दुसरी बाजू
प्रकाश सावंत
जल, जंगल, जमीन अन् अवघा निसर्गच हे ज्यांचे विश्व. नृत्यवादन हाच ज्यांचा श्वास. ज्यांनी आपल्या जगण्याचाच आनंद तारपावादनात शोधला, ते ज्येष्ठ तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा. पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावच्या भिकल्या यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. या पुरस्काराने केवळ महाराष्ट्राच्या आदिवासी लोकजीवनाचा, संस्कृती-परंपरेचाच नव्हे, तर तारपा संगीत-नृत्यकलेचाही मानसन्मान वाढला आहे.
भिकल्याऽऽ.. आला रे ऽऽऽ.. अशी हाक आसमंतात घुमताच, आदिवासी पाड्यातील मने उचंबळून येतात. कार्यक्रमाच्या अंगण, मंडपात धाव घेतात. तारपा निसर्गवाद्याच्या वेगवेगळ्या लय-तालाच्या निसर्गधुनीत धुंद होऊन हरखून, हरपून जातात. पाड्यावरचे बायाबापडे एकत्र येऊन आधी मानवी साखळी तयार करतात. ही मानवी साखळी हातात हात घालून सर्पिल नृत्य करीत नागमोडी वळणे घेत ठेका धरते. गिरक्या नि फिरक्या घेत फेर धरून नाचूबागडू लागते. रात्री १० वाजता सुरू झालेला तारपा वादनाचा आनंदसोहळा पहाटे ६ वाजेपर्यंत उत्तरोत्तर रंगत, दंगत जातो.. हे समूहगान, समूहनृत्य स्वर्गसुखाचा सामूहिक आनंद स्वत:ही घेते आणि दुसऱ्यालाही देते. म्हणूनच ते ठरते आनंददायी निसर्गगान...
डोरली, बाया, मोरुगली, गुंजबाई, डोंगर हाकणीचा चाळा म्हणजे आदिवासी देवदेवतांचे पुण्यस्मरण अन् पुण्यस्तवनही. फुगड्यांचा चाळा म्हणजे कष्टकरी आदिवासी महिलाजगताचे विरंगुळ्याचे साधनच. तारपावादकाच्या रोमारोमातच नव्हे, तर तारपा वाद्याच्या अंगअंगात, श्वासाश्वासात संगीताचा स्वर्गसुखाचा आनंद फुलतो. तारपा संगीतनृत्यकलेच्या भावभक्तीतच सामावलाय मन भरून पावणारा आदिवासींचा पांडुरंग...
तारपा संगीतनृत्याची साधनाआराधना म्हणजे आदिवासी देवदेवतांचा लोकजागरच. ‘हे देवा सर्वांना सुखी ठेव. सर्वांचे भले कर. यंदा चांगले पीक येऊ दे अन् साऱ्यांची घरे धनधान्याने भरू दे.’ जगाच्या कल्याणाचे हे आदिवासी बांधवांचे पसायदान श्वासाश्वासात भावभक्ती अन् नाचता-गाता देव भेटल्याचीच देते लोकविलक्षण अनुभूती...
महाराष्ट्राच्या ठाणे, पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू परिसरातील आदिवासींच्या तांबड्या-पांढऱ्या रेषांनी सजलेल्या वारली रंगकलेने अवघ्या विश्वात आपल्या नावाचा डंका वाजविला आहे. तसेच, वारली कलेचा अविभाज्य भाग असलेल्या तारपा संगीत-नृत्य कलेच्या सामूहिक आविष्कारानेही सातासमुद्रापार कीर्ती संपादन केली आहे. या नावलौकिकाला साजेसे कार्य तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनी केले आहे. त्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराने आदिवासी लोककलेचाच सन्मान झाल्याची जनभावना आहे. त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी तारपा संगीत-नृत्याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या बोलण्यातून निसर्ग व माणुसकीची जाण पदोपदी वृद्धिंगत होत होती.
आपल्या वाडवडिलांचा तारपावादनाचा समर्थ वारसा आपण पुढे घेऊन जात असल्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. आपले पणजोबा नवश्या, आजोबा धाकल्या, वडील लाडक्या, लाडक्याचा मी भिकल्या. आता हाच तारपावादनाचा समृद्ध वारसा मी माझा नातू जगदीश चंद्रकांत धिंडा यांच्याकडे सोपविला असल्याचे भिकल्या धिंडा यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. आजवर आपण चाळीस-पन्नास लोकांना तारपावादनाचे धडे दिलेत. मी २० - २५ जणांची टीम सांभाळलीय. या टीमला आम्ही मुंबई दाखवली. दिल्लीला विमानाने नेले. आज माझे घर पुरस्कार, मानसन्मानाने भरले आहे. पुरस्काराच्या रकमेतील २५ हजार रुपये खर्चून मी घरात एक कपाट बनवले आहे. त्यात सर्व पदके, सन्मानपत्रे ठेवलीत. हा आदिवासी कला संस्कृतीचा अनमोल ठेवा पाहून माझे मन भरून पावते. पुरस्काराने भरलेले माझे घर हेच माझे कलामंदिर आहे. तेच माझे भाग्य व तीच माझी श्रीमंतीसुद्धा आहे.
