स्वर राहिला जिवंत 
अक्षररंग

स्वर राहिला जिवंत

पार्थिवाचे बंधन तोडून सुमनताईंचे सूर आज सर्वव्याप्त निराकारात विलीन झाले आहेत. देहाने एक्झिट घेतली असली, तरी भान हरपवून टाकणारी त्यांची ‘होशरुबा’ सुरांचे थेरपीसारखे कुरवाळणे आपल्या मनात कायम जिवंत राहील.

नवशक्ती Web Desk

विशेष

अक्षय शिंपी

पार्थिवाचे बंधन तोडून सुमनताईंचे सूर आज सर्वव्याप्त निराकारात विलीन झाले आहेत. देहाने एक्झिट घेतली असली, तरी भान हरपवून टाकणारी त्यांची ‘होशरुबा’ सुरांचे थेरपीसारखे कुरवाळणे आपल्या मनात कायम जिवंत राहील.

धीमे सुरों में कोई मधुर गीत छेड़िए

ठहरी हुई हवाओं में जादू बिखेरिए

परवीन शाकिरचा हा शेर सुमन कल्याणपुर यांच्या आवाजाला अगदी चपखल बसतो. काही आवाज ऐकताना आपण आपले राहत नाही.

आपलं भान हरपतं. माझ्यासाठी पं. कुमार गंधर्व, मुकुल शिवपुत्र, नय्यरा नूर, किशोरी आमोणकर आणि सुमन कल्याणपुर हे ते भान हरपवणारे आवाज आहेत. फारसी भाषेत एक फार सुंदर शब्द आहे. ‘होशरुबा’. होश म्हणजे भान आणि रूबा म्हणजे खेचून घेणे. भान हरपतं ती अवस्था म्हणजे होशरूबा. फार अस्वस्थता दाटून आली की, यांच्यापैकी कुणा एकाच्या किंवा आलटून पालटून या सर्वांच्या आवाजांसामोर मी कानांचे पडदे पसरतो आणि पुढल्या अवघ्या काही मिनिटांतच एका वेगळ्याच जगात जाऊन पोहोचतो. कानांचे पडदे फक्त माध्यम असतात. जादू घडते ती मेंदूत. ते आवाज ऐकून मेंदूतल्या ग्रंथी पाझरू लागतात आणि अस्वस्थतेचा किंवा एकूण असण्याचाच विसर पडतो.

सुमन कल्याणपुर यांचा आवाज माझ्यासाठी थेरपीसारखा आहे. त्यांचे अत्यंत घट्ट, भरीव सूर, तालाशी चाललेला खेळ, आत्मा नाचायला लागावा अशी लय आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गाण्याच्या पाठीमागे असलेला निश्चित, ठोस असा विचार.. मला सातत्याने सुमनताईंच्या आवाजाकडे खेचून नेतो. मनाचं दुखणं अत्यंत विश्वासाच्या माणसाकडे बोलून दाखवावं आणि उत्तरादाखल त्यानं फक्त आपल्याला कुरवाळत राहावं, पाठीवरून हात फिरवत राहावा, असा अनुभव मला त्यांचा आवाज ऐकताना येतो.

संगीत ही जगातील सर्वश्रेष्ठ कला आहे. भावविरेचन करण्याची जी विलक्षण ताकद संगीतात आहे ती अन्य कुठल्याही कलेमध्ये नाही. कसलेल्या गायकानं मैफिलीत नुसता षड्ज लावला तरी अख्खी मैफिल तत्क्षणी सावध होऊन कान टवकारते, तो श्रोत्यांचा फार महत्त्वाचा क्षण असतो. तो क्षण विस्कटू नये. कसलेला गायक तो विस्कटू देत नाही. श्रोत्यांशी थेट संभाषण न करता सुरांतून जो त्यांच्या साऱ्या अस्तित्वाचा ताबा घेतो तो श्रेष्ठ गायक, अशी मी माझ्यापुरती केलेली एक व्याख्या आहे. त्यात सुमनताई अगदी नेमक्या बसतात.

‘ना तुम हमें जानो, न हम तुम्हे जाने’

या गाण्याची मी पारायणं केली आहेत. अजूनही करतो. बंद डोळ्यांसमोर काही रंग नाचायला लागतात. निवांत, कुठेही पोहोचण्याची घाई नसल्यासारखं एका पायवाटेने चालत राहावं किंवा तळ्यात पाय बुडवून क्षितिजाशी कललेल्या आकाशात चाललेले ढगांचे खेळ बघत आपल्याशीच मंद मंद हसत राहावं, असं काहीसं वाटत राहतं. पण हेही अपुरंच आहे. तो अनुभव ज्या तीव्रतेने येतो ती तीव्रता शब्दांत उतरणं अवघड आहे. संगीत त्या अनुभवांच्या प्रदेशात नेतं. मी सुमनताईंचा हात धरून तिकडे आनंदाने जातो.

उर्दू भाषेत जी अदब, नजाकत, खानदानीपणा आहे तो सुमनताईंच्या आवाजात आहे. समईची वात शांत, मंदपणे तेवत राहावी तसा मला त्यांचा आवाज वाटतो. त्या आवाजाला अतिशय आस आहे. आश्वस्त करणारं विलक्षण असं काही त्या आवाजात आहे. ते आजवर ज्या पार्थिवात सांभाळून ठेवलं गेलं होतं, ते पार्थिव आता सर्वव्याप्त निराकार संगीतात कायमस्वरूपी विलीन झालं आहे. पण आपल्याकडे त्या आवाजातलं ‘विलक्षण असं काही’ तंत्राच्या मदतीनं गोठवूनही ठेवलं गेलं आहे. आपण असू तोवर ते आपल्या सोबत असेल. कधीतरी एका वळणावर आपणही त्याचा हात धरून त्यामिठीत विलीन होऊ. सुफी तत्त्वज्ञान म्हणतं, ज्याच्यावर प्रेम करायचं त्यातच विरघळून जायचं. ते आणि आपण अशी दुहेरी, भिन्न अस्तित्व असता कामा नये...आपल्याही बाबतीत कधीतरी घडेल ते. तोवर सुमनताईंचा आवाज ऐकत दिवस सरताहेत, हेही या कठोर दिवसांत काय कमी महत्त्वाचं आहे?

अभिनेता, कवी, दास्तानगो

akshayshimpi1987@gmail.com

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई