प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची गरज भासते. पूर्वी घरगुती आणि नैसर्गिक पाचक पेयांनी ही गरज पूर्ण होत असे- चव, आरोग्य आणि परंपरा यांचा सुंदर संगम घडवत. या पारंपरिक पेयांचा माहितीप्रवास.
आज आपल्या खाद्य प्रवासात आपण काही चविष्ट आणि रणरणत्या उन्हाळ्यात शरीराला उपयुक्त पेयांची माहितीयुक्त सफरच करणार आहोत.
उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाने शरीराची काहीली होऊ लागली की, सुकलेल्या गळ्याला थंडावा देण्यासाठी आपण थंड पेयाकडे वळतो. तसंही आपल्या जीवनात, वर्षाचे हिवाळ्यातील दोन-तीन महिने सोडले तर सदाचाच उन्हाळा असतो म्हणा. मग अगदी तयार शीतपेयांपासून गाडीवरच्या बर्फाच्या गोळ्यापर्यंत स्वाहा करून आपल्यापरीने शरीराला पोटाला थंडावा देण्याचा प्रयत्न करतो.
फ्रीजमध्ये भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या पटापट रिकाम्या होतात. या पाण्याने, शीतपेयांनी तेवढ्यापुरती तहान भागते, पण थोड्याच वेळात पुन्हा शोष लागतो.
फ्रीज उपलब्ध नव्हते किंवा सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते तेव्हा घरोघरी मातीचे माठ थंड पाण्याने आपली तहान भागवत होते. इतकंच नव्हे, तर फ्रीजचं पाणी पिऊन होणारा सर्दी-खोकला माठातल्या पाण्याने होत नव्हता, कारण माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड होतं. पूर्वी अगदी साध्या रूपात दिसणारा हा माठ आज विविध आकर्षक रूपात अगदी नळासहित बाजारात उपलब्ध असतो.
पूर्वी घरात बनणारी सरबतं उन्हाचा त्रासही कमी करत होती, खर्चाची बचतही आणि Preservative विरहित असल्यामुळे त्यांचे दुष्परिणामही भोगावे लागत नव्हते.
घरगुती सरबतांत लिंबू सरबत हे अगदी आजही आपली उपयुक्तता टिकवून आहे. आजही उन्हाळ्यात स्वस्त मस्त आणि शरीराला तंदुरुस्त ठेवणारं हे सरबत. लिंबू हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणारं आहे. उन्हाळ्यात ताजंतवानं राहण्यासाठी लिंबू सरबत हे उत्तम पेय आहे. याचबरोबर अतिसार, जुलाब होत असतील तर लिंबू सरबत पोटातील संसर्गदोष आणि येणारा अशक्तपणा कमी करतं.
अगदी अचानक पाहुणे मंडळी घरी आली की, समोर आलेलं हेच लिंबू सरबत पाहुण्यांचा प्रवासाचा शीण कमी करून त्यांना ताजंतवानं करतं.
कोकम सरबत हेसुद्धा उन्हाळ्यासाठी एक उत्तम आणि चविष्ट पेय आहे. आज कोकम आगळ हे बाजारात (साखरयुक्त/ साखरेशिवाय) सहज उपलब्ध आहे. पूर्वी कोकणात कोकम किंवा रातांब्यांचं आगळ उन्हाळ्यासाठी मुद्दाम बनवला जायचा. मोठाल्या काचेच्या बरणीत रातांबे किंवा कोकमांचा थर, त्यावर साखर, मीठ, त्यावर पुन्हा कोकम रातांबे थर अशी बरणी वरपर्यंत भरून तिला अनेक दिवस ऊन दाखवायला अंगणात ठेवली जायची. आतल्या सगळ्या घटकांचा एकमेकांशी छान संयोग होऊन हे कोकम आगळ किंवा रातांबे आगळ तयार व्हायचा. कुणी उन्हाचं अचानक आलं की, पेला भरून आणि जिरं लावून हे सरबत दिलं जायचं. कोकम सरबत हे पित्तशामक असल्यामुळे पचन सुधारतं आणि उष्णतेपासून शरीराचा बचाव करतं. कोकमाची सोलकढीसुद्धा शेवटच्या भातावर किंवा तशीच प्यायला अत्यंत चविष्ट लागते.
कोकणात पूर्वी उन्हाळी ताप, कणकण असल्यावर किंवा ताप येऊन गेल्यावर किंवा अगदी वर्षभरसुद्धा सकाळच्या न्याहारीला उकड्या तांदळाची पेज किंवा निवळ (पेजेचं पाणी) दिला जायचा.
ग्लासभर निवळ त्यात चमचाभर घरचं तूप आणि मिठाची कणी हे प्राशन केलं की, दोन-तीन तास भूक लागत नसे. पेजेसोबत जीभेची गेलेली चव येण्यासाठी आमली (मिठातली कैरी) किंवा लिंबाचं लोणचं. तापामुळे आलेला अशक्तपणा थकवा, पेज आणि निवळ भरून काढायचे. पचायला हलकी असणारी ही पेज आणि निवळ बनवण्यासाठी घरांत उकडे तांदूळ साठवून ठेवलेले असायचे.
धने-जिरे पाणी हे तर उन्हाळ्यात संजीवनी देणारं सोपं घरगुती पेय आहे. रात्री पातेलंभर पाण्यात दोन दोन चमचे धने-जिऱ्याची पावडर टाकून ते पाणी खळखळून उकळायचं आणि रात्रभर झाकून ठेवून द्यायचं. सकाळी अनशापोटी ग्लासभर पाणी तसंच किंवा त्यात थंड दूध घालून प्यायल्यावर खूप ताजतवानं वाटतं. साखर घालणं न घालणं आपल्यावर अवलंबून आहे. या पेयामुळे शरीरातील उष्णता कमी होते, पोट साफ होतं, पचनसंस्था सुरळीत होते.
आंब्याचं पन्ह हेसुद्धा उन्हाळ्यासाठी एक चविष्ट आणि शरीराला थंड ठेवणारं उत्कृष्ट पेय आहे. अनेक घरांत कैरीचा गर काढून आणि त्यात गूळ, जिरं, काळं मीठ हे घटक टाकून, हे मिश्रण हवाबंद बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलं जातं. गरजेनुसार दोन चमचे हे मिश्रण ग्लासमध्ये घेऊन त्यात थंड पाणी घातलं की तत्काळ चविष्ट पन्ह तयार होतं. पचन सुधारणारं, ऊर्जा वाढवणारं आणि शरीराला निर्जलीकरणापासून वाचवणारं हे पेय आहे. पन्ह आणि आंबेडाळ हे पदार्थ प्रामुख्याने उन्हाळ्यात (चैत्र महिन्यात), विशेषतः गुढीपाडवा आणि चैत्र गौरीच्या हळदी-कुंकवाच्या वेळी दिले जातात. कैरीच्या हंगामात हे थंड पेय आणि आंबट-गोड डाळ शरीराला थंडावा देण्यासाठी उत्तम मानले जातात.
उसाचा रस किंवा गन्ने का रस किंवा शुगरकेन ज्यूस हे एक नैसर्गिक, पौष्टिक आणि ऊर्जा देणारं पेय आहे. कावीळ या आजारावर उसाचा रस हा अत्यंत गुणकारी आहे, कारण यामध्ये नैसर्गिक साखर आणि पोषक तत्त्व असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून आजार वेगाने बरा करतात. नैसर्गिक साखरेमुळे उसाचा रस थकवा त्वरित दूर करून भरपूर ऊर्जा देतो.
शहाळ्याचं मधुर पाणी हे एक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण नैसर्गिक पेय आहे, जे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवतं आणि हृदयाच्या आरोग्याला आधार देतं. नारळपाण्यात ९५% पाणी असतं, ज्याचं सेवन किडनी स्टोनपासून बचाव करतं. सकाळी रिकाम्यापोटी शहाळ्याचं पाणी पिणं शरीरासाठी अत्यंत
फायदेशीर आहे, ज्यामुळे पचन सुधारतं आणि ऊर्जेची पातळी वाढते.
आवळा सरबत हेसुद्धा एक चवदार सरबत उन्हाळ्यात शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आवळ्यामध्ये सी व्हिटामिन असल्यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गापासून आपला बचाव होतो.
अशी अनेक घरगुती चविष्ट सरबतं आपल्या शरीराचा उन्हाळी त्रासापासून बचावही करतात आणि चवीचा आनंदही देऊन जातात. आज ही सरबतं घरी बनवणं कधीच मागे पडलंय, कारण घरगुती या शीर्षकाखाली बाजारात लिंबू, कोकम, पन्ह ही सरबतं सहज उपलब्ध आहेत. निवळ, धनेजिरे पाणी, पेज याबद्दल तर आजची पिढी अनभिज्ञ आहे. सांगायला बहुतेक घरांत ज्येष्ठ व्यक्ती कुणीच नाही आणि असलीच तर त्यांच्या सांगण्यावर “शीऽऽऽऽ मला नको....” ही प्रतिक्रिया येते किंवा तोंड वाकडं केलं जातं. कारण या वेगवान आयुष्यातील आजच्या जमान्यात तयार शीतपेयांतून श्रम न करता, काही वेळ तरी जलद आराम मिळतो, त्याचे वाईट परिणाम कुणीच विचारात घेत नाही. मोठमोठे शीतपेयांचे ब्रँड अगदी शाळकरी मुलांपासून आजच्या पिढीला आपल्या कल्पक जाहिरातींमधून लालचावत असतात. बाटलीचं बुच उघडलं आणि आतलं गोडगोड सरबत नाकातून झिणझिण्या येत गटगट मुखात सोडलं की झाऽऽऽलं....
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com