उड्यांचा ऑलिम्पिक प्रवास 
अक्षररंग

उड्यांचा ऑलिम्पिक प्रवास

उड्या मारताना फक्त मजाच येते की त्यातून एखादा नवा खेळही जन्माला येऊ शकतो? एका सोळा वर्षांच्या मुलाच्या मनात आलेल्या भन्नाट कल्पनेतून तयार झालेलं ट्रॅम्पोलिन आज ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलं आहे! या उड्यांच्या खेळाचा शोध नेमका कसा लागला, जाणून घेऊया!

नवशक्ती Web Desk

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

उड्या मारताना फक्त मजाच येते की त्यातून एखादा नवा खेळही जन्माला येऊ शकतो? एका सोळा वर्षांच्या मुलाच्या मनात आलेल्या भन्नाट कल्पनेतून तयार झालेलं ट्रॅम्पोलिन आज ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलं आहे! या उड्यांच्या खेळाचा शोध नेमका कसा लागला, जाणून घेऊया!

बागेत गेल्यावर कित्येकदा आपण मुलांना एका खेळण्यावर उड्या मारताना बघत असतो. मुलांनी उडी मारली की ती मात्र उंच उडतात आणि मग अलगद खाली आल्यावर ते खेळणं त्यांना पुन्हा उंच उडवतं! मुलांचा नुसता दंगा सुरू असतो अशावेळी! खूप मजा येत असते त्यांना. हे असं व्यायाम आणि मजा, दोन्हीचा अनुभव देणारं खेळणं म्हणजे ट्रॅम्पोलिन! ट्रॅम्पोलिन हा जिम्नॅस्टिक खेळाचा एक प्रकार म्हणून ओळखला जातो.

या ट्रॅम्पोलिनचा शोध कसा लागला असेल बरं? अशाच उड्या मारणाऱ्या मुलाने शोधून काढला असेल का हा खेळ?

तर चक्क याचं उत्तर ‘हो’ असं सापडलं! १९३० च्या दशकात जॉर्ज निसेन आणि त्याचे प्रशिक्षक लॅरी ग्रिसवोल्ड यांनी या ट्रॅम्पोलिनची निर्मिती केली! गंमत अशी झाली की, सोळा वर्षांचा जॉर्ज आयोवा येथे सर्कस बघायला गेला होता. तिथे सर्कशीतल्या विदूषकांना उड्या मारताना बघून त्यांना ही कल्पना सुचली. तिथे झोपाळ्यावरचे (Trapeze) कलाकार/विदूषक उंचावरून खाली लावलेल्या सुरक्षा जाळीवर उड्या मारत होते आणि त्या जाळीवरून पुन्हा वर उसळून कसरती करत होते. हे पाहून निसेन यांना कल्पना सुचली की, जर असेच उसळी देणारे एखादे उपकरण बनवले, तर जिम्नॅस्टिक्सच्या सरावासाठी ते खूप उपयोगी ठरेल. घरी आल्यावर निसेन यांनी चक्क आपल्या पलंगाची चौकट मोडून पहिल्यांदा हे ट्रॅम्पोलिन तयार करण्याचा प्रयत्न केला. मुळात जॉर्ज खेळाडू असल्यामुळे त्यांना व्यायामाची मनापासून आवड होती. असं एखादं खेळातील उपकरण, ज्यावर खेळताना मजाही येईल आणि व्यायामही होईल, असं त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी वाटलं. याचं त्यांच्या प्रशिक्षकांना कौतुक वाटलं आणि त्यांनी मग जॉर्ज आयोवा विद्यापीठात शिकत असताना हे ट्रॅम्पोलिन तयार करायला मनापासून मदत केली. मजबुतीसाठी लोखंडी पट्ट्या, उसळी मारण्यासाठी मदत व्हावी म्हणून टायरच्या आतील रबरी ट्युब्ज असा सगळा खटाटोप करून पहिले असे ट्रॅम्पोलिन तयार झाले.

सुरुवातीला निसेन याला ‘बाऊन्सिंग रिग’ म्हणत असत. १९३७ मध्ये पदवी घेतल्यानंतर ते आपल्या मित्रांसोबत या उपकरणाचे प्रयोग दाखवत अमेरिका आणि मेक्सिकोचा दौरा करत होते. मेक्सिकोमध्ये असताना त्यांनी स्पॅनिश भाषेतील ‘एल ट्रॅम्पोलिन’ (El Trampolin) हा शब्द ऐकला, ज्याचा अर्थ ‘डायव्हिंग बोर्ड’ (पाण्यात उडी मारण्याची फळी) असा होतो. निसेन यांना हे नाव खूप आवडले आणि त्यांनी इंग्रजीत त्याचे स्पेलिंग बदलून ‘Trampoline’ या नावाने ट्रेडमार्क नोंदवला, अशी रंजक माहिती नोंदवली गेली आहे. पुढे ट्रॅम्पोलिनला अधिक मजबूत करण्यात आले. निसेन यांनी तर या उपकरणाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी खूप गमतीदार युक्त्या वापरल्या! ट्रॅम्पोलिन लोकप्रिय करण्यासाठी निसेन यांनी १९६० मध्ये न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये चक्क एका जिवंत कांगारूसोबत ट्रॅम्पोलिनवर उड्या मारत फोटो काढले होते, ज्याची जगभर चर्चा झाली आणि मग हळूहळू हा खेळ सगळ्यांचा आवडता झाला. अमेरिकी नौदलाच्या सैनिकी प्रशिक्षणासाठी आणि नासाच्या अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठीदेखील याचा वापर व्हायला सुरुवात झाली! निसेन यांच्या अथक प्रयत्नांनंतर २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्सचा अधिकृत खेळ म्हणून समावेश झाला. ट्रॅम्पोलिनवर उड्या मारल्याने व्यायाम होतो, हवेत उसळी मारून खाली येताना शरीराचा तोल सांभाळण्याचा सराव होतो आणि मजा येते, ते वेगळेच! ऑलिम्पिकमध्ये खेळताना मग या खेळासाठीचे अर्थातच नियमदेखील ठरवण्यात आले. एका खेळाडूला किमान दहा उड्या मारणे बंधनकारक असते आणि शेवटच्या उडीला ट्रॅम्पोलिनच्या मधोमध सरळ येऊन उभे राहता आले पाहिजे! पुढे या उपकरणात बरेच बदल करण्यात आले आणि ते अधिक सुरक्षित करण्यात आले! आता ट्रॅम्पोलिनवर उड्या मारताना या खेळाची मजा तर जरूर घ्यायची, पण सुरक्षितपणे न पडता उभं राहायलादेखील विसरायचं नाही!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@ gmail.com

Mumbai : १६ हजार बॅनर्सवर कारवाई; दीड महिन्यांत मात्र केवळ १७ जणांवर गुन्हे दाखल

महाविकास आघाडीत शरद पवार गट लक्ष्य; ठाकरे गट आणि काँग्रेसची जोरदार टीका

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

पूर्वसूचना न देता सरकारविरुद्ध दावा दाखल करता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान'; ९ जागांसाठी २९ उमेदवार; सोमवारी मतमोजणी