नवरूपांतून उलगडणारी आदिशक्ती 
अक्षररंग

नवरूपांतून उलगडणारी आदिशक्ती

आदिशक्ती दुर्गा म्हणजे शक्ती, भक्ती, मातृत्व आणि साहस यांचा संगम. नवरात्रीत पूजली जाणारी तिची नऊ रूपे स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवतात. कुठे तपश्चर्येचे सामर्थ्य, कुठे ममतेचा ओलावा, तर कुठे दुष्टांचा संहार करण्याचे रौद्र तेज! नवदुर्गांच्या या रूपांतून स्त्रीशक्तीचे सामर्थ्य आणि सृजनशीलतेचे महत्त्व अधोरेखित होते.

नवशक्ती Web Desk

विशेष

मंजिरी हसबनीस

आदिशक्ती दुर्गा म्हणजे शक्ती, भक्ती, मातृत्व आणि साहस यांचा संगम. नवरात्रीत पूजली जाणारी तिची नऊ रूपे स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवतात. कुठे तपश्चर्येचे सामर्थ्य, कुठे ममतेचा ओलावा, तर कुठे दुष्टांचा संहार करण्याचे रौद्र तेज! नवदुर्गांच्या या रूपांतून स्त्रीशक्तीचे सामर्थ्य आणि सृजनशीलतेचे महत्त्व अधोरेखित होते.

दुर्गा ही पार्वतीचे शक्ती स्वरूप आहे यात शंकाच नाही. नवदुर्गांचा विचार केला तरी तीच पार्वती आहे, याबद्दल आपली खात्री पटते. पण मग तिचे 'दुर्गा' हे नाव कशामुळे झाले असावे? 'दुर्गा' या शब्दाचा व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला, तर 'दुर्' म्हणजे कठीण आणि 'गम' म्हणजे जाणे, या दोन शब्दांशी त्याचा संबंध येतो. «दुर्गं गच्छाति इति दुर्गा» म्हणजेच, जी भक्तांना कठीण प्रसंगातून पार नेते, ती दुर्गा, असा अर्थ केला जातो.

दुर्ग म्हणजे किल्ला, तेव्हा जी अभेद्य आहे, अजेय आहे, ती दुर्गा, असाही या शब्दाचा अर्थ आहे. या शब्दाला एक पौराणिक पदरही आहे. एका वैदिक कथेनुसार, 'दुर्गम' नावाच्या राक्षसाने त्रिलोकात हाहाकार माजवला था. त्याने वेदही पळवून नेले होते. तेव्हा देवीने अवतार घेऊन या राक्षसाचा वध केला आणि सृष्टीचे रक्षण केले, तेव्हापासून हिला 'दुर्गा' असे नाव पडले.

दुर्गा देवीच्या स्वरूप प्रकटनाची कथाही रोमांचकारी आहे. महिषासुराने त्रिलोकात अनेक अत्याचार केले व हाहाकार माजवला. सर्व देव हताश होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेशांकडे गेले. तेव्हा त्रिदेवांच्या शरीरातून दिव्य प्रकाश बाहेर पडला. ते तेज शक्तीने धारण केले आणि दुर्गा प्रकट झाली. ती अष्टभुजा किंवा दशभुजा होती. शिवाने तिला त्रिशूल दिले, भगवान विष्णूने तिला सुदर्शन चक्र दिले, इंद्राने वज्र दिले, वरुणाने शंख दिले, अग्नीदेवाने शक्ती दिली आणि हिमालयाने शक्तिशाली सिंह दिला. या सर्व शक्तींनी युक्त होऊन दुर्गादेवीने महिषासुराशी सलग नऊ दिवस युद्ध केले. शेवटी दहाव्या दिवशी महिषासुराचे मर्दन केले आणि सृष्टीला त्याच्या त्रासातून मुक्त केले. नंतर तिने शुंभ-निशुंभ आणि रक्तबीज या राक्षसांचाही वध केली.

तर अशी ही दुर्गादेवी शक्तीस्वरूपिणी आहे. नवरात्र उत्सवात तिचे पूजन नऊ दिवस व नऊ रात्री केले जाते. दहाव्या दिवशी तिने महिषासुर आणि इतर राक्षसांचा वध केला आणि विजयपताका सर्वदूर फडकावली. तो दिवस आपण 'विजयादशमी' म्हणून साजरा करतो. हा विजय म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, दुर्बलतेवर शक्तीचा विजय आणि अंधविश्वासावर डोळस भक्तीचा विजय होय. तिच्या नऊ रूपांमध्ये या सर्व निष्ठा आणि कल्पना दृग्गोचर होतात; म्हणूनच दुर्गेची ही नऊ स्वरूपे समजून घेणे आणि मग त्यांचे पूजन करणे, हा खरा कल्याणकारी मार्ग आहे.

पहिले रूप आहे 'शैलपुत्री'. हिमालयाची ही पुत्री शंकराला वरते. तिचे वाहन नंदी आहे. तिने अंगावर हलक्या रंगाचे दागिने परिधान केले आहेत. तिला दोनच हात आहेत; एका हातात त्रिशूल आहे आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तिचे लाल-गुलाबी वस्त्र तिच्या तारुण्याला शोभणारे आहे. अशी ही कोमल अंगी मनाने मात्र कणखर आहे, तिचा निश्चय दुर्दम्य आहे; म्हणूनच शंकराला प्राप्त करण्यासाठी तिने पुढचे 'ब्रह्मचारिणी' हे रूप सहज धारण केले होते.

तिचे दुसरे स्वरूप 'ब्रह्मचारिणी'. हिमालयाच्या कंदरांमध्ये पंचाग्निसाधन करणारी, शंकरच वर हवा या निश्चयाने केवळ बेलपत्र खाऊन राहणारी ही तपस्विनी! हिचे रूप काय वर्णावे? अतिशय तेजस्वी, एका हातात जपमाळ तर दुसऱ्या हातात कमंडलू, अंगावर रुद्राक्षाचे अलंकार आणि कशाय वस्त्र परिधान केलेले हिचे स्वरूप भक्तांना आंतरिक शक्ती प्रदान करते.

तिचे तिसरे रूप 'चंद्रघंटा' या नावाने प्रसिद्ध आहे. ही दशभुजा आहे. शांती आणि कल्याण विश्वाला देणारी ही देवी स्वतः मात्र अनेक अस्त्रे-शस्त्रे धारण करणारी आहे. नऊ हातांमध्ये त्रिशूल, तोमर, गदा, धनुष्य, बाण, तलवार, कमळ, घंटा आणि पाण्याचे भांडे या गोष्टी ती धारण करते. एका हाताने ती भक्तांना आशीर्वाद देते. शस्त्रांचा वापर केवळ शांतिकल्याणार्थ करावा, हेच ती सुचवत असावी. ती वाघावर आरढ असून तिच्या मस्तकावर तिने घंटेच्या आकाराचा चंद्र धारण केलेला आहे; म्हणून हिला 'चंद्रघंटा' असे म्हणतात.

हिचे पुढचे स्वरूप आहे 'कूष्मांडा'. हिला आठ भुजा आहेत. ती सिंहावर बसलेली आहे. सहा हातांमध्ये चक्र, गदा, कमळ, धनुष्यबाण, तलवार आणि जपमाळ आहे. दोन हातांमध्ये मध आणि पाण्याचे भांडे आहे. उरलेला हात सिंहाच्या पाठीवर आरूढ आहे. रोगापासून रक्षण करणारी ही देवी आहे, हिला कोहळ्याचा नैवेद्य लागतो. कोहळा आणि मध अशा दोन औषधी गोष्टी तिने धारण केलेल्या आहेत.

'स्कंदमाता' हे तिचे मातृस्वरूप आहे. स्कंद म्हणजेच कार्तिकेय. ही देखील सिंहावर आरूढ झालेली असून हिला चार भुजा आहेत. गौरवर्णाच्या या देवीने दोन हातांमध्ये कमळ धरलेले आहे, तिसऱ्या हातात सहा मुखांचा कार्तिकेय बालक ती सांभाळत आहे आणि एका हाताने भक्तांना आशीर्वाद देत आहे. माणसाच्या जडणघडणीत मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे तिचे रूप त्याच मातृमहतीला वाहिलेले आहे.

पुढचे रूप आहे 'कात्यायनी'. कात्य गोत्रात उत्पन्न झालेली अशी ही देवी आहे. तिच्या चार हातात तलवार, ढाल, कमळ आणि त्रिशूल आहे. ही देखील सिंहावर स्वार आहे. इच्छित वर प्राप्त व्हावा, यासाठी ललना हिची पूजा करतात.

काळे शरीर आणि रक्ताळलेले तीन डोळे, केशसंभार विखुरलेला, गळ्यात कवटीचा हार, हातात खड्ग धारण केलेली अशी महाभयंकर 'कालरात्री' हे देवीचे पुढचे स्वरूप! ती गाढवावर स्वार होते. तिच्या हातात वज्र आहे, त्रिशूळ आहे आणि तंतुवाद्य आहे. या स्वरूपात स्मशानस्थित भस्मविलेपित शिवाची ती अर्धांगिनी शोभते. "चराचरात जे काही मंगल ते माझे आहे आणि अमंगळ आहे तेही माझेच आहे," असे म्हणणाऱ्या शिवाची ती पत्नी आहे. तिचे हेही स्वरूप भक्तांना आकर्षित करते.

पुढचे स्वरूप 'महागौरी'. पांढरे वस्त्र, हातात त्रिशूल, डमरू आणि कमळ धारण केलेली, सर्वांना आशीर्वाद देऊन आकर्षित करणारी अशी हिची मूर्ती आहे. हिचेही पूजन सर्वत्र होते. अष्टमीला मोठा होम केला जातो. पिठाची महालक्ष्मी उभी करून तिचे पूजन होते.

पुढची देवी 'सिद्धिदात्री'. नावाप्रमाणे सिद्धी प्राप्त करून देणारी ही देवी शंख, चक्र, कमळ आणि गदा धारण करणारी आहे. ती कमळावर स्वार आहे. तिच्या उपासनेने अनेक कामनांची पूर्ती होते. तर अशी ही दुर्गादेवीच्या नऊ स्वरूपांची कहाणी आहे.

नवरात्र किंवा नवदुर्गा यातील 'नऊ' या आकड्याला खूपच महत्त्व आहे. गीतेमध्ये भगवंतांनी मानवी शरीराला एक नगर कल्पून त्याला नऊ दरवाजे आहेत असे म्हटले आहे, "नवद्वारे पुरे देही". किंवा मनुष्य जन्माची नाळ या नऊ आकड्याशी नक्कीच निगडित आहे. माता नऊ महिने बालकाला गर्भात धारण करते आणि मगच त्याचा जन्म होतो. दुर्गादेवी हे मातृत्वाचे आणि सृजनत्वाचे उगमस्थान आहे, म्हणूनच तिचे स्वरूप असे नऊ प्रकारांनी आविष्कृत व्हावे, हे संयुक्तिक वाटते.

नवरात्रीचे नऊ रंग सुप्रसिद्ध आहेत आणि प्रत्येकच रंगाचे काही वैशिष्ट्य आहे. केशरी रंग ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे, तर पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. लाल रंग साहसाचे प्रतीक आहे, तर निळा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. पिवळा रंग सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. हिरवा रंग सृजनत्वाचे प्रतीक आहे. राखाडी रंग परिपक्वता दर्शवतो, जांभळा रंग आध्यात्मिक उंची दर्शवतो, तर मोरपंखी रंग अद्वितीयता दर्शवतो.

अर्थात, देवीला सर्वच रंग प्रिय आहेत. काळा रंगही तिला वर्ज्य नाही. कोणत्याही रंगात जी खुलून दिसते, तेच खरे स्त्रीत्व!

आणि स्त्रीशक्तीला मर्यादा नाही, तिची कितीतरी स्वरूपे आहेत आणि ती सर्वांनी वंदनीय मानावीत, अशीच स्त्रीत्वाची महती आहे. ते विश्वाला सांगण्यासाठी या नवदुर्गांचे पूजन सर्वजण मोठ्या उत्साहाने करतात.

hasabnis1gmail.com

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान