अक्षररंग

सहजीवनाची समतावादी मुळाक्षरं!

१५ मे. जागतिक कुटुंब दिन. या दिनाच्या निमित्ताने नेहमीच कुटुंब पद्धतीत होणारे बदल, वेगळ्या पद्धतीच्या कुटुंबांचा उदय, कुटुंबांतर्गत लोकशाही अशा मुद्द्यांची चर्चा होत असते. ही अशी चर्चा करताना बहुतेकवेळा कोणत्याही कुटुंब पद्धतीचा पाया असायला हवा, अशा ‘समता’ या मुल्याचं विस्मरण होतं. म्हणूनच यावर्षीच्या कुटुंब दिनाच्या निमित्ताने संगीता आणि राजू यांच्या समतावादी सहजीवनाची ही एक झलक.

Swapnil S

वेगळ्या वाटा

संगीता ठोसर, राजू जाधव

१५ मे. जागतिक कुटुंब दिन. या दिनाच्या निमित्ताने नेहमीच कुटुंब पद्धतीत होणारे बदल, वेगळ्या पद्धतीच्या कुटुंबांचा उदय, कुटुंबांतर्गत लोकशाही अशा मुद्द्यांची चर्चा होत असते. ही अशी चर्चा करताना बहुतेकवेळा कोणत्याही कुटुंब पद्धतीचा पाया असायला हवा, अशा ‘समता’ या मुल्याचं विस्मरण होतं. म्हणूनच यावर्षीच्या कुटुंब दिनाच्या निमित्ताने संगीता आणि राजू यांच्या समतावादी सहजीवनाची ही एक झलक.

मी आणि राजूने सत्यशोधक पद्धतीने विवाह केला आणि आमच्या सहजीवनाला सुरुवात केली. त्याला आता वीस वर्ष पूर्ण झाली. या प्रवासात अर्थातच आम्हाला अनेक चढउतारांना सामोरं जावं लागलं. पण त्यामुळे कधी डगमगायला झालं नाही. राजूची घट्ट मैत्री आणि विश्वास यामुळेच हे शक्य झालं. राजू माझा कधी नवरा बनला नाही, तर तो माझा सर्वात जवळचा मित्र बनला. पारंपरिक समाजाच्या दृष्टिकोनातून ‘बिनकामाचा नवरा’ बनून तो मला कार्यकर्ती व अभ्यासक याचं अद्वैत साधण्यासाठी सातत्याने सक्रिय प्रोत्साहन देत राहिला. समाजामध्ये आजही लिंगभावावर आधारित श्रम विभागणी आहे. पुरुषांनी बाहेर जाऊन पैसे कमवावे आणि स्त्रियांनी घर सांभाळावं, असं या परंपरागत चौकटीत अभिप्रेत असतं.

आज त्यात काहीसा बदल होऊन स्त्रिया अर्थार्जनासाठी घराबाहेर पडल्या असल्या तरी आजही घराची, घरकामाची जबाबदारी ही स्त्रियांचीच असल्याचं मानलं जातं. स्त्रियांनी नोकरी केली तरी घरच्या जबादारीपासून त्यांना दूर जाता येत नाही. घर स्त्रीलाच सांभाळावं लागतं. तरच ती चांगली स्त्री मानली जाते.

या पारंपरिक लैंगिक श्रमविभागणीला राजूने ठाम नकार दिला आहे आणि त्यानुरूप तो व्यवहार करतोय. अनेकजण आपले विचार मांडताना फक्त बोलण्यापुरता स्त्री-पुरुष समतेचा विचार मांडतात, परंतु, प्रत्यक्ष व्यवहार करताना ते ‘आधुनिक रानडे’ बनतात. जसं बोलतात तसं वागत नाहीत. राजूने मात्र घर ही स्वतःची जबाबदारी बनवली. जोपर्यंत घरातल्या श्रम विभागणीची फेररचना होणार नाही तोपर्यंत स्त्री-पुरुष समता प्रत्यक्षात येऊ शकत नाही हा विचार तो माझ्या सोबतीने प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्यासाठी अविरत प्रयत्न करतो आहे.

स्वतः अर्थशास्त्र विषयामध्ये पी.एचडी. करूनही माझ्यासाठी स्वतःच्या करीयरवर त्याने पाणी सोडलं. किती दलित कार्यकर्त्या अकादमिक विश्वात योगदान देत आहेत व किती जणांना तशी संधी मिळते, असा प्रश्न करून मी असं वैचारिक योगदान देऊ शकते आणि मी ते दिलं पाहिजे, असा आत्मविश्वास त्याने माझ्यात निर्माण केला.

तसंच त्यासाठी तो स्वत:ही प्रत्यक्ष अनेक जबाबदाऱ्या पार पाडतो आहे. हे आज इथं लिहिणं सोप असलं तरी प्रत्यक्षात ते निभावणं तितकंच अवघड होतं. माझा राजू माझ्या लेकीचा केवळ बाप नाही तर आई देखील बनला. दोन महिन्याच्या अनुला आंघोळ घालण्यापासून ते तिचा खाऊ बनविणं, तो तिला खाऊ घालणं अशा सर्व बाबी त्याने केल्या. एरव्ही लेकरू थोडसं रडायला लागलं की “ए, ह्याला घे ग” असं म्हणणारे अनेक पुरुष मी पाहिले आहेत. स्वतःतील पुरुषत्वावर मात करणं ही आत्यंतिक कठीण बाब असते. त्यासाठी ज्याप्रमाणे विनातडजोड वैचारिक निष्ठा असावी लागते तसंच प्रत्यक्ष कृती करण्याची तयारी आणि हिंमत दाखवावी लागते. वैचारिक मांडणी करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळते. पण तसा व्यवहार करणाऱ्यांना मात्र उपेक्षा व अवहेलना सहन करावी लागते. पण राजूने त्याची कधी फारशी फिकीर केली नाही.

मला आठवत नाही, की मला कधी राजूपासून कुठली गोष्ट लपवावी लागली. कारण त्याची कधी गरजच पडली नाही. नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि मैत्री असावी लागते. या त्रिसूत्रीवर सहजीवन सुंदर बनू शकतं, याचा मी राजूच्या सोबतीने प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. लग्नानंतर नवऱ्याचं घर हेच मुलीचं घर बनतं, असं मानलं जातं. जणू तिचे नातेवाईक तिच्यासाठी अस्तित्वहीन बनतात. नवऱ्याच्या नातेवाईकांना तिने आपलं मानावं आणि त्यांची सरबराई करावी, अशी अपेक्षा केली जाते. पण नवरे मात्र बायकोच्या नातेवाईकांची जबाबदारी घेणं तर सोडाच, पण इतरही साधे संबंध ठेवण्यास फारसे तयार नसतात. राजूने मात्र माझ्या कुटुंबाला जणू आपलंच कुटुंब मानलं. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात तो माझ्याही आधी पुढे राहिला. हे माझ्या घरचे, हे तुझ्या घरचे असा भेद त्याने कधीही केला नाही.

सामान्यतः घराची ओळख ही पुरुषाच्या नावाने सांगितली जाते. पण आमच्या इथे बहुतांश परिचित, कार्यकर्ते ‘हे संगीताचं घर’ असं संबोधतात. त्यात न्यून न वाटता राजूला त्यात आनंदच वाटतो. उलट अशी ओळख बनावी यासाठी त्यानेच प्रयत्न केले. तुम्ही म्हणाल की इथं कुठं समता आहे? इथं तर राजू दुय्यम स्थानी आहे. पण त्याचं मत तसं नाही. जात-पितृसत्ताक समाजात स्त्री-पुरुष समता आणण्यासाठी सर्वच गोष्टींच्या नव्या आखणीची व नव्या कृतीची गरज आहे, असं राजूचं ठाम मत आहे. त्यामुळे समाजाला ज्या गोष्टींची सवय नाही, त्यांची लोकांना सवय लावणं, हे स्त्री-पुरुष समतेच्या वाटेवरचं पाहिलं पाऊल आहे, असं त्याला वाटतं.

त्यामुळेच अनुचा जन्मदाखला मिळविताना त्यावर माझं नाव यावं, यासाठी तो अतिशय भांडला होता. अनुसाठी शाळेत प्रवेश घेताना देखील त्याने नावाचा मुद्दा लावून धरला. शाळेत मुलांचं नाव लावताना आधी मुलाचं नाव आणि मग वडिलांचं नाव-आडनाव, अशी जी प्रचलित पद्धत आहे, ती सोडून अनूचं नाव ‘अनित्य राजू संगिता’ असं लावावं म्हणून तो भांडला. वडिलांचं आडनाव वगळून फक्त आई आणि वडिलांचं नाव लावावं, हा त्याचा आग्रह होता. पण असं नाव लावता येत नाही, असं शाळेने सांगितल्यावर ‘ठीक आहे. मग, संगीताचं नाव लावा. माझं नाव काढून टाका’, असं त्याने सांगितल्यानंतर शाळेचे कर्मचारी बघतच राहिले. पुरुष म्हणून जातपितृसत्ताक समाजाचे जे जे प्रिव्हिलेजेस, विशेषाधिकार एखाद्या पुरुषाला मिळतात ते ते तो कायम नाकारत आला आहे.

एकदा आमची चळवळीतील मैत्रीण दिशा शेख घरी आली. दुसऱ्या दिवशी ती मला म्हणाली, “ताई, तुझ्या घरी खूप छान वाटलं. मी चळवळीतील खूप लोकांच्या घरी गेले. त्या सर्व घरांमध्ये मला स्त्री आणि पुरुष राहत असलेले दिसले. पण तुझ्या घरात मात्र दोन स्त्रिया एकत्र रहात आहेत असं वाटलं.” तिचा हा अभिप्राय म्हणजे मला आमच्या ‘degender’- ‘लिंगभावापल्याडच्या’ सहजीवनाची सर्वोत्तम पावती वाटते.

संगीता ठोसर या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या शिक्षणसंस्थेतील विमेन स्टडी सेंटरमध्ये अध्यापक आहेत.

आमच्या सहजीवनाला वीस वर्षं पूर्ण झाली. आजकाल ‘सहजीवन’ हा शब्द तसा बऱ्याचदा सैलसर पद्धतीने वापरला जातो किंवा वापरताना गल्लत केली जाते. ‘संसार’ आणि ‘सहजीवन’ हे काहीसे एकसारखे भासत असले, त्यात काही अंशी साम्य असले तरी माझ्यामते त्यातील भेद हा अतिशय मूलभूत स्वरूपाचा आहे. हा भेद निव्वळ व्यक्तिगत पातळीपुरता महत्त्वाचा नसून तो जात-पितृसत्ताक व्यवस्थेच्या अंतर्गत असलेली स्त्री-पुरूष नातेसंबंधातील गुंतागुंत आणि त्यातील सत्तासंबंध समजून घेण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

भारतीय समाजात रूढार्थाने दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी विवाह करून एकत्र जीवन जगणं याला ‘संसार’ असं म्हटलं जातं. त्यात स्त्री-पुरुष अनुक्रमे बायको आणि नवऱ्याची भूमिका पार पाडतात. पारंपरिक चौकटीत या भूमिका निभावल्या जात असल्याने त्याचे फायदे-तोटे त्या नवरा-बायकोला मिळत असतात. व्यवस्था पितृसत्ताक असल्याने साहजिकच पुरुषांना अनेक लाभ मिळतात, तर दुसऱ्या बाजूला स्त्रियांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागते.

या दुय्यमत्वामुळे स्त्रियांना नवऱ्याची सेवा करणं, नवरा मारझोड करणारा असेल तर त्याची मारझोडही सहन करणं, हे सगळं करावं लागतं. एखादा नवरा बायकोची हौस पुरी करणारा असेल, समंजस असेल तर बायकोच्या दृष्टिकोनातून संसार सुखाचा होतो. तिचं नशीब चांगलं असल्याची पावती तिला सगळे देतात. खुद्द तिला देखील तसंच वाटतं. ती अजूनच भक्तिभावाने वडाच्या झाडाला फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच नवरा मिळण्याची कामना करते. कधीमधी नवऱ्याने चारचौघात अक्कल काढली, गालगुच्चा घेतला, कोणताही निर्णय घेताना तिला विचारलं नाही तरी ती आपला संसार सुखाचा आहे, असंच मानते.

नवरा थोडंच शंभर टक्के तिचं ऐकणार आहे, असं तिला वाटतं. थोडक्यात संसार म्हणजे व्यवस्थेने सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणं आणि त्या एकमेकांना त्रास न देता पार पाडणं म्हणजे सुखी संसार होय. बऱ्याच लोकांना हा असा वरवरचा ‘सुखी संसार’ही लाभत नाही. विशेषतः खूप कमी स्त्रियांच्या वाट्याला हे सुखी संसाराचं सुख येतं. आणि म्हणूनच बऱ्याचदा ‘संसार’ आणि ‘सहजीवन’ यात गल्लत केली जाते.

‘सहजीवन’ म्हणत असताना नवरा आणि बायको या पारंपरिक सत्तासंबंधावर आधारित भूमिकांना नकार देऊन एकमेकांचे ‘जीवन साथीदार’ म्हणजेच परस्परांचे जीवनसाथी बनावं लागतं. त्यादृष्टीने आम्ही गेली वीस वर्षं एकमेकांच्या सोबतीने ही सहजीवनाची वाट चालत आहोत. संगीता ही जीवनसाथीच्या रुपात लाभणं हे माझ्या आयष्यातील सर्वात मोठं प्रिव्हिलेज आहे, असं मला मनापासून वाटतं.

त्यामुळे सहजीवनाचा खडतर प्रवास सोपा बनला आहे. सुरुवातीची दहा वर्षं दोघांनाही स्थिर असा मिळकतीचा स्त्रोत नव्हता. त्यात माझ्या चुकांचा वाटा अधिक. बरेच हितचिंतक ‘आम्ही सांगत होतो, चळवळ वगैरे नंतर करा, आधी करीयरकडे लक्ष द्या’ या सारख्या पूर्वी दिलेल्या सल्ल्यांची आठवण करून देत होते. आर्थिक चणचण कधीकधी तीव्र बने. पण त्यामुळे आमच्यात कधी वाद-भांडणं झाली नाहीत. छोटे छोटे आनंदाचे क्षण जगत हा प्रतिकूल काळ आम्ही जगून काढला. निर्णयात असलेली ‘जीवनसाथी’ची भागीदारी हा सह-जीवनाचा आधार असतो. आम्ही आयुष्याचे छोटे मोठे निर्णय कायम एकमेकांना सांगूनच घेतले. चर्चा, एकमेकांची संमती, परस्पर विश्वास हा सहजीवनाचा प्रमुख आधार असतो. त्याचं भान ठेवल्याने आम्हाला कधीही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवण्याची गरज पडली नाही. छोटा असो की मोठा, प्रत्येक निर्णय आम्ही मिळूनच घेतला. सहजीवन म्हणजेच इगोला मूठमाती द्यावी लागते. त्यात पुरुषी इगो तर हिमालयापेक्षा उंच असतो.

म्हणूनच हे कागदावर किंवा फेसबुकवर लिहिणं अगदी सोपं असतं, परंतु प्रत्यक्षात त्याचा अंमल करणं तितकंच कठीण असतं. नाहीतर अनेक पुरोगामी, वर्गांतक, जात्यंतक मंडळी सुखेनैवपणे पारंपरिक लैंगिक श्रम विभागणीचा फायदा घेत, पुरुष असण्याचे प्रिव्हिलेजेस् घेत जगतात. मुलांना स्वतःचं नाव, आडनाव वेगवेगळी कारणं देत लावतात. आधुनिक रानडे सर्वत्र प्रत्ययास येतात. त्यामुळे स्त्री-पुरुष समतेचा व्यवहार हा निव्वळ वैचारिक गप्पा मारून होत नाही, तर त्यासाठी जाणीव-नेणिवेचं वैकर्तन घडवून आणावं लागतं. तरच स्त्री-पुरुष समतेचा व्यवहार होऊ शकतो. आम्ही दोघेही हा प्रवास वैचारिक ध्येयवादावरील अढळ विश्वास, एकमेकांवरील प्रेम यांच्या सहाय्याने करत आहोत. हा सहजीवनाचा प्रवास करताना दोघांनाही बदलावं लागतं. ती बदलाची प्रक्रिया आम्ही स्वीकारली आहे.

पारंपरिक धारणा, इगो, लाभ सोडून म्हणजेच पुरुषत्वाचा त्याग करून डिजेन्डर होणं, लिंगभावापल्याड जाणं ही कठीणतम प्रक्रिया आहे. कॉ. शरद् पाटील सांगतात की, स्त्री-पुरुष समतेची अट ही सर्वात अवघड अट असते. या अटीची पूर्तता करण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्न करत आहोत. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्यातला पुरुष आपल्याही नकळत अनाहूतपणे नेणिवेच्या बाहेर पडून कधी प्रकट होईल याची शाश्वती नसते. त्यासाठी जाणीव-नेणिवेला सतत प्रशिक्षित करत राहणं गरजेचं असतं. आज या प्रक्रियेतील एक मोठा पल्ला गाठला, याचं समाधान आणि आनंद व्यक्त करण्यासाठी हे थोडं हितगुज आपल्याशी केलं आहे.

राजू जाधव हे स्वतंत्र संशोधक असून फुले-आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक