भारतातले अनोखे वन्यजीव 
अक्षररंग

भारतातले अनोखे वन्यजीव

कुणी पाण्यात राहतं, कुणी रात्रीच बाहेर पडतं, तर कुणाचे पंख चक्क दीड फुटांपर्यंत पसरतात! ओळखा पाहू, हे जीव कोणते? चला, त्यांची गंमतशीर गोष्ट जाणून घेऊया.

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

कुणी पाण्यात राहतं, कुणी रात्रीच बाहेर पडतं, तर कुणाचे पंख चक्क दीड फुटांपर्यंत पसरतात! ओळखा पाहू, हे जीव कोणते? चला, त्यांची गंमतशीर गोष्ट जाणून घेऊया.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आपण भारतातल्या अनोख्या वन्यजीवांची ओळख करून घेत आहोत. मागच्या भागात समुद्री गाय अर्थात डुगॉंग आणि फॉरेस्ट आउलेट अर्थात रान पिंगळा यांची ओळख करून घेतली होती. भारताला लाभलेल्या लांबलचक सागर किनाऱ्यांप्रमाणेच भारताच्या विविध राज्यांमधल्या नद्यादेखील भारतीय वन्यजीवांच्या वैविध्यात भर घालण्याचं काम करत असतं.

मात्र या नद्यांमधील जलचरांकडे त्यामानाने आपलं लक्ष जात नाही. अशाच एका काहिसा दुर्लक्षित असलेल्या आणि निवासावर अतिक्रमण झाल्यामुळे धोक्यात आलेल्या जलचराची ही ओळख...

गंगानदीतले डॉल्फिन्स

गंगानदीला भारताच्या इतिहासात, भूगोलात आणि संस्कृतीमध्ये जितकं महत्त्वाचं स्थान आहे, त्याहूनही तिचं महत्त्व अधिक आहे ते भारतातील नैसर्गिक जैवविविधता टिकवण्याच्या बाबतीत. हिमालयात उगम पावून बंगालच्या उपसागरात विलीन होणाऱ्या गंगानदीतील सर्वात अनोखा जलचर म्हणजे ‘गंगेतले डॉल्फिन्स’.

जलचर असले तरी डॉल्फिन्स सस्तन प्राणी आहेत. बहुसंख्य डॉल्फिन्स हे सागरात म्हणजे खाऱ्या पाण्यात आढळतात, पण गंगेतले डॉल्फिन्स हे एकमेव डॉल्फिन्स आहेत जे गोड पाण्यात राहतात. प्रामुख्याने गंगा नदीच्या प्रवाहात आढळतात म्हणून तिच्याच नावाने ओळखले जात असले तरी हे डॉल्फिन्स भारताशेजारच्या नेपाळ आणि बांगलादेश या देशांमधील नद्यांमध्येही आहेत. गंगेबरोबरच हे ब्रह्मपुत्रा, मेघना, कर्णफुली, सांगू, कर्णाली, सप्तकोशी या नद्यांमध्येही आढळतात. या वैशिष्ट्यपूर्ण जलचर सस्तन प्राण्याला भारताच्या राष्