रानफुलांच्या गावा जावे... 
अक्षररंग

रानफुलांच्या गावा जावे...

पावसाळा संपत येताना सह्याद्रीचे डोंगर हिरव्या रंगाने नटतात आणि त्यावर रंगीबेरंगी रानफुलांची जादुई दुनिया फुलते. कुठे पिवळी, कुठे गुलाबी, कुठे निळी, तर कुठे जांभळी फुले डोंगरांना सुंदर बनवतात. या रानफुलांमध्ये काही फुले अगदी छोट्या पक्ष्यांसारखी, काही कंदिलासारखी, तर काही कीटकांना पकडणारीही असतात!

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

पावसाळा संपत येताना सह्याद्रीचे डोंगर हिरव्या रंगाने नटतात आणि त्यावर रंगीबेरंगी रानफुलांची जादुई दुनिया फुलते. कुठे पिवळी, कुठे गुलाबी, कुठे निळी, तर कुठे जांभळी फुले डोंगरांना सुंदर बनवतात. या रानफुलांमध्ये काही फुले अगदी छोट्या पक्ष्यांसारखी, काही कंदिलासारखी, तर काही कीटकांना पकडणारीही असतात! चला तर मग, सह्याद्रीच्या कुशीत उमललेल्या या अद्भुत रानफुलांची ओळख करून घेऊया आणि निसर्गाचे हे रंगीबेरंगी गुपित जाणून घेऊया!

केवळ माझा सह्यकडा’ म्हणून कवी वसंत बापटांनी गौरवलेला आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक जडणघडणीचा कणा असलेला आपला राकट, रांगडा सह्याद्री सर्वात सुंदर दिसतो ते श्रावण-भाद्रपदातल्या सरत्या पावसात. इतिहासाची मानचिन्हे बनलेले इथले गिरी दुर्ग असोत, डोंगर माथ्यावरची मोकळी पठारे असोत किंवा आकाशाकडे झेपावलेल्या गिरी शिखरांचे डोंगर उतार या सगळ्यावर वर्षा राणीने जणू हिरवागार शेला अंथरलेला असतो आणि या शेल्यावर बुट्टी असते ती नाजूक, रंगीबेरंगी रानफुलांची. कुठे गुलाबी तर कुठे निळ्या, कुठे पिवळ्या तर कुठे जांभळ्या रानफुलांनी आरास सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पाहायला मिळते. त्यामुळे सरत्या पावसातली गिरी भ्रमंती नेहमीच नेत्रसुखद आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. नेहमी अगदी धीरगंभीर आणि करारी मुद्रा धारण करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मनासारखी गोष्ट घडल्याचा आनंद अगदी उठून दिसावा आणि त्याची धीरगंभीर मुद्रा एकदम हसरी खेळकर व्हावी तसे परिवर्तन या काळात सह्याद्रीचे होऊन जाते. जमिनीलगत पसरलेल्या गवतापासून ते शेजारच्या बळकट झाडाचा आधार घेत वाढणाऱ्या वेलीपर्यंत तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पतींवर ही रानफुले पाहायला मिळतात. तसं तर अगदी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हातही तग धरून राहिलेल्या झुडपांना फुले येतात, पण पावसाळ्यात सगळीकडे हिरवाई असल्याने, त्यावरच्या फुलांचे अस्तित्व लगेच कळते. त्यातही आषाढाच्या धारा धुव्वांधार कोसळून गेल्यानंतर जेव्हा ऊन-पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू होतो तेव्हा रानफुलांचा खरा मौसम सुरू होतो असं म्हणता येईल.

रानफुलांच्या राज्यात प्रवेश करण्यापूर्वी थोडंसं फुलांविषयी. अंदाजे पंधरा ते सोळा कोटी वर्षांपूर्वी उत्क्रांतीच्या चक्रात जमिनीवरच्या वनस्पती सपुष्प झाल्या. यामागचे मुख्य कारण होते पुनरुत्पादनाच्या सुरक्षित व खात्रीशीर मार्गाची आवश्यकता. फुले ही आपल्यासाठी सुगंधी, सुंदर वगैरे असली तरी वनस्पतींसाठी ती पुनरुत्पादनाचं कार्य करतात आणि ते त्यांना चोखपणे करता यावं म्हणून त्यांना वेगवेगळे रंग, आकार आणि गंध लाभलेला असतो. पावसाळ्यात रानवाटांवर, कडेकपारींवर आणि पठारांवर उमलणारी रानफुले ही मौसमी असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला जून आणि जुलैमध्ये सर्वसाधारणपणे नागाच्या फण्याची आठवण करून देणारा पांढरा साप कांदा, कानातल्या झुमक्यांसारखी दिसणारी कर्णफुलं आणि हिरव्या रंगाचा सापकांदा फुललेला दिसतो. या काळातील सर्वात वेधक फुल म्हणजे ‘वायतुरा’. उथळ पाण्याच्या डबक्यात गवताच्या पात्यासारख्या पानांची ही वनस्पती, तिला येणाऱ्या मोहक रंगाच्या आणि नावानुसार इंग्रजी वाय आकाराच्या फुलांनी नजरेत भरते. साताऱ्या अवतीभवतीच प्रामुख्याने आढळत असल्याने या झाडाच्या शास्त्रीय नावातच सातारेन्सिस असा उल्लेख समाविष्ट करण्यात आला आहे.

या मौसमात सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतात ती कवळ्याची लाल टिका लावलेली पिवळी फुले. झुंडीने फुलणाऱ्या कवळ्यामुळे सगळा डोंगरउतारच पिवळा पिवळा होऊन जातो. या फुलांच्या आकारामुळे त्यांना डोनाल्ड डक फ्लॉवर असे टोपणनावही मिळाले आहे. या कवळ्याच्या म्हणजे स्मिथिया जिनसमधली आणखी काही प्रकार जसे स्मिथिया सेन्सिटिवा (लाजाळू कवळा), स्मिथिया सेतुलोसा (मोठा कवळा) देखील पाहायला मिळतात. या पिवळ्या कवळ्याची गुलाबी आवृत्ती म्हणजे स्मिथिया पुरपुरीया अर्थात बरका, या गुलाबी रंगाच्या फुलावर लाल रंगाच्या ऐवजी पांढऱ्या रंगाचा टिका असतो आणि हे ऑक्टोबरमध्ये फुलते. पिवळ्या रंगाची आणखी काही रानफुले म्हणजे सोनकी, सोनतारा, पिवळी अबई, पान लवंग. पिवळ्याप्रमाणेच गुलाबी-लाल रंगांच्या रानफुलांची संख्याही भरपूर आहे. गुलाबी तेरड्यापासून ते गुलाबी बाभळीपर्यंत, इतक्या छटा कुठल्या ब्रँडेड रंगातही मिळणार नाहीत. त्यात तेरड्यातही पुन्हा जांभळा तेरडा, पिवळा तेरडा असे प्रकार आहेतच. जरतारी, बोरपुडी, सुपली, फुलझडी या गडद रंगाच्या फुलांप्रमाणेच नावाप्रमाणेच फिक्या अबोली रंगाचे चिमुकले अबोलिमादेखील लक्ष वेधल्याशिवाय राहात नाही.

या रानफुलांमधील एक अनोखा प्रकार म्हणजे टेरिस्ट्रियल ऑर्किड्स. सर्वसाधारणतः ऑर्किड्स नेहमी झाडावर वाढतात, पण हबेनारिया जीनसमधील ऑर्किड्स मात्र जमिनीवर उगवतात आणि बहरतात. पांढराशुभ्र रंग आणि नजाकतदार पाकळ्या ही यांची ओळख म्हणता येईल. बाहुली हबे आमरी, आषाढ हबे आमरी, उग्र हबे आमरी, पांचगणी हबे आमरी, चिरे हबे आमरी असे अनेक प्रकार गवतावर झुलताना पाहायला मिळतात. रानफुलांच्या जगातील आणखी एक अनोखा प्रकार म्हणजे ‘कंदील पुष्प’. ॲपोसिनेशिया कुळातील सेरोपेजिया जीनसचे जे अनेक प्रकार पाहायला मिळतात, त्यांच्या फुलांच्या आकारावरून कंदील पुष्प असे समर्पक नाव मिळाले आहे. सगळ्याच वनस्पती परागीभवनासाठी कीटकांचा उपयोग करतात पण सेरोपिजिया चक्क कीटकांना ओलिस धरून, सक्तीने हे काम करायला लावते आणि मगच त्या कीटकाला सोडते. सेरोपेजियाच्या फुलांची रचनाच तशी असते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या फुलांना खरचुडी म्हटले जाते. सेरोपेजिया जैनी, व्हिन्साफोलिया, हिरसुटा, ऑक्युलेटा, सह्याद्रिका असे कंदील पुष्पाचे प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळतात.

रानफुलांमध्ये आभाळी, नभाळी, चिरे पापणी, पंद अशी नाजूक फुलं पाहायला मिळतात त्याचप्रमाणे चक्क कीटकांचा फराळ करणारी दवबिंदू म्हणजे ड्रोसेरासारखी कीटकभक्षी वनस्पतीही पाहायला मिळतात. या दवबिंदूच्या देठावरचे दवबिंदूंसारखे दिसणारे चिकट थेंबच कीटकांचा घात करणारे असतात, फुलांकडे आकर्षित झालेले कीटक त्यात फसतात आणि मग ही वनस्पती त्या कीटकाची शिकार करते. रानफुलांची ही अनोखी दुनिया बघायला कुठे जावं? साताऱ्याजवळचं कासचं पठार तर सर्वांना माहीत आहेच, मात्र अति पर्यटनामुळे या पठारावरील फुलांचा खजिना जरा धोक्यातच आलाय. २०१२ मध्ये युनेस्कोच्या नैसर्गिक विश्व वारसा स्थानांच्या यादीत कास पठाराची नोंद झाली आहे. त्यामुळे या साधारणपणे १००० हेक्टरच्या परिसराला विशेष संरक्षण मिळालं आहे. वनखात्यानेही कासच्या पुष्प खजिन्याचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सावधगिरीचे उपाय योजले आहेत आणि त्याचबरोबर पर्यटकांना या स्थळाचा आनंद घेता येईल अशा सुविधाही निर्माण केल्या आहेत.

कासप्रमाणेच साताऱ्याजवळचे, ठोसेघरच्या पुढे असलेले चाळकेवाडीचे पठारदेखील याबाबतीत समृद्ध आहे. तसेच भीमाशंकरचा परिसर, खंडाळा-लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर आणि पाचगणीतील पठारे, आंबोली या ठिकाणी रानफुलांच्या विविध जाती पाहायला मिळतात. तसेच शिवनेरी, सिंहगड, राजगड, पुरंदर या किल्ल्यांवरही रानफुलांचा गालीचा अंथरला जातो. जिथे लॅटराइट म्हणजे जांभ्या दगडाचे सडे आहेत, उंचावर मोकळी पठारे आहेत तिथे रानफुलांचे गाव वसलेलं पाहायला मिळतं. मात्र या रानफुलांच्या गावाला जाताना थोडी खबरदारी अवश्य घ्यावी. अशा परिसरात प्लास्टिक, कागद, अन्न पदार्थ असा मानवी कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. पायाखाली रानफुले आणि वनस्पती तुडवल्या जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तसेच या वनस्पती तुमच्या बागेत वा कुंडीत जगणार नाहीत. त्यामुळे तोडून आणू नयेत. रानफुलांचे सौंदर्य जवळून न्याहाळायला सोबत मोठे भिंग अवश्य ठेवावे. मग चला, 'जाईन विचारत रानफुला...' म्हणून सह्याद्रीच्या डोंगरवाटांवरून भटकंती करायला.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू