टपल्या आणि ठोसे
संदीप प्रधान
महाराष्ट्रात पावसाचा पत्ता नाही. घामाच्या धारांनी आणि महागाईच्या ज्वाळांनी बेजार जनतेला दिलासा देण्याकरिता राजकीय नेत्यांचे पावसाळी कवी संमेलन आयोजित करण्याची कल्पना महायुती सरकारने मांडली. शिवतीर्थावर भव्यदिव्य कवी संमेलनाचे आयोजन केले गेले....
सर्वप्रथम देवाभाऊ आपली कविता घेऊन उभे राहिले... (कवी सौमित्र यांच्या गारवा... गारवा...च्या धर्तीवर)
फांद्यांवरती बांधले हिंदोळे,
तरीही रुसवा काही संपेना,
तुझ्या नि माझ्या मनाचे कोडे,
अजून काही सुटेना...
(शिंदेंकडे कटाक्ष टाकतात)
हात तुझा हातात घेऊनी,
पाऊस रडगाणी म्हणतो आहे,
जागवा... ठाण्यात रात्र जागवा...
(नवनाथ बन उभा राहून जोरजोरात टाळ्या वाजवू लागतो मग टाळ्यांचा कडकडाट होतो.)
.....
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बराचवेळ दाढीवरून हात फिरवत असतात. मधेच डाव्या हाताने चष्मा नाकावरून वर सरकवतात. मग कविता सादर करायला उभे राहतात...(गदिमांच्या नाच रे मोराच्या धर्तीवर)
नाच रे मोरा, दिल्लीच्या वनात,
नाच रे मोरा नाच!
शहांच्या दारी झुंजलो रे,
कागाळ्यांचा काळा
काळा कापूस पिंजला रे,
आता तुझी पाळी,
महाशक्ती देते टाळी,
झुलव पिसारा नाच!
(शिंदे यांनी साभिनय सादर केलेल्या या कवितेवर उद्धव ठाकरे व संजय राऊत खिदखिदत असतात. कविता संपल्यावरही त्यांचे गडगडाटी हास्य सुरु असल्याने सर्व नजरा त्यांच्याकडे वळतात. मग दोघे ओशाळून गप्प बसतात.)
.....
तेवढ्यात व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाली. इतक्या लवकर आपले नाव जाहीर होईल या कल्पनेनी उद्धव बावचळले. त्यांनी आपल्या कुर्त्याचे खिसे चाचपले. मग रश्मी वहिनींच्या पर्समधील कविता घेऊन ते व्यासपीठावर गेले...(ग्रेस यांच्या ती गेली तेव्हा रिमझिमच्या धर्तीवर)
ते गेले तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
वर्षात अडकल्या फायली
हा सरदेसाई सोडवित होता
ते आमदार होते म्हणुनी
घनव्याकुळ थोरात-पटोले रडले
त्यावेळी दरवाजा ओढून सावध
वर्षावर पाचोळा उडविला होता
मातोश्रीवर गमले मजला
संपले सीएमपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा
हिंदुत्वाचा कंदील एकटा होता.
(भाजपच्या रसिक श्रोत्यांनी या कवितेला दाद दिली. मात्र शिंदेसेनेचे श्रोते टाळ्या वाजवूया की नाही या विवंचनेत एकमेकांकडे पाहत होते.)
.....
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अचानक व्यासपीठावर येऊन राज ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे मैदानाच्या एका कोपऱ्यात घोळक्याने बसलेल्या मनसैनिकांनी शिट्या, टाळ्या आणि घोषणांनी मैदान डोक्यावर घेतले...(ग्रेस यांच्याच पाऊस कधीचा पडतोच्या धर्तीवर)
पक्ष कधीचा पडतो,
नेत्यांची पाने गळली,
का कुढत वैचारिक भूमिका,
या जनातल्या आभाळी?
महायुती अशी जवळी असताना,
मी असा दादूकडं का जावे?
