सिनेरंग
पूजा सामंत
कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील भारतीय, मराठी चित्रपटांची हजेरी ही बाब प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी असतेच. यंदा कान्समध्ये चार मराठी चित्रपटांनी हजेरी लावली. त्याविषयी सांगताहेत प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते गजेंद्र अहिरे.
युरोपमधील एक आगळी ऐतिहासिक वास्तू असलेले आयफेल टॉवर ही फ्रान्सची एक जागतिक ओळख असली तरी याच फ्रान्सची जागतिक स्तरावर आणखी एक सशक्त ओळख अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे. ती म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल. कान्स फिल्म फेस्टिव्हल आता जगभर एक प्रतिष्ठित सोहळा म्हणून ओळखला जातो. जगभरातील निर्माते-दिग्दर्शक आपल्या कलाकृतींचं मार्केटिंग करण्यासाठी, तर कधी वितरक शोधण्यासाठी आपल्या युनिटसोबत या फेस्टिव्हलला हजेरी लावतात. यात काही आमंत्रित चित्रपटांचे खास शो असतात. काही कलाकारांसाठी ‘रेड कार्पेट’ वेलकम असते.
दरवर्षी वेगवेगळ्या कारणांनी कान्स फिल्म फेस्टिव्हल गाजत असतो. यंदाच्या फेस्टिव्हलचं एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटांची विशेष उपस्थिती. कान्समध्ये एकूण चार मराठी चित्रपटांची निवड झाल्याचं सांस्कृतिक राज्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत जाहीर केलं होतंच. ते चार चित्रपट म्हणजे ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’ आणि ‘जुनं फर्निचर’. चार मराठी चित्रपटांची निवड झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांची वेगळी खास छाप पडली आहे. जयंत सोमलकर आणि अन्य चार निर्मात्यांची प्रस्तुती असलेल्या ‘स्थळ’ चित्रपटाला महाराष्ट्रात फारसं व्यावसायिक यश लाभलं नसलं तरी ‘स्थळ’च्या कथेने, त्यातील कलाकारांच्या अभिनयाने सगळेच प्रभावित झाले होते. प्रख्यात फिल्ममेकर गजेंद्र अहिरे यांच्या ‘स्नो फ्लॉवर’मध्ये क्रॉस कंट्री कथेचा संघर्ष अतिशय परिणामकारकपणे दाखवला होता. महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा सिनेमा वृद्धांच्या आयुष्याची परवड गंभीरतेने दर्शवतो. राज मोरे यांची पहिलीच कलाकृती असलेला ‘खालिद का शिवाजी’मध्ये खालिद नामक एक लहान बालक शिवाजी महाराजांना त्याच्या सत्यशोधक कल्पनेतून शोधतो, शिवाजी महाराजांच्या मूल्यांना, त्यांच्या समतेच्या विचारांना शोधतो, असे कथानक लक्षवेधकपणे मांडले आहे. अतिशय प्रगत आणि तरीही परस्पर विभिन्न संस्कृतीचा मिलाफ दाखवणारे हे चारही चित्रपट कान्स फेस्टिव्हलमध्ये चर्चेचा विषय ठरले. त्यांची दखल वैश्विक स्तरावर घेतली गेली, हे अतिशय महत्त्वाचे आहे.
लेखक, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे कान्स फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित होते. नुकतेच ते मुंबईत परतले. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या संदर्भात त्यांनी नोंदवलेली निरीक्षणं, त्यांचे अनुभव याविषयी त्यांनी मांडलेली मतं इथे त्यांच्याच शब्दांत- “कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मला आलेला एकूणच अनुभव समृद्ध करणारा होता. अर्थात आतापर्यंत माझे वेगवेगळे चित्रपट जगभरच्या अनेक गाजलेल्या फेस्टिवल्समध्ये सादर झालेले असल्याने मला अशा फेस्टिवल्समध्ये नेमकं काय होतं, फिल्म फेस्टिव्हलचा अजेंडा काय असतो, कशा प्रकारे तिथे काम चालतं, कार्यपद्धती काय असते, यात बिझनेसविषयक दृष्टिकोन काय असतो, या सगळ्याची जाणीव मला आहे. पण यावर्षी महत्त्वाचं आहे ते यंदा कान्समध्ये चार मराठी चित्रपटांची दखल घेतली गेली. ही मराठी चित्रपटसृष्टीचा मान वाढवणारी महत्त्वाची बाब आहे, हे मी सांगायला नकोच. जगभरचे फिल्म मेकर्स त्यांचे चित्रपट घेऊन इथे येतात तेव्हा त्यांच्या मनात चित्रपटांना आंतरराष्ट्रीय-जागतिक बाजारपेठ मिळावी हा महत्त्वाचा हेतू असतो. महाराष्ट्र शासनाने माझ्या ‘स्नो फ्लॉवर’ या फिल्मची निवड केली होती आणि माझ्यासाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे माझा हिंदी चित्रपट ‘पारो’ची देखील निवड कान्स महोत्सवासाठी झाली होती. ‘पारो’ या माझ्या सिनेमाचं ट्रेलर गेल्याच वर्षी लाँच झालं होतं आणि त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली होती. मागे मी रशियन, फ्रेंच, स्वीडिश फिल्म फेस्टिव्हल्समध्ये माझ्या कलाकृती घेऊन गेलो होतो. या अशा महोत्सवांमुळे आम्हा फिल्म मेकर्सना देखील आपले चित्रपट वैश्विक पातळीवर कुठे आहेत, याची जाणीव होते. आपल्या मातृभाषेतील, संस्कृतीतील चित्रपट तुलनात्मक, गुणात्मकदृष्ट्या कुठे आहेत, याची जाणीव असणं गरजेचं आहे. अर्थात जागतिक स्तरावर प्रत्येक भाषेतील चित्रपटांचा आशय भिन्न असतो आणि ते स्वाभाविकच आहे. पण एकूणच भाषा, संस्कृतींचा हा मेलमिलाफ या निमित्ताने घडतो आणि त्यातूनच एकूण सिनेमा संस्कृतीचा विकास होत असतो. यातून आपल्या सिनेमा संस्कृतीचाही विकास होतो, काही नव्या जाणिवा होतात. इथे कान्सला आल्यानंतर किंवा सर्वसाधारणपणे कोणत्याही फिल्म फेस्टव्हल्समध्ये नव्या वाटा दिसतात, नव्या संधी लाभतात. आपल्या देशात, राज्यात बसून याची जाणीव होत नाही. कान्स फिल्म फेस्टिव्हल ही सिनेमाची जागतिक व्यापारपेठ आहे. त्याची व्याप्ती किती मोठी आहे, हे तिथे गेल्यावरच समजतं. जगभरातले फिल्म मेकर्स यावर्षीही तिथे आले होते. यात फ्रेंच, जर्मन, कोरियन, चायनीज, स्वीडिश, रशियन, पोलिश अशा विविध भाषिक चित्रपटांचे स्टॉल्स तिथे होते. अनेक दालनांमधून दररोज सिनेमाविषयक चर्चा होत. मी बहुतेक चर्चासत्र अटेंड केलीत. कान्समध्ये जाणं म्हणजे नव्या संधी गवसणं हे नक्की. एकाच छताखाली बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत राहतात आणि त्यातही मुख्य हेतू आपापल्या सिनेमांना बाजारपेठ मिळवणं हाच असतो. आपल्याकडे व्यावसायिकदृष्ट्या नाकारलेल्या चित्रपटाला जर कलात्मक मूल्यं असतील तर हाच चित्रपट कान्ससारख्या फेस्टिव्हलमध्ये नावाजला जाऊ शकतो.
आपले मराठी चित्रपट याबाबत कमी पडतात का? बहुतांशी मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर का फसतात? असे प्रश्न मला अनेक समीक्षक, पत्रकार विचारतात. यासंदर्भात मी प्रामाणिकपणे सांगेन की, केवळ मराठीच नाही, पण जो हिंदी सिनेमा मेन स्ट्रीम मानला जातो, तिथेही रिलीज होणाऱ्या २५० हिंदी सिनेमांपैकी जेमतेम चार-पाच सिनेमा चालतात, बाकी फ्लॉपच होतात! त्यामुळे फक्त मराठी सिनेमांवर अपयशाचा शिक्का का बसावा? सिनेमाचा आशय उत्तम असणं गरजेचं आहे. त्यातील निर्मिती मूल्य विषयानुरूप असावीत या मताचा मी आहे. जगभर असंच चित्र दिसतं. अलीकडे हिंदी आणि पाठोपाठ मराठी चित्रपट मोठ्या संख्येने रिलीज होत आहेत. मराठी चित्रपटांनी आपली गुणवत्ता सोडू नये. मराठीत खूप उत्तम साहित्य आहे, त्यावर आधारित चित्रपट काढता येतील. जर एकाच विभागात चार ते पाच हॉटेल्स असतील तर त्यातील एखादे हॉटेल चालते, बाकीची हॉटेल्स चालत नाहीत.. याचा अर्थ असा होत नाही, अन्य चार हॉटेल्स निकृष्ट आहेत. जे हॉटेल चालते त्यांच्याकडे स्टाफ आणि मार्केटिंग अधिक उत्तम असेल हे लक्षात घेतलं पाहिजे. आपला वकूब, आपली कुवत देखील ओळखली पाहिजे. सुमार चित्रपट बनवून आकाशाला गवसणी घालणे अयोग्यच.
आतापर्यंत मी ६७ चित्रपट बनवलेत. पण नवा चित्रपट करताना मी आजही बारकाईने संशोधन करतो. कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हणजे स्वतःला निर्माता-दिग्दर्शक म्हणून पडताळवून पाहण्याची सुवर्णसंधी आहे, असेच मी मानतो. इराणी लोकांचे चित्रपट देखील बोध घेण्यासारखे असतात. त्यामुळे कान्स फिल्म फेस्टिव्हल हा अनेक अंगानी ‘आय ओपनर’ आहे. इथे आलेला प्रत्येक फिल्म मेकर अतिशय ‘फोकस्ड’, ‘इन्स्पारायिंग’ होता. सिनेमा बनवणं हा अतिशय भारलेला माहोल असतो. याचा आनंद मी देखील घेतलेला आहे. भारतीय ज्येष्ठ दिग्दशर्क शेखर कपूर यांचं या महोत्सवातील भाषण देखील मला स्पर्शून गेलं. मी सध्या एक आंतरराष्ट्रीय चित्रपट करतोय. त्यासाठीचा रिसर्च सुरू आहे. आता पुन्हा एकदा पुढील वर्षी मी नव्या अनुभवाच्या तयारीत असेन.