सिन्नरचा हेरिटेज हँगआऊट 
अक्षररंग

सिन्नरचा हेरिटेज हँगआऊट

काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, तर अनुभवायची असतात! सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिराच्या दगडी शिल्पांपासून डुबेरेच्या बर्वे वाड्यापर्यंतची ही सफर म्हणजे इतिहास, स्थापत्यकला आणि पर्यटन यांची अनोखी भटकंती.

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

शंतनु परांजपे

काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, तर अनुभवायची असतात! सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिराच्या दगडी शिल्पांपासून डुबेरेच्या बर्वे वाड्यापर्यंतची ही सफर म्हणजे इतिहास, स्थापत्यकला आणि पर्यटन यांची अनोखी भटकंती.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हे आज औद्योगिक वसाहत म्हणून परिचित असले, तरी त्याच्या जुन्या वस्तीभोवती फिरताना मध्ययुगीन महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाच्या अनेक खुणा आजही आढळतात. त्यांत गोंदेश्वर मंदिराचे स्थान विशेष आहे. महाराष्ट्रातील भूमिज मंदिरशैलीचा विचार करायचा झाल्यास अंबरनाथ, झोडगे, रतनवाडी, माणकेश्वर यांच्याबरोबर सिन्नरच्या गोंदेश्वराचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. मंदिराची भव्यता ही तर प्रथमदर्शनी जाणवतेच; परंतु त्याची खरी ओळख केवळ त्याच्या आकारमानात नसून आराखडा, शिखररचना, मंडोवरावरील शिल्पविन्यास आणि पंचायतन योजनेच्या सुसूत्रतेत आहे.

गोंदेश्वर हा प्रत्यक्षात एक पंचायतन मंदिरसमूह आहे. मध्यभागी शिवाचे मुख्य मंदिर असून त्याभोवती चार उपमंदिरे बांधलेली आहेत. या उपमंदिरांचा संबंध गणेश, देवी, सूर्य आणि विष्णू या देवतांशी आहे. त्यामुळे संपूर्ण संकुल पंचायतन पद्धतीत उभे राहते. उत्तर भारतातील मंदिरपरंपरेत पंचायतन योजना परिचित असली, तरी महाराष्ट्रात तिचे इतके सुस्पष्ट आणि स्थापत्यदृष्ट्या परिपक्व उदाहरण फारसे दिसत नाही. मुख्य देवता केंद्रस्थानी आणि इतर देवतांची मंदिरे चार दिशांना- या रचनेत केवळ धार्मिक संकल्पना नसून अवकाशाच्या नियोजनाची शिस्तही आहे.

गोंदेश्वराच्या मुख्य मंदिरात गर्भगृह, अंतराळ आणि मंडपांची अनुक्रमिक रचना दिसते. मंदिर उंच अधिष्ठानावर उभे असल्याने त्याला स्थैर्य आणि ऐश्वर्य दोन्ही प्राप्त झाले आहे. प्रदक्षिणेतून मंदिर पाहताना भिंतींचा पृष्ठभाग सपाट ठेवलेला नसून पुढे-मागे येणाऱ्या रथ, भद्र आणि कर्णभागांच्या सहाय्याने त्याला लय दिली आहे. मंदिराच्या वास्तुरचनेत याच लयीचा पुढे शिखरापर्यंत विस्तार होतो. गोंदेश्वराच्या स्थापत्याचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे इथे शिल्प आणि वास्तू या दोन स्वतंत्र गोष्टी नाहीत. शिल्पाला जागा देण्यासाठी वास्तू तयार झालेली नाही; वास्तूच्या अंगभूत रचनेतूनच शिल्पासाठी अवकाश निर्माण झाला आहे.

मुख्य देवालयाचे शिखर भूमिज प्रकारात मोडते. भूमिज शैलीची ओळख तिच्या शिखररचनेत सर्वाधिक स्पष्टपणे होते. मध्यवर्ती ऊर्ध्वरेषांना अनुसरून वर चढणारी रचना आणि त्यांच्या दरम्यान नियमित क्रमाने बसविलेली लघुशिखरे यामुळे शिखराला जणू भूमितीय जाळ्याचे स्वरूप प्राप्त होते. या छोट्या प्रतिकृती केवळ अलंकरण नाहीत. मोठ्या शिखराच्या आकाराची पुनरावृत्ती लहान-लहान रूपांत करून संपूर्ण वास्तूला ऊर्ध्वगामी गती देणे हा त्यामागील स्थापत्यविचार आहे. गोंदेश्वराच्या शिखरात ही योजना विशेष स्पष्ट दिसते. अभ्यासग्रंथातही या मंदिराला महाराष्ट्रातील भूमिज परंपरेच्या विकासात महत्त्वाचे स्थान दिले आहे.

मंदिराच्या बाह्यभिंतींवर देवदेवता, दिक्पाल, विविध अवतार, नृत्यमुद्रा, सुरसुंदरी आणि लौकिक जीवनाशी संबंधित अनेक प्रतिमा दिसतात. विष्णूच्या विविध रूपांबरोबरच नरसिंह, वराह, त्रिविक्रम, शिवाची विविध रूपे, गणेश, देवी आणि महिषासुरमर्दिनी यांसारख्या मूर्ती येथे आढळतात. या मूर्ती पाहताना मात्र त्यांना स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहण्याऐवजी मंदिराच्या संपूर्ण दृश्यरचनेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. देवकोष्ठातील मुख्य प्रतिमा, त्यांच्या दोन्ही बाजूंच्या लहान प्रतिमा, वरचे वास्तुअलंकरण आणि खालील पट्टिका- या सगळ्यांत एक निश्चित क्रम आहे. मंदिरावरील रामायण तसेच विविध पुराणकथांतील शिल्पे ही त्या काळातील समाजावर या कथांचा असलेला पगडा दर्शवतात.

सुरसुंदरींच्या प्रतिमाही गोंदेश्वराच्या मंडोवराचा महत्त्वाचा भाग आहेत. दर्पण पाहणारी स्त्री, केशरचना करणारी स्त्री, नर्तकी, वाद्यधारी स्त्री अशा अनेक प्रतिमांमधून शिल्पकाराने स्त्रीदेहाचे केवळ सौंदर्य दाखविलेले नाही; त्याने हालचाल दगडात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कटिभागातील वळण, एका पायावर आलेला भार, किंचित कललेली मान आणि हातांच्या मुद्रांमधून निर्माण होणारी लय या प्रतिमांना जिवंतपणा देते. मध्ययुगीन मंदिरशिल्पातील सुरसुंदरी ही केवळ सजावटीची आकृती नव्हती; मांगल्य, सौंदर्य आणि समृद्धीच्या व्यापक कल्पनेशी तिचा संबंध होता.

गोंदेश्वराकडे पाहताना ‘हेमाडपंती मंदिर’ एवढीच ओळख देण्याची प्रचलित सवय टाळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक काळ्या दगडाच्या मध्ययुगीन मंदिराला सरसकट हेमाडपंती म्हणण्याने स्थापत्यशैलीतील महत्त्वाचे फरक नाहीसे होतात. गोंदेश्वराची ओळख त्याच्या भूमिज शिखरात, पंचायतन योजनेत, अधिष्ठान-मंडोवर-शिखर यांच्या परस्परसंबंधात आणि विकसित शिल्पकार्यक्रमात शोधली पाहिजे.

या मंदिराचे नेमके कालनिर्धारण किंवा मंदिर बांधणाऱ्या स्थापकाचे नाव यांविषयी विविध मते आहेत. म्हणून उपलब्ध पुराव्यापेक्षा पुढे जाऊन एखाद्या राजाचे नाव निश्चितपणे जोडणे योग्य ठरणार नाही. मात्र स्थापत्यरचना, शिल्पशैली आणि तत्कालीन महाराष्ट्रातील भूमिज परंपरेचा विकास पाहता गोंदेश्वर हे साधारणतः यादवकालीन, तेराव्या शतकात बांधलेले मंदिर असावे, असा अंदाज बांधता येतो.

सिन्नरला जाऊन गोंदेश्वर पाहताना केवळ मुख्य गर्भगृहातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन परतणे म्हणजे मंदिराचा फारच थोडा भाग पाहणे होय. एकदा अधिष्ठानापासून शिखरापर्यंत नजर नेली, भिंतींच्या प्रत्येक प्रक्षेपाचा क्रम समजून घेतला, चार उपमंदिरांच्या स्थानाकडे लक्ष दिले आणि शिल्पांची त्यांच्या वास्तूतील जागा पाहिली की हे मंदिर वेगळ्या प्रकारे उलगडू लागते.

गोंदेश्वर हे केवळ सिन्नरचे प्राचीन शिवमंदिर नाही. मध्ययुगीन महाराष्ट्रातील वास्तुकाराला भूमिती, देवप्रतिमा, अवकाश आणि ऊर्ध्वरेषा यांची किती परिपक्व जाण होती, याचा तो दगडात उभा राहिलेला पुरावा आहे. सिन्नरमध्ये गोंदेश्वराबरोबरीने आयेश्वराचेही मंदिर आहे. ते मंदिर पाहून जवळच डुबेरे येथे असलेला बर्वे वाडाही पाहावा, म्हणजे आपली सिन्नर सहल सुफल संपूर्ण होते.

sdparanjpe@gmail.com

तपासात फेरफाराची भीती; पुढील निर्णय घेण्यापूर्वी महिनाभर तपासावर लक्ष ठेवणार- जरांगे

भारताचा हेतू योग्य नाही, पाकिस्तानमुळे काश्मिरी सुरक्षित; डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे धक्कादायक वक्तव्य

Mumbai 'एसआयआर'मध्ये गोलमाल; एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज, धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai : बेस्ट बसमध्ये न घेतल्यास कोयता हाती घेऊ! मच्छिमार महिला संतप्त

एशियाटिकमधील वंदे मातरम् अपमान प्रकरण : डॉ. मुणगेकरांवर कारवाईची टांगती तलवार