(Photo-@wamazing)
अक्षररंग

फुजीमान झिंदाबाद

निसर्गसौंदर्य आणि शिस्तीचा अनोखा संगम असलेल्या जपानची खरी ओळख म्हणजे ‘फुजीसान’ (माऊंट फुजी). चेरीच्या बहराचा आनंद लुटल्यानंतर, ढगांच्या पडद्याआड लपणाऱ्या या पवित्र शिखराचे दर्शन होणे हे कोणत्याही पर्यटकासाठी भाग्याचेच लक्षण. निद्रिस्त ज्वालामुखीचे भव्य रूप, ‘काची काची’ रोपवेची रंजक दंतकथा आणि ‘अल्पाईन रूट’वरील २० मीटर उंच बर्फाच्या भिंती... जपानच्या या चित्तथरारक प्रवासाची ही एक ओघवती सफर!

नवशक्ती Web Desk

जगतवारी

मेधा आलकरी

निसर्गसौंदर्य आणि शिस्तीचा अनोखा संगम असलेल्या जपानची खरी ओळख म्हणजे ‘फुजीसान’ (माऊंट फुजी). चेरीच्या बहराचा आनंद लुटल्यानंतर, ढगांच्या पडद्याआड लपणाऱ्या या पवित्र शिखराचे दर्शन होणे हे कोणत्याही पर्यटकासाठी भाग्याचेच लक्षण. निद्रिस्त ज्वालामुखीचे भव्य रूप, ‘काची काची’ रोपवेची रंजक दंतकथा आणि ‘अल्पाईन रूट’वरील २० मीटर उंच बर्फाच्या भिंती... जपानच्या या चित्तथरारक प्रवासाची ही एक ओघवती सफर!

चेरीचा बहर डोळे भरून पाहिल्यावर, जपानची ठळक ओळख सांगणाऱ्या माऊंट फुजीला भेटायला आम्ही उतावीळ झालो होतो. खरंतर माऊंट फुजी बघायची जितकी उत्सुकता होती तितकी तो बघायला मिळेल याची शाश्वती नव्हती. जपानची वारी करून आलेल्या बऱ्याच प्रवाशांनी, “तो ढगातच असतो, त्याचं शिखर कधी दिसतच नाही.” अशा नकारात्मक गोष्टी सांगून आम्हाला नाउमेद केलं होतं. आमची प्रवासदेवता मात्र त्या दिवशी आमच्यावर प्रसन्न होती. फुजी फाइव्ह लेक एरियातील कावागुचीको या स्टेशनला उतरलो आणि मागे वळून पाहिलं; तर हा ‘फुजीसान’ त्याच्या पूर्णावतारात दत्त म्हणून उभा! अगदी पट्टीने मोजून काढलेला समभुज त्रिकोण आणि माथ्यावर शुभ्र हिमाचा मुकुट!

माऊंट फुजीला जपानी भाषेत ‘फुजीसान’ म्हटलं जातं. सान म्हणजे पर्वत आणि सान हे आदरार्थी संबोधनसुद्धा आहे. माऊंट फुजी हा १२,३८८ फूट उंच असलेला जपानमधील सर्वात उंच पर्वत. बौद्ध अग्निदेवता ‘फुची’वरून या पर्वताला फुजी हे नाव पडलं. आपल्याकडे डोंगरमाथ्यावर जशी देवस्थानं असतात, तशीच या पवित्र माऊंट फुजीच्या शिखरावर शिन्तो पंथाची देवी ‘सेंगेन-सामा’चं मंदिर आहे. जुलै- ऑगस्ट या उन्हाळी महिन्यांमध्ये हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी हा कठीण चढ चढतात. हा पर्वत रात्रीच्या अंधारात चढून पहाटेचा सूर्योदय पाहण्यासाठी बरेच पर्यटक हे खडतर गिर्यारोहण आनंदाने करतात. माऊंट फुजीला धार्मिक महत्त्व असलं तरी हा सहा लाख वर्षांपूर्वी जन्मलेला ज्वालामुखीचा पर्वत आहे. १७०७मध्ये त्याचा उद्रेक झाला होता. तेव्हापासून मात्र तो निद्रिस्त आहे.

फुजीसानच्या पायथ्यापासून शिखरापर्यंतच्या वाटेवर विश्रांतीसाठी दहा थांबे केले आहेत. पाचव्या थांब्यापर्यंत जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे. परंतु फुजीच्या नयनमनोहर दर्शनाचा आनंद लुटायचा असेल तर ‘काची काची’ रोपवे घेऊन माऊंट तेंजोवर जाणं याला पर्याय नाही. या रोपवेने आम्ही अवघ्या तीन मिनिटांत डोंगरमाथ्यावर पोहोचलो आणि जपानी भेटकार्डांवर दिसणारं ते फुजीसानचं रूप डोळे भरून पाहिलं. कठड्याजवळ चेरीची झाडं फुलली होती. त्यांच्या फांद्या फुलांनी डवरून वाकल्या होत्या. तिथे असलेल्या ‘तानुकी टी हाऊस’च्या गच्चीवर चढून गेलो. आता खालच्या चेरीच्या झाडांच्या माथ्यावरील फुलांच्या गर्द फांद्या नजरेसमोर येत होत्या आणि त्यातून तो ‘फुजीबा’ डोकावत होता. ‘फुजीबा फुजीबा भागलास का? चेरीच्या झाडामागे लपलास का?’

गच्चीवर फिरून फुजीबाचं मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही खाली उतरलो तर तिथे एक छोटंसं मंदिर दिसलं आणि देव्हाऱ्यात होती सशाची मूर्ती. काय हे गौडबंगाल? त्यामागे एक आख्यायिका आहे. दुष्ट ‘रॅकून’ कुत्रा आणि हुशार सशाची ही मजेशीर दंतकथा! यातला तानुकी कुत्रा मोठा द्वाड! एका म्हाताऱ्या जोडप्यानं डोंगरउतारावर लावलेला भाजीपाला हा फस्त करत असे. एकदा त्याला पकडून म्हातारीने बेदम चोप दिला. त्याचा बदला म्हणून तानुकी तिला चावला आणि त्या श्वानदंशाने ती बिचारी मेली. हा सुस्वभावी ससा होता या म्हाताऱ्या जोडप्याचा मित्र. तानुकीला आयुष्यभराचा धडा शिकवण्यासाठी तो पुढे सरसावला. मैत्रीचं नाटक करून तो तानुकीबरोबर लाकडं गोळा करायला गेला. तानुकी आपल्या पाठीवर मोळी बांधून चालू लागल्यावर ससोबाने ती मोळी दिली पेटवून. तानुकीची पाठ चांगली भाजून निघाली. ती आग विझवायला त्याने तळ्यात उडी मारली. ती संधी साधून सशाने त्याला पाण्यात बुडवून मारून टाकले. लाकडं जळताना काची काची असा आवाज येतो म्हणून याचं नामकरण काची काची रोपवे असं झालंय.

मंदिराच्या बाहेरील मोकळ्या आवारात हृदयाच्या आकाराच्या फ्रेममध्ये बसवलेली एक मोठी स्टीलची घंटा आहे. पवित्र फुजीकडे बघत ही ‘बेल ऑफ तेंजो’ किणकिणवली तर मनातील प्रेमसाफल्याची अथवा निरामय आयुष्याची इच्छा पूर्ण होते, अशी इथली स्थानिक श्रद्धा! मात्र ढगांची मर्जी असेल तरच हा दर्शनाचा योग येतो. आज सूर्यदेवाचा दिवस होता. त्यानं ढगांना रजेवर पाठवलं होतं, त्यामुळे ‘हृदया’तला फुजी कॅमेऱ्यात कैद करायची संधी आम्हाला मिळाली आणि मनात आनंदाची घंटा किणकिणली.

डोंगरमाथ्यावरील उंच शिखरं मला नेहमीच साद घालत असतात. तीन हजार मीटर उंच असलेल्या जपानच्या उत्तर आल्प्स डोंगरखोऱ्यातील नयनमनोहर परिसरातून जाणारा नव्वद किलोमीटरचा ‘अल्पाईन रूट’ हा मार्ग मला न खुणावता तरच नवल! जगातील सर्वाधिक हिमवृष्टी होणाऱ्या काही जागा या पर्वतराजींमध्ये असल्यामुळे येथे २० ते २३ मीटर उंचीची बर्फाची भिंत तयार होते. ती बघायला हा वसंतातील काळच उत्तम. १५ एप्रिल ते १५ ऑक्टोबर या सहामाहीत हा मार्ग पर्यटकांसाठी खुला असतो. एरव्ही इथे फक्त बर्फाची जाड चादर असते. आम्ही १६ एप्रिलचा टूर बुक केलेला होता म्हणताना १५ एप्रिलला टोयामा या गावी येऊन पोहोचलो. सहा विविध प्रकारची वाहनं बदलून आपल्याला हा ‘टाटेयामा कुरोबे अल्पाईन रूट’चा आनंददायी प्रवास करायचा असतो. रेल्वे, केबल कार, हायलँड बस, टनेल ट्रॉली बस, रोपवे आणि आपली हाडामासांनी बनलेली दोन पायांची गाडी. ३०१५ मीटर उंचीच्या टाटेयामा नावाच्या डोंगराला ओलांडून, कधी त्याच्या पोटातील बोगद्यातून प्रवास करून कुरोबे धरण या अभियांत्रिकी आश्चर्याचं विहंगम दर्शन झालं की हा प्रवास संपतो. पाठीवर बिऱ्हाड असलेली तरुण मंडळी हा एकेरी प्रवास करतात. आम्ही मात्र त्याच मार्गाने परत टोयामा या आमच्या मुक्कामाच्या गावी येणं पसंत केलं. या प्रवासाला आठ-नऊ तास लागणार होते म्हणून आम्ही टोयामाहून सकाळी सहा वाजताची ट्रेन पकडायचं ठरवलं. जरा लवकर पोहोचायच्या सवयीमुळे पाच वाजता स्टेशनला पोहोचलो तर ही भलीमोठी रांग! पहाटे चार वाजल्यापासून आली होती की काय ही मंडळी? की तिथेच पथाऱ्या पसरल्या होत्या कोण जाणे. त्या रांगेत उभं राहून तिकिटाचे सोपस्कार पार पाडण्यात चांगला दीडएक तास मोडला आणि टाटेयामाला जाणारी अगदी पहिली नाही तरी दुसरी ट्रेन आम्हाला मिळाली.

हिवाळ्याच्या सुट्टीनंतरचा हा पहिलाच दिवस होता. कारण १५ एप्रिलची टूर बर्फाच्या वादळामुळे रद्द झाली होती. गर्दीचा बंदोबस्त करताना गडबड गोंधळ होईल या शंकेला तिथे थाराच नव्हता. सगळी व्यवस्था अगदी चोख! प्रवासातील पहिलं वाहन- केबल कार. ही केबलच्या सहाय्याने सरळसोट उंच कड्यावर चढणारी रेल्वेच. ४७५ मीटरवरून निव्वळ सात मिनिटांत ही आम्हाला ९७५ मीटर उंचीवरील बिजोडायर या जागी घेऊन गेली. अगदी समोरची जागा पटकावल्याने डोंगरातील हिरव्यागार वनराईचं दर्शन झालं. सेडारचे उंच आणि प्राचीन वृक्ष इथे उभे आहेत. लगबगीनं मुरोडो येथील बर्फाच्या भिंतीकडे जाणाऱ्या हायलँड बसच्या रांगेत उभे राहिलो. हा पन्नास मिनिटांचा प्रवास म्हणजे डोळ्यांना भुरळ घालणारी निसर्गसौंदर्याची मेजवानी! दुतर्फा शुभ्र हिमराशी, झाडांवरील हिरव्या पानांवर बर्फाची पातळ दुलई, दूरवर दिसलेला ‘शोमयो’ धबधबा, सँडो सेडर हा प्राचीन वृक्ष असा नजराणा सादर करत ही बस आम्हाला त्या उंच बर्फाच्या भिंतींमधून खोदलेल्या रस्त्यावरून मुरोडो या ८००० फुटांवरील जागेवर घेऊन गेली. बर्फाच्या भिंतींना स्पर्श करत, त्यावर रेलत, हलत डुलत आम्ही त्या रस्त्यावरून रपेट मारली. लगेच वितळेल हे माहीत असूनसुद्धा भिंतीवरील बर्फावर बोटानं एक हसरा चेहरा कोरला. माझ्या मनाचं प्रतिबिंब जणू! भिंतीच्या पलीकडे ‘पॅनोरॅमिक व्ह्यू’ अशी पाटी असलेली एक पायवाट दिसली म्हणून तिथे वळलो. ताज्या भुसभुशीत बर्फात घुसणारं पाऊल खुबीनं वर काढत, स्वतःचा तोल सांभाळत एक किलोमीटर चालायला खूपच मजा आली.

मोरोडो या अत्युच्च बिंदूपासून खाली कुरोबे धरणापर्यंत जाण्यासाठी टाटेयामाच्या पोटात शिरायचं होतं. विजेवर चालणारी ट्रॉली बस दहा मिनिटं त्या बोगद्यातून आम्हाला घेऊन गेली आणि बाहेर येऊन पाहिलं तर काय? सगळा परिसर हिमाच्छादित! डायकांबो या जागेवर एक छानसं मचाण आहे. दोन्ही हात कोटाच्या खिशात घालून आणि मफलर गळ्याशी घट्ट लपेटून आम्ही त्या शुभ्र नजराण्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. धरणापाशी जायला आता आम्हाला रोपवेमध्ये बसायचं होतं. १.७ किमीच्या या रोपवेला टेकूचे खांब नाहीत. म्हणूनच त्याला ‘वन स्पॅन’ रोपवे म्हणतात. त्यानंतर बोगद्यातून जाणाऱ्या केबल कारचा प्रवास होता. बाहेर आल्यावर फिरत्या रंगमंचासारखं सारं दृश्य पालटलं होतं. समोर होता मोठ्ठा जलाशय. १८६ मीटर उंच असलेलं विशाल कुरोबे धरण पाहण्यासाठी एक नागमोडी रस्ता केलाय. वरून हिरवट रंगाचा दिसणारा हा तलाव जवळून स्वच्छ दिसत होता.

जपानच्या चेरी ब्लॉसम इतकंच वेड मला या डोंगरमाथ्यांनी लावलं.. आता बघायची होती जपानमधील वेगवेगळ्या पंथांची मंदिरं आणि त्यांच्या रंजक आख्यायिका.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल