अक्षररंग

महिषासुरमर्दिनी

दुर्गा किंवा नवदुर्गा हे पार्वतीचे उग्ररूप होय. बहुतेक सर्वत्र तिचीच उपासना होत असते. नवरात्रात तिचीच घटस्थापना होते. सिंधु संस्कृतीपासून अस्तित्वात असलेली स्त्रीरूपाची उपासना वैदिक व पुराणकाळात विकसित झाली. गुप्तकाळापासून दुर्गेचे रूप मंदिरांवरील शिल्पांत, नाण्यांवर आढळते. तिच्या राक्षसवधाच्या प्रतिमेत “असुरी शक्तींवर विजय” ही सामाजिक कल्पना प्रतिबिंबित होते.

राकेश मोरे

पाऊलखुणा

दुर्गा किंवा नवदुर्गा हे पार्वतीचे उग्ररूप होय. बहुतेक सर्वत्र तिचीच उपासना होत असते. नवरात्रात तिचीच घटस्थापना होते. सिंधु संस्कृतीपासून अस्तित्वात असलेली स्त्रीरूपाची उपासना वैदिक व पुराणकाळात विकसित झाली. गुप्तकाळापासून दुर्गेचे रूप मंदिरांवरील शिल्पांत, नाण्यांवर आढळते. तिच्या राक्षसवधाच्या प्रतिमेत “असुरी शक्तींवर विजय” ही सामाजिक कल्पना प्रतिबिंबित होते.

दुर्गा ही पार्वतीचे उग्र रूप मानले जाते. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही तिची रूपे असून शाक्तपंथात तिला सर्वोच्च शक्ती मानले जाते. त्यातले महाकाली हे तमोगुणी, महालक्ष्मी हे रजोगुणी व महासरस्वती हे सत्त्वगुणी रूप होय.

दुर्गा ही शाक्तपंथातील प्रमुख देवतांपैकी एक. शाक्तपंथाचा आज दिसणारा विकास मध्ययुगाच्या प्रारंभी, विशेषतः इ.स.च्या ५ व्या आणि ६ व्या शतकात झाला. मात्र या संकल्पनेची मुळे फार प्राचीन काळात शोधता येतात. सिंधु संस्कृतीच्या काळात मातृदेवीची उपासना प्रचलित होती, तेव्हाच या पंथाची सुरुवात झालेली दिसते. शाक्तपंथ हा हिंदू धर्माचा असा एक पैलू आहे ज्यामध्ये स्त्रीरूपाला अंतिम शक्ती मानले जाते. हिंदू धर्म हा बहुरूपी आहे; तो बहुदेववादी नाही. कारण हिंदू धर्मात एकाच सर्वोच्च परमेश्वरावर विश्वास आहे, पण त्याला विविध रूपांत स्वीकारले जाते. हिंदू धर्मातील त्रिदेव ब्रह्मा-सृष्टीकर्ता, विष्णू-पालनकर्ता आणि शिव-संहारकर्ता या तीन रूपांत मांडले जातात. या तिघांच्या पत्नींच्या रूपात त्यांचे स्त्रीस्वरूपही आहे. ब्रह्माची सरस्वती, विष्णूची लक्ष्मी आणि शिवाची पार्वती. यातून हे दिसते की, जगाच्या पूर्णत्वासाठी स्त्री आणि पुरुष दोन्ही आवश्यक आहेत. एकाच्या अनुपस्थितीत दुसरा अपूर्ण आहे. शाक्तपंथही याच विचारातून उदयास आला असावा.

हा ‘शक्तिपंथ’ ज्याची मुळे सिंधु संस्कृतीत आहेत, तो पुढे वैदिक काळातही वाढत गेला. असेही मानले जाते की, जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा त्यांनी सिंधु संस्कृतीतील मातृदेवीची उपासना आपल्या संस्कृतीत सामावून घेतली आणि त्यामुळे हा पंथ सतत विकसित होत राहिला.

