जगतवारी
मेधा आलकरी
एका बाजूला मिठाच्या खाणीतील काळोख, तर दुसरीकडे बर्फाच्या गुहेतील गारठा! मनात भीती, डोळ्यांसमोर निसर्गाचे चमत्कार आणि सोबतीला खळखळून हसवणारा गमतीदार गाईड... साल्झबर्गच्या या सफरीत निसर्गाने जणू साहस, विनोद आणि थरार यांची भन्नाट मेजवानीच दिली.
साल्झबर्गला गेलो की तेथील सॉल्ट माईन आणि बर्फाची गुहा पाहायचीच असं घरी केलेल्या इंटरनेटच्या अभ्यासाअंती पक्कं ठरवलं होतं. माझ्या मनात थोडीशी धाकधूक होती. अंधारी गुहा हे माझ्यासाठी एक दुःस्वप्न आहे. त्यातून ही बर्फाची थंडगार गुहा. तरी उसनं अवसान आणायचं आणि हा चमत्कार बघून यायचाच असं मनाला बजावलं होतं. हवामानाच्या बाबतीत प्रवासदेवतेची आमच्यावर अगदी ‘छप्पर फाडके’ कृपा होती. पंधरा दिवस आधी आजूबाजूच्या प्रदेशात पुरानं थैमान घातलं होतं. सोसाट्याच्या वाऱ्यापावसाची आशंका स्थानिक मंडळींना वाटत होतीच. पण आमचं नशीब बलवत्तर! रविराज अगदी कोणताही आडपडदा न ठेवता आमच्यावर आपल्या किरणांचा वर्षाव करत होते. आमची हॉटेल मालकीण ‘सीसी’ (सीसी हे तिथल्या अप्सरेसारख्या सुरेख राणीचं नाव; त्यामुळे आपल्या राधेसारख्या बऱ्याच सीसी आपल्याला इथे भेटतात) म्हणाली देखील, “एवढा स्वच्छ सूर्यप्रकाश पडलाय आणि तुम्ही त्यापासून वंचित राहणार? खाणीत आणि गुहेत घालवणार हा दिवस?” आम्ही म्हटलं, “बाई गं, त्या ‘व्हिटॅमिन डी’चं कौतुक तुला. आमच्या देशात आम्ही त्याचं आकंठ पान करत असतो. आम्हाला निसार्गानं धरणीमातेच्या उदरात दडवलेली नवल दुनिया पाहायची आहे.”
नऊ जणांच्या मेटॅडोरमधला आमचा ड्राइव्हर कम टूर गाईड फारच गमत्या होता. त्यानं जिभेला आणि गाडीला एकत्रच वेग दिला. सुरुवातीला आपली ओळख करून देताना म्हणाला, “आय ॲम अ साल्झबर्गर, नॉट हॅमबर्गर, नॉट चिकनबर्गर बट साल्झबर्गर!” पुढे हायवेला लागायच्या आधी म्हणाला, “थोड्याच वेळात उजव्या हाताला तुम्हाला अमेरिकन दूतावास दिसेल.” आमच्या माना उजवीकडे वळल्या. पाहतो तर मॅक डोनाल्डचा मोठा ‘एम’ दिसला. आम्ही सगळ्यांनी त्याच्या खेळकरपणाला दिलखुलास दाद दिली. आता हायवे सोडून आम्ही एका छोट्या रस्त्याला लागलो. हिरवी कुरणं आणि छान टुमदार खेडी लागली. थोडं अंतर पार केल्यावर म्हणतो कसा, “आता डावीकडे पाहा, सुंदर बव्हेरियन कन्यका सूर्यस्नान करताहेत.” सगळ्यांच्या माना गर्रकन डावीकडे वळल्या. तिथे धष्टपुष्ट जर्सी गाई रवंथ करत गवतावर बसल्या होत्या. अशा या गमत्या ड्रायव्हरची कॉमेंट्री ऐकत आणि बाहेरचा देखावा पाहत आम्ही सॉल्ट माईनला कधी येऊन पोहोचलो कळलंच नाही.
या मिठाच्या खाणीत शिरण्यापूर्वी तुम्हाला खास ‘फील’ यावा म्हणून खाणकामगारांचा पोशाख देतात. जॅकेट, पॅन्ट आणि कातड्याचा बेल्ट चढवून सज्ज झालेले आम्ही ट्रॉलीत बसणार, इतक्यात आमचा गमत्या गाईड एक डोळा मिचकावत शुभेच्छा देत मिश्किलपणे म्हणाला, “सुखरूप परतलात; तर पुन्हा भेटू.” ट्रॉलीमध्ये समोरच्याच्या खांद्याला धरून एकापाठोपाठ एक घोडा घोडा करून बसायचं असतं. रुळावरून ट्रॉली बोगद्यात आत आत जात राहिली. एका सखोल ऐसपैस जागी आम्हाला उतरवण्यात आलं. एखादा ढिला दगड कोसळून आपला कपाळमोक्ष होईल किंवा वीज बंद पडून अंधार गुडुप्प होईल, आपल्याला बाहेर जायचा रस्ता मिळणार नाही आणि त्या काळकोठडीत आपण गुदमरायला लागू अशी जी भीती मला खाणीत जायच्या कल्पनेने अस्वस्थ करत होती ती कुठे गायब झाली कुणास ठाऊक. इथून एका नव्या गाईडनं सूत्र हातात घेतली. तोही तितकाच गमत्या. खाणीतील वेगवेगळ्या क्षारांमुळे रंगीबेरंगी दिसणाऱ्या खडकांना हा चॉकलेट म्हणे. मजल दरमजल करत, मिठाचे खडे, अवजारं, मशीन, त्यांचा उपयोग समजून घेत घेत आम्ही पुढे पुढे जात होतो. आणखी एका ऐसपैस ठिकाणी पोहोचलो. तिथून खाली जाण्यासाठी एक लांबलचक चिंचोळी लाकडी घसरगुंडी होती. गुडघे न वाकवता, टाचा जमिनीला न टेकवता, लाकडी घसरगुंडीच्या टोकाशी बसायचं आणि त्याच अवस्थेत घसरत खाली येत खोल दरीत पोहोचायचं. पाय टेकले तर वेग मंदावतो आणि घर्षणामुळे इजा होण्याची शक्यता असते. अशी कुठलीही चूक न करता आम्ही घसरत क्षणात खाली पोहोचलो. झू झट्याक!
या लवण खाणीच्या शेवटी एक खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. यातील मिठाचं प्रमाण २७ टक्के आहे. समुद्रातही हे प्रमाण फक्त तीन-चार टक्के असतं. मी बोट बुडवून चाखून पाहिलं. अगदी खारट्ट! ही खाण आता मिठाच्या उत्पादनासाठी वापरात नसून फक्त पर्यटकांसाठी खुली आहे. पूर्वी इथेच तयार होणारं ढेरसारं मीठ निर्यात करून आर्च बिशप गबर झाले होते. म्हणूनच त्याला ‘पांढरं सोनं’ हा किताब मिळाला होता. एका तराफ्यावर बसून आम्ही हा तलाव पार केला आणि लिफ्टने पृष्ठभागावर आलो. तसा शैक्षणिक असलेला हा टूर, ट्रॉलीची झुकझुकगाडी, खाणकामगाराचा पोशाख, घसरगुंडी आणि तराफ्यावरील जलविहार यामुळे खूपच मनोरंजक होतो. तिथे मीठ बनवण्याच्या प्रक्रियेवर एक फिल्मही दाखवली. उरल्यासुरल्या शंकांचं निरसन ती फिल्म पाहून झालं. परतीची ट्रॉली सुरू करण्यापूर्वी गाईडनं कपाटातून आपली हॅट काढली. त्यात मिठाच्या छोट्या छोट्या डब्या होत्या. खाणीला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ त्यातील एक डबी प्रत्येकाने उचलावी हे सांगताना तो म्हणतो कसा, “वेल लेडीज अँड जेंटलमन, व्हॉट यू टेक आऊट इज फॉर यू अँड व्हॉट गोज इन्साईड इज फॉर मी.” हास्याच्या लाटेत हॅटमध्ये नाणी खणकायला लागली.
वेरफेन बर्फाची गुहा साल्झबर्गपासून चाळीस किलोमीटरवर आहे. पार्किंगपासून केबल कारच्या स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी एक बऱ्यापैकी उंच चढ चढावा लागला. बर्फाच्या गुहेत जायचं म्हणून अंगावर चढवलेलं जॅकेटचं ओझं नको वाटत होतं. रंध्रारंध्रातून घाम गळत होता. केबलकारच्या नयनरम्य प्रवासानं मात्र तो शीण घालवला. तीन मिनिटांत ती आपल्याला ५०० मीटर उंचावर घेऊन जाते. वर वर जात होतो तसं डोंगराचं बदलतं रंगरूप पाहायला मिळत होतं. केबलकारमधून उतरल्यावर पुन्हा पंधरावीस मिनिटांची तंगडतोड केली, तेव्हा कुठे गुहेच्या तोंडाशी येऊन पोहोचलो. बाहेर रणरणतं ऊन आणि आत गेल्यावर वाटलं, जणू भल्या मोठ्या फ्रीजमध्ये शिरलोय! सगळीकडे बारमाही बर्फाचं राज्य!
गुहेचं दार उघडल्यावर थंड हवेचा असा काही झोत येतो, की मानेला एक जबरदस्त झटका बसून टोपी काय डोकंच सर्रकन उडून मागे पडतं की काय असं वाटतं. प्रत्येकाच्या हातात एक कार्बाइडचा दिवा देतात. त्या ज्योतीवर झाकण नाहीच, उघडा! आता मनात वेगळीच चिंता. हॉरर सिनेमातील दृश्याप्रमाणे नेमक्या वेळी ज्योत विझली तर? गुडुप्प अंधार होईल आणि वर गारठा. ‘बापरे!’चा आवंढा गिळला आणि आत शिरले. माझ्या कल्पनेतली गुहा सरळसोट, अरुंद, अंधारी. या गुहेत तर चक्क पायऱ्या चढाव्या लागल्या. थोड्याथिडक्या नव्हे; तब्बल सातशे! त्याही लाकडी ओलसर आणि रेलिंग मात्र लोखंडाचं, थंडगार! एका हातात दिवा घेऊन हा उभा उंच चढ चढायचा म्हणजे कवायतच होती.
परंतु हा रोमांचकारी आणि आगळावेगळा अनुभव होता. जणू बर्फाच्या राजवाड्यात आलो होतो. सगळ्या आकृत्या नैसर्गिक आणि स्फटिकासारख्या पारदर्शक. वर्षानुवर्षं जमलेला हा बर्फ कधी आर्क्टिकमधल्या पोलर बेअरचा आकार घेतो; तर कधी आपल्या राजस्थानमधील गजराजाचा. एक शिडी तर बर्फाच्या मोठ्या चेंडूतूनच गेली होती. शिडी चढण्यापूर्वी सर्कशीतील मृत्युगोलासमान भासणारा तो चेंडू चढून गेल्यावर पृथ्वीगोलासारखा वाटला. आपल्या हातात ज्योत असली तरी गाईडच्या हातात मात्र मॅग्नेशियमची तार असते. एक टोक हातात धरून दुसरं पेटवलं की त्याचा स्वच्छ आणि प्रखर प्रकाश पडतो. त्या प्रकाशात बर्फाच्या पारदर्शक आकृत्या कधी हलक्या निळसर; तर कधी समुद्री हिरवट दिसतात. अशा एखाद्या आकृतीच्या मागे किंवा गर्भात शिरून तो गाईड तार पेटवून प्रकाश पाडायचा तेव्हा क्षणार्धात ती आकृती उजळून निघायची. ‘वाssssऊव!’ म्हणताना होणारा तोंडाचा चंबू, वासलेला आ आणि विस्फारलेले डोळे मूळपदावर यायला वेळच लागायचा.
एकंदर बेचाळीस किलोमीटर लांब असलेली ही जगातील सर्वात मोठी आईस केव्ह मानली जाते. पर्यटकांना मात्र फक्त एक किलोमीटर आत नेऊन आणण्याची व्यवस्था आहे. केवळ एका छिन्नी-हातोड्याच्या मदतीनं गिरीगर्भातील हा अनमोल ठेवा शोधून काढणारी धन्य ती माणसं! त्यांच्या धाडसाला आणि चिकाटीला एक कडक सलाम! गुहेबाहेर आलो ते अतिशय प्रसन्न मनाने.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com