लज्जतदार खाऊ गल्लीचा फेरफटका 
अक्षररंग

लज्जतदार खाऊ गल्लीचा फेरफटका

माटुंग्यातील रामा नायक यांच्या श्रीकृष्ण बोर्डिंगचं उद्घाटन १९४२ साली साने गुरुजींनी केलं, तर श्रीकृष्ण सरजोशी यांच्या दादरच्या 'आस्वाद'चं उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं.

नवशक्ती Web Desk

पुस्तक परीक्षण

प्रदीप राऊत

माटुंग्यातील रामा नायक यांच्या श्रीकृष्ण बोर्डिंगचं उद्घाटन १९४२ साली साने गुरुजींनी केलं, तर श्रीकृष्ण सरजोशी यांच्या दादरच्या 'आस्वाद'चं उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. १८८० साली मुंबईत पहिलं चायनीज रेस्टॉरंट 'सेलर्स क्लब' उघडणारा चीनी माणूस नव्हता तर जपानी होता आणि १८४० साली एका भय्याने फोर्टमध्ये पुरीभाजीचा धंदा चालू केला होता आणि आता ही पुरी फुगून रेस्टॉरंटमध्ये तिचं रूपांतर झालं आहे. ते मुंबईतील पहिलं रेस्टॉरंट असावं. अशा अनेक मनोरंजक गोष्टी संजीव साबडे यांच्या 'खाऊ गल्ली' या लज्जतदार पुस्तकात वाचायला मिळतात. ही इतिहासाची जंत्री नाही, मुंबईत कुठे कुठला पदार्थ चांगला मिळतो याची माहिती देणारं हे पुस्तक आहे. गेली चाळीस वर्षे 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' खाणं म्हणजे नुसतं पोट भरणं नव्हे तर तो पवित्र यज्ञ आहे, या भावनेने साबडेंनी खाऊ गल्ल्या, धाबे, रेस्टॉरंट, स्टॉल, ठेले यांची पोटनिष्ठेने यात्रा केली आहे. त्याबद्दल अनेकदा लिहिलं आहे. त्याचाच परिपाक म्हणजे 'खाऊ गल्ली. पुस्तकात ज्या पदार्थांबद्दल त्यांनी लिहिलंय त्याची चव त्यांनी घेतली आहे.

कुठला आहार कुठं घ्यावा, हे ते सारं इतकं रंगतदारपणे लिहितात की तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी ठिकाणांची माहिती मिळते, तशीच मांसाहारी जेवणासाठी कुठे जावं, कुठे झणझणीत तिखट पदार्थ मिळतात हेही ते चवदार पद्धतीने तिखट पदार्थ मिळतात हेही ते चवदार पद्धतीने लिहितात. कुठेही शाकाहारी-मांसाहारी भेदभाव नाही. खाताना वा लिहिताना दोन्ही चवींच्या माणसांना योग्य न्याय दिला आहे. मुंबईतील जुनी शाकाहारी रेस्टॉरंट गिरगाव, दादर, विलेपार्ले या भागात आहेत. इराणी हॉटेल पाहूनच गेल्या शतकाच्या सुरुवातीला कहऱ्हाडे ब्राह्मणांनी ती सुरू केली, अशी वेगळी माहिती साबडे सांगतात. 'हातात झारा आणि उलथनं' घेऊन फिरणाऱ्या या पाकतज्ज्ञ ब्राह्मणांतील वीरकर, पणशीकर, कुलकर्णी, चाफेकर यांचा पोटाश्रय दिला आहे. यात गोरेगावच्या सप्रेंचाही समावेश आहे.

कांदिवलीच्या महावीर नगरमध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या पुरणपोळींचीही माहिती पुस्तकात आहे. 'आस्वाद' प्रमाणेच चविष्ट, हटके मराठी पदार्थाच्या 'जिप्सी कॉर्नर', गिरगावचे 'विनय', 'कोल्हापुरी चिवडा', दादरच्या गोखलेंचं 'श्रीकृष्ण' वरही ते प्रेमाने लिहितात.