पुराणकालात शाक्तपंथाला त्याचे प्रगल्भ रूप लाभले. अनेक पुराणांमध्ये देवींचे संदर्भ सापडतात. कूर्मपुराणात मातृदेवीचे सहस्रनाम आवाहन केले आहे, तर मत्स्यपुराणात देवीची १०८ नावे दिली आहेत. याच संदर्भात कालिकापुराण देखील महत्त्वाचे आहे. यात वाममार्ग म्हणजे देवीची तांत्रिक उपासना, तसेच प्राण्यांचे आणि अगदी मानवांचेही बळी देऊन तांत्रिक पद्धतीने देवीची उपासना केली जात असल्याचाही उल्लेख सापडतो.

मात्र शाक्तपंथाविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती, विशेषतः दोन प्रमुख देवता दुर्गा आणि काली यांच्याविषयीची माहिती मार्कंडेय पुराणात मिळते. ऋषि मार्कंडेय यांनी लिहिलेल्या या पुराणातील ‘देवीमाहात्म्य’ या विभागात देवी दुर्गा आणि देवी कालीच्या पराक्रमांचे वर्णन आहे. यात दुर्गेला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून दाखवले आहे, तर कालीला ‘रक्तबीजसंहारक’ म्हणून गौरवले आहे. हे मार्कंडेय पुराण शाक्तपंथाच्या आजच्या रूपाचे प्रमुख आधार मानले जाते.

मूर्तिशिल्पात दुर्गेच्या महिषासुरमर्दिनी या रूपाच्या अनेक मूर्ती आढळतात. त्यांपैकी काही मूर्तींना आठ, तर काही मूर्तींना दहा भुजा असतात. क्वचित अठरा भुजांच्याही मूर्तीही आढळतात. बिहारमध्ये एक शिल्प सापडले आहे. त्यात सिंहवाहिनी दुर्गेची मूर्ती आहे. तिने आपल्या डाव्या हाताने एका मुलाला जवळ धरून ठेवले आहे. हे दुर्गेचे मातृस्वरूप होय. दुर्गेच्या कालीरूपाच्या मूर्तीत काली ही एका प्रेतावर उभी असते आणि तिच्या हाती नररुंड असते. अशा मूर्ती नेपाळात आढळतात.

देवी दुर्गा हिच्या महिषासुरमर्दिनी रूपाला गुप्तकाळापासून भारतभर लोकप्रियता मिळाली. प्राचीन व मध्ययुगीन भारतीय मंदिरांमध्ये आढळणाऱ्या महिषासुरमर्दिनीच्या शिल्पांची भौगोलिक व्याप्ती दर्शवते की पाचव्या शतकापासून ती भारतीय उपखंडाच्या धार्मिक आणि कलात्मक अभिव्यक्तीत ठामपणे रुजली होती. उत्तर भारतातील गुप्तकालीन मंदिरांमध्ये, सातव्या शतकातील दक्षिणेकडील चालुक्य मंदिरांत तसेच महाबळीपुरममधील पल्लवांच्या लेणी मंदिरांत तिचे चित्रण आढळते. याशिवाय, वेरूळ येथील कैलास मंदिर व मध्य भारतातील खजुराहोतील चंदेल मंदिरांत तसेच दक्षिणेकडील होयसळ व काकतीयांच्या मंदिरांमध्येही तिची रूपे कोरलेली दिसतात.

महिषासुरमर्दिनीची सगळ्यात जुनी प्रतिमा राजस्थानातील नगर येथून सापडली असून, त्या टेराकोटाच्या फलक (इ.स.पू. १ शतक-इ.स. १ शतक) आहेत. एका चारहाती प्रतिमेत (इ.स. १ शतक) देवीने महिषाला पुढच्या उजव्या हाताने उचलले असून डाव्या हाताने त्याची जीभ पकडलेली आहे. पाठीमागच्या डाव्या हातात खेटक (आयताकार ढाल) तर उजव्या हातात त्रिशूल आहे. वाहन असलेला सिंह मात्र शांतपणे खाली बसलेला असून तो युद्धात सहभागी होत नाही.

कुषाणकाळातील महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमा मथुरा व बेसनगर येथेही आढळल्या. १९४०-५० च्या दशकात झालेल्या या शोधामुळे (अग्रवाल, १९५८) बॅनर्जी यांनी मांडलेली ‘महिषासुरमर्दिनी प्रतिमा गुप्तकालापूर्वी अस्तित्वात नव्हती’ ही संकल्पना खोडून काढली गेली. मथुरा संग्रहालयात अशा सहा मूर्ती आहेत. त्यापैकी एक चारहाती तर उर्वरित सहा-सहा हातांच्या आहेत.

उत्तर प्रदेशमधील राजघाट येथील एका मुद्रेत ‘दुर्ग्गाह’ असे गुप्तलिपीतील अक्षर असून देवीच्या हातात पुष्पहार व चतुष्कोणी शूल आहे. भिता येथे सापडलेल्या दुसऱ्या मुद्रेत त्रिशूल-परशू धारण केलेली प्रतिमा आहे. नालंदा (गुप्तकाळ) येथे सापडलेल्या कांस्य प्रतिमेत त्रिनेत्री देवी आहे. चार हातांत अक्षमाला, कमंडलू, टोकदार दंड असून खाली इग्वाना प्राणी कोरलेला आहे. बंगालमधील देऊलबंदी येथून आठहाती प्रतिमा सापडली असून तिला ‘सर्वाणी’ असे शिलालेखात संबोधले आहे.

देवीने राक्षसांचा वध केल्याच्या संकल्पनेला असलेली लोकप्रियता, याला एक सामाजिक अर्थ असणे स्वाभाविक आहे. देवतेच्या राक्षसांविरुद्धच्या लढाईतून ‘असुरी शक्तींवर विजय’ या संकल्पनेने श्रमजीवी जनतेला, त्यांच्या अपेक्षांना प्रतिकूल वास्तवातही, एका कल्पित पण दिलासा देणाऱ्या वास्तवाचा अनुभव दिला असावा.

प्राचीन नाणी व मुद्रांवरूनही दुर्गेची ओळख पटते. नालंदा येथील गुप्तकालीन मुद्रांवर देवीला दुर्गा सिंहवाहिनी म्हणून दाखवले आहे. ती चारहाती असून सिंहावर बसलेली आहे आणि पद्मासनात आहे. गुप्तकालीन सुवर्ण नाण्यांवर महिषासुरमर्दिनी रूपाचे चित्रण दिसते. यामध्ये एका बाजूस सम्राट चंद्रगुप्त व कुमारदेवी यांचा युगलप्रकार, तर दुसऱ्या बाजूस सिंहावर आरूढ देवीचे चित्र आहे. तिच्या हातात कमळ दिसते. मात्र, या ओळखीबाबत संशय आहे, कारण देवीच्या हातात ‘कॉर्नुकोपिया’ म्हणजे संपत्तीचे शिंगही आहे. त्यामुळे ती लक्ष्मीही असू शकते, कारण संपत्ती व सौभाग्यदेवता लक्ष्मीला कधी कधी सिंहवाहनावरही दर्शवलेले आढळते.

प्राचीन काळापासून महिषासुरमर्दिनीच्या रूपाला मिळालेली ही लोकप्रियता केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे प्रतीक आहे. असुरी शक्तींवर विजय मिळवणारी दुर्गा ही प्रत्येक युगातील, प्रत्येक माणसाच्या आत दडलेल्या चांगुलपणाचे आणि वाईटावर मात करण्याच्या क्षमतेचे रूप आहे.

rakeshvijaymore@gmail.com

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये