लोकवाङ्मयातली खाद्यसंस्कृती
डॉ. मुकुंद कुळे
लोकसंस्कृतीत स्त्रियांनी नागोबाला आपला भाऊ मानलं आहे. या दिवशी नागोबा आपल्या बहिणींना, विशेषत: भाऊ नसलेल्या बहिणींना भेटायला येतो, अशी स्त्रियांची पारंपरिक धारणा आहे. त्यामुळेच नागोबाला संबोधून लोकगीतांमधून स्त्रियांनी आपली सुखदु:खं व्यक्त केली आहेत. आपल्या या नागोबारूपी भाऊरायासाठी अनेक पंचपक्वान्न केली आहेत. त्याला इजा होऊ नये, म्हणून काळजी घेतली आहे.
लोकरहाटीतली एक गोष्ट... नवीनच लग्न झालेली सासुरवाशीण नागपंचमीच्या पहिल्याच सणाला आपल्याला माहेरपणाला न्यायला कोण येतंय, त्याची वाट पाहत असते. आपल्या गावाकडून येणाऱ्या वाटेवर तिचे डोळे रोखलेले असतात. तिच्या सगळ्या मोठ्या जावांना त्यांचे त्यांचे भाऊ येऊन आधीच घेऊन गेलेले असतात. आपल्याला भाऊ नसला तरी बाबा कुणाला तरी ‘माघारी’ म्हणून पाठवतील याची त्या सासुरवाशिणीला खात्री असते. त्यामुळे नदीवरून पाणी भरून झाल्यावर, चुलीशी पुरेसा लाकूडफाटा ठेवून झाल्यावर प्रत्येक वेळी ती धावत जाऊन बघत असे, माझ्या माहेराहून कुणी न्यायला आलंय का ते... पण प्रत्येक वेळी कुणीच आलेलं नाही हे पाहून ती हिरमुसून पुन्हा माघारी येत असे. घरातल्या बाकीच्या मोठ्या सुना तालेवाराच्या लेकी होत्या. त्यामुळे सासूला त्यांचं आणि त्यांच्या माहेराचं मोठं कौतुक होतं. पण ही धाकटी सून गरीबाघरची लेक होती. त्यामुळे ती गेली काय अन् न गेली काय, याचं सासूला काही देणंघेणं नव्हतं. कारण ती काही परत सासरी येताना माहेरहून डबोलं घेऊन येणार नव्हती. त्यामुळे धाकट्या सुनेचं सतत आत-बाहेर करणं सासूला जाणवत होतं... तसंच माघारी न्यायला यायला हिला भाऊ नाही हेही तिला ठाऊक होतं. पण ती मजा बघत होती. शेवटी न राहवून ती आपल्या धाकट्या सुनेला कुत्सितपणे म्हणते कशी- “धाकटे तुला गो कोण येईल माहेरपणाला न्यायला?” एव्हाना धाकट्या सुनेलाही आपल्या सासूचा पुरेपूर अनुभव आलेला असतो. त्यामुळे तिचा हा स्वर आपल्यावरील प्रेमापोटी नसून हिणवण्यासाठी आहे हे तिला उमगतं. त्यामुळेच सासूच्या प्रश्नावर ती धाकटी सून पटकन बोलून जाते- “येईल माझा लांडोबा-पांडोबा...”
आणि थोड्या वेळाने खरंच लांडोबा-पांडोबा तिला न्यायला येतो. मग ती पण त्याच्याबरोबर जायला निघते आणि सुनेला माघारपणाला न्यायला कुणी आलंय म्हटल्यावर सासूही तिला अडवू शकत नाही. कारण लग्नानंतरचा पंचमीचा पहिलाच सण असतो. रानात थोडं दूर चालत जाईपर्यंत धाकटी सून निमूट त्या लांडोबा-पांडोबाच्या मागून माहेराच्या वाटेने चालत राहते… आणि रानात जरा पुढे गेल्यावर ती लांडोबा-पांडोबाला म्हणते- “भावा, कोण रं तू बहिणीच्या हाकंला धावून आलास? बाबा माझी वाट बघत असतील, माझ्या वाटंकडे डोळं लावून बसलं असतील. माघारपणाला पाठवायला कुणी नाय म्हणून मनातल्या मनात रडत पण असतील. तू कसा मोक्याला माझ्या पाठच्या भावासारखा धावून आलास...’ तसा तो लांडोबा-पांडोबा म्हणजेच नाग आपलं खरं रूप तिच्यासमोर उघड करतो.
परंतु त्याच्या त्या नागरूपाला ती धाकटी सून घाबरत नाही. त्या लांडोबा-पांडोबाला ती नमस्कार करते आणि त्याच्या पाठोपाठ चालू लागते. जणू पुढे सरसर वाट काढत जाणारा तिचा भाऊराया आणि त्याच्या मागेमागे चालणारी त्याची लाडाची बहिणाबाई... पण लांडोबा-पांडोबाची ही गोष्ट इथेच संपत नाही. ही लाडाची बहिणाबाई आपल्या या लाडक्या भावाकडून वचन घेते, प्रत्येक सणाला ‘माघारी’ म्हणून यायची!
एकदा लहानपणी श्रावणात गावाला असताना मी देखील कधी तरी आईबरोबर गावच्या नदीच्या काठावर असलेल्या बांबूच्या बेटावर नाग पूजायला गेलो होतो. तिथे गेल्या गेल्या आईसकट जमलेल्या सगळ्या आयाबायांनी आधी वारुळाभोवतीची जागा शेणाने चांगली सारवली. मग त्या सारवलेल्या जागेवर सुरेखशी रांगोळी काढली. मग घरून नेलेल्या ताम्हणातलं निरांजन पेटवून त्या वारुळाची पूजा केली आणि मग तांदूळ, लाह्या, फुलं वारुळावर उधळली. लोटीत आणलेलं दूध प्रत्येकीने वारुळाच्या वेगवेगळ्या शिखरांत ओतलं अन् वारुळाभोवती फेर धरून साऱ्याजणी गाणी म्हणू लागल्या. त्यांची गाणी रंगात आलेली असतानाच वारुळातल्या एका शिखरात काही तरी हालचाल दिसली. नाचणाऱ्या साऱ्या जणी क्षणभर थबकल्या. प्रत्येकीची नजर वारुळाच्या दिशेनं रोखली गेली नि बघता बघता फड्यावर दहाचा आकडा असलेला काळा कुळकुळीत नाग मान उंचावत बाहेर आला. अर्ध शरीर वारुळात आणि दीड-दोन फूट उंच मान वारुळाबाहेर. सगळ्या जणींकडे तो टकामका पाहू लागला. त्याचं ते फडा उगारलेलं रूप पाहून मी घाबरलो आणि पटकन आईला बिलगलो. तेव्हा माझ्या मनातली भीती ओळखून आणि लोकरहाटीतल्या श्रद्धेला जागून आई लगेच म्हणाली, “घाबरू नको. तो नाग असला तरी आम्हा बह्यणींना भेटाय आलाय तो आज. आलाय तसा निघून जाईल गपगुमान. ज्यांना भाऊ नसतो, त्यांना तोच तर येतो माघारी म्हणून..”
तर भाऊ नसलेल्या सासुरवाशिणींचं भाऊपण निभावणाऱ्या अशा या भाऊरायाचं बहिणींना किती कौतुक. त्या मनातल्या मनात त्याचं भाऊपण तर जपतातच, पण प्रत्यक्षातही नागपंचमीच्या दिवशी ते नातं निभावतात. त्या नागपंचमीच्या दिवशी जमीन खणत नाहीत, न जाणो भूमीत घर असलेल्या नागोबाला चुकून कुदळ लागलीबिगली तर... किंवा स्वयंपाकघरातही विळीवर काही चिरत नाहीत, तव्यावर काही भाजत नाहीत आणि जात्यावर काही दळत नाहीत. कारण तसं केलं तर नागकुळातल्या आपल्या भावाला त्रास होईल, असं त्यांचं पारंपरिक मत. हे मत जुनाट खरं, परंतु परंपरेला श्रद्धेचं बळ मिळालं की त्याला आश्वासकता प्राप्त होते. म्हणून आजही नागपंचमीला घरात कुणी काही चिरत वा भाजत नाही नि दळतही नाही.
प्रत्यक्षात नागपंचमीला नागाला, म्हणजेच आपल्या भावाला काय काय आणि किती खाऊ घालू असंच प्रत्येक बहिणाबाईला होत असतं. परंतु हा बंधुराया प्रत्यक्षात उंदीर किंवा तत्सम प्राण्यांशिवाय काही खातच नाही. वारुळात ओतलेलं दूध किंवा त्याला वाहिलेल्या लाह्या हे त्याचं खाद्य नाहीच. यामुळे खरंतर त्याच्या जीवावरच बेततं. पण लोकमन श्रद्धेला बांधील असतं. त्याला नागपंचमी तर साजरी करायची असते, मग घराबाहेर कधी भिंतीवरच्या चित्रातल्या, कधी शिल्पांतल्या, तर कधी खऱ्याखुऱ्या नागाला देखील दूध-लाह्यांचा प्रसाद दाखवला जातो. मात्र घरात त्या दिवशी आवर्जून फक्त उकडलेले पदार्थ करतात - पुरणाचे उकडलेले दिंड किंवा पुरणाचे कानवले, हळदीच्या पानातल्या पातोळ्या, अगदी अळुवड्यादेखील यादिवशी फक्त उकडून खातात... आणि हे सगळं घरोघरच्या सासुरवाशिणी नागोबाला मनोमन स्मरूनच करतात. त्यामुळे लोकवाङ्मयात देखील या पदार्थांचे कितीतरी दाखले मिळतात -
“नागपंचमीच्या दिशी नाग निघालं खेळाया
कोन्या पापिणीनं गहू काढलं दळाया
पंचमीच्या दिशी केला निवद उकडीचा
माझ्या ग बंधुराया नागोबाच्या आवडीचा...”
पूर्वी नागपंचमीच्या सणाला घरोघरची मोदकपात्रं बाहेर यायची. कारण घरात काही शिजवायला-तळायला मनाई असायची. पातोळ्या-दिंड-कानवले असे फक्त उकडलेले पदार्थच करायची मुभा असायची. अशावेळी हे मोदकपात्रं कामाला यायचं. मग घरोघरी दिवसभर मोदकपात्रांचा घाणा सुरू असायचा आणि त्यातून वातावरणात पसरणारा अवीट गोडीचा परिमळ. मग उपासकरी बहिणींपेक्षा घरातल्या पुरुषांचीच भूक चाळवायची त्या गंधाने -
“लाडक्या बंधुराया, वाट पाहते घडोघडी
तुझ्या आवडीचे दिंड केले चवघडी
नागपंचमीचा सण घरोघरी दरवळ
पातोळ्यांचा बघ गेला दारी परिमळ..”
उकडून केल्या जाणाऱ्या या पदार्थांबरोबरच प्रत्यक्ष नागाला वाहिल्या जाणाऱ्या दूध-दही-लाह्यांचे संदर्भदेखील ओव्या-लोकगीतांमध्ये खूप आहेत.
“नागपंचमीच्या दिशी नागाला दूधलाह्या
यावं बहिणीच्या घरी भाऊराया
नाग भाऊराया तुला वाहते दूधलाह्या
दर्शनाला येती शेजारच्या आयाबाया..”
एकदा नागाला भाऊ मानल्यावर मग केवळ नागच नाही, तर त्याचं संपूर्ण नागकूळच घरचं होऊन जातं. मग त्या साऱ्यांसाठीही सगळ्या गोष्टी मोठ्या निगुतीने केल्या जातात. म्हणजे बघा -
“नागोबा संगट पूजा केली नागिणीची
वाटी देते फुटाण्यांची..”
किंवा
“दह्यादुधाच्या वाट्या जाईजुईची फुलं
माझ्या दारामधी पुजते नागोबाची मुलं..”
लोकसंस्कृतीत महिलांनी नागाला भाऊ मानलेला आहे. नागाला भाऊ मानून आपलं सुखदुःख त्याला सांगितलं आहे.. आणि लोकसंस्कृतीचा हा प्रभाव लोकमानसावर आजही आहे. त्यामुळेच कालौघात आज नागपंचमीचे संदर्भ बदलले असले किंवा आता पूर्वीसारखं खरोखरच्या नागांना दूध पाजलं जात नसलं तरी नागांची प्रतीकात्मक पूजा मोठ्या प्रमाणावर केली जातेच आणि क्वचित ग्रामीण भागात आजही पंचमीची गाणी गायली जातातच -
“सणामंदी सण नागपंचमी खेळायाची
बाळाई ग वाट पाहते मुराळ्याची
पंचमीच्या सणा आली बाळाई खेळाया
नागोबा बंधू गेला तिला ग आनाया
भावासाठी करू काय गोड आवडीचं
बाळाईने केलं जेवण वरण-पुरणाचं..”
लोकसाहित्याचे अभ्यासक व मुक्त पत्रकार.