मांसाहारी रेस्टॉरंट व पदार्थांची माहिती देताना साबडे लिहितात की बहुतेक जण मुघलाईमधील चिकन टिक्का, सीग कबाब असे ठराविक पदार्थच मागवतात. नर्गिस कबाब, टुंडे, काकोरी, शामी कबाब या लखनवी मुलायम पदार्थांची वैशिष्ट्य आणि ती मिळणारी ठिकाणंही ते सांगतात. माहीमच्या जत्रेत चिकन, मटणाचा व हलवा पुरीचा स्वाद घेण्याचा आग्रह ते धरतात. गिरणगावातील छोट्या मोठ्या हॉटेलची माहिती देताना दादरची अनेक गोमंतकीय रेस्टॉरंट, गिरगाव येथील श्रीराम, माहिमचं सायबीण, गोरेगावचं सत्कार यांचीही नावं सुचवतात. बोरीबंदरजवळच्या 'पोलीस कॅन्टीन' मधील खिम्यावरील लेख वाचून पु. ल. देशपांडे यांनी तेथील पार्सल मागवून फडशा उडवला होता, त्याचा किस्साही पुस्तकात आहे. खाद्यपदार्थांचा मागोवा घेत साबडे नवी मुंबई व ठाण्यातही खाऊन आले आहेत. त्यामुळे एका लेखाचं शीर्षक आहे 'ठाणे तिथे मराठी खाणे'. कुठे काय स्वस्त मिळतं, कुठे महाग हेही ते सांगतात.

जवळपास पन्नास वर्षे निरनिराळ्या हॉटेलात खात आलेले आहेत. त्यामुळे आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू पद्धतीचं सांबार, चटणी, अन्य खाद्यपदार्थ व ते देणारी रेस्टॉरंट आणि चवीचा फरकही ते सांगतात. पोंगल तिखट, सांबार भात, बीसीवेळी भात, चिंच भात, टोमॅटो भात हे प्रकार व पाककृतीही त्यांनी दिली आहे. काही वर्ष दिल्लीत राहिल्याने आणि अनेक शहरात फिरले असल्याने ते तेथील पदार्थांची 'तोंडओळख 'ही करून देतात. पावभाजी खाण्यासाठी बोरीबंदरचं 'कॅनन', ताडदेवचं 'सरदार', चर्चगेटचं 'लेनिन' ही ठिकाणं सुचवली आहेत. इर्लाच्या अमर ज्यूस सेंटरची, तशीच घाटकोपर, बोरिवली, माटुंगा येथील ठिकाणांची देतात.

'खाऊ गल्ली'तील भरगच्च माहिती वाचून 'अन्नदाता सुखी भव' या धर्तीवर तुम्हीही चवदार, लज्जतदार पदार्थांची खुमासदार पद्धतीने ओळख करून देणाऱ्या सावडेंचे आभार मानाल, लेख अधिक सविस्तर असते तर अधिक गंमत आली असती.

खाद्यगल्ली

लेखक: संजीव साबडे

स्वामीराज प्रकाशन

एसी लोकल दुरुस्ती केंद्रासाठी ३७१ कोटींचा निधी; वाणगाव येथे देखभाल केंद्राची उभारणी

LPG eKYC Last Date : अजून ई-केवायसी केली नाही? आजच करा, नाहीतर सिलिंडर मिळण्यात येणार अडचण

रस्ते अपघातात ५० टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू; मुंबई रस्ता सुरक्षा वार्षिक अहवाल

एसटी प्रवाशांनाही लागणार वाचनाची आवड; नालासोपारा आगारात फिरते वाचनालय सुरु

Mumbai : ३७ हजार फेरीवाले 'नॉट रिचेबल'; QR कोड आधारित ओळखपत्रासाठी ३१ ऑगस्ट अखेरची तारीख