विशेष
शिरीन कुलकर्णी
शेखबाईंच्या जाण्याने मराठी भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि प्रमाणभाषा, व्याकरण व शुद्धलेखनाचा आग्रह आयुष्यभर जपणाऱ्या एका समृद्ध परंपरेचा आधार हरपला आहे. त्यांच्या सहवासात लाभलेले भाषेचे संस्कार, शिकवण्याची पद्धत, बारकाव्यांकडे पाहण्याची दृष्टी आणि माणूस म्हणून लाभलेली माया आजही मनात तितकीच जिवंत आहे. त्यांच्या आठवणी जाग्या होताच शुद्ध-अशुद्ध मराठीचा प्रत्येक संदर्भ त्यांची प्रकर्षाने आठवण करून देतो. त्यांच्या कार्याचा आणि सहवासाचा हा स्मरणलेख...
शेखबाईंविषयी लिहावं म्हटलं; तर कुठून सुरुवात करावी, हे कळेना. मग वाटलं की, प्रत्येक क्षणी कुठे ना कुठे अशुद्ध लिहिलेलं वाचलं, चुकीचं बोललेलं ऐकलं; की बाईंची आठवण येतेच आपोआप!
माझ्यावर शुद्धलेखनाचे जे संस्कार झाले; ते प्रथम आईवडील, नंतर बालमोहनसारखी शाळा आणि नंतर केवळ दोन वर्षांचा बाईंचा सहवास! बाईंच्या जिभेवर व्याकरणाचे नियम असत. केव्हाही कोणतीही शंका विचारली; तरी अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगत असत.
मला आठवतं, माझी मुलाखत घेताना बाईंनी मला व्याकरणातले अनेक सोपे प्रश्न विचारले. माझी पार्श्वभूमी थोडीबहुत तयार होती; त्यामुळे मी बरीचशी उत्तरं देऊ शकले. त्यांनी मला विचारलं, “सामान्यरूप म्हणजे काय?” मी सांगितलं, “कोणत्याही शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडलं गेल्यावर त्या शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो, त्याला सामान्यरूप म्हणतात.” बाई म्हणाल्या, “बरोबर. पण उदाहरण सांग.” मी पोपटासारखं सांगितलं, “झाडावर, झाडाखाली या शब्दांमध्ये झाड या शब्दाला वर, खाली ही शब्दयोगी अव्ययं जोडली गेल्यावर झाड या शब्दात ‘झाडा’ असा बदल झाला.” त्या म्हणाल्या, “अगदी बरोबर. पण मग झाड या शब्दाला विभक्तिप्रत्यय लावून बघ बरं.” मी मनातल्या मनात लावून बघितला आणि स्वतःशीच म्हटलं, “अरेच्चा! खरंच की!” त्यादिवशी डोक्यात सामान्यरूप फिट्ट बसलं.
बाईंनी लिहिलेली पुस्तकं पाहिली, तरी त्यांचा व्याकरणाचा, किंबहुना शुद्धलेखनाचा प्रचंड अभ्यास सहज लक्षात येईल. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही दोन्ही पुस्तकं नुसती चाळून जरी पाहिली, तरी त्यांच्या अफाट अभ्यासाचा आवाका केवढा मोठा आहे, हे सहज लक्षात येईल. त्यामुळे त्यांनी त्यासाठी घेतलेले कष्ट आणि ‘मराठी शब्दलेखनकोशा’च्या मुखपृष्ठावर अगदी वर ‘मराठी लिहा अचूक’ ही ओळ त्यांच्या मराठी भाषेवरील नितांत प्रेमाची जाणीव करून देते.
आज जेव्हा वेगवेगळ्या समाजमाध्यमांमध्ये लिहिलं आणि बोललं जाणारं अशुद्ध मराठी बघते; तेव्हा बाईंची फार आठवण येते. प्रमाणभाषा कशी लिहिली पाहिजे, याबाबत त्या खूप कळकळीने बोलत असत.
बाईंनी व्याकरणतज्ज्ञ म्हणून अनेक ठिकाणी काम केलं, लेख लिहिले. ‘अंतर्नाद’सारख्या दर्जेदार मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून अनेक वर्षं काम केलं.
दोनच वर्षं बाईंबरोबर मिळाली, पण तेवढ्यात खूप काही शिकायला मिळालं. प्रश्नपत्रिका कशी तयार करावी, प्रश्नांची रचना कशी असावी, सुभाषितवजा ओळी संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी का देऊ नयेत, निबंधाचे विषय कसे वेगवेगळ्या प्रकारचे असावेत, हे सगळं बाईंकडून शिकले. वर्गात शिकवताना एकदम धडा किंवा कविता शिकवायला सुरुवात करू नये, त्यांची प्रस्तावना कशी करावी, लेखकाची किंवा कवीची माहिती कशी सांगावी, त्यांचं इतर लेखन काय आहे, ते सांगून मुलांना वाचनाला प्रवृत्त कसं करावं; हे सारं सारं बाईंनी शिकवलं आणि ते मला माझ्या पुढच्या शिकवण्याच्या काळात खूप उपयोगी पडलं.
बाई आणि मी खूप गप्पा मारत असू. तेव्हा माझा मुलगा तीन महिन्यांचा होता. त्याला केव्हा काय खायला द्यावं, हेसुद्धा मला आईने मुलीला सांगावं, तसं बाई सांगायच्या. आम्ही दोघी खूप हसायचो, एकत्र फिरायचो. त्यांनी मला ग्रंथालयासाठी पुस्तकं कशी निवडावी, तेही शिकवलं. शिकवण्यासाठी माझं काय वाचन असलं पाहिजे, हेही सांगितलं.
त्यांच्यामुळे विंदा करंदीकर, श्री. पु. भागवत यांच्याशी थोडाबहुत परिचय झाला. त्यांना जवळून पाहता आलं आणि त्यांच्याशी बोलताही आलं. याचा मला फार आनंद झाला होता.
बाई निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेल्या या सहकाऱ्यांना, तसंच उपप्राचार्य पंडित सर, प्रकाशभाई मेहता सर या सर्व दिग्गजांबरोबर मलाही जेवायला बोलावलं होतं.
त्यांनी मला मुलीसारखं मानलं होतं. त्यांच्या घरी केव्हाही जायची मला मुभा होती. त्या पुण्याला राहायला गेल्यानंतर आणि मीही निवृत्त झाल्यानंतर एकदा त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. त्यांना खूप आनंद झाला होता आणि तो त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. मी मला येणाऱ्या शंका त्यांना फोन करून विचारत असे. वय नव्वदीच्या पुढे गेल्यावरही त्या त्यांचं स्पष्टीकरणासह निराकरण करत. ‘ठरावीक, लवचीक’ या शब्दांमध्ये वी आणि ची ऱ्हस्व हवे की दीर्घ? ऐतिहासिक, भौगोलिक यांमध्ये तर सि आणि लि ऱ्हस्व असतात. या माझ्या शंकेला त्यांनी उत्तर दिलं, “ऐतिहासिक आणि भौगोलिक यांमध्ये इतिहास आणि भूगोल हे मूळ शब्द आहेत. त्यांना ‘इक’ हा प्रत्यय लागला आहे. ठरावीक आणि लवचीक यांमध्ये वेगळा मूळ शब्द नाही. त्यामुळे ते दीर्घ आहेत.” उपांत्य अक्षर केव्हा ऱ्हस्व होतं, अनुच्चारित अनुस्वार केव्हा आवश्यक असतो, असे अनेक शुद्धलेखनाचे नियम बाई बोलता बोलता सांगत असत आणि असं सांगत; की ते डोक्यात कायमचं बसून जाईल.
‘आता शुद्धलेखनाची गरज नाही, काय सांगायचंय ते कळल्याशी कारण!’ असा विचार मांडला जातो. बाईंचा मात्र प्रमाणभाषा विशिष्ट पद्धतीनेच लिहिली पाहिजे, असा आग्रह होता.
मराठीवर प्रेम करणाऱ्या मंडळींपैकी एकेक जण कायमचे निघून गेले आहेत. त्यात मला बाईंमुळेच श्रीपुंच्या घरी भेटलेले श्रीनिवास विनायक कुलकर्णी आहेत आणि स्वतः श्रीपुही आहेत. ही पिढी संपत चालली आहे आणि बाईंचं जाणं हा अचूक मराठी लिहिण्याचा आग्रह धरणाऱ्यांपैकी शेवटचा टोला पडला आहे. यापुढे कोण यासाठी इतकं झटेल?
आता बाई नाहीत, ही जाणीव मनाला खिन्न करून टाकते. बाईंचा गुलाबी गोरा, खळखळून हसतानाचा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि मन हताश होतं; पण बाईंच्या आठवणी आणि बाईंची पुस्तकं ही सतत आधार देतील, एवढं मात्र निश्चित!
लेखिका निवृत्त प्राध्यापिका आहेत.