हाच का तो पुरोगामी महाराष्ट्र? 
अक्षररंग

हाच का तो पुरोगामी महाराष्ट्र?

वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे किंवा जवाबदार घटनात्मक पदावर वसलेल्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित वादग्रस्त व्हिडीओच्या ताज्या घटना पाहता, हाच का तो पुरोगामी महाराष्ट्र? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

नवशक्ती Web Desk

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

संतसज्जनांच्या अभंगवाणीचे नैतिक अधिष्ठान लाभलेल्या आणि समाजसुधारकांच्या तेजस्वी विचारांनी उजळून निघालेल्या ज्या भूमीने देशाला सर्वांगीण प्रगतीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला, ज्या राज्याने 'पुरोगामी' असण्याचा तोरा मोठ्या अभिमानाने मिरवला, तोच महाराष्ट्र आज श्रद्धेच्या बाजारीकरणाच्या अत्यंत धोकादायक वळणावर येऊन उभा आहे. वादग्रस्त भोंदूवावा अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे किंवा जवाबदार घटनात्मक पदावर वसलेल्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित वादग्रस्त व्हिडीओच्या ताज्या घटना पाहता, हाच का तो पुरोगामी महाराष्ट्र? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

भोंदूबाबा अशोक खरात याच्यासारखी प्रवृत्ती धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली तथाकथित काळी जादू, वशीकरण, करणी वा अघोरी कृत्य करून गडगंज संपत्ती गोळा करीत असेल, सर्वसामान्य, अगतिक महिलांचे शोषण करत असेल, त्याच्या दरबारात आपल्या राजकीय भवितव्याच्या चिंतेने मंत्री येराझाऱ्या घालत असतील, महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षाच भोंदूबाबाचे पाय धुण्यात धन्यता मानत असतील, तर आपण कोणत्या अंधार युगात वावरत आहोत, असा प्रश्न निर्माणा होतो. सर्वसत्ताधीश मंत्रीही अनामिक भीतीपोटी निर्माण झालेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये गुंतून पडत असतील, तिथे बेरोजगारी, कुपोषण, दारिद्रय यासारख्या नानाविध समस्यांच्या फेऱ्यात सापडलेल्या सामान्य माणसाची काय कथा? मग, दारिद्र्याने पिचलेली गोरगरीब मंडळी बुवा, बाबा, महाराजांच्या भोंदूगिरीला बळी पडत असतील, तर त्यात नवल ते काय?

सध्या घराघरातील 'टीकी'वर बाबा-महाराजांच्या करामती व धार्मिक कर्मकांडांचे उदात्तीकरण करणाऱ्या मालिका खुलेआम दाखविल्या जात आहेत. त्यातून घराघरांमध्ये अंधश्रद्धांचे तण जोमाने फोफावले आहे. आपण काय बघतो, कोणते विचार अंगिकारतो याचे कोणतेही भान प्रेक्षकांना उरलेले नाही. सध्या घरसंस्कार मागे पडून घराच्या वास्तुदोषाला अधिक महत्त्व आले आहे. त्यात ज्यांना स्वतःचे भवितव्य सांगता येत नाही, त्या कथित वास्तुगुरूंच्या आहारी सारा समाज अधीन होत चालला आहे. घरांची दिशा जर एखाद्या व्यक्तीचे भवितव्य घडवणार असेल, तर शिक्षणाची, मेहनतीची गरजच काय ? सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत गुंतलेल्या तरुणाईला सभोवतालच्या मूलभूत प्रश्नांचे आणि मूल्यांचे गांभीर्य वाटेनासे झाले आहे. पण, जेव्हा जीवनाचे कटु वास्तव भोंदू खरातसारख्या घटनांच्या रूपाने समोर येते, तेव्हा त्यातून सामाजिक अधःपतन किती वेगाने सुरू आहे, याची कल्पनाच करवत नाही.

