अक्षररंग

मुलांची सुट्टी, पालकांची कसोटी

शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्याआधीच मुलांचे आणि त्यांच्या पालकांचेही प्लॅनिंग सुरू होते. लहान मुलांचा आनंद तर ओसंडून वाहत असतो. यंदा मे महिन्याची सुट्टी लागता लागताच, पहिल्या इयत्तेत शिकत असलेल्या माझ्या मुलाने, हर्षदीपने मला विचारले, “बाबा, समर व्हेकेशनमध्ये आपण तीन दिवस श्रीलंकेला जाऊन येऊया का?”

Swapnil S

पालकत्वात रमले बाबा

संजय हिरे

शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्याआधीच मुलांचे आणि त्यांच्या पालकांचेही प्लॅनिंग सुरू होते. लहान मुलांचा आनंद तर ओसंडून वाहत असतो. यंदा मे महिन्याची सुट्टी लागता लागताच, पहिल्या इयत्तेत शिकत असलेल्या माझ्या मुलाने, हर्षदीपने मला विचारले, “बाबा, समर व्हेकेशनमध्ये आपण तीन दिवस श्रीलंकेला जाऊन येऊया का?”

नुकतंच पाचवं वर्षं संपवून सहावं वर्ष लागलेल्या माझ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाने मी चकित झालो. मी कुतूहलाने त्याला विचारले, “का रे बाळा, श्रीलंकेला का जायचं?” तो म्हणाला, “माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, ती तिच्या आई-बाबांसोबत श्रीलंकेला जाऊन आली.” मुलांना आपण जेव्हा फिरायला घेऊन जातो तेव्हा ते नुसतंच फिरणं किंवा खाऊ-पिऊ घालणं या पुरतं सीमित राहता कामा नये. या भटकंतीतून मुलांच्या निरीक्षणशक्तीला, चिकित्सकपणाला वाव मिळाला पाहिजे, निसर्गातील वैविध्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यायला हवा.

मी माझ्या मोबाइलमधील आमच्या गावचे फोटो काढून दाखवत हर्षदीपला म्हणालो, “अरे, या फोटोतील हे छोटंसं बकरीचं पिल्लू तुला आठवतं का? मी गावी असताना व्हॉट‌्स‌ॲप कॉल करून तुला हे पिल्लू दाखवलं होतं.” “हो हो. आठवतंना मला,” असं म्हणत मोबाइल माझ्या हातातून घेऊन हर्षदीप गावचे फोटो कौतुकाने पाहू लागला. “अरे, ते पिल्लू आता मोठं झालं असेल, हो ना? आणि आपल्या कौलारू घरामागील शेतात, आंब्याच्या झाडाला खूप आंबेही आले असतील,” मी म्हणालो. ही सगळी आमची चर्चा ऐकून आणि गावचे फोटा पाहून हर्षदीप पटकन म्हणाला, “मग यावेळी सुट्टीत आपण आपल्या गावालाच जाऊया, बाबा.” श्रीलंकेला जायचा त्याचा विचार बारगळला होता.

मुलांना परदेशात फिरायला नेऊ नये, असे मला म्हणायचे नाही. किंबहुना अगदी लहान वयात मुलांना आपल्या गावाची ओळख झाली पाहिजे. लहानपणापासून मुलांना गावी जायची, तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायची सवय लावल्यास गावच्या जीवनपद्धतीत मुलं आपसूक रमतात. त्यांना अवघड वाटत नाही. शिवाय गावची शेती, विविध प्रकारच्या फळा-फुलांची झाडं, विहीर, गाईंचा गोठा, शेळ्या-बकऱ्या, गावची नदी या सर्व गोष्टी प्रत्यक्ष गावी गेल्यानंतरच मुलं पाहू शकतात. यासाठीच पालकांनी मुलांना आवर्जून गावी नेले पाहिजे. मुलांची गावच्या मातीशी नाळ जुळण्याची ही प्रक्रिया मुलांना पुढे आयुष्यभर गावच्या मातीशी जोडून ठेवते. याशिवाय, गावाजवळच्या किंवा जिल्ह्यातील प्रसिद्ध स्थळांची ओळख मुलांना आवर्जून करून द्यावी.