तारपा संगीत नृत्याने मला भरभरून दिले. मला कलावंत म्हणून पाच हजाराची सरकारी पेन्शन मिळते. मुंबई, दिल्लीचे सरकारी अधिकारी आमच्या आदिवासी वाड्यावस्त्यांमध्ये मला भेटण्यासाठी येतात. त्यांच्या सहकार्यातून गावचे रस्ते ठीकठाक होतील. गावात दिवाबत्तीची सोय होईल. चांगल्या शाळेत आदिवासींची मुले शिकतील. आरोग्य केंद्रात डॉक्टर असतील. त्यातून माझ्या आदिवासी बांधवांचे जगणे अधिक आनंदी होईल, हीच माझी मनोकामना असल्याचे ते सांगतात.
मी स्वत: तारपा वाद्य तयार करतो. कधी त्याची चार-पाच दिवसात निर्मिती होते, तर कधी बराच कालावधी लागतो. माझ्या घरात आठ-दहा तारपावाद्ये आहेत. तारपा हे निसर्गवाद्य आहे. ते दुधी भोपळा, बांबू व माडाची पात, पान यापासून बनते. ते बनविण्याचीसुद्धा एक कला आहे. तारपा वाद्य हे निसर्गगान आहे आणि निसर्गधूनसुद्धा.
तारपा वादन ही एक अल्प, मध्यम, दीर्घ श्वासाची कला असून त्यात आपले पंचप्राण फुंकावे लागतात. या निसर्गवाद्यात श्वासाचीच लय आहे. ताल आहे. या श्वासाची, तालाची गती कधी मंद, कधी मध्यम, तर कधी वेगवान आहे. श्वास ही संस्कृती आहे. हाताने वाद्य वाजवणे ही आकृती आहे. ही श्वासाची संस्कृती व वाद्याची आकृती यांचा अनोखा संगम म्हणजे तारपावादन आहे. वाऱ्याच्या झुळूकीने झाडांची पानेच नव्हे, तर झाडसुद्धा सळसळते. हालू, डोलू लागते. मानवी श्वास व तारपा वाद्य हे तनामनाने एकरुप होतात. जणू वारे अंगात संचारते. तसा श्वास तारप्यात घुमतो आणि मग, श्वासाची चित्ताकर्षक धून पुंगीप्रमाणे वाजू लागते. वारा गाणे गातो, अगदी तसेच धुंदफुंद, निर्गुण, निराकार सूर निर्माण होतात. ते प्रसन्न मनाने नाचूबागडू लागतात. जीवनात आनंद फुलवतात. हा आनंदच सुखी जीवनाचे सार सांगतो.
मला आजवर अनेक मानसन्मान मिळाले. हा माझा मानसन्मानाचा ठेवा आपल्या पुढच्या पिढ्यांनाही सदोदित स्फूर्ती आणि प्रेरणा देत राहील असा विश्वास भिकल्या धिंडा यांनी व्यक्त केला. तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आपण आयुष्यभरात कधीही विसरू शकणार नाही अशी कृतज्ञतेची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
तारपा संगीतनृत्य कलेला कृत्रिमतेची जोड देऊन सध्या डीजे, बेंजोचा जो काही धांगडधिंगाणा सुरू आहे, त्याविषयी त्यांनी तीव्र नापसंती दर्शवली. तारपा संगीत नृत्यकला म्हणजे निसर्गाचे दुसरे रूप आहे. ती निसर्गाची साधना-आराधना आहे, संवाद आहे. तीच आदिवासी लोकजीवन आणि जीवनसंस्कृतीचे मूळ आहे. त्यामुळे ‘ओरिजनल’ ते ‘ओरिजनल’. कृत्रिम संगीतनृत्यात ना लय आहे, ना ताल आहे, ना श्वास आहे आणि ना ध्यास आहे.
‘आपली मूळची संस्कृती परंपरा, कलेचा गौरवशाली वारसा जपायचा असेल, तर आपल्या सभोवतालचा निसर्ग आपणच जपायला हवा. निसर्ग राहिला तरच आपण राहू. ही पृथ्वी राहील. त्यासाठीच जल, जंगल, जमिनीचे संरक्षण व्हायला हवे. आजकाल विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जात आहेत. जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत. स्वच्छंदी बागडणाऱ्या वन्य प्राण्यांचे, आपले जीवन गाणे गाणाऱ्या पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. हे कुठेतरी थांबायला हवे,’ अशीच भावना ते व्यक्त करतात.
भिकल्या लाडक्या धिंडा यांनी आपल्या निर्मळ, शुद्ध आचारविचारातून निसर्गाची समृद्धी व संपन्नता याचेच निसर्गगान गायिले आहे. निसर्ग टिकला, तरच आदिवासींची कला टिकेल. तारपा संगीतनृत्यकलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी केवळ कलेचा गौरवच करून चालणार नाही, तर त्यासाठी आता आपल्याला निसर्गाचे गान आणि भान ठेवावेच लागेल. त्यातच स्त्री-पुरुषांच्या समानतेचा पुकारा करणाऱ्या, निसर्गाचे गुणगान गाणाऱ्या आदिम संस्कृतीचा मानसन्मान आहे.
prakashrsawant@gmail.com