डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले, फक्त बोटीने गाठता येणारे पाणखोल जुवा हे गड खाडीतील एक निसर्गरम्य बेट. शांतता, माडांची हिरवाई, जुना वाडा आणि पुराशी दोन हात करणाऱ्या ग्रामस्थांची जिद्द- या सगळ्यांनी समृद्ध असा या बेटावरील तीन दिवसांचा अनुभव.
कोकणात समुद्रकिनारी, जंगलातील गावात बरेचदा राहिले आहे; पण यावेळी मी चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या एका निसर्गनिर्मित बेटावर राहिले होते. या बेटावर जायला रस्ता नाही, पूल नाही, चालत जायला बांधही नाही. इथे फक्त आणि फक्त बोटीनेच जाता येतं. गड खाडीच्या खोल पाण्यात स्थित झालेल्या या बेटाचे नाव आहे पाणखोल जुवा. कोकणी भाषेत बेटाला जुवा म्हणतात.
मालवणपासून १५ ते २० मिनिटांवर हे बेट आहे. प्रसिद्ध तोंडवली तळाशीलमध्ये आलात तरी तिथून बोट बुक करून या बेटाची भटकंती करता येईल.
मला या बेटावर मुक्काम करून इथले जीवन बघायचे होते. आणि निवांत फिरत, शांतता स्वतःमध्ये झिरपवत इथल्या अनुभवाने समृद्ध व्हायचे होते. ट्रीपची आखणी केली आणि बेटावर असणाऱ्या होमस्टेसोबत बोलून राहण्याची व्यवस्थाही झाली.
मालवण आचरा रोडवरून गाडीने एक वळण घेतले आणि एका अरुंद रस्त्यावरून गाडी हाडी गावातल्या जेट्टीजवळ पोहोचली. गाडी व्यवस्थित पार्क केली. तीन दिवसांनी भेटू असे गाडीला म्हणाले. जेट्टीवर येऊन बघते तर समोर गड नदीचे निळेशार खाडीपात्र आणि त्याच्या मधोमध नारळाच्या झाडांनी हिरवीगार किनार रेखलेले बेट दिसत होत. तीन दिवस इतक्या अद्भुत ठिकाणी असणार आहोत आपण.. या विचाराने उत्सुकतेची एक मोठी लाट मनाला शिवून गेली. होमस्टेचे मालक त्यांची बोट घेऊन जेट्टीवर न्यायला आले होते. माझी आणि नवऱ्याची बॅग बोटीमध्ये ठेवली. आम्हीही व्यवस्थित बसलो आणि जुव्याकडे जायला निघालो. बोटीतून जाताना खाडीचे, बेटाचे रमणीय दृश्य दिसत होते. कुणी जाळे टाकून मासेमारी करत होते, गावकऱ्यांची बोटीतून ये जा सुरू होती, झुकलेले माड खाडीत स्वतःचे रूप पाहत होते, बगळे एकाग्र होऊन मासे टिपत होते. पाहता पाहता १० मिनिटांत आमच्या होमस्टेजवळ बोट येऊन लागली. होमस्टे खाडीला अगदी लागून, त्यामुळे बोटीतून उतरून चार पायऱ्या चढल्या की, होमस्टेवर प्रवेशच. होमस्टे साधा होता. घराच्या बाजूच्या परसात दोन खोल्या केल्या होत्या आणि मागे खाडी बघत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जागा केली होती. संध्याकाळ चहा घेत सूर्यास्त बघत इथेच घालवली.
सकाळी अगदी पहाटे उठले. खाडीच्या काठावर थांबून सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य बघितले. नारिंगी बिंब पाण्यात पसरत होते आणि त्यावर होडी तरंगत होती. हे बेटसुद्धा गुगल मॅपवर बघितले तर होडीसारखेच दिसते.
इथे फिरताना नजर जाईल तिथे माड आणि माडच दिसतात. काही उंच सरळसोट वाढलेले, काही वेडेवाकडे वाढत आकाशाला भिडू पाहणारे, काही नुकतेच लावलेले तर काहींचे आयुष्य संपून सुतारपक्ष्यांचे घर झालेले. नाना तऱ्हेच्या या नारळाच्या झाडांनी या बेटावर सावली धरली आहे. त्यांच्या सहवासात घरे विसावली आहेत.
घरांची रचना अशी की, एक उंच जोते आणि त्यावर घर. जोत्याची उंचीही पाच फूट माणसाच्या छातीला लागेल एवढी. पावसाळ्यात येणारा पूर अशी उंच रचना असण्यामागचे कारण. उन्हाळ्यात शांत संथ वाटणारी गड नदी पावसाळ्यात रौद्र रूप धारण करते. बरेचदा बेटावर पाणी शिरते. त्यामुळे जितके उंच जोत्यावर घर बांधता येईल तितके उंच बांधले आहे. अशी ३० ते ३५ घरे बेटावर आहेत.
घरे बघत फिरताना एक सुखद धक्काच बसला. चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या या बेटावर चक्क वाडा होता. तोसुद्धा मातीचे बांधकाम असलेला, प्रशस्त आणि दुमजली!!. शेणाने सारवलेले अंगण, वाड्याच्या भव्यतेला साजेसे मोठाले तुळशीवृंदावन तिथे होते. वाड्याच्या भिंती मातीच्या आहेत. खांब, खिडक्या, तुळ्या लाकडी. वाड्याचे कौलारू छप्परही भलेमोठे. सध्या १५ जण वाड्यात राहतात. पण सणवार, कार्यक्रम असले की, १०० माणसे वाड्यात असतात. इतक्या मोठ्या कुटुंबाला सामावून घेणारा हा भव्य वाडा आहे. एकीकडे वाडा संस्कृती लोप पावत चाललेली आहे. त्यामुळे बेटावर १५० ते २०० वर्षे जुना राहता वाडा बघायला मिळेल याची मी कल्पनाच केली नव्हती.
बेटावर जशी माडाची मोठी मोठी झाडे आहेत, जुनी घरे आहेत त्यापेक्षाही जुनी आणि भलीमोठी वडाची, पिंपळाची झाडे तिथे दिसली. शेकडो वर्षे जुनी असावीत. याच एका वडाच्या झाडाखाली वाडोळेश्वर देवाचे कौलारू देऊळ आहे. गावकरी सांगतात की, “जेव्हा पूर येतो, पाणी वाढत जाते, घरे पाण्यात जातील असे वाटते तेव्हा आम्ही अंतःकरणाने वाडोळेश्वराला साद घालतो. तो आमचे ऐकतो आणि पाणी रात्रीत कमी होते. असा आमचा देव आमची काळजी घेतो.” या मंदिरावर छत्र धरलेल्या वडाच्या झाडाचा विस्तार अफाट होता. मुलं त्याच्या सावलीत खेळायची, विसावा घ्यायची; पण तौक्ते वादळ झाले तेव्हा या झाडाच्या, सावली धरलेल्या जाडजूड फांद्या उन्मळून पडल्या. पण पडताना त्या मंदिरावर पडल्या नाहीत. बाजूला कोसळल्या. मंदिराच्या कौलाला नखभरही इजा झाली नाही. अशी ही मंदिराची घटना समजली या आणि वाडोळेश्वराचीही.
वाडोळेश्वराचे मंदिर तसे बेटाच्या मध्यवर्ती आहे. पुढे गेल्यावर काही घरे आहेत. विस्तीर्ण शेतजमीन आहे; जी पार बेटाच्या टोकापर्यंत पसरली आहे. नारळसुपारीच्या बागांसोबतच भातशेतीही इथे करतात. भातशेती झाल्यावर वांगी, वरणा, चवळी, कुळीथ थंडीच्या दिवसांत लावले जायचे. गेले काही वर्ष बेटाला सुरक्षा देणारा बंधारा ढासळून खाडीचे पाणी शेतजमिनीत शिरत आहे. मातीत क्षार भरपूर झाल्यामुळे ही पिके घेण्याचे प्रमाण कमी कमी होत चाललेले दिसले. अत्यंत कष्टाने केलेली शेती हातातून जात आहे हे पाहून ग्रामस्थांचा शेती करण्याचा उत्साह कमी झाला आहे. बेटाला एक बंधारा असावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
सध्या बेटावर शेती कमी केली जात असली तरी नारळ सुपारीला आणि खाडीला धरून अनेक व्यवसाय सुरू असलेले दिसले. मी जिथे राहिले होते तिथे नारळाच्या झावळ्यापासून मुगड्याचे झाडू बनवत होते. हे झाडू हाती तयार करून मालवणला विक्रीला पाठवतात. खोबरे सुकवून त्यापासून तेल काढतात, नारळ, सुपारी विक्रीला पाठवतात. खाडीमध्ये मासेमारी चालते. पर्यटकांना बोटीतून फिरवून आणतात. असे अनेक व्यवसाय इथे ग्रामस्थ करत आहेत. पण शेतीने आपलं बेट फुलावं अशी इच्छा सर्वांच्या मनात आहे.
इथे फिरताना जाणवले की, बेट मोहक दिसत असले तरी पुराची आणि जमिनीची धूप होण्याची दुःखद किनार बेटाला आहे. अशा स्थितीत गावकरी बेट सोडून गेले असते, जमिनी विकल्या असत्या; पण गावकरी वाडोळेश्वरावर मनापासून श्रद्धा ठेवून बेटावर राहत आहेत. बेट जपण्याचा प्रयत्न करत आहेत.
इथले तीन दिवस मी अगदी नीरव शांततेत घालवले. बेटावर अगदी मनसोक्त फिरले. इथे बंधारा व्हावा. गावाला सुरक्षा लाभावी. ग्रामस्थ विवंचनेतून मुक्त व्हावेत आणि बेट पुन्हा समृद्ध व्हावे अशी प्रार्थना देवाकडे केली.
जवळचे एअरपोर्ट - चिपी विमानतळ
जवळचे रेल्वे स्टेशन - कुडाळ रेल्वे स्टेशन (तिथून रिक्षा किंवा बसने पोहोचायला तासभर लागेल)
रस्त्याने - मालवण आचरा मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना एक वळण हाडी या गावाकडे जाते.
मुंबईवरून- मुंबई गोवा महामार्ग.
पुण्यावरून- मुळशी ताम्हिणी मार्गे उतरून किंवा पुणे बंगलोर हायवे प्रवास करून अनुस्कुरा मार्गे येता येते.
जवळचे मुख्य शहर - मालवण ( १० ते १३ किमी)
भेट देण्यासाठी योग्य महिना - नोव्हेंबर ते मे (नोव्हेंबर ते जानेवारी थंडीचे धुक्याचे दिवस अनुभवता येतील) (फेब्रुवारी ते मे मध्येही बेटावर बऱ्यापैकी थंडावा असतो)
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com