पावसाच्या या थेंबांनी,
मनातले दुःख का गावे?
nnn
व्यासपीठावरील घडामोडींमुळे पार्थ व जय पवार अस्वस्थ झालेले असतात. खुर्चीत शांत बसलेल्या सुनेत्रा पवार यांना ते उठवतात आणि माईकपाशी आणून उभे करतात....(शांता शेळके यांच्या ऋतू येती ऋतू जाती, पाऊस कधी सुटेना, या कवितेच्या धर्तीवर)
ऋतू येती ऋतू जाती,
सत्तेचा मोह कधी सुटेना,
हिरव्यागार नोटांवरून,
त्या दोघांचा नाद तुटेना.
दादांच्या पक्षाच्या कुशीमध्ये,
कोंब नवा हसतो आहे.
(पार्थ व जय पवार हे दोघे प्रश्नार्थक चेहरा तसाच ठेवून जोरदार टाळ्या वाजवतात व पटेल-तटकरे हे टाळ्या वाजवतायत की नाही याकडे बघतात. मग ते दोघेही बळेबळे टाळ्या वाजवतात.)
nnn
लागलीच पटेल माईकपाशी जातात आणि तटकरे हे आता कविता म्हणतील, असे जाहीर करतात. रायगड जिल्ह्यातून आपल्याला कविता म्हणण्याची संधी मिळेल या अपेक्षेने बंद गळ्याचा कोट घालून आलेल्या गोगावलेंच्या चेहऱ्यावर निराशा पसरते. शिंदे गोगावले यांच्या मांडीवर थोपटून सांत्वन करतात... (विंदा करंदीकर यांच्या पाऊस आला, पाऊस आला कवितेच्या धर्तीवर...)
वहिनी आल्या, वहिनी आल्या!
डोक्यावरच मग विजा चमकल्या,
कडकडात घनगर्जन झाली,
याची मारा, त्याची मारा !
पटेल गेले करीत बडबड,
रुपालीताईंचे भिजले वाळवण,
आम्ही केला एकच गलका,
वहिनी आल्या, वहिनी आल्या!
(तटकरे यांनी कविता सादर केल्यावर तोंडभरून हसत केसावरुन हात फिरवत केस मागे केले. पार्थ व जय दोघे लालबुंद झाले होते.)
nnn
इतका वेळ हा सर्व काव्यसोहळा बाजूला बसून पहात असलेले भुजबळ मफलर गळ्याभोवती घट्ट गुंडाळत पुढे आले. नेते झाले, त्यांची मुले, सुना, नातवंडे झाली. साऱ्यांनी कविता गायल्या. पण कुणालाही मला संधी द्यावी, असे वाटले नाही. किती ही उपेक्षा मी सहन करायची? हा भुजबळ कबड्डी खेळणारा आहे, याद राखा...भुजबळ यांचा हा अवतार पाहून सारेच कावरेबावरे झाले. देवाभाऊंनी भुजबळ यांच्यापुढे माईक धरला...(मंगेश पाडगांवकर यांच्या श्रावणात घन निळा बरसला...च्या धर्तीवर)
आरक्षणावर सराटीत बरसला,
शोषितांच्या नयनी अश्रूधारा,
उलगडला ठाण्यातुन अवचित,
भिववी मोरपिसारा
जागुनि ज्याच्या वाट पाहिली,
ते सुख नेले आपल्या दारी
जिथे तिथे भुजबळा भेटे,
आता आरक्षण हनन मुरारी
(समीर आणि पंकज हे दोघे उभे राहून भुजबळ साहेब तुम आगे बढोच्या घोषणा देतात)
.....
तेवढ्यात शरद पवार हे व्यासपीठावर विंगेतून कधी अवतीर्ण झाले ते संमेलनाध्यक्ष देवाभाऊ यांनाही कळत नाही. त्यांची कविता ते सादर करू लागतात... (बा. भ. बोरकर यांच्या सरिवर सरी आल्या गंच्या धर्तीवर...)
टोपीवर टोपी लावल्या गं
सचैल भोयी न्हाले गं
भोयी झाले थापांत भिजून चिंब
थरथर कांपति नजरचिंब
पाने पिसली घरीच बसले
टोपीवर टोपी लावल्या गं
(जितेंद्र आव्हाड धावत व्यासपीठावर येतात आणि कार्यक्रम संपल्याची घोषणा करतात... पडदा पडतो)
pradhansandeep19@gmail.com