. गणपती, राधा, राक्षस, वाघ, हंस, पशुपक्षी अशी अनेकजण वेशभूषा घालून नृत्य करतात. यात लहान मुलांचा सहभाग असतो.  नेरूरसारख्या गावातील एका छोट्या वाडीत इतका अप्रतिम कार्यक्रम वर्षानुवर्षे सादर होतो हे एक नवल म्हणायला हवे.

कुणकेरीतील हुडोत्सवात भाविकच देवांवर मारतात दगड

तळकोकणातील शिमगोत्सव म्हटलं की, सावंतवाडीतील कुणकेरी गावचा हुडोत्सव आलाच. हजारो भाविक या उत्सवाला हजेरी लावतात. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक येथून भाविक मोठ्या संख्येने या उत्सवाला येत असतात. सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या 'हुडोत्सवा'ने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, अशा प्रथा परंपरांमुळे वेगळपण जपले आहे. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा 'हुडोत्सव‘ सर्वांसाठी पर्वणीच असते. या हुडोत्सवात शंभर फूट असणाऱ्या होळीवर अवसार चढू लागतात. त्यांना भाविक खालून दगड मारत असतात. होळीच्या सहाव्या दिवशी रात्री हुड्यावर व होळीवर पेटत्या शेणी मारल्या जातात. होळीच्या सातव्या दिवशी मुख्य हुडोत्सव असतो. उत्सवावेळी या संपूर्ण हुड्याला आंब्याचे टाळ बांधले जातात. अंगात संचार आलेले अवसार हे येथील शंभर फूट उंच असणाऱ्या होळीवर चढू लागताचं जमलेले भाविक खालून त्यांच्यावर दगड मारतात. पण, मारलेले दगड हे अंगात संचारलेल्या अवसारापर्यंत म्हणजे देवांपर्यंत पोहचत नाहीत आणि ज्याचा दगड अवसारांना लागला त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी येथे येणाऱ्या भाविकांची दृढ श्रद्धा आहे. शिमगोत्सवात डफ व घुमट या पारंपरिक वाद्यांचा वापर करुन गावात खेळ खेळले जातात. हे खेळगडी जी गाणी म्हणतात त्यांना 'जती' असे संबोधले जाते. घोडेमोडणी आणि वाघाची शिकार हे सुद्धा या हुडोत्सवाचे वेगळेपण आहे. रोंबटात वाघाची लुटुपुटुची शिकार केली जाते. कुणकेरीतील परबवाडी येथे श्री भावईच्या देवघरी तिची उत्सवमूर्ती आहे. हुडोत्सवाच्या दिवशी याठिकाणी तसेच भावईच्या मंदिरातही नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे असे कार्यक्रम होतात. हा उत्सव आजही आपले वेगळेपण जपून आहे.

देवगड तालुक्यातील पुरळचा कापडखेळ

देवगड तालुक्यातील पुरळ गावात होणारा कापडखेळ हा शिवकाळापासून प्रसिद्ध आहे. कित्येक वर्षापासून शिमगोत्सवामध्ये पुरळच्या निशाणासोबत पुरळचे ग्रामस्थ गावामध्ये आपला कापडखेळ सादर करतात. या कापडखेळाचे वैशिष्टय म्हणजे इतिहासकालीन जसे शिवरायांच्या मावळ्यांनी परिधान केलेले फेटे असतात, त्याचप्रमाणे पुरळ गावातील कापड खेळ्यांचे हे फेट सुबकतेने सजविले जातात. यामुळे या खेळ्यांच्या फेट्यांची कलाकृती ही लक्षणीय असते. अंगामध्ये शर्ट व कमरेभोवती गोल साड्या परिधान करून हातात काठ्या, रुमाल घेऊन फेर धरून हा धार्मिक खेळ सादर केला जातो. 

'कापडखेळ' हे देवखेळे (कापडखेळे) परगावातील नवस पुरळ गावात जाऊन शिमगोत्सवामध्ये हे देवखेळे त्या नवस असणा-या व्यक्तीच्या घरासमोर निशाणकाठी घेऊन त्या ठिकाणी देवखेच्च्यांचा खेळ सादर केला जातो. नवसाला पावणारे हे देवखेळे म्हणून प्रसिद्ध आहेत. पुरळ गावातील पावणाई, रवळनाथ मंदिरातील निशाणकाठी व देवतरंग पुरळ मधीलच गावराई चव्हाट्यावर शिमगोत्सव कालावधीत स्थलांतरीत केले जातात. आणि याचं ठिकाणी 'देवखेळे (कापडखेळे) हे पुरळ गावात खेळले जातात. 

वेंगुर्ला- मठ येथील घोडेमोडणी

वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावात शिमगोत्सवात चालणारी अनोखी 'घोडेमोडणी' पूर्वीच्या युद्धाची प्रचिती करुन देते. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गनिमी काव्याने युद्धात विजय मिळविला, त्याप्रमाणे त्याचे एक प्रतिक म्हणून घोडेस्वारी युद्ध आणि ऐतिहासिकता, एकतेचे प्रतिक यांची जपणूक करणारा आगळावेगळा, सांस्कृतिक परंपरा जपणारा म्हणून मठ शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. पाचव्या दिवशी गावचे मानकरी घोडेस्वारी करण्यासाठी निघतात. प्रतिकात्मक घोड्याचे मुख असलेला व शेती वापरली जाणारी इरली' याचा वापर करून, सजवून, गुलाल, रंग, ढोलताशांच्या गजरात आपल्या ठिकाणावरून स्वारीसाठी निघतात. ज्याप्रमाणे मराठ्यांनी गनिमीकाव्याने युद्धस्वारी करून युद्ध जिंकले व विजयोत्सव साजरा केला त्याचेच प्रतिकात्मक घोडेस्वारी लढाई होते. हे दृश्य पाहताना कधी रात्र होते हे समजतही नाही. एवढी ही घोडेमोडणी प्रभावी असते. त्यानंतर बनाटे फिरविण्यासारखी चित्तथरारक नृत्ये साजरी होतात.

या शिमगोत्सवाला जर पर्यटन व्यवसायाची समर्थ जोड मिळाली तर कोकणासाठी ती भाग्याची गोष्ट ठरेल?

Iran Israel War : इराणच्या सर्वोच्च नेता निवडी‌वेळी इस्रायलचा हल्ला; लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ले

अर्थसंकल्प अर्थपूर्ण ठरावा एवढीच अपेक्षा...

मार्च महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ४ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Women’s Day 2026 : महिला दिनानिमित्त उपयुक्त आणि स्टायलिश गिफ्ट आयडिया; यंदा द्या खास सरप्राईज