आजचा समाज सद्सद्विवेकबुद्धीला तिलांजली देऊन केवळ काल्पनिक चमत्काराच्या मृगजळामागे धावताना दिसत आहे. ही हतबलता, अगतिकताच भोंदूबाबांचे सर्वांत मोठे भांडवल ठरत आहे. ज्याच्या शिक्षणाचाच पत्ता नाही, अशा खरातसारख्या नराधमांनी केवळ सामाजिक, आर्थिक, फसवणुकीचे गुन्हेच केले नाहीत, तर त्यांनी लोकांच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचासुद्धा गळा चिरला आहे. एखादा सामान्य माणूस आपले दुःख, वेदना घेऊन अशा भोंदूंच्या चरणी लीन होतो, तेव्हा ती केवळ त्या व्यक्तीची फसवणूक नसते, तर ती त्या कुटुंबाच्या संस्काराची, विचारसरणीची, शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची पराभूत मानसिकताच असते. एखाद्याचे मनच खचले तर त्यावर हव्यासी, अय्याशी बुवा-बाबा-महाराजांचे चांगलेच फावते, मग मानसिक गुलामगिरी आर्थिक फसवणूक अटळच ठरते. हे सांगण्यासाठी कुठल्याही रॉकेट सायन्सची गरज नाही.

खरे तर, राजकारण हा समाजाचा आरसा असतो. सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या व्यक्तींचे जीवन खासगी न राहता सार्वजनिक बनते. ज्यांच्याकडे पाहून तरुण पिढी आदर्श घेते, त्या लोकप्रतिनिधींच्याच वर्तनातून जर संभ्रम डोकवायला लागला, तर नैतिकतेचा, विवेकाचा, आदशांचा डोलारा कोसळायला कितीसा वेळ लागेल ? सध्याच्या काळात ज्या पद्धतीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि नैतिक अधःपतन झाले आहे, ते पाहून लोकशाहीच्या भवितव्याबद्दल चिंता वाढल्यास आश्चर्य ते काय ? झिरवाळ यांच्यासारख्या नेत्यांशी संबंधित व्हिडीओची सत्यता आगामी काळात चौकशीअंती सिद्ध होईलच, परंतु अशा प्रकारच्या समाजमाध्यमातील वादग्रस्त चर्चामुळे जनमानसात जो संभ्रम निर्माण होतो, जो संदेश जातो, तो राज्याच्या प्रतिमेला कायमस्वरूपी तडे देतो, त्याचे काय ? राजकारण हे समाजसेवेचे, लोककल्याणाचे, त्यागाचे माध्यम राहण्याऐवजी 'स्वार्थाचे', 'भोगाचे', वशिलेबाजीचे आणि भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे की काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.

एकेकाळी प्रबोधनकार ठाकरे यांनी ज्या सामाजिक ढोंगावर, दांभिकतेवर आणि कर्मकांडावर आयुष्यभर आपल्या लेखणीतून आसूड ओढले, तोच ढोंगीपणा आज नव्या डिजिटल स्वरूपात अवतरला आहे व त्याला सत्ताधारीच खतपाणी घालत आहेत. महाराष्ट्राला सावरण्यासाठी आता पुन्हा एकदा

गाडगेबाबांच्या खराट्याची गरज निर्माण झाली आहे. गाडगेबाबांनी केवळ रस्ते झाडले नाहीत, तर त्यांनी माणसांच्या मनातील अज्ञानाचा आणि भेदभावाचा कचरा साफ केला होता. 'देव देव्हाऱ्यात नाही, तो माणसांत आहे' हे सांगणाऱ्या थोर संतांची शिकवण आपण सोयीस्करपणे विसरलो आहोत आणि बावा-बुवांच्या कच्छपी लागून स्वतःला हव्या त्या पद्धतीने धर्माचा व अध्यात्माचा अर्थ लावू लागलो आहोत, जे सर्वथा गैर आहे.

एकेकाळी ख्यातनाम लेखक खुशवंत सिंग यांनी आपल्या 'गुरुज, गॉडमन अॅण्ड गुड पीपल' या पुस्तकातून तत्कालीन भोंदू, बुवा, बाबांचा खरपूस समाचार घेतला होता. भगत, मांत्रिक व देवमाणूस यांच्यातील फरकही स्पष्ट केला होता. हे पुस्तक सद्यस्थितीशी अगदीच साधर्म्य साधणारे आहे. ज्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा आहे तेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत आणि जे मुक्तीचा मार्ग दाखवतात तेच वासनेच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळेच जनतेचा विश्वासच डळमळीत झाला आहे. ही विश्वासाची दरी समाजाला अराजकतेकडे आणि वैचारिक अंधाराकडे नेणारी ठरण्याचा धोका अधिक आहे. कोणत्याही राज्याची श्रीमंती ही तिथल्या नद्यांवर, धरणांवर किंवा कारखान्यांवर मोजली जात नाही, तर तिथल्या माणसांच्या विचारांच्या उंचीवर मोजली जाते. महाराष्ट्र हा विचारांनी श्रीमंत असणारा प्रदेश आहे. हे वैचारिक धन आपण गमावून बसलो, तर केवळ भौतिक प्रगतीला काहीही अर्थ उरणार नाही. अशोक खरात किंवा इतर राजकीय वादाच्या घटना या केवळ हिमनगाचे टोक आहेत. हा मनात साचलेला गढूळपणा, कलूषितपणा साफ करण्यासाठी प्रत्येक घटनेकडे तर्कसंगत, वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच पाहण्याची आवश्यकता आहे.

ज्या राज्यात परस्त्रीला मातेसमान मानले जाई, त्याच राज्यात आज स्त्रियांचे शोषण करणाऱ्या बाबांचे पेव फुटणे ही शिवरायांच्या विचारांशी केलेली घोर प्रतारणा आहे. ती रोखायची असेल, तर आपल्याला दांभिकतेवर सडकून टीका करणाऱ्या तुकोबांचा विद्रोह पुन्हा शिकावा लागेल. अंधश्रद्धेच्या बेड्या तोडण्याचे बळ देणाऱ्या महात्मा फुले यांचा 'सत्यशोधक' दृष्टिकोन आत्मसात करावा लागेल. आपल्याला आपल्या घरातील मुलांवर असे संस्कार करावे लागतील की, त्यांना चमत्कारापेक्षा आपल्या मेहनतीवर, कर्तृत्वावर विश्वास वाटेल. जोपर्यंत समाजात 'विवेकाचा जागर' होत नाही, तोपर्यंत ही नैतिक घसरण थांबणार नाही.

महाराष्ट्र आजही थकला नाही किंवा हरला नाही, तो केवळ काहीसा भरकटला आहे. प्रबोधनाच्या उजेडात आणि नैतिकतेच्या वाटेवर पुन्हा एकदा चालण्यास सुरुवात केली, तर हे अंधश्रद्धेचे, अनीतीचे, अमंगल मळभ नक्कीच दूर होईल. डोळस श्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी आणि उच्च नैतिक बाणा या चतुःसूत्रीच्या आधारे आपल्या लाडक्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा त्या वैचारिक वैभवाच्या शिखरावर नेण्याची गरज आहे, जिथे केवळ विचारच नव्हे, तर आचारही शुद्ध आणि सात्विक असतील. हा महाराष्ट्र संतांचा, शूरवीरांचा आहे, तो भोंदूबाबांचा केव्हाही होऊ न देणे, हीच काळाची गरज आहे.

prakashrsawant@gmail.com

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर

Mumbai : 'कामा'त आनुवंशिक समुपदेशन विभाग सुरू होणार; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

Mumbai : नालेसफाईवर उपायुक्तांची नजर; आयुक्तांच्या आदेशानुसार 'ऑन दी स्पॉट' करणार पाहणी

वेळेत भूसंपादन न झाल्यास जमीन मालकाचीच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Mumbai : आता ज्येष्ठ डॉक्टरांकडेच प्रशासकीय पदभार; रुग्णालयातील पदांच्या नियुक्तीत पारदर्शकता आणणार