विशेष
राजेंद्र साठे
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या 'नीट' (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार, पेपरफुटी आणि 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'च्या (NTA) ढिसाळ कारभारावर प्रस्तुत लेख परखड प्रकाश टाकतो. सत्तेचा बेदरकार माज, यंत्रणेची अक्षम्य अकार्यक्षमता आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे होणारे मानसिक व शैक्षणिक नुकसान यावर यात तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
या देशात एका बाजूला आहे हाती प्रचंड सत्ता असलेली यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला मुकी विचारी कुणी हाका अशा वर्णनाची जनता. सत्ता ठेवेल तसे राहणे, वागवेल त्याला गोड मानून घेणे हे जनतेचे कायमचे प्राक्तन आहे, जनता नावाच्या या वर्गात आजवर शेतकरी, कामगार, मजूर, महिला, नोकरदार अशांचा समावेश होता. आता त्यात विद्यार्थी नावाचा घटक दाखल झाला आहे. 'नीट' वैद्यकीय पूर्वपरीक्षेचा जी बट्ट्याबोळ अलीकडेच झाला त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तीन मे रोजी ही पूर्वपरीक्षा झाली होती. पेपरफुटीमुळे ती दहाच दिवसांमध्ये रद्द करावी लागली. आता २१ जून रोजी फेरपरीक्षा होईल. पहिल्या परीक्षेला सुमारे २३ लाख विद्यार्थी बसले होते. दुसरीलाही तेवढेच बसतील, मधल्या काळात जे नैराश्यामध्ये जातील किंवा जीवाचे बरेवाईट करून घेतील ते त्यात नसतील. परीक्षेसाठी पुन्हा एकदा सर्व अवसान गोळा करणे, त्याची तयारी करणे हे विद्यार्थ्यांसाठी सोपे नसेल, प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी तर ही न केलेल्या अपराधाची शिक्षा असेल. पण या परीक्षेचे व्यवस्थापन जिच्याकडे आहे त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए याबद्दल काय किंमत मोजणार हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. गेल्या दहा-बारा वर्षांतला अनुभव पाहिला तर सत्तास्थानी असलेल्यांनी चूक मान्य करणे आणि त्याबद्दल प्रायश्चित्त घेणे हे क्वचितय घडलेले आहे. त्यामुळे याही प्रकरणात फारशी आशा नाही.
समाज माटले की चोच्या होणार, माणसे पैसे खाणार, पेपरफुटी हा त्यातलाच एक प्रकार आहे असे काही जणांना वाटण्याचा संभव आहे. 'नीट' परीक्षेसंदर्भातील आकडेवारीही अशा समजाला पोषक आहे. या पूर्वपरीक्षेला सरासरी २३ ते २५ लाख विद्यार्थी बसतात. वैद्यकीय प्रवेशाच्या एकूण जागा असतात सुमारे एक लाख ३० हजार. सर्वांचे लक्ष्य सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवणे हे असते. कारण तिथे दर्जा उत्तम असतो आणि पाच वर्षांची त्यांची एकूण फी केवळ पाच लाख असते. याउलट खासगी महाविद्यालयांमध्ये हीच फी पाच वर्षांसाठी दीड कोटी रुपयांपर्यंत जाते. साहजिकच पेपर फोडून सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्याएवढे गुण मिळाले तर किमान एक कोटी रुपये वाचतात. अशा स्थितीत २० किंवा तीस लाख रुपये देऊन पेपर विकत घेणे हा फायद्याचा सौदा असतो. कायम वाकड्या मार्गाचा विचार करणाऱ्यांना अर्थातच तो आकर्षक वाटतो.
पण लोकच भ्रष्टाचारी आहेत, त्याला एनटीए काय करणार हा अत्यंत फालतू बचाव आहे. कारण, २०२६ मध्ये जे काही घडले आहे तो सामान्य भ्रष्टाचाराचा प्रकार नसून व्यवस्था राबवण्यातली प्रचंड अकार्यक्षमता आहे. व्यवस्थेतील दोष ओळखून वेळीच सुधारणा न करण्याची अक्षम्य चूक आहे. आपल्याला कोण जाब विचारू शकणार असा सत्तेचा बेदरकार माज आहे.
'नीट' च्या परीक्षेत सातत्याने घोटाळे होत आले आहेत. ते झाले की आरोपींना अटक होते, रॅकेटचा पर्दाफाश झाला अशा बातम्या येतात. पण या प्रकरणांचे पुढे काहीही होत नाही. आजतागायत अशा प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला ठोस शिक्षा झालेली नाही. २०२४ मध्ये बिहार, झारखंडमध्ये पेपर फुटला. ४५ जणांवर आरोपपत्र दाखल झाले. संजय मुखिया नावाच्या एका नामचीन गुंडाला या प्रकरणातला मास्टरमाइंड घोषित करण्यात आले होते. हा गुंड इतरही अनेक पेपर लीक प्रकरणातला आरोपी होता. पण सीबीआय ठराविक मुदतीत त्याच्यावर आरोपपत्रही दाखल करू शकली नव्हती.
त्याच वर्षी गुजरातमध्ये गोध्रा इथे एका सेंटरवरचा घोटाळा समोर आला होता. ज्या प्रश्नांची उत्तरे ठाऊक नाहीत ती सोडवू नका, त्यांची योग्य उत्तरे नंतर सेंटरवरचे शिक्षक लिहून भरतील अशी योजनाच बहुदा तिथे राबवली जात होती. 'नीट'मध्ये चुकीच्या उत्तराला उणे गुण असतात. त्यामुळे ही अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची 'सेवा' होती. याच सेवेसाठी हे केंद्र इतके विख्यात होते की तिथे दूरदूरच्या राज्यांमधून विद्यार्थी येत होते. हा घोटाळा उघडकीस आला, पण पुढे यावर काय कारवाई झाली याचा खुलासा झालेला नाही.
यंदाच्या घोटाळ्यात राजस्थानातील सिकर शहरातील कोचिंग सेंटर्स व त्यांची नावे घेतली जात आहेत. इथूनच यंदाचा पेपर फुटला. पण हे सेंटर २०२४ मध्येही बातम्यांमध्ये होते. त्या वर्षी 'नीट' परीक्षेत मिळवणारी देशातील जी ५० केंद्रे होती ७२० पैकी ६५० किंवा त्याहून अधिक गुण त्यातली ३७ एकट्या सिकर जिल्ह्यातील होती. (६५० गुण असतील तर बहुदा सरकारी महाविद्यालयात प्रवेश पक्का मानला जातो.) हा अत्यंत संशयास्पद प्रकार होता. २०२६च्या घोटाळ्यात सिकरचे नाव ठळकपणे झळकणे हा एनटीएच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या दुर्लक्षाचा खास नमुना म्हणायला हवा.
२०२४ मध्ये ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले होते. इतक्या संख्येने असे यश पूर्वी कधीही मिळाले नव्हते. काही विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वेळ कमी मिळाला म्हणून जादाचे गुणही दिले गेले होते. जागरूक संघटनांमुळे हे सर्व प्रकार उघडकीस आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर हे गुण कमी झाले. काही जणांची फेरपरीक्षा घेण्यात आली. पण एनटीए नावाची यंत्रणा परीक्षा घेण्याच्या मामल्यात नापास झालेली आहे हे तेव्हाच स्पष्ट झालेले होते.
खरे तर सरकारने त्यावेळीच यावर मूलभूत इलाज करायला हवा होता. पण आपल्या सत्ताकाळात आपले व आपल्या संस्थांचे काही चुकूच शकत नाही असा मोदी सरकारचा आविर्भाव असतो. त्यामुळे त्यावेळी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. इस्रोचे माजी प्रमुख राधाकृष्णन यांची एक समिती नेमण्यात आली. पण तिच्या शिफारशी गुंडाळून ठेवण्यात आल्या. इंजिनिअरिंगसाठीची जेईई ही परीक्षा संगणकावर आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतली जाते. त्याच धर्तीवर 'नीट'चीही परीक्षा घ्यावी अशी सूचना या समितीने केली होती. पण तिच्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता यंदाच्या नामुष्कीमुळे पुढील वर्षापासून 'नीट'ची परीक्षा संगणकावर घेऊ, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. पण 'एनटीए'चा आजवरचा कारभार पाहता तिच्यात घोळ होणार नाहीत याची हमी कोणीही देऊ शकत नाही.
सध्या 'नीट'ची परीक्षा लेखी होते. त्याचे पेपर छापले जातात त्या छापखान्यांपासून तो त्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवाल्यांपर्यंत सर्वत्र पेपरफुटीचा धोका कायमच होता. पण सध्या जे बाहेर येते आहे त्यावरून खालच्या स्तरातले कामगार नव्हे तर प्रश्नपत्रिका तयार करणारे प्राध्यापक, कोचिंग क्लासवाले बडे व्यावसायिक आणि परीक्षा केंद्रांवरचे व्यवस्थापक वगैरे लोकच या पेपरफुटीतले मुख्य मास्टरमाइंड आहेत. यात भाजपशी संबंधित काही कार्यकर्तेही असल्याचे उघड झाले आहे. साहजिकच हे खूप मोठे रॅकेट असल्याचा संशय निर्माण झाला आहे. दुर्दैवाने आजवरचा इतिहास पाहता यातले बडे मासे कधीच पकडले जाणार नाहीत अशीच शक्यता अधिक आहे.
'नीट' ची परीक्षा पूर्वी प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे घेतली जात असे. तीच पद्धत पुन्हा सुरू करावी अशी मागणी दक्षिणेतील राज्यांमधून पूर्वापार होत आली आहे. आता या घोटाळ्यामुळे तिला बळ मिळेल. मात्र या निमित्ताने एकूणच आपली परीक्षा पद्धती, वैद्यकीय शिक्षणासाठीची जीवघेणी स्पर्धा, त्यातले डोळे पांढरे करणारे शुल्क या सर्वांचाच फेरविचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तीन तासांमध्ये १८० बहुपर्यायी प्रश्नांची वेगाने उत्तरे लिहू शकणारा म्हणजे गुणवान व डॉक्टर होण्यासाठी योग्य उमेदवार ही आपली व्याख्या योग्य आहे काय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तसेच डॉक्टर होणे म्हणजेच आयुष्याची इतिकर्तव्यता या समजाचा फेरविचार करण्याचीही गरज आहे.
satherajendra@gmail.com