'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

बकरीने शोधलेलं पेय !!

कॉफीचा शोध माणसाने नव्हे, तर चक्क बकऱ्यांनी लावल्याची एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. इथिओपियातील एका मेंढपाळाच्या निरीक्षणातून जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेयांपैकी एक असलेल्या कॉफीचा प्रवास कसा बरं सुरू झाला?

नवशक्ती Web Desk

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

कॉफीचा शोध माणसाने नव्हे, तर चक्क बकऱ्यांनी लावल्याची एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. इथिओपियातील एका मेंढपाळाच्या निरीक्षणातून जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेयांपैकी एक असलेल्या कॉफीचा प्रवास कसा बरं सुरू झाला?

वाफळत्या, सुगंधी टेस्टी कॉफीचा आनंद आपण प्रत्येकाने कधी ना कधी घेतला आहे. प्रवासातला शीण घालवायला, कधी मस्त गप्पांची मैफिल रंगवताना, कधी छान पाऊस पडत असताना, कधी जरा बरं वाटत नसेल तर आईच्या हातची मायेने तयार केलेली कॉफी घेतानाचा आनंद आपण मनापासून अनुभवला आहे. कॉफीपान हे जगभरात अतिशय मनापासून चवीने केलं जातं आणि हा कॉफीचा इतिहास आताचा नाही बरं, तर पार दहाव्या- बाराव्या शतकापासूनचा आहे. काय गंमत आहे पहा!

प्रत्येक सहज शोधाचा जनक हा कोणी माणूस आहे आणि कॉफी ही मात्र चक्क शेळ्या-मेंढ्यांनी शोधली! कोणी सांगतात कॉफीचा शोध दहाव्या शतकात लागला तर कोणी सांगतं पंधराव्या शतकात. इतिहासात प्रत्यक्ष कॉफीपानाची नोंद सोळाव्या शतकातील असली तरी तिचा वापर बऱ्याच आधीपासून असावा. कॉफीचं रोपटं हे सगळ्यात आधी इथिओपियात आढळलं आणि पहिली रसरशीत पातळ कॉफी तयार झाली ती येमेनमध्ये! आफ्रिका आणि अरेबिक जगतात कॉफीचा प्रवास सुरुवातीला वेगाने झाला. मग ती युरोपमध्ये दाखल झाली. विषुववृत्तीय प्रांत आणि भारतात कॉफीची लागवड जोमाने बहरते. आता तर जगभरात जवळपास सत्तर देश कॉफी उत्पादनात अग्रेसर आहेत. अरेबिक जगतातील ‘कहावा’ या नावाने प्रसिद्ध असलेली कॉफी फ्रेंचांनी उच्चभ्रूंची म्हणून नावारूपाला आणली. कॉफी हाऊसेस तयार झालीत आणि अनेक शास्त्रज्ञ, कलावंतांच्या बौद्धिक गप्पा या कॉफीच्या कपाभोवती रंगायला लागल्या.

इंग्लंडमध्ये कॉफी हाऊस सुरू झालं तरी त्यांना आपला चहाच जास्त प्रिय होता आणि जगभर त्यांचं साम्राज्य पसरलेलं असल्याने त्यांनी चहाचा प्रसार जास्तच वेगाने केला. मात्र त्यांना शह दिला तो अमेरिकनांनी! ब्रिटिशांनी अमेरिकेत चहावर अतिरिक्त कर आकारणी केली तेव्हा त्याचा निषेध म्हणून मग अमेरिकन लोकांनी कॉफी हे राष्ट्रप्रेमाचं प्रतीक म्हणून जवळ केलं आणि कॉफीला लोकप्रिय केलं. आजही कॉफी पिणारा राष्ट्रप्रेमी असतो असं अमेरिकन समजतात असा एक समज आहे, तर या अशा कॉफीचा आस्वाद मात्र पहिल्यांदा घेतला तो एका शेळ्या-मेंढ्यांच्या कळपाने!! याची गोष्ट अशी की, इथिओपियात कॉफीची पुष्कळ झुडपं होती. कालदी नावाचा मेंढपाळ रोज आपल्या बकऱ्यांना चरायला घेऊन जायचा. त्या भागात कॉफीची बरीच झाडं होती. काही दिवसांनी कालदीच्या लक्षात आलं की, आपल्या बकऱ्या या आजकाल जास्तच तरतरीत आणि उत्साही झाल्या आहेत आणि चक्क रात्री झोपायलाच तयार नसतात! उलट चरून आल्या की, अगदी अंगातच येतं म्हणा ना त्यांच्या! मग त्याने याचा शोध घेतला तर त्याच्या लक्षात आलं, एका विशिष्ट झाडाच्या बिया या बकऱ्यांनी खाल्ल्या की, त्या ताज्यातवान्या होतात. हा हा म्हणता ही बातमी सर्वत्र पसरली. काही सुफी धर्मगुरूंपर्यंत ही बातमी गेली आणि त्यांनी त्या बिया आणून, भाजून त्याचं पेय तयार केलं. ते घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, रात्रीची प्रार्थना म्हणताना नेहमी येते तशी झोप आपल्याला येत नाहीये. एकदम उत्साही वाटत आहे. मग रात्रीच्या प्रार्थनेआधी हे पेय घ्यायला सुरुवात झाली.

येमेनपर्यंत ही बातमी पोहोचली आणि मग कॉफीपानाचे रीतसर प्रयोग पहिल्यांदा तिथे सुरू झाले. तिथून मग कॉफीचा जगप्रवास सुरू झाला. अरेबिक भाषेतील कहावा म्हणजे गडद, शक्ती देणारं, तरतरी देणारं पेय. तुर्की लोकांनी कहावे आणि डच लोकांचं कोफिया मग ब्रिटिशांनी कॉफी केलं तर फ्रेंचांनी कॅफे. आता आपण जी इन्स्टंट कॉफी घेतो ती मात्र न्यूझीलंडच्या कॉफीप्रेमींनी शोधून काढली आहे. पण काय आहे बालमित्रांनो, ‘कहावा’ ‘वाहवा’ जरी असली तरी या कॉफीत आहे कॅफेन नावाचं द्रव्य जे आपल्याला तरतरी देतं आणि तुम्हाला तर माहितच आहे अति सर्वत्र वर्जयेत! तेव्हा लहानपणी आई बाबांनी दिल्याशिवाय कॉफी घ्यायची नाही आणि मोठेपणी देखील सणासुदीला एकत्र मस्त गप्पा मारताना तेवढी मजा म्हणून कॉफी घ्यायची. बस्स.

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

Mumbai : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना भेट; पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

बनावट दाखल्यांचा घोटाळा उघडकीस; महसूल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल