'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

श्रावणाचं सिक्रेट!

निसर्गाचे बदलणारे सौंदर्य, उपवासामागील वैज्ञानिक रहस्य आणि 'डिजिटल उपवासा'तून मिळणारा आनंद दाखवणारी एक रंजक कथा.

नवशक्ती Web Desk

कथा

हार्दिका

निसर्गाचे बदलणारे सौंदर्य, उपवासामागील वैज्ञानिक रहस्य आणि 'डिजिटल उपवासा'तून मिळणारा आनंद दाखवणारी एक रंजक कथा.

इयत्ता सातवीत शिकणारा साहिल त्याच्या मोबाइल सकीनवर प्रचंड वेगाने बोट फिरवत होता. 'फ्री-फायर' गेमची अत्यंत आव्हानात्मक लेव्हल सुरू होती. त्याच्या कपाळावर आठ्या आणि चेहऱ्यावर एक अनाकलनीय तणाव दिसत होता. "साहिल ! अरे अर्धा तास झाला हाक मारतेय ! मोबाईल बाजूला ठेव आणि चल, जेवायला." किचनमधून आईचा थोडा वैतागलेला आवाज आला.

"थोडं थांब ना आई! पाचच मिनिटं उरली आहेत... सतत डिस्टर्ब करू नकोस!" साहिल मोठ्याने चिडून ओरडला. गेममध्ये हरण्याची भीती, त्यावरून होणारी चिडचिड, अभ्यासात लक्ष न लागणं आणि सततचा राग... साहिलच्या दैनंदिन आयुष्याचा हा एक भागच बनला होता.

तेवढ्यात त्याचा चुलत भाऊ विनू आणि शेजारी राहणारा आरव धावतच त्याच्या खोलीत आले. आरवने साहिलच्या हातातला फोन जवळजवळ बाजूला सारत म्हटलं, "अरे साहिल, चल पटकन बाहेर ! वातावरणात काय अप्रतिम जादू झाली आहे बघ तर खरं!"

साहिलने त्रासलेल्या चेहऱ्याने विचारलं, "काय वेगळं घडतंय बाहेर ? पाऊस पडतोय एवढंच ना?"

"अरे फक्त पाऊस नाही!" आरव उत्साहाने सांगू लागला, "किंचित काळेकुट्ट ढग आणि दुसऱ्या बाजूला पिवळेधमक पडलेलं ऊन ! ऊन-पावसाचा लपंडाव चाललाय. चहूबाजूला हिरवंगार दिसतंय, खाडीकडचा परिसर तर निसर्गचित्रासारखाच भासतोय. हे सगळं पाहून खूप भारी वाटतंय."

मुलांचा हा संवाद ऐकून आजी आणि डॉक्टर काका (साहिलचे बाबा) दिवाणखान्यात आले.

आजी हसून म्हणाली, "आरव, अरे हा श्रावण महिना आहे! हा निसर्गाचा सर्वात मोठा उत्सव किंवा असं समज की हा 'निसर्गाचा वाढदिवस' आहे! उन्हाळ्याच्या तीव्र जाळाने थकलेली ही धरतीमाता जेव्हा पावसाच्या पहिल्या तुषारांनी न्हाऊन निघते, तेव्हा श्रावणात ती हिरवीगार साडी नेसून नटते. झाडं, पानं, पक्षी अन् फुलपाखरं निसर्गाच्या या वाढदिवसाचा आनंद साजरा करतात. म्हणूनच आपण या काळात निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो."

"वाह आजी ! म्हणजे निसर्गाची पार्टीच सुरू आहे ना!" आरव आश्चर्याने म्हणाला.

पण विनूचा चेहरा मात्र काहीसा पडलेला होता. तो एक दीर्घ सुस्कारा टाकत म्हणाला, "निसर्गाचा वाढदिवस ठीक आहे आजी, पण माझी पार्टी मात्र कॅन्सल झाली ! आज संध्याकाळी मित्रांसोबत स्ट्रीट फूड खायला जायचं होतं, तर आईने ठाम नकार दिला. श्रावणात म्हणे बाहेरचं उघड्यावरचं खाणं बंद आणि चिकन मटण तर मागायचंही नाही ! देवाला आपण काय खातो याने काय फरक पडतो, मला तर हे नियम अजिबात पटत नाहीत !"

डॉक्टर काका विनूचं बोलणं ऐकून मोठ्याने हसले. त्यांनी तिन्ही मुलांना सोफ्यावर जवळ बसवून घेतलं.

"विनू, तुला वाईट वाटतंय ना. अशी काय ती आई..? हे सगळे जुनाट धार्मिक नियम किंवा अंधश्रद्धा आहेत, बरोबर ना विनू ?

"हो काका. खावंसं वाटलं की खायला दिलं पाहिजे ना तिथे का बरं नियम ? पोटात दुखलं तर तू आहेसच ना काका..

"हो, मी आहे पण हे नियम फक्त परंपरा म्हणून नाहीयेत तर त्यामागे सायन्स आहे. मग करायची आहे का सायन्स सफर..?"

साहिलनेही गेमचा विचार सोडून उत्सुकतेने मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवला. बाबा सांग ना. काकांनी विचारलं, "मुलांनो, मला सांगा, उन्हाळ्यात जेव्हा तुमची शाळा संपते, तेव्हा तुम्ही काय करता ?"

"आम्ही समर व्हेकेशनला (सुट्टीला) जातो आणि स्वतःला रिफ्रेश करतो !" विनू उत्तरला. "अगदी बरोबर !" काका पुढे समजावून सांगू लागले, "जसं मन रिफ्रेश करावं लागतं तसं शरीरालाही आतून रिफ्रेश होण्याची गरज असते.

आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या 'पचनसंस्थेला' (Digestive System) दिलेली ती एक आवश्यक मोठी सुट्टी म्हणजेच श्रावण ! पावसाळ्यात आकाशात सूर्यप्रकाश कमी असतो आणि हवेत अतिप्रमाणात दमटपणा असतो. या नैसर्गिक बदलांमुळे आपली पचनशक्ती खूप मंदावते. अशा वेळी जड मांसाहार, तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले, तर पचनसंस्थेवर प्रचंड ताण येतो आणि आरोग्य बिघडतं. शिवाय, पावसाळ्यात उघड्या अन्नावर सूक्ष्मजंतू (Bacteria) अतिशय वेगाने वाढतात."

"बाबा, म्हणजे श्रावणातील सात्विक आहार आणि उपवास म्हणजे आपल्या पोटाला दिलेली 'मिनी व्हेकेशन' आहे तर!" साहिलने लॉजिक लावत विचारलं.

"अगदी बरोबर !"

"पण काका, मग लोक उपवास करून दिवसभर उपाशी का राहतात?" आरवने आपला प्रश्न मांडला.

"आरव, उपवास म्हणजे केवळ अन्न त्यागणं किंवा पोट उपाशी ठेवणं नव्हे. खरा उपवास म्हणजे 'संयम' (Self-Control) ! आपल्या मनातील नकारात्मक विचार, राग, चिडचिड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात या मोबाईलचा होणारा अतिवापर नियंत्रित करणं ! यालाच आधुनिक शास्त्रीय भाषेत 'डिजिटल डिटॉक्स' म्हणतात."

आजीने चर्चेत भर घालत पुढे सांगितलं, "मुलांनो, पूर्वी श्रावणात घरात भजन-कीर्तनाचे सूर घुमायचे, मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळले जायचे आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसून गप्पा मारत सात्विक फराळ करायचे. यामुळे माणसाचे मन शांत आणि एकाग्र राहायचं. लोकांचं लक्ष मोबाईलच्या निर्जीव स्क्रीनवर न राहता, जिवंत नात्यांवर असायचं. सण आपल्याला एकत्र आणतात आणि आपल्या मानसिक स्वास्थ्याची (Mental Health) काळजी घेतात."

साहिलला अचानक आपल्या वागण्यामागचं मूळ कारण स्पष्ट झालं. मोबाईल गेममधील पराभवामुळे होणारा तीव्र ताण, अभ्यासातील दुर्लक्ष आणि आईवर विनाकारण ओरडणं... या सगळ्याचं मूळ त्या डिजिटल स्क्रीनच्या अतिवापरातच असावं.

साहिलने मन घट्ट करून मोबाईल आजीच्या हातात दिला आणि म्हणाला, "बाबा, यावर्षी माझा 'डिजिटल उपवास' सुरू ! कठीण आहे पण मी प्रयत्न नक्की करणार आणि मोबाईलचा अनावश्यक वापर टाळणार. माझा गेमिंग टाइम मी निसर्गाचा आनंद घेण्यात, खेळण्यात अन् अभ्यासात घालवणार. मग आईपण खुश होईल."

काका, "मीपण निसर्गाच्या या वाढदिवसाची भेट म्हणून आपल्या सोसायटीच्या बागेत दोन नवीन रोपं लावून त्यांची काळजीही घेईन !" आरव उत्साहाने उद्‌गारला.

काका, "मीही रोज घरीच बनलेलं जेवण्याचा प्रयत्न करून पोटालाही मिनी व्हेकेशनचा आनंद घेऊ देणार!" विनू म्हणाला.

आजी आणि काकांनी मुलांना ऑल द बेस्ट दिलं. तेवढ्यात साहिलची आई घरात केलेली गरमागरम भजी आणि चहा घेऊन आली. गॅलरीतून बाहेर चालणारा ऊन-पावसाचा सुंदर खेळ बघत सर्वांनी एकत्र वेळ घालवला. मुलांच्या मनात ज्ञान, विज्ञान आणि विचारांची नवी हिरवळ बहरत होती !

krantip183@gmail.com

एसी लोकल दुरुस्ती केंद्रासाठी ३७१ कोटींचा निधी; वाणगाव येथे देखभाल केंद्राची उभारणी

LPG eKYC Last Date : अजून ई-केवायसी केली नाही? आजच करा, नाहीतर सिलिंडर मिळण्यात येणार अडचण

रस्ते अपघातात ५० टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू; मुंबई रस्ता सुरक्षा वार्षिक अहवाल

एसटी प्रवाशांनाही लागणार वाचनाची आवड; नालासोपारा आगारात फिरते वाचनालय सुरु

Mumbai : ३७ हजार फेरीवाले 'नॉट रिचेबल'; QR कोड आधारित ओळखपत्रासाठी ३१ ऑगस्ट अखेरची तारीख