'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

बरण्यांत साठवलेला पाऊस

पावसाळ्याची चाहूल लागली की घराघरांत साठवणीच्या पदार्थांची लगबग सुरू व्हायची आणि अंगणापासून ओटीपर्यंत सुगंध दरवळायचा. पापड-कुरडयांच्या निमित्ताने शेजारणी जमायच्या, गप्पा रंगायच्या आणि चवीसोबत नात्यांचाही साठा व्हायचा.

नवशक्ती Web Desk

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

पावसाळ्याची चाहूल लागली की घराघरांत साठवणीच्या पदार्थांची लगबग सुरू व्हायची आणि अंगणापासून ओटीपर्यंत सुगंध दरवळायचा. पापड-कुरडयांच्या निमित्ताने शेजारणी जमायच्या, गप्पा रंगायच्या आणि चवीसोबत नात्यांचाही साठा व्हायचा.

हे सगळे जेवणात जिभेला चव आणणारे पदार्थ पूर्वी बाहेरून आणले जात नव्हते आणि घरगुती या नावाखाली फारसे मिळतही नव्हते.

पावसाळा जवळ आला की, हे साठवणीचे पदार्थ करण्याची गडबड प्रत्येक घरात सुरू व्हायची. घरातले पितळी, पत्र्याचे डबे, चिनीमातीच्या लहान-मोठ्या बरण्या, सट स्वच्छ धुवून उन्हात कोरडे व्हायला ठेवले जायचे. तेव्हा पाऊसही शहाण्या मुलासारखा जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात हजर व्हायचा, त्यामुळे महिना-दीड महिना आधी ही सगळी तयारी घरोघरी सुरू व्हायची.

पापड, कुरवडयाचा कच्चा माल बाजारातून घरात उतरायचा, तर हिरव्यागार रसरशीत करकरीत कैऱ्या, काही लोणच्यासाठी, थोड्या मोरांब्यासाठी तर काही गुळांब्यासाठी घरोघरी दाखल व्हायच्या आणि एक दिवस सख्खे शेजारी स्त्रियांच्या सोयीने नक्की व्हायचा. एक दिवस पापड वाळवणासाठी आणि दुसरा कुरडया, चिकोड्या यांच्यासाठी.

घरातली कामं आटोपून, जेवणं आटोपून शेजारी सख्या पोळपाट-लाटणीसह वर्तमान हजर व्हायचा. सगळ्या मांडी घालून आणि समोर पोळपाट ठेवून स्थानापन्न व्हायच्या. घरची गृहिणी पापडाच्या छान मळलेल्या आणि मस्त रंग आलेल्या पिठाच्या गोळ्यातून थोडा भाग काढून आणि तो पुन्हा एकदा मळून त्याची लांब सुरनळी करत असे आणि विळीवर किंवा पायाच्या अंगठ्याला दौऱ्याचं एक टोक गुंडाळून आणि राहिलेला अर्धा दोरा पिठाच्या सुरनळीला एक फास टाकत त्याच्या लहान पेढ्याएवढ्या लाट्या पाडत असे. पहिली एक एक लाटी गोड्या तेलात बुडवून सगळ्या स्त्रिया, लाट्यांवर नजर ठेवून असलेली मुलं-मुली यांच्या मुखात जायची. पापडखार, मिरची यांचा जीभखवळणारा वास नाकात जायचा आणि जीभखवळून उठायची. पीठ कसं मळलं गेलंय, चव कशी झालीय याची चर्चा व्हायची आणि पापड लाटण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. घरातली पुरुष मंडळी कामावर गेलेली असताना, घरात स्त्रियांचे राज्य असायचे आणि पापड लाटण्याची मोहीम उत्साहात सुरू व्हायची. स्वच्छ जमिनीवर चटई आणि जुनी सुती साडी ताणून वाळवण्यासाठी बिछाना तयार केला जायचा. शाळकरी मुली लहान लाट्या लाटून अनुभवी स्त्रियांकडे सोपवत आणि नंतर उत्साहाने ते पापड सुपावर, कागदावर किंवा दादराच्या घराशेजारील पत्र्यावर वाळत घालत. कावळे, चिमण्या आणि पाळीव प्राण्यांपासून पापडांचे रक्षण करण्यासाठी वयस्कर स्त्री काठी घेऊन पहारा देई किंवा साडीचा शेव त्यावर पसरला जाई. कामाच्या दरम्यान चहा-खाण्याचा ब्रेक होई. पाय वळले तरी एक पाय लांब करून स्त्रियांचे हात सतत चालत राहत. गप्पा, हास्य-विनोद आणि बातम्यांमुळे कामाचा थकवा जाणवत नसे. सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व आटोपून चहा घेत स्त्रिया घरी परतत. दिवसभराच्या उन्हाने पापड कुरकुरीत वाळायचे आणि अपुरे वाळलेले पापड दुसऱ्या दिवशी पुन्हा ऊन दाखवून पितळेच्या डब्यात सुरक्षित बंदिस्त केले जात.

दुसऱ्या दिवशी कुरडया, चिकोड्या वाळत घालण्याचा कार्यक्रम व्हायचा. साडीवर लांबलचक प्लास्टिक अंथरून त्यावर साबुदाण्याच्या चिकोड्या, गव्हाच्या कुरडया वाळत घातल्या जायच्या. गव्हाच्या कुरडया घालण्यापूर्वी दोन दिवस आधी बरीच झंझट असायची. गहू भिजवणे, त्याचा चीक काढणे, तो गाळून घेणे, त्याची उकड शिजवणे आणि तो पारदर्शक झाल्यावर त्याच्या कुरडया प्लास्टिकवर थोड्या थोड्या अंतरावर घालणे.

पापडानंतर लोणचे, मुरांबा आणि गुळांबा बनवण्याचा नंबर असायचा. कुणी विळीवर कैऱ्या फोडताना, तर कुणी किसताना कैरीच्या आंबट फोडींचा आस्वाद घेतला जाई. कैरीच्या फोडी लोणच्याचा मसाला लावून चिनी मातीच्या बरण्यांत भरल्या जात, तर मुरांबा-गुळांबा थंड झाल्यावर लहान बरण्यांत ठेवला जाई. बरण्यांना कपड्याचा दादरा बांधून त्या फडताळात सुरक्षित ठेवल्या जात, ज्या थेट पावसाळ्यातच उघडल्या जात. या साठवणीवर घरातील ज्येष्ठ स्त्रीची कडक नजर असे; तीच सटात लोणचे-मुरांबा काढून देई. 'एकमेकां साह्य करू' या तत्त्वाने ही कामे झाल्यावर खलबत्त्यात लसूण, शेंगदाणा, कढीपत्ता व कारळ्याच्या सुक्या चटण्या कुटून बरण्यांत भरल्या जात.

तसेच, पावसाळ्यात मासेमारी बंद असताना सामिषाहारींसाठी सुके बांगडे, बोंबील आणि सुंगटांची बेगमी पत्र्याच्या डब्यांमध्ये करून ठेवली जाई.

हे सगळं बनवताना स्वच्छता ही गोष्ट कसोशीने पाळली जायची. पापड विभागात उडदाचे, पोह्याचे, तांदळाचे पापड, मिरगुंड बनायची.

पावसाळा सुरू झाला की सगळीकडे छान थंड वातावरण असायचं. अशा गार वातावरणात, गरमागरम भात, कुळथाचं पिठलं, भाजलेला पापड आणि सोबत लालभडक कैरीचं अथवा लिंबाचं लोणचं समोर यायचं आणि भूक खवळून उठायची. घास मटामट मुखात जाऊ लागायचे. पोट आणि मन तृप्त व्हायचं.

मासे खाण्याची तीव्र इच्छा उफाळून आली की एखादा बांगडा काढायचा आणि खरपूस भाजून त्यावर खोबरेल तेल टाकून भात, डाळीची आमटी सोबत खायचा किंवा सुक्या सुंगटाची कीसमुर चपाती सोबत खाऊन तृप्त व्हायचं.

श्रावण महिन्यात शनिवार, सोमवारी अथवा सणावाराला गोडधोडाच्या जेवणात मुरांबा, शेंगदाण्याची चटणी, पोह्याचा पापड, कुरडया यांनी जेवणाची चव अजून वाढून जायची. वेळेला भाजीची जागाही हे मुरांबे, चटण्या भरून काढायचे. हे सगळे पदार्थ का बनायचे, तर पावसाळ्यात भाज्या आणलेल्या नसल्या, संततधार पावसामुळे भाजीबाजारात जाणं झालं नाही, अशावेळी हे पदार्थ मदतीला धावून यायचे. आज हे सगळं फारसं कुणी करत नाही, कुणाला तेवढा वेळही नाही आणि आजच्या पिढीला या चवीची ओळख आणि आवडही नाही आणि त्यातूनही हवंच असेल तर हे सगळे प्रकार घरगुती या नावाखाली विकत मिळतात. मग कशाला उगीच एवढा वेळ खर्च करायचा आणि शरीराला त्रास करून घ्यायचा ?

हे सगळं निगुतीने कौतुकाने आणि प्रेमाने करणारे ते हातही गेले आणि ती पिढीही. कालाय तस्मै नमः हेच खरं, दुसरं काय...

लेखक, निवेदक, कवी

kprasad1959@gmail.com

Mumbai : ३७ हजार फेरीवाले 'नॉट रिचेबल'; QR कोड आधारित ओळखपत्रासाठी ३१ ऑगस्ट अखेरची तारीख

Mumbai : चणे-फुटाण्याच्या प्रसादात 'ऑरामाईन'चा वापर? कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका; नगरसेवकाचे महापौरांना पत्र

जयगड बंदरातील जहाजातून LPG गॅसचा तातडीने उपसा करा; उच्च न्यायालयाचे सरकारी यंत्रणांना आदेश

Mumbai : मोनोरेल सप्टेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता; महालक्ष्मी ट्रॅव्हलेटर स्कायवॉकही खुला होणार

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर लोकल सेवांवर परिणाम