आजच्या डिजिटल युगात मोबाइल आणि व्हॉट‌्स‌ॲपमध्ये अडकून पडलेली मुलं एकलकोंडी होत जातील की काय, अशी भीती वाटण्याजोगी सध्याची परिस्थिती आहे. या सगळ्यांपासून मुलांना लांब ठेवण्यासाठी पालक मंडळी त्यांना वेगवेगळ्या शिबिरांना पाठवत असतात. हा आता जणू एक ट्रेंडच झाला आहे. पण सुट्टीच्या कालावधीत मुलांना बिझी ठेवण्यासाठी शिबिरं आणि बेबीसिटींग हेच पर्याय आहेत, असं नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या जवळच्या नातेवाईकांकडेही मुलांना एखादा आठवडाभर राहायला पाठवायला काय हरकत आहे? आजी-आजोबा, आत्या, काका, मावशी, मामा ही सगळी जवळच्या नात्यातली मंडळी. या नात्यांतील लोकांचा सहवास मुलांना लहानपणापासून मिळणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या चुलत-मावस-मामे-आत्ये भावंडांसोबत राहिल्याने आपण सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची कुटुंबभावना मुलांमध्ये आपसूकच निर्माण होते. शिवाय यातून पालकांच्या रजांचंही वाटप होतं. नोकरदार पालकांना रजा मिळण्यात अडचणी येतात. अशावेळी ज्यांच्या घरी मुलं राहायला आहेत, तिथल्या पालकांनी चार दिवस रजा घेतली की इतर पालकांना कामावर जाता येते. मुलं दुसऱ्या काका-मामाच्या, मावशी-आत्याच्या घरी गेली की, तिथल्या पालकांनी रजा घ्यायची. यामुळे कोणा एकावर रजेचा ताण येत नाही.

मुलांचा कल जाणून घेण्यासाठीही उन्हाळी सुट्टीचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो. मुलं चित्रं काढत असतील तर त्यांच्यासोबत बसून त्यांच्या रंगवण्याच्या आनंदात पालकांनी पण सहभागी झालं पाहिजे. या एकत्रित कृतीतून मुलांचा उत्साह आणखी वाढतो.

काही वेळेस मुलांना एखादा खाण्याचा पदार्थ बनवावासा वाटतो. कारण ते आईला जेवण बनवताना पाहत असतात. वेळेचा अभाव, कामाची घाई अशा कारणांमुळे एरव्ही मुलांना किचनमध्ये लुडबुड करू देण्यास आपली तयारी नसते. मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवण्यात त्यांना मदत केल्यास, आपण केलेला पदार्थ खाण्याची मजा काय असते, याचा आस्वाद मुलांना घेता येईल. पालकांचा उत्साह आणि पाठिंबा मिळाला तर त्यातूनच मुलांमध्ये एखाद्या विषयाची गोडी निर्माण होऊन पुढे भविष्यात या छंदाचं रूपांतर मुलांच्या करिअरमध्येही होऊ शकतं.

मुलांची सुट्टी कारणी लावायची असेल तर प्रत्येकाने असे विविध पर्याय शोधायला हवे.

प्रयोगशील पालक

"त्यांच्या काही शंका असतील तर..."; राज ठाकरेंच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंचा मोठा निर्णय; e-KYC मध्ये चूक झाली असेल तर...

Lionel Messi's India Tour 2025: पुतळ्याचे अनावरण, स्टेडियममध्ये राडा; कोलकात्यानंतर मेस्सी कुठे अन् कोणाला भेटणार? जाणून घ्या मेस्सीचा संपूर्ण भारत दौरा

कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेल्याने मेस्सीच्या चाहत्यांचा उद्रेक; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा माफीनामा, म्हणाल्या...

Messi Viral Video : मेस्सी आला आणि १० मिनिटांत निघून गेला...; फुटबॉलपटूच्या क्षणिक एन्ट्रीने कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर चाहत्यांचा राडा