परीक्षण
अनुराधा नेरुरकर
माझ्यातल्या सागराने, लाटेच्या उर्मीन, किनारा भेटण्याच्या उमेदीने आणलंय मला तुझ्यापर्यंत... असं समुद्राला सांगणारी, त्याच्या दृश्य, अदृश्य रूपांचा वेध घेणारी, त्याच्या अथांग खोलीचा थांग शोधत त्याच्या अनेक विभ्रमांकडे आकृष्ट होत शब्दांत व्यक्त होणारी ही कविता हाती आली आणि वाचताना जॅक्स यवेस कुस्तो (Jacques yves Cousteac) या समुद्रशास्त्रज्ञाचे शब्द मला आठवले 'The sea once it casts it's spell, holds one in it's net of wonders for ever' समुद्राने एकदा आपल्यावर संमोहन केलं तर तो त्याच्या विस्मयजन्य जाळ्यात आपल्याला कायम गुंतवू शकतो. हे सत्य समुद्राशी भावनिक आणि अध्यात्मिक नातं जोडणाऱ्या सगळ्यांनाच लागू आहे. अंजली चितळे या स्वप्नाळू स्वभावाच्या, चिंतनशील वृत्तीच्या आणि बुद्धीची ठाम वैज्ञानिक बैठक असणाऱ्या संवेदनशील कवयित्रीला समुद्राने घातलेली साद आणि तिने त्याच्याशी साधलेला एकतर्फी संवाद म्हणजेच हा 'मोहसमुद्र'.
पृथ्वीचा साधारण एकाहत्तर टक्के भाग व्यापून असलेला समुद्र, त्यावर अफाट पसरलेलं आभाळ आणि पाण्यातल्या तसंच आकाशातल्या जहाजांना लागू होणारं सागरी अंतर मोजण्याचं परिमाण म्हणजे 'नॉटिकल माईल्स' (Nautical miles). कवयित्रीची जीवशास्त्राची जाण, तिचं निरीक्षण आणि तिचा अभ्यास तिला ह्या परिमाणाची भुरळ घालत असावा. समुद्र, समुद्रपक्षी, किनारा, लाटा, त्यांचं गान, त्यांचं उधाण ह्या साऱ्यांचं एक अनोखं आकर्षण कवयित्रीच्या रोमारोमात भिनलेलं आपल्याला आढळून येतं, सुरुवातीच्या काही कवितांमधून नॉटिकल माईल्स'च्या अनुषंगाने पक्ष्यांचा, त्यांच्या जीवन पद्धतीचा, त्यांच्या स्थलांतराचा आणि त्यांच्या मनमौजी जगण्याच्या वृत्तीचा उल्लेख येतो. इतर कवितांमधून तिचा समुद्राशी घडत असलेला संवाद, त्यातील आरोह-अवरोह, त्याचा वक्तशीरपणा, त्याचं फेसाळणं, त्याचं लहरणं आणि त्याचं उचंबळणं वेगवेगळ्या संदर्भामधन कधी व्यक्तिगत स्वरूपात तर कधी निसर्गाच्या रूपकातून उलगडत जातं.
'माझ्या हृदयात उतरू नकोस, तू बुडशील अश्रूचा समुद्र शिगोशिग आहे आत, तू तरशील ?'
समुद्रालाच बुडण्याची ताकीद देणारी आणि आपल्या अश्रुंचा दाखला देत त्यालाच प्रश्न विचारणारी ही कवयित्री समुद्राशी संवाद करता-करता स्वतःशीच संवाद करते. त्याच्या अनेक रुपांमधून आपल्याच मनाचा धांडोळा घेते. ह्या कवितांमधील 'नॉटिकल माईल्स' हे जहाजांसाठी समुद्री अंतर मोजण्याचं परिमाण, जे पक्ष्यांनी समुद्रावरून पार केलेल्या अंतरासाठीही जोडलं जातं. याबाबतीत असलेलं कवयित्रीचं निरीक्षण आणि अभ्यास कवितांमधून शब्दबद्ध करताना ते मानवी अंतराला मोजण्याचं प्रमाण देखील आहे हे सुद्धा ती सांगू पाहते तर कधी 'माहीत नाही किती प्रकाशवर्षे दूर आहे माझ्या प्रवासाचे गंतव्य स्थान...' म्हणताना अंतराची संज्ञा प्रकाशवर्षांपर्यंत पोहोचवताना दिसते. 'नॉटिकल माईल्सची अंतरे' आणि 'नॉटिकल माईल्सचा प्रवास आणि पक्षी' सारख्या कविता ह्या पक्ष्यांविषयी बोलतात.
'तसं एक अंगीभूत होकायंत्र असतंच की पक्ष्यांच्या शरीरात नॉटिकल माईल्सची अंतरं लांघायला आणि समुद्रावरील आभाळातून झेप घ्यायला' 'समुद्र आणि मी', 'किती ह्या लाटा' अशा कवितांमधून कवयित्री समुद्राच्या लाटांबरोबर आपल्या मनातील विचारांच्या लाटांना तोलताना दिसते. स्त्रीची समर्पित वृत्ती आणि पुरुषसत्ताक समाजातील तिचं स्थान नदी आणि समुद्राच्या माध्यमातून व्यक्त करताना ती म्हणते,
इतका कसा संपृक्त खारटपणा तुझा ? एका गोड नदीला पाहिलंय मी स्फुंदून स्फुंदून रडताना आणि तरीही तुझ्यात सामावून जाताना
समुद्राचे सर्व चढ-उतार साक्षित्वाने पाहणारा, त्याची अनंत रूपं न्याहाळणारा, त्याचं स्पर्शसुख अनुभवणारा, त्याचं तांडव झेलणारा आणि शांत गाजेमधून आपलं निवांतपण जपणारा स्थितप्रज्ञ काठ. 'समुद्र आणि काठ' ह्या कवितेतून हा काठ माणसाने कसं असावं याचा वस्तुपाठ देऊन जातो. कवयित्रीला भुरळ घालणारं समुद्राचं उधाण, तिला विचारांच्या आवर्तात गुंतवणार त्याचं थांग लागू न देणारं अथांग रूप आणि त्याची वनराजासारखी, आयाळ फलकारत केलेली गर्जना हे त्याचे सगळे विभ्रम कवयित्रीच्या मनाला मोहवताना दिसतात. हा मोहसमुद्राचा फेरा तिला कायम वेढून राहिलेला आहे.
'तुकडा तुकडा समुद्र' हे कवयित्रीचे समुद्राशी संवाद साधणारे तुकडे एक वेगळीच तरल अनुभूती देऊन जातात. जगण्याचा मंत्र देऊन जातात.
समुद्राने शिकवलाय जगण्याचा मंत्र तळातून खोल ओसंडून जायचं आणि... आपल्याच धंदीत मस्त उसळायचं
निसर्गाचा अथांग कॅनव्हास आणि माणसाने आपल्या थिटेपणाने, स्वार्थाने आणि पर्यावरण ऱ्हासाने विस्कटलेलं त्यावरचं चित्र कवयित्रीला अस्वस्थ करतं. त्यांवेळी लाटांचीही बदलणारी नीती तिला कुठेतरी योग्य वाटू लागते कारण तिची अंतस्थ भावना पर्यावरणाविषयी असलेल्या सजगतेची आणि निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेची आहे. नद्यांच्या समुद्रातील समर्पणातून, समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यातून नको असलेले सहज बाहेर फेकून देण्याच्या वृत्तीच्या समर्थनातून ती एक आदर्श असं समुद्रतत्त्व आपल्यापुढे सादर करताना दिसते. सुबक छपाई, सुयोग्य मांडणी आणि उत्तम निर्मिती असलेला 'सृजनसंवाद प्रकाशन'ने प्रकाशित केलेला आवर्जून वाचावा असा हा कवितासंग्रह होय. ज्याचे मुखपृष्ठ कवयित्री अंजली चितळे यांनीच साकारले असून अश्विनी खटावकर यांनी रेखाचित्रांतून समुद्राची विविध रूपं सुंदररित्या टिपली आहेत.
नॉटिकल माईल्सचा एक मोहसमुद्र
अंजली चितळे
सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठे : ८०
मूल्य ₹२५०