अक्षररंग

कोलमडलेल्या मनांना सावरण्यासाठी...

मराठवाड्यात आलेल्या भयानक पुराने केवळ शेती आणि घरं उद्ध्वस्त झाली नाहीत, तर माणसांची मनंही कोलमडली आहेत. या आपत्तीचा शेवट केवळ पाणी ओसरल्याने होणार नाही; कारण खरी पुनर्बांधणी मनांना सावरण्यातून होते.

नवशक्ती Web Desk

हितगुज

डॉ. शुभांगी पारकर

मराठवाड्यात आलेल्या भयानक पुराने केवळ शेती आणि घरं उद्ध्वस्त झाली नाहीत, तर माणसांची मनंही कोलमडली आहेत. या आपत्तीचा शेवट केवळ पाणी ओसरल्याने होणार नाही; कारण खरी पुनर्बांधणी मनांना सावरण्यातून होते. मनाची पुनर्बांधणी ही एक जीवनावश्यक बचावप्रक्रिया आहे. कारण समाज उभा राहतो तो केवळ घरांच्या भिंतींनी नव्हे, तर सशक्त आणि संवेदनशील मनांनीच समाजाची बांधणी होत असते.

कॅलिफोर्नियामधील वणवे असो वा मराठवाड्यातील अलीकडचा पूर असो, हजारो लोकांनी आपली घरं, पाळीव प्राणी आणि आयुष्यभराची साठवण गमावली. काहीजण शारीरिकदृष्ट्या वाचले, पण मनात कायमचा प्रश्न उमटला, “आयुष्य आता पुन्हा पहिल्यासारखं असणार नाही का?”

नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, आपत्तींनी मानवी इतिहासावर न पुसणारी छाप सोडली आहे. आपल्या समाजाला, संस्कृतीला आणि सामूहिक जाणिवेला आकार दिला आहे. विनाशकारी भूकंपांपासून ते विध्वंसक पुरांपर्यंत, दुःखद अपघातांपासून ते जाणूनबुजून केलेल्या मानवनिर्मित हिंसाचारापर्यंतची प्रत्येक घटना मानवी लवचिकता आणि प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणाऱ्या मानवी प्रयत्नांची साक्ष देते. जेव्हा अशा मोठ्या आपत्ती येतात तेव्हा त्या फक्त घरं आणि रस्ते उद्ध्वस्त करत नाहीत, तर आपल्या मनालाही हादरवून टाकतात. अनेक व्यक्ती, अनेक समुदाय आणि अनेक राष्ट्र अशा सामायिक आपत्तींना आणि त्यांच्या परिणामांना सामोरी गेली आहेत, अशा कठीण प्रसंगात त्यांनी एकमेकांकडून शक्ती मिळवली आहे आणि परस्परांचे सांत्वन केले आहे.

आपत्तीचा सामना करताना शरीर आणि मन दोन्ही तत्काळ प्रतिसाद देतात. या प्रतिक्रिया म्हणजे कमकुवतपणा नसतो, तर त्या असामान्य परिस्थितीतील सामान्य मानवी प्रतिक्रिया असतात. या प्रतिक्रिया समजून घेणं हेच मानसिक आरोग्याच्या पुनर्बांधणीचं पहिलं पाऊल आहे. अशा वेळी शासनाची आणि सामाजिक संस्थांची भौतिक मदत जितकी आवश्यक आहे, तितकाच लोकांना भावनिक आधार देणंही अत्यावश्यक आहे. कारण अन्न आणि निवारा शरीर वाचवतात, पण काळजी, सहवेदना आणि संवाद मन वाचवतात. पुरानंतर अनेक स्वयंसेवी संस्था आणि आरोग्यकर्मी गावोगावी फिरत आहेत, लोकांशी बोलत आहेत, लोकांमधील भीती, नैराश्य किंवा अपराधभावना समजून घेत आहेत.

आघातातून सावरण्याची टप्प्याटप्प्यांची प्रक्रिया

आघातानंतर सावरणं ही एक दीर्घ आणि संवेदनशील प्रक्रिया असते. तिचं स्वरूप प्रत्येकासाठी वेगळं असतं, पण साधारणतः ती चार टप्प्यांतून पुढे सरकते.

सुरुवातीच्या टप्प्यात मन अचानक धक्क्यात गेलेलं असतं, विचार गोठलेले असतात आणि अनेकदा सुन्नपणा जाणवतो. अशा वेळी व्यक्ती केवळ आपल्या मूलभूत गरजांकडे म्हणजे अन्न, पाणी, निवारा आणि सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रित करते.

यानंतर सुरू होतो जाणिवेचा टप्पा, जिथे वास्तव स्पष्ट दिसायला लागतं. अशावेळी मनात दडपून ठेवलेल्या दुःख, राग, अपराधभाव अशा विविध भावना उफाळून येतात. ही वेळ अवघड असते, अस्वस्थ करणारी असते, पण या भावनांना स्वीकारणं आणि त्यांना व्यक्त होऊ देणं अत्यंत आवश्यक असतं.

तिसऱ्या टप्प्यात व्यक्ती एकंदरीत परिस्थितीचा स्वीकार करून अर्थ लावण्याची प्रक्रिया सुरू करते. आलेल्या अनुभवाकडे नव्या दृष्टीने पाहून, “हे माझ्या आयुष्यात का घडलं?” याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असते. या टप्प्यात आत्मपरीक्षण केलं जातं. संवाद आणि समज विकसित होते.

शेवटी येतो एकत्रीकरणाचा टप्पा. यात व्यक्ती आपला कठीण भूतकाळ विसरत नाही, पण त्यातून शिकते आणि वाढीचं सामर्थ्य मिळवते. आपत्ती किंवा आघात हे तिच्या जीवनकथेचा भाग बनतात. परंतु आता ते केवळ वेदनेचं प्रतीक न राहता, नव्या जाणिवेचे आणि आंतरिक बळ देणारे स्रोत होतात.

अशा रीतीने, आघातातून बाहेर पडण्याची ही यात्रा वेदनेपासून पुनर्जन्माकडे नेणारी असते, जिथे मन पुन्हा जिवंत होतं. जीवनात अर्थ, स्थैर्य आणि नव्या आशेचा उदय होतो.

आघात आणि मानसिक आरोग्यावरचा परिणाम

आपत्ती, संकटं किंवा अचानक घडलेले दुःखद प्रसंग हे केवळ बाह्य जग हादरवत नाहीत, तर माणसाच्या मनाच्या खोल तळालाही धक्का देतात. शरीरावरील जखमा काही दिवसांत भरतात, पण मनावर उमटलेले ठसे अनेकदा दिसत नाहीत. त्यामुळे ते दुर्लक्षित राहतात. मात्र, हीच न दिसणारी जखम पुढे चिंता, नैराश्य, असहाय्यता किंवा निद्रानाशासारख्या दीर्घकालीन मानसिक समस्यांमध्ये रूपांतरित होऊ शकते.

म्हणूनच आघात ओळखणं आणि स्वीकारणं हीच उपचारयात्रेची पहिली पायरी आहे. भावना मान्य करणं म्हणजे कमकुवतपणा नव्हे, तर बरं होण्याचं धैर्य दाखवणं होय. आपल्या वेदनांना शब्द देणं, त्यांना नाकारणं थांबवणं, हेच मन:शांतीचं सुरुवातीचं पाऊल आहे.

नैसर्गिक आपत्तींनंतर मनावर अनेक प्रतिक्रिया उमटतात. काही जणांना भीती, काहींना राग, गोंधळ किंवा शून्यतेची भावना जाणवते. हे सर्व पूर्णपणे नैसर्गिक आहे, कारण असामान्य परिस्थितीत मनाचा प्रतिसाद तसाच असतो.

कधी कधी या भावना मानसिक विकारांचं तीव्र रूप घेतात. पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) मध्ये माणूस घटनेचा अनुभव पुन्हा पुन्हा जगतो - फ्लॅशबॅक, दुःस्वप्नं किंवा सततची अस्वस्थता, भावनिक थकवा आणि सुन्नपणा, सतत सजग, तणावग्रस्त असणं किंवा चिडचिडेपणाचं वर्तन यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होतं, झोप उडते आणि मन शांत राहात नाही. चिंता (Anxiety) असताना सतत अस्वस्थता, बेचैनी आणि ‘पुढे काय होईल?’ अशी भीती मनावर दाटते. हा सतर्कतेचा अतिरेक थकवणारा ठरतो. या सगळ्या तणावानंतर नैराश्य (Depression) मनाला कवेत घेतं. जीवनातील रंग हरवतो. दुःख, निराशा आणि जीवनाविषयी उदासीनता वाढते. अनेकांना आपल्या अस्तित्वालाच अर्थ उरलेला नाही, असं वाटू लागतं.

प्रत्येक अश्रू, प्रत्येक भीतीचा कंप, प्रत्येक रात्रभराचा ताण हे सांगत असतो की मन अजून घायाळ आहे. त्याला वेळ, आधार आणि सहवेदना आवश्यक आहे. प्रत्येकाची आघातातून सावरण्याची गती वेगळी असते. ती आधीची मानसिक स्थिती, सामाजिक पाठबळ आणि वैयक्तिक लवचिकता यावर अवलंबून असते. म्हणूनच या प्रतिक्रिया ओळखून त्यावर वेळेवर कार्य करणं हीच उपचारयात्रेची सुरुवात आहे.

आघात समजून घेतल्याने केवळ व्यक्ती नव्हे, तर समाजही बदलतो. जेव्हा मित्र, कुटुंब आणि समाज या भावनांना समजून घेतात, तेव्हा सहानुभूतीचं आणि सुरक्षिततेचं वातावरण तयार होतं. मनाला पुन्हा फुलायला सुरक्षित जागा मिळते.

शेवटी, आपत्ती हा असा अनुभव आहे जो माणसाच्या जगण्याच्या मूळ आधारालाच हादरा देतो. नैसर्गिक आपत्ती, अपघात, हिंसा किंवा अचानक गमावलेलं काही मौल्यवान.. हे सगळं मनात खोलवर अस्थैर्य निर्माण करतं. हा अनुभव जसा वैयक्तिक असतो तसा सामूहिकही. सामूहिक आपत्तीच्या वेळी जणू समाजाच्या चेतनेलाच जखम झालेली असते.

वाचलेल्यांचा अपराधभाव (Survivor’s Guilt)

आपत्ती, अपघात किंवा युद्धातून वाचलेल्यांच्या मनात येणारा अपराधभाव, हा मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील एक गुंतागुंतीचा पण अत्यंत मानवी अनुभव आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर होलोकॉस्ट आणि हिरोशिमा यातून वाचलेल्यांच्या अनुभवांमधून या भावनेचं जिवंत चित्र दिसून आलं. आपण वाचलो, पण का? ही अंतर्मनातील घळघळणारी वेदना. ही वेदना वेळीच ओळखली गेली नाही तर ती आयुष्यभर अपराधीपणा, आत्मद्वेष किंवा गंभीर नैराश्याचं रूप धारण करू शकते.

काहीजणांना असं वाटतं की, ते जगण्याच्या योग्यतेचे नाहीत. “आपण काही वेगळं केलं असतं, तर ते वाचले असते का?” या विचारांनी त्यांच्यात निद्रानाश, थकवा, स्नायूंचा ताण आणि भूक न लागणं ही लक्षणं दिसतात. अनेकदा ही भावना चिंता, नैराश्य किंवा आघातानंतरच्या तणावाशी (PTSD) जोडलेली असते.

इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की, जीवघेण्या आपत्तीतून वाचून जगणं हा अपराध नाही, तर ते आशेचं प्रतीक आहे. तुम्ही वाचलात म्हणजे तुम्हाला आता इतरांना मदत करण्याची, आधार देण्याची आणि समाजात जीवन पुन्हा फुलवण्याची संधी मिळाली आहे. कारण भीषण दुर्घटनेतून वाचलेला प्रत्येक माणूस, आशेचा दूत असतो.

मानसिक पुनर्बांधणी

ढासळलेल्या मनाची पुन्हा बांधणी करण्यासाठी काही छोटी छोटी पावलं उचलणं आवश्यक आहे.

भौतिक मदत

आपत्तीच्या काळात मन सावरण्यापूर्वी शरीराला सुरक्षिततेची आणि स्थैर्याची खात्री मिळणं अत्यावश्यक असतं. भुकेल्या, थकलेल्या आणि भीतीने ग्रस्त माणसाकडून मानसिक स्थिरतेची अपेक्षा करता येत नाही. म्हणूनच अन्न, पाणी, औषधं, कपडे आणि सुरक्षित निवारा यासारखी भौतिक मदत ही केवळ तातडीची गरज नाही, तर ते मन:शांतीकडे नेणारं पहिलं पाऊल आहे.

या गोष्टी मिळाल्यावरच माणूस स्वतःकडे आणि इतरांकडे पाहण्याची ताकद मिळवतो. निवाऱ्याची हमी मिळालेलं कुटुंब पुन्हा भविष्याचा विचार करू लागतं. म्हणूनच, आपण आपत्तीग्रस्तांना दिलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, प्रत्येक वस्त्र किंवा जेवणाचा घास त्या माणसाला सांगत असतो की, “तू एकटा नाहीस, आम्ही तुझ्यासोबत आहोत.” सुरुवातीची भौतिक मदत हीच मानसिक पुनर्बांधणीची सुरुवात असते.

सेल्फ केअर

आघातानंतर मन आणि शरीर दोन्ही थकलेले असतात. अशा वेळी स्वतःची काळजी घेणं (Self-care) हा बरं होण्यासाठीचा पहिला आधार असतो. स्वत:ची काळजी घेणं म्हणजे स्वतःला वेळ देणं, शरीराला योग्य पोषण देणं आणि मनाला शांतता देणं.

माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणात राहणं

भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा विचार करत न बसता वर्तमान क्षणात राहण्याने ताण कमी होतो, मन स्थिर होतं आणि भावनांना स्पष्टता येते. काही मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करणंही मनाला सावरण्याची शक्ती देतं.

शारीरिक हालचाल

उदा. चालणं, योग किंवा हलका व्यायाम. शारीरिक हालचाल शरीरात एंडोर्फिन्स निर्माण करते, जी नैसर्गिक ‘आनंद रसायनं’ आहेत. त्यामुळे मन हलकं होतं आणि ऊर्जेची नवचेतना मिळते.

संतुलित आहार

हा आत्मउपचाराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पोषण मिळालेलं शरीर मनाला स्थैर्य देतं. योग्य आहार, पाणी आणि झोप हीच मानसिक आरोग्याची मूलभूत औषधं आहेत.

हे लक्षात ठेवलं पाहिजे की, स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नव्हे. ती स्वतःकडे करुणेने पाहण्याची प्रक्रिया आहे. यातून हळूहळू वेदनेला सामर्थ्यात आणि तुटलेपणाला नव्या आशेत बदलता येते.

जीवनात काही वादळं अशी येतात, जी शरीरापेक्षा मनालाच जास्त झोडपून काढतात. अशा वेळी मनाशी एकटं झगडणं म्हणजे अंधारात मार्ग शोधण्यासारखं असतं.

लक्षात ठेवा, मनावरचा भार जर असह्य वाटत असेल, अपराधभाव, दु:ख किंवा भीती थांबत नसेल, मानसिक आरोग्याची समस्या आवाक्याबाहेर जात असेल, तर मनोचिकित्सक, समुपदेशक किंवा डॉक्टर यांच्याशी अवश्य बोला. त्यांच्या मार्गदर्शनातून आयुष्य पुन्हा थाऱ्यावर येऊ शकतं.

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता

महानगरामध्ये आणखी परवडणारी घरे; उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

विधिमंडळातील आश्वासने ९० दिवसांत होणार पूर्ण; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास

नवाजुद्दीन सिद्दीकीला न्यायालयाचा झटका; भावाविरोधातील मानहानीचा खटला फेटाळला

जमीन मोजणीचा निपटारा आता 30 दिवसांत! प्रकरणे मार्गी लागणार; खासगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकारी करणार

संघासारखी संघटना नागपूर शहरातच राहू शकते; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन