नवलनगरी
सोनाली कोलारकर-सोनार
कपडे धुण्याची पद्धतही एक विज्ञान आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चला, ईशानसोबत जाणून घेऊया ड्राय क्लिनिंगचा रंजक इतिहास.
शनिवारी मस्त सुट्टीची मजा घेत पुस्तक वाचत बसलेला आठवीतला ईशान, आईच्या हातातला धुण्याच्या कपड्यांचा गठ्ठा बघून म्हणाला, ‘आई, तो लाल टी-शर्ट धुवायला टाकू नको. त्याला ड्राय क्लीन करायला दे. त्याच्यावर तसं लिहिलं आहे.’
आईला गम्मत वाटली. ती मुद्दाम ईशानला म्हणाली, ‘एकदम आज कसं काय हे तुझ्या लक्षात आलं बुवा?’
तेव्हा आपले डोळे चमकवत ईशान म्हणाला, ‘अग बस इथे आई! तुला मी गम्मत सांगतो. मी एका माणसाची गोष्ट वाचली. ऐक तू पण.’
आई उत्सुकतेने म्हणाली, ‘ह सांग!’
‘बघ ही गोष्ट पार १८२१ ते ५५ च्या काळातील आहे. ईशानने गोष्ट सांगायला सुरुवात केली. जीन बाप्तीस्त जॉली नावाचा एक फ्रेंच टेलर होता. म्हणजे खरं तर तो कपड्यांना डाय करून म्हणजे रंग लावून देण्याचे काम करायचा. त्यांच्या घरी एक खूप सुंदर टेबल क्लॉथ होता. त्याच्या बायकोचा तो टेबल क्लॉथ फारच लाडका होता. ते फार काळजी घ्यायचे त्याची. पण एका आठवड्यात कामाच्या धबडक्यात तो धुवायचा राहून गेला, तसाच टीपॉयवर मळलेला टेबल क्लॉथ अंथरला होता. रोजच्या सारखी त्यांची कामवाली बाई आली आणि साफसफाई करायला लागली. त्याकाळी टरपेन्टाईनवर पेटणारे दिवे होते हे तुला माहीत असेलच?’ ईशान आता मोठा होऊन ‘छोट्या’ आईला गोष्ट सांगत होता. ‘हो हो’ आईने देखील शहाण्या विद्यार्थिनीसारखी मान हलवत म्हंटले.
‘तर त्या टेबलावर असलेल्या अशा एका दिव्याला या कामकरी मावशीबाईचा धक्का लागला आणि त्यातले तेल सांडले ते चक्क त्या टेबल क्लॉथवर! आता आपल्याला चांगलेच रागावले जाणार या विचाराने कामवाली मावशीबाई घाबरली. थोड्या वेळाने जॉलीने येऊन टेबल क्लॉथ बघितला आणि त्या टरपेन्टाईने तेवढा भाग घासला, तर गम्मतच झाली. मळलेला टेबल क्लॉथ तेवढ्या भागात एकदम स्वच्छ दिसायला लागला. त्याने तातडीने तो टेबल क्लॉथ घेतला आणि एका टबमध्ये ठेवला. त्यात टरपेन्टाईन टाकलं आणि त्याला घासलं, तर काय आश्चर्य! तो एकदम स्वच्छ होऊन चमकायला लागला. हा शोध लागलेला बघून जॉलीला खूपच छान वाटलं. त्याने लगेच डाय करण्यासोबतच, लोकांना देखील सेवा द्यायला सुरू केली आणि नाव दिलं : ड्राय क्लिनिंग! याच दरम्यान अमेरिकेत पण या ड्राय क्लिनिंगबाबत संशोधन सुरू होतं. थॉमस जेनिंग्स या आफ्रिकन अमेरिकन संशोधकाने या प्रक्रियेचे पेटंट पण घेतले होते. फक्त गंमत काय होत होती की पाण्याव्यतिरिक्त जो द्रव पदार्थ किंवा विद्रावक (solvent) या ड्राय क्लिनिंगसाठी वापरला जात होता त्याने आग भडकण्याची शक्यता होती. टरपेन्टाईनमध्ये धुतलेल्या कपड्यांना एक विशिष्ट वास यायचा तो वेगळाच! त्यामुळे अर्थातच ग्राहक जरा बिचकूनच कपडे द्यायचे. मग हळूहळू संशोधनात भर पडत गेली आणि आता परक्लोरो इथिलीन (perchloroethylene) हा वास न येणारा, आग न लागू शकणाऱ्या विद्रावकाने कपडे धुतले जातात.’
इतकं सांगून ईशान म्हणाला, ‘आई, पाण्याशिवाय ज्याही विद्रावकाने कपडे धुतले जातात त्याला ड्राय क्लिनिंग म्हणतात, हे मला आता या गोष्टीतून कळलं! तर मी काय म्हणत होतो की, असंच मी आता आंघोळीसाठी पण करू का ड्राय क्लिनिंग!’ ईशान हसत हसत म्हणाला.
आई पण जोरात हसली आणि म्हणाली, ‘मस्त गोष्ट सांगितलीस या शोधाची! यासाठी तुला शाबासकी म्हणून तुझ्या आवडीचा खाऊ नक्की मिळेल, पण पाण्याने केलेल्या आंघोळीनंतरच!!’
तेव्हा मित्रांनो, कपड्यांवर लिहिलेल्या सूचनांचं ते धुण्यापूर्वी नक्की पालन करा! नाहीतर काहींचा रंग पाण्यामुळे धुतला जाईल आणि काहींना उगीचच ड्राय क्लीन केल्याने ते खराब होतील. तेव्हा हे काही सिम्बोल्स नक्की लक्षात ठेवा. ते कॉलरच्या मागे ‘वॉशिंग इन्स्ट्रक्शन्स’ अशा मथळ्याखाली लिहिलेले असतात. आपले कपडे स्वच्छ, नेटके राहिले की आपल्याला प्रसन्न वाटतेच!
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक
sonalikolarkarsonar@gmail.com