दृष्टिक्षेप
प्रकाश पवार
शिवराज्याभिषेकाचं त्रिशतकोत्तर हे पहिलंच वर्ष. रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात अलीकडेच ‘ध्रुवभ्रमयंत्र’ (ॲस्टोलेब) हे यंत्र सापडलं आहे. या उत्खननामध्ये शिवकाळातील विज्ञानाचे वेगवेगळे पुरावे सापडत आहेत. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांची विज्ञानदृष्टी समजून घ्यायला हवी. शिवरायांच्या या विज्ञानदृष्टीत कायद्याला आणि लोकेच्छेला अनन्यसाधारण महत्त्व होतं.
त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शिवराज्याभिषेक दिन गेल्या वर्षी झाला. म्हणजेच त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शिवराज्याभिषेक दिनानंतरचं हे पहिलेच वर्ष (३५१ वा) आहे. सध्या रायगड किल्ल्याचे उत्खनन सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण या संस्था हे उत्खननाचं कार्य करत आहे. या उत्खननांमध्ये विज्ञानाशी संबंधित वेगवेगळे पुरावे मिळत आहेत. अलीकडेच ‘यंत्रराज’ किंवा ‘ध्रुवभ्रमयंत्र’ (ॲस्टोलेब) हे ग्रहताऱ्यांची दिशा दाखवणारं यंत्र रायगडच्या उत्खननात सापडले आहे. ही विशेष दखलपात्र घटना आहे. यानिमित्ताने शिवरायांच्या विज्ञान दृष्टीची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. शिवरायांची विज्ञान दृष्टी समजून घेण्याची जिज्ञासा लोकांमध्ये जागृत झाली आहे.
रायगडाशी विज्ञानाचा संबंध कसा येतो? हा मुद्दा शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने समजून घेणे चित्तवेधक ठरते. विशेषतः ३५१ वर्ष पाठीमागे जाऊन ६ जून १६७४ या दिवशीची लिखित स्वरूपातील वर्णनं पुन्हा पुन्हा नीट समजून घेतली तर त्या वर्णनात विज्ञानविषयक काही बाबी दिसू लागतात. त्यादिवशी रायगडावरती विज्ञानाच्या संदर्भातील काही घडामोडी घडत होत्या. त्या घडामोडींमध्ये विज्ञानाची तत्त्वे स्पष्टपणे दिसतात. त्यांचे स्वरूप कथांसारखे होते. परंतु त्या सुट्ट्या सुट्ट्या घटना विज्ञानाची एक एक कथा सांगतात.
विज्ञानाच्या कथा
शिवराज्याभिषेक प्रसंगाच्या वेळी अनेक घटना घडल्या होत्या. उदाहरणार्थ- बांधकाम, भाषा, पाणी, लेखन, व्यक्ती, समाज, छापखाना, तलवारी, घोडे, हत्ती, बाजारपेठ इत्यादी. या कथांमध्ये विज्ञानाचा अर्थ दडलेला दिसतो. त्यात विज्ञानविषयक ज्ञान, विज्ञानाचे वातावरण व विज्ञानाची दृष्टी स्पष्टपणे दिसते.
राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावरील बाजारपेठेचे, राजवाड्याचे आणि रायगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारती सर्वांना दिसत होत्या. या विज्ञानाच्या पाऊलखुणा होत्या. बांधकाम करण्यासाठी कुशल इंजिनिअरची गरज असते. कुशल इंजिनिअर कलाकारांच्या व कामगारांच्या हातातील कौशल्य बाहेर काढत असतो. रायगडावरती शिवराज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या सर्वांना इंजिनिअरचे कौशल्य आणि इंजिनिअरने अनेक कामगारांकडून घडवलेल्या रायगडवरील बांधकामाचे दर्शन होत होते. हे सर्व दर्शन विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करून उभारल्या गेलेल्या रायगडाचे होते.
रायगड किल्ल्यावर पाण्यासाठी तळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पाण्याची साठवण करणे हे एका अर्थाने विज्ञानविषयक ज्ञान आहे. पाऊस किती पडला याचे मोजमाप करण्याचे एक तंत्र किंवा यंत्र रायगडावर विकसित करण्यात आले होते. पाऊस मोजण्याच्या यंत्राचा पुरावाही अलीकडे उपलब्ध झालेला आहे.
शिवराज्याभिषेकाच्या दिवशी रायगड किल्ल्यावरती इंग्रजी, संस्कृत, मराठी, फारसी अशा अनेक भाषा बोलल्या जात होत्या. जे इंग्रज अधिकारी किल्ल्यावर उपस्थित होते, ते इंग्रजीत संवाद करत होते. गागाभट्ट संस्कृत श्लोक म्हणत होते, तर गडावरती उपस्थित असणारे मावळे, दर्यावर्दी लोक मराठी व कोकणी भाषेत बोलत होते. म्हणजेच थोडक्यात इंग्रजी, संस्कृत, मराठी आणि फारशी अशा भाषांमधील संवाद हे एक भाषाविज्ञानाचे वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यावर आधारित व्यवहार गडावर सुरू होता. बहुभाषिकता ही विज्ञानाची शैली असून ती किल्ल्यावर त्यादिवशी व्यक्त होत होती.
ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा आधार गणित हा आहे. परंपरागत ज्योतिषशास्त्र आणि नव्याने विकसित होणारे आधुनिक खगोलशास्त्र याची सांगड गडावर घातली जात होती. विश्वाचे आकलन करून घेण्यासाठी ‘यंत्रराज’ हे यंत्र देखील किल्ल्यावर होते. गागाभट्ट यांनी जुन्या आणि परंपरागत साहित्यामध्ये फेरबदल करून नवीन कालसुसंगत साहित्य लिहिले होते. नवीन काळाशी सुसंगत ज्ञाननिर्मिती म्हणजे समाज विज्ञानाचे कौशल्य. गागाभट्ट रायगड किल्ल्यावर विज्ञानाचे प्रतिनिधित्व करत होते.
१९४२ मध्ये मुंबईमध्ये पाचवी ‘अखिल भारतीय ग्रंथ परिषद’ भरली होती. त्या परिषदेचे अध्यक्ष कन्हैयालाल मुन्शी होते. शिवरायांनी छपाईचे यंत्र मिळवले होते, असा युक्तिवाद त्यांनी त्या परिषदेत केला होता. यानंतर १९७५ मध्ये वाकणकर यांनी ‘मुद्रण कला आणि शिवाजी’ हा लेख लिहिला. त्यात त्यांनी ९ जानेवारी १६७० व ८ एप्रिल १६७४ रोजी लिहिलेल्या इंग्रजांच्या दोन पत्रांचा तपशील दिला आहे. त्यावरून शिवरायांनी छपाई यंत्र खरेदी केले होते, ती मशीन रायगडावरती आली होती, शिवरायांनी छपाईची मशीन चालविण्यासाठी दोन कुशल व्यक्तींची मागणी इंग्रजांकडे केली होती, हे काम भीमजी पारेख करत होते, हे तपशील या पत्रांमधून स्पष्ट होतात. छापखाना म्हणजे लिखित स्वरूपातील ज्ञानाचे संकलन. म्हणजेच शिवरायांकडे ज्ञान संकलन करण्याची एक दृष्टी होती. ज्ञानाचे संकलन ही एका अर्थाने विज्ञानाची कथा आहे. ज्ञानाचे संकलन करणे आणि ते ज्ञान व्यवहारात वापरण्याचे कौशल्य विकसित करणे, हे विज्ञानाच्या वाढीला पूरक वातावरण आहे. अर्थातच, शिवरायांनी विज्ञानाला पूरक असे वातावरण रायगडावर निर्माण केले होते.
रायगडावर शिवराज्याभिषेकाच्या दिवशी परकीय वकील आणि शिवरायांचे अधिकारी व्यापारविषयक करार करत होते. व्यापारविषयक चर्चा सुरू होती. राज्याभिषेक ही एक राजकीय घडामोड होती, तर व्यापारविषयक करार आणि व्यापारविषयक चर्चा ही आर्थिक घडामोड होती. राजकीय घडामोडीबरोबर आर्थिक घडामोडी घडवून आणण्याची घटना राज्याभिषेकाच्या दिवशीच घडत होती. आर्थिक कला आणि राजकीय कला या दोन्हीही कलांचा विकास समाजविज्ञानाच्या अंगाने रायगडावरती त्यादिवशी घडत होता.
रायगडावरती शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमात सिंहासनाच्या उजव्या हाताला मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरं होती. डाव्या बाजूला अनेक अश्वपुच्छे व मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत सोन्याच्या तराजूची पारडी न्याय चिन्ह म्हणून तळपत होती. रायगडावरती मावळे होते. तराजूवरील मत्स्यांच्या प्रतिमा दर्यावर्ती दर्यासारंग आणि दर्याचा राजा या गोष्टी दर्शवत होत्या. यातून दर्यावर्दी जगण्यातील शास्त्र-तंत्र याचा एक संदेश दिला जात होता. शिवरायांनी संरक्षणाच्या आणि व्यापाराच्या आरमाराची स्थापना केली होती. त्या क्षेत्रातील अनुभवी अधिकारी किल्ल्यावर उपस्थित होते. समुद्र ओलांडू नये, ही एक अंधश्रद्धा त्या काळात होती. ती पुढेही काही काळ अस्तित्वात होती. आधुनिक काळात देखील समुद्रावरून प्रवास केल्यामुळे अनेक मान्यवरांना प्रायश्चित्त घ्यावे लागले होते. परंतु शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगी मात्र दर्यावर्दी, दर्यासारंग आणि दर्याचा राजा या गोष्टी विज्ञानाची प्रतीकं या अर्थाने सर्वांना दृश्य स्वरूपात दिसत होत्या. ही उदाहरणं विज्ञानाची उदाहरणं म्हणून सर्वांना स्पष्टपणे दिसत होती. थोडक्यात, शिवराज्याभिषेक सोहळ्यात विज्ञानाचे प्रदर्शन भरले होते.
शिवराज्याभिषेकासाठी रायगडावरती अष्टप्रधान मंडळ उपस्थित होते. तसेच इतरही महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. त्या सर्वांकडे विज्ञानाची एक दृष्टी होती. त्यांनी विज्ञानाचे ज्ञान आत्मसात केले होते. त्यांनी विज्ञानाच्या ज्ञानानुसार युद्धकलेत फेरबदल केले होते. संरक्षणासाठी त्या काळातील प्रगत शस्त्रास्त्रे खरेदी केली होती. ती शस्त्रास्त्रेही किल्ल्यावर होती. परदेशातील तलवारी आणि तोफा यांची खरेदी करण्यात आली होती. त्याही किल्ल्यावर होत्या. तसेच परदेशातून खरेदी केलेले चपळ घोडे किल्ल्यावर होते. चपळ घोडे हे त्या काळातील गतिशास्त्राचे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण होते. जमिनीचे मोजमाप करू नये, ही सुद्धा एक अंधश्रद्धा होती. मात्र शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गणिती पद्धतीचा वापर करून तीन वेळा जमिनीचे मोजमाप केले होते. ते मोजमापही किल्ल्यावरील विज्ञानाचे प्रतिनिधित्व करत होते.
विज्ञानावर आधारलेला समाज
शिवरायांचा प्रयत्न विज्ञानावर आधारलेला समाज घडविण्याचा होता. शिवरायांनी यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला. या संदर्भातील अनेक उदाहरणं शिवरायांच्या जीवनात दिसतात. परंतु शिवराज्याभिषेक प्रसंगाच्या वेळची दोन उदाहरणं जास्त लक्ष वेधून घेणारी आहेत.
१. विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगवेगळे असते. शिवरायांच्या काळात दारुगोळा, तोफा, परदेशी तलवारी, परदेशी चपळ घोडे, छापखाना, यंत्रराज हे तंत्रज्ञान होते. शिवरायांनी त्यांच्या काळातील या प्रगत तंत्रज्ञानाचे स्वागत केले. या तंत्रज्ञानाचा उपयोगही केला. या अर्थाने शिवरायांचं व्यक्तिमत्त्व तंत्रज्ञानाच्या कौशल्याचा उपयोग करणारे होते. या प्रक्रियेलाच ‘आधुनिकीकरण’ म्हटले जाते. मात्र तंत्रज्ञानापेक्षाही विज्ञान जास्त महत्त्वाचं आहे, यावर शिवरायांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे शिवराय प्रत्येक घटनेतील कार्यकारणभाव समजून घेत होते. ‘कार्यकारणभाव’ म्हणजेच विज्ञान अशी त्यांची ठाम धारणा होती. रायगडावरती संपन्न होणारा शिवराज्याभिषेक ६ जून रोजी घडत होता. राज्याभिषेकाची घटना आणि ६ जून यांच्यातील कार्यकारणभावही संरक्षणाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणजेच विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट घडविण्याचा विचार शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य पैलू होता, असे स्पष्टपणे दिसते.
२. विज्ञान आणि गैरविज्ञान अशा दोन गटात जगाची विभागणी झाली आहे. परंतु शिवराज्याभिषेकाच्या दिवशी रायगडावरील वातावरण विज्ञानाने भारलेले होते. अवैज्ञानिक वातावरण जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. यामुळे शिवराज्याभिषेक प्रसंगी ‘विज्ञानाशी संबंधित लोक’ या संकल्पनेला महत्त्व दिले गेले होते. ‘लोकांची इच्छा आहे, तुम्ही सिंहासनावरती बसावे’, असा स्पष्ट उच्चार रायगडावरती करण्यात आला होता. याचा अर्थ ‘लोकांची इच्छा’ हे विज्ञान आहे. ‘देव-धर्माची इच्छा आहे तुम्ही सिंहासनावरती बसावे’, असे म्हटलेले नव्हते. लोकांच्या इच्छेमुळे शिवरायांनी सार्वभौम राज्यसंस्था स्थापन केली, हे विज्ञान आहे. म्हणजेच थोडक्यात रायगड किल्ल्यावरती सार्वभौम राज्यसंस्थेची घोषणा झाली, याचा दुसरा अर्थ वैज्ञानिक समाजाची घोषणा झाली. ज्ञानावर आधारलेल्या समाजाला शिवराय प्राधान्य देतात या तत्त्वाची घोषणा झाली. तसेच ‘मावळा’, ‘दर्यावर्दी’ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा सन्मान झाला. म्हणजेच शिवरायांच्या राज्यसंस्थेने मावळा, दर्यावर्दी, कोकणी, पांढरपेशा, नागवंशी इत्यादी ‘बहुसांस्कृतिक समाज’ मान्य केला, या गोष्टीवर राज्याभिषेक दिनाने शिक्कामोर्तब केले. ही खरी विज्ञानाची कथा रायगडवर त्या दिवशी घडत होती.
कायद्यांचे संहितीकरण
शिवरायांचा राज्यकारभार कायद्यानुसार होत होता. त्यासाठी कायद्यांचे संहितीकरण करण्यात आले होते. कायद्यांचं संहितीकरण ही विज्ञानाचीच दृष्टी आहे. राज्यकारभार कायद्याप्रमाणे होत आहे आणि पुढेही होणार आहे, हे लोकांना शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगी स्पष्टपणे दिसत होते. विशेषतः ‘कानूजाबता’ नावाने कायद्यांचे पुनर्लेखन केले गेले. संभाजी महाराज शिवराज्याभिषेकात युवराज म्हणून सहभागी झालेले होते. विशेष म्हणजे त्यांनी ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला होता. ‘बुधभूषण’ ग्रंथामध्ये विविध प्रकारच्या कायद्यांचे संकलन केलेले आहे. तसेच कायद्याच्या समाजातील व्यवहाराची प्रक्रियाही नोंदविलेली आहे. म्हणजेच कायद्यावर आधारलेला समाज आणि कायद्यावर आधारलेला शासन व्यवहार या दोन्ही गोष्टींचा पुरस्कार संभाजीराजे करत होते. ‘कायद्यासमोर सर्व समान’ हे तत्त्वही त्यांनी प्रमाण मानले होते. समाज विज्ञानामध्ये ‘कायदा’ या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे. कायद्याचे संहितीकरण ही प्रक्रिया विज्ञानाची आहे. ‘कानूजाबता’ व ‘बुधभूषण’ ही उदाहरणं कायद्याच्या संहितीकरणाची आहेत. कायदा वैज्ञानिक ज्ञानाला महत्त्व देतो. कायद्यामध्ये विवेकीकरणाची प्रक्रिया घडते.
विवेकीकरण म्हणजेच विज्ञानाची दृष्टी होय. आजच्या अर्थाने शिवराज्याभिषेक प्रसंगी विज्ञान व्यक्त झाले नाही. परंतु शिवरायांच्या काळातील आणि शिवरायांनी विकसित केलेली विज्ञानाची दृष्टी मात्र ६ जून १६७४ रोजी सुस्पष्टपणे रायगडावर दिसत होती, असा निष्कर्ष उपलब्ध पुराव्यांवरून काढता येतो.
विशेषतः ६ जून १६७४ हा दिन हिंदवी स्वराज्यातील शिवराज्याभिषेक दिनाबरोबरच तो हिंदवी स्वराज्यातील ‘विज्ञान दिन’ ठरावा अशा विज्ञानाशी संबंधित घटना स्पष्टपणे दिसत होत्या.
राज्यशास्त्राचे अध्यापक व राजकीय विश्लेषक.