मुलांची कमाल गॅदरिंगची धमाल 
अक्षररंग

मुलांची कमाल गॅदरिंगची धमाल

सगळा वर्ग पारावरच्या गप्पांसारखा चवीचवीने गप्पा मारण्यात मशगूल झाला होता. त्यांच्या गप्पांचा विषय एकच… तो म्हणजे पुढील महिन्यात शाळेत होणारं गॅदरिंग. आता गॅदरिंग म्हणजे मुलांच्या उत्साहाला, आनंदाला उधाण येणारच.

नवशक्ती Web Desk

बालोद्यान

एकनाथ आव्हाड

सगळा वर्ग पारावरच्या गप्पांसारखा चवीचवीने गप्पा मारण्यात मशगूल झाला होता. त्यांच्या गप्पांचा विषय एकच… तो म्हणजे पुढील महिन्यात शाळेत होणारं गॅदरिंग. आता गॅदरिंग म्हणजे मुलांच्या उत्साहाला, आनंदाला उधाण येणारच.

थोरात सर वर्गात आले. गप्पा मारण्यात रमलेल्या वर्गाकडे एकवार त्यांनी नजर टाकली. मुलांची आणि सरांची नजरानजर होताच सारा वर्ग एकदम चिडीचूप झाला. सर पटकन म्हणाले, “खूप झाल्या गप्पाटप्पा, आता जरा अभ्यासाकडं बघा.”

सरांनी पुस्तक उघडलं. ते शिकवायला सुरुवात करणार तोच शिपाई चंदनशिवे सूचना वही घेऊन वर्गावर आले. थोरात सरांनी मुलांना सूचना मोठ्याने वाचून दाखवली. शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी गोळा करण्याच्या संदर्भात ही सूचना होती. सूचना वहीवर सही करून थोरात सरांनी ती वही चंदनशिवेंच्या हातात दिली.

चंदनशिवे वही घेऊन वर्गाबाहेर पडले. थोरात सर मुलांना म्हणाले, “मुलांनो, इमारत दुरुस्ती निधी गोळा करण्यासाठी यावेळी आपली शाळा एक नाटक बसवणार आहे. त्या नाटकाला तिकीट लावून आपण पैसे उभे करणार आहोत. ज्यांना ज्यांना या नाटकात काम करायची इच्छा आहे त्यांनी मधल्या सुट्टीत सभागृहात जमायचे आहे.”

एवढे बोलून सरांनी शिकवायला सुरुवात केली. पण काही मुलांच्या डोक्यात एकच गोष्ट होती, ती म्हणजे नाटक.

एकदाची मधली सुट्टी झाली. भराभर डब्यातली पोळीभाजी खाऊन नाटकात काम करण्यासाठी आतूर झालेली मुलं सभागृहाकडे वळली. सारी मुलं शाळेच्या सभागृहात एकदाची गोळा झाली. तिथे एक अनोळखी व्यक्ती मुलांची वाट बघत बसलीच होती. थोरात सरही त्या व्यक्तीच्या सोबत होतेच.

सगळी मुलं स्थिरस्थावर झाल्यावर थोरात सर मुलांना म्हणाले, “मुलांनो, आपल्या शाळेतर्फे नाटक बसवण्यासाठी आपल्याकडे कोण आलंय माहितीय?” सर्व मुलांचे चेहरे उत्सुक झाले. आलेल्या पाहुण्यांचे नाव, त्यांच्याबद्दलची माहिती ऐकण्यासाठी मुलं आतूर झाली होती.

थोरात सर आलेल्या पाहुण्यांकडे पाहत म्हणाले, “मुलांनो, हे आहेत ज्येष्ठ नाटककार सूर्यकांत सराफ. हे आपल्या नवीन नाटकाचे दिग्दर्शक आहेत आणि नाटकही त्यांनीच लिहिलंय बरं. त्यांच्या नाटकाचं नाव आहे… ‘मिशी हरवली आहे.’”

नाटकाचं नाव ऐकल्याबरोबर मुलं एकदम फसकन हसली. नावातच विनोद होता. थोरात सर म्हणाले, “विनोदी नाटक आहे. तुम्हा मुलांना खूप आवडेल.”

सराफ सर बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी ‘मिशी हरवली आहे’ या नाटकाबद्दल मुलांना बरीच माहिती दिली. गम्मतपूरचे चित्रसेन महाराज आणि त्यांची मिशी… एके रात्री त्यांची मिशी हरवते. महाराजांची मिशी शोधण्यासाठी कडकसिंग आणि भडकसिंग वेगवेगळ्या युक्त्या योजतात. त्यातून पुढे चांगलीच गंमत घडते. शेवटी मिशी चोरणारा चोर सापडतो आणि नाटकाचा पडदा पडतो.

सराफ सरांनी चित्रसेन महाराजांच्या मुख्य पात्रासाठी मुलांची चाचपणी केली आणि शेवटी बाळूची निवड केली. बाळूच्या आनंदाला पारावर उरला नाही. उरलेल्या पात्रांचीही निवड करण्यात आली. उद्यापासून सुरू होणाऱ्या तालमीच्या सर्व सूचना सराफ सरांनी मुलांना दिल्या आणि मुलांची पांगापांग झाली.

बाळू घरी आला. आज त्याची धाकटी बहीण शमी पोट दुखत असल्यामुळे शाळेत गेली नव्हती. आल्या आल्या त्याने शमीला शाळेत होणाऱ्या नाटकाबद्दल सांगितले. स्वतःच्या भूमिकेबद्दल सांगताना बाळूचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.

शमी म्हणाली, “बाळूदा, मला मिळेल का रे या नाटकात काम?”
बाळू हसून म्हणाला, “नुसती आवड असून चालणार नाही; मेहनत आणि वेळ द्यावी लागते.”

त्याने तिला गॅदरिंगमध्ये नाट्यछटा सादर करण्याचा सल्ला दिला. शमी आनंदाने तयार झाली.

दुसऱ्या दिवसापासून शाळेत नाटकाची तालीम जोरदार सुरू झाली. सराफ सरांच्या मिश्किल बोलण्याने तालमी आनंददायी होत होत्या. संवाद, अभिनय, स्टेजवरील वावर या सगळ्यावर सराफ सरांची पक्की पकड होती. मुलंही झपाटून मेहनत घेत होती.

तिकिट विक्रीचे नियोजन थोरात सरांनी केले होते. बाळूने आपल्या सोसायटीत घरोघरी जाऊन नाटकाचा प्रचार केला. शमीही त्याच्या सोबत होती. बाळूने सर्वांत जास्त तिकिटं विकली. बाबांनी दहा हजारांचा चेक शाळेला देणगी म्हणून दिला. बाळूनेही आपला गल्ला फोडून साठवलेले पैसे शाळेसाठी दिले. आईला त्याचं फार कौतुक वाटलं.

ठरलेल्या दिवशी नाटक आणि बक्षीस सोहळा यथासांग पार पडला. नाटकाला भरघोस दाद मिळाली. बाळूच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. सर्वाधिक निधी जमा केल्याबद्दल डॉ. विजया वाड यांच्या हस्ते बाळूचा सत्कार करण्यात आला.

वाडबाई म्हणाल्या, “बाळूसारखी गुणी मुलं समाजासाठी नवा आदर्श निर्माण करतात.”
हे ऐकून बाळूचे डोळे भरून आले. सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं आणि शमी अभिमानाने भावाकडे पाहत राहिली.

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड