माझ्या नावाची गोष्ट 
अक्षररंग

माझ्या नावाची गोष्ट

आपलं नाव आपल्याला आवडत नसेल, तर ते बदलून टाकावं का? पण प्रत्येक नावामागे एखादी सुंदर गोष्ट, आठवण किंवा भावना दडलेली असू शकते! सानिकाला तिच्या नावामागचं गोड रहस्य कसं उलगडलं त्याची ही गोष्ट-

नवशक्ती Web Desk

कथा

मंगल देवदत्त परुळेकर

आपलं नाव आपल्याला आवडत नसेल, तर ते बदलून टाकावं का? पण प्रत्येक नावामागे एखादी सुंदर गोष्ट, आठवण किंवा भावना दडलेली असू शकते! सानिकाला तिच्या नावामागचं गोड रहस्य कसं उलगडलं त्याची ही गोष्ट-

सानिका, सांग बरं, तुझ्या नावाचा अर्थ काय गं?” मराठीच्या पिरियडला कुलकर्णी बाईंनी विचारलं.

वर्गात एकदम मुलांची कुजबुज सुरू झाली. सगळे आपापल्या नावांचे अर्थ मोठ्या उत्साहाने सांगू लागले. अन्वी म्हणाली, तिच्या नावाचा अर्थ निसर्गाची देवी, कबीरच्या नावाचा अर्थ महान कवी, तर शौर्यच्या नावाचा अर्थ शूर असा होता.

सानिकाची पाळी आली, तेव्हा ती बाकावरून हळूच उभी राहिली. “मॅडम, माझं नाव सानिका आहे.”

“छान! पण सानिका या नावाचा अर्थ माहीत आहे का तुला?” बाईंनी चष्म्यातून बघत विचारलं.

सानिकाने हिरमुसली होऊन नकारार्थी मान हलवली. वर्गातल्या दोन-तीन मुलांनी दबका हशा पिकवला.

बाई लगेच म्हणाल्या, “अरे, हसायला काय झालं? काही हरकत नाही, सानिका. आज घरी जाऊन आई-बाबांना विचारून ये. उद्या तू सगळ्यांना सांगायचं, ठीक आहे?”

शाळा सुटून घरी येताना सानिकाच्या मनात तोच विचार घोळत होता. खरं सांगायचं तर, तिला आपलं नाव कधीच फारसं आवडलं नव्हतं. वर्गातल्या काही मुलींची नावं किती भारी आणि मॉडर्न वाटायची! अन्वी, मायरा, कियारा... किती कूल वाटतात ही नावं! त्यांच्यापुढे तिला आपलं ‘सानिका’ नाव किती साधंसुधं आणि जुन्या पद्धतीचं वाटायचं.

दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत तिची बेस्ट फ्रेंड रिया डबा उघडता उघडता म्हणाली, “सानिका, तुला नाव आवडत नाही ना? मग तू नाव बदलून घे ना! मी तुला ‘सॅनी’ म्हणते. बघ, किती छान आणि स्टायलिश वाटतं!”

सानिकाला ही आयडिया एकदम पटली. तिने दप्तरातून वही काढली आणि पहिल्याच पानावर मोठ्या स्केचपेनने लिहिलं- ‘SANNY’. वर्गातही तिने सगळ्या मैत्रिणींना बजावून सांगितलं, “आजपासून मला सानिका म्हणायचं नाही, फक्त सॅनी म्हणायचं!”

काही जणींनी लगेच तिला ‘सॅनी... सॅनी’ म्हणायला सुरुवात केली. सानिकाला खूप भारी वाटलं. स्वतःचं नाव आपणच बदललं, याचा एक वेगळाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

त्या संध्याकाळी आजी तिच्या खोलीत आली. सानिका अभ्यास सोडून वहीवर वेगवेगळ्या फॉन्टमध्ये ‘सॅनी’ नावाची सही करण्यात मग्न होती.

“काय गं सानू, कसली ही एवढी तयारी चाललीये?” आजीने तिच्या पाठीवरून हात फिरवला.

सानिकाने अभिमानाने मान वर केली. “आजी, माझं नवीन नाव लिहितेय मी! आता मी सानिका नाही, सॅनी आहे!”

आजी तिच्या शेजारी बेडवर बसली. “नवीन नाव? मग आमच्या त्या जुन्या गोड सानिकाचं काय झालं?”

सानिकाने तोंड वाकडं केलं. “अगं आजी, सानिका नाव किती साधं आहे. आजकाल कुणी अशी नावं ठेवतं का? सॅनी किती भारी वाटतं. माझ्या सगळ्या मैत्रिणी मला आता तसंच म्हणतात.”

आजी गालातल्या गालात हसली. तिने प्रेमाने सानिकाचा हात आपल्या हातात घेतला. “बरं बाईसाहेब, पण तुला तुझ्या नावामागची खरी गोष्ट माहीत आहे का?”

“नाही. पण नावामागे कसली आलीये गोष्ट?” सानिकाने आश्चर्याने विचारलं.

आजी शांत आवाजात सांगू लागली, “तुला माहीत आहे ना, संगीतात किती सूर असतात?”

“सात!” सानिका लगेच म्हणाली, “सा, रे, ग, म, प, ध, नि!”

“अगदी बरोबर! पहिला सूर ‘सा’ आणि सातवा सूर ‘नि’. या सात स्वरांच्या वेगवेगळ्या मेळातून किती गोड संगीत तयार होतं, नाही?”

“हो! आमच्या म्युझिकच्या मॅडमनी शिकवलंय.”

आजी पुढे म्हणाली, “तुझा जन्म झाला, तेव्हा तुझ्या आईला गाण्याची खूप आवड होती. ती तंबोऱ्यावर रियाज करायची. पण संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे तिला गाणं पुढे शिकता आलं नाही. जेव्हा तुझा जन्म झाला आणि आजोबांनी तुला पहिल्यांदा हातात घेतलं, तेव्हा ते म्हणाले होते- ‘आपल्या घरात साक्षात एक नवा सूर आला!’ तुझ्या आईच्या डोळ्यांत तर आनंदाश्रूच उभे राहिले.”

“पण आजी, मग माझं नाव ‘सानिका’ का ठेवलं?” सानिकाने उत्सुकतेने विचारलं.

“कारण घरात सगळ्यांना संगीताची ही आठवण जपायची होती. पहिला सूर ‘सा’ आणि सातवा सूर ‘नि’... या सात स्वरांमधून जशी एक सुंदर धून तयार होते, तशीच ही सात स्वरांची गोड, नाजूक संगीतमय मुलगी म्हणजे ‘सानिका’! तुझ्या जन्माने आमच्या घरात आनंदाचं एक नवं गाणं सुरू झालं, असं आम्हाला वाटलं.”

सानिका डोळे मोठे करून आजीकडे पाहत राहिली. तिच्या अंगावर एक हलकासा रोमांच आला. “म्हणजे आजी... माझं नाव फक्त एक नाव नसून, एक छोटंसं गाणंच आहे?”

“हो तर!” आजीने तिच्या गालावर हलकी चापटी मारली. “पण म्हणून तुला गाणं शिकायलाच हवं असा काही नियम नाही हं! तुला ड्रॉइंग आवडतं, सायन्स आवडतं की खेळायला आवडतं... ते तू ठरव. तुझं नाव तुला काय बनायचं हे सांगत नाही; पण तू आमच्यासाठी कोण आहेस, हे ते नक्की सांगतं!”

सानिकाने पटकन आजीला घट्ट मिठी मारली. आता तिला आपलं नाव अजिबात जुनं किंवा बोरिंग वाटत नव्हतं. तिच्या नावामागे सात स्वरांची जादू होती, आईचं स्वप्न होतं आणि घरात उमटलेला आनंदाचा नवा सूर होता!

दुसऱ्या दिवशी मराठीच्या तासाला कुलकर्णी बाईंनी विचारलं, “सानिका, शोधलास का नावाचा अर्थ?”

सानिका आत्मविश्वासाने ताडकन उभी राहिली. “मॅडम, माझ्या नावाची गोष्ट संगीताशी जोडलेली आहे. संगीतात सात सूर असतात- सा, रे, ग, म, प, ध, नि. या स्वरांमधून गोड धून बनते, तशीच संगीतासारखी मुलगी म्हणजे सानिका! माझ्या जन्माच्या वेळी आजोबा म्हणाले होते की आमच्या घरात एक नवा सूर आलाय!”

“अरे वा! किती अप्रतिम गोष्ट आहे ही!” बाई कौतुकाने म्हणाल्या आणि अख्ख्या वर्गाने टाळ्या वाजवल्या.

तेवढ्यात मागच्या बाकावरून रिया हळूच खोडकरपणे म्हणाली, “अगं सॅनी, आता बस ना खाली!”

वर्गात एकच हशा पिकला. सानिकाही मोकळेपणाने हसली.

सुट्टीत रिया जवळ येऊन म्हणाली, “सॉरी हं, सानिका. आता सॅनी नाही म्हणायचं ना?”

“अगं, तुला आवडत असेल तर नक्की म्हण! सॅनी माझं निकनेम आणि सानिका हे माझं खरं नाव!”

त्या रात्री सानिकाने वहीच्या पानावर ‘SANNY’च्या खाली अगदी ठळक, मोत्यासारख्या अक्षरांत लिहिलं- ‘सानिका’ आणि त्याच्या बाजूला संगीताच्या सात स्वरांची एक छानशी नक्षी काढली.

खिडकीतून मंद वारा येत होता. दूर कुठूनतरी गाण्याचे सूर ऐकू येत होते. सानिकाने नकळत ती धून गुणगुणायला सुरुवात केली. आता तिला स्वतःच्या नावात तिच्या आयुष्याचं एक सुंदर गाणं ऐकू येत होतं!

mdparulekar@gmail.com

Mumbai : १६ हजार बॅनर्सवर कारवाई; दीड महिन्यांत मात्र केवळ १७ जणांवर गुन्हे दाखल

महाविकास आघाडीत शरद पवार गट लक्ष्य; ठाकरे गट आणि काँग्रेसची जोरदार टीका

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

पूर्वसूचना न देता सरकारविरुद्ध दावा दाखल करता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणी