चला टिळकेश्वराच्या वारीला 
अक्षररंग

चला टिळकेश्वराच्या वारीला

घनदाट जंगल, दाट धुक्याची चादर आणि खळखळणारे प्रवाह... पावसाळ्यात स्वर्गासमान होणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील 'टिकळेश्वर' या अद्भुत देवस्थानाचा आणि तिथल्या निसर्गरम्य ट्रेकिंगचा थरारक अनुभव!

नवशक्ती Web Desk

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

घनदाट जंगल, दाट धुक्याची चादर आणि खळखळणारे प्रवाह... पावसाळ्यात स्वर्गासमान होणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील 'टिकळेश्वर' या अद्भुत देवस्थानाचा आणि तिथल्या निसर्गरम्य ट्रेकिंगचा थरारक अनुभव!

वनश्रीने नटलेला रत्नागिरीतील संगमेश्वर तालुका. हिरव्यागार डोंगररांगांनी संगमेश्वरला कवेतच घेतलं आहे. या भागावर पावसाळ्यात निसर्गदेवता अशी जादुई कांडी फिरवते की हा भाग स्वर्गासमान होऊन जातो. इथलं घनदाट जंगल पावसात चिंब चिंब भिजून जातं. ओलेत्या झाडांवरून पाण्याचे थेंब जमिनीवर अलवार ठिबकत असतात. पाण्याचे प्रवाह खळखळत वाहतात. दाट धुक्याचा पदर या भागावर पसरलेला असतो. काहीसं गूढ वातावरण इथे जाणवतं. ही पावसाळ्याची किमया बघायची असेल तर संगमेश्वर तालुक्यातील देवरूख या गावी जावं. देवासारखेच असंख्य पुराणवृक्ष या गावात आहेत. देवराई, मंदिरं इथे आहेत. पावसाळ्यात हा परिसर अगदी भिजून जातो. इथे फिरताना वेळ थांबली आहे असंच वाटतं. या गावाच्या भवताली असणारे डोंगर तर अगदी धीरगंभीर तपस्वीसारखे भासतात. इतकी शांतता या गावात आहे.

या गावापासून अगदी २० मिनिटांच्या अंतरावर एक देवस्थान आहे जे डोंगरावर आहे. टिकळेश्वर नावाने त्याची ख्याती आहे. मागच्या वर्षी पावसाळ्यात देवरुखात गेले होते तेव्हा टिकळेश्वरला ठरवून जाऊन आलेच. आणि तिथला निसर्गाचा आविष्कार पाहून थक्क झाले होते. टिकळेश्वर हे मार्लेश्वरच्या डोंगररांगेला असणारं अद्भुत ठिकाण. तिथे पोहोचण्याचा रस्ताही फार सुरेख. पावसात भिजून गेलेली गावं वाटेत लागतात. एका ठिकाणी तर रस्ता भातशेतींच्या मधून जातो. दोन्ही बाजूला भातशेतीचे मळे दिसत होते. मी गेले होते तेव्हा चिखलणी सुरू होती. म्हणजे शेतात बैलजोडी उतरवून भातलावणी करण्यासाठी चिखल घुसळणं सुरू होतं. मी त्या जागी थांबून हे दृश्य पाहतच राहिले. बाजूच्या एका छोट्या टेकडीवरून पाणी शेतात वाहत येतं आणि या पाण्यावर भातशेती केली जाते.

याच टेकडीच्या मागे एक मोठा डोंगर आहे. तोच डोंगर टिकळेश्वरचा. टेकडीला वळसा घातला आणि एक चिंचोळी घाटी चढून आम्ही टिकळेश्वरच्या पार्किंग जवळ पोहोचलो. हा डोंगर चढायला छान पायऱ्या केल्या आहेत. त्या पायऱ्या चढायला सुरूवात केली आणि एका अद्भुत जागी जात आहे याचा प्रत्यय येऊ लागला. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला झुडुपे, वेली वाढल्या होत्या. पावसामुळे हे रान ओलेचिंब झालं होतं. एकूण किती पायऱ्या आहेत याची कल्पनाच नव्हती. पण वर पोहोचायला अर्धा तास लागतो असं समजलं होतं. जसजसं वर जाऊ लागले तसं वाटेवर धुकं पसरू लागलं. अजून वर गेले आणि धुक्याच्या राज्यात पोहोचले आहे असंच वाटलं. एकदम दाट दाट धुकं चहूबाजूला होतं. पावसाची बारीक सर येऊन गेली आणि हे धुकं विरून जाऊन टिकळेश्वरच्या पायथ्याचे काय अफाट दृश्य दिसलं म्हणून सांगू!! मी इतक्या उंचीवर होते की खाली दरीत पाहिल्यावर डोळे गरगरायचे. ही दरी घनगर्द झाडीने व्यापलेली होती. नजर जाईल तिथे फक्त हिरवाई आणि हिरवाईच.

हे दृश्य डोळ्यात साठवलं आणि शेवटचा टप्पा चढायला घेतला. हा टप्पा मात्र कच्च्या वाटेचा आणि पावसामुळे किंचित निसरडा झाला होता. हा टप्पा पार केला आणि समोर एक गुहा दिसली. आत जाऊन पाहते तर त्यात पाण्याच्या टाकी खोदलेल्या दिसल्या. खडकातून पाणी निथळून त्या टाक्यात पडत होतं. आणि त्या टपटपीचा नाद त्या गुहेत गुंजत होता. इथे बरेचदा बिबट्या दिसतो असं समजलं.

या गुहेच्या डाव्या बाजूने गेल्यावर मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या चढल्या आणि धुक्यात हरवलेला ‘हर हर टिकळेश्वर’ नावाचा फलक दिसला. मी डोंगराच्या उंच टोकावर असणाऱ्या मंदिरात उभी होते. मंदिर प्रशस्त, नव्या बांधकामात आहे. चारी बाजूनी खुलं असल्याने मंदिरातही धुकं पसरत होतं. तिथल्या कट्ट्यावर बसल्यावर जाणवलं की, आपल्या आजूबाजूला धुक्याची भिंत तयार झाली आहे. खालचं, अगदी पाच फूट अंतरावरचं काही दिसत नव्हतं. आकाशात तरंगणाऱ्या बेटावर आली आहे असंच वाटलं! गाभाऱ्यात महादेवाची पिंडी आहे. बाहेर एक नंदी. त्याच्या बाजूला दोन समाधीस्थळ. हा डोंगर हरपुडे, बेलारी आणि तळवडे या तीन गावांच्या सीमेवर आहे, त्यामुळे या डोंगराला टिकळेश्वर नाव देण्यात आलं.

मंदिरात बराच वेळ थांबले. तिथून निघणार इतक्यात पावसाच्या सरी आल्या. पुन्हा बराच वेळ मंदिरात थांबले. खरंतर इथून पाय निघतच नव्हता. तिथली शांतता, प्रसन्न वातावरण कायमचं मनात राहिलं. साधारण तासभर मंदिरात थांबून तिथून निघाले. वाटेत हरपुडे गावातील स्त्रिया वर येताना दिसल्या. मी आपली शूज घालून पाय सांभाळत वाट उतरत होते तर त्या साध्या चपला घालून सर सर वाट चढत होत्या. मला पहिल्यांदा वाटलं त्या दर्शनासाठी येत असाव्यात. तर त्या स्त्रिया दर्शनासाठी तर येतच होत्या, शिवाय डोंगरावरची रानभाजी खुडायला त्या इतक्या पायऱ्या चढून आल्या होत्या. गाणी म्हणत, गप्पा मारत या सगळ्या मैत्रिणी ‘फोडशी’ नावाची रानभाजी खुडायला जात होत्या. इतक्या पायऱ्या चढून भाजी आणायची म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर सोस नव्हता तर मैत्रीचा आनंद पसरला होता. मंदिराच्या मागे एक माचीसारखा भाग आहे, तिथे ही भाजी मिळते असे त्यांनी सांगितलं.

त्यांचा निरोप घेतला आणि मी पायऱ्या उतरून खाली आले. पुन्हा एकवार डोंगराकडे पाहिलं. टिकळेश्वरचा सुळका अजूनही धुक्यात बुडालेला होता. तिथे वरती स्त्रियांनी भाजी खुडायलाही सुरुवात केली असेल. रात्री ही भाजी त्या चुलीवर फोडणीला घालतील. रानातल्या भाजीचा दरवळ त्यांच्या घरात दरवळू लागेल. रात्री बिबट्या त्या गुहेत पाणी प्यायला येईल. रात्री मंदिरात कसं वातावरण असेल असे नानाविचार त्या डोंगराकडे पाहताना आले. टिकळेश्वरचा अनुभव मन अगदी प्रफुल्लित करणारा होता.

ज्यांना ट्रेकिंगची (Trekking) आवड आहे, निसर्गाची विविध रूपं, पावसाचे सोहळे बघायला आवडतात, महादेवासमोर बसून नामजप, ध्यान करू इच्छितात त्यांनी एकदा तरी टिकळेश्वरला जायलाच हवं.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

Mumbai : बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

पाकिस्तानातील क्वेट्टा येथे भीषण स्फोट; रेल्वे ट्रॅकजवळील हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

Bhayandar : पोलिसांकडूनच वृक्षतोड; उत्तनमधील प्रकार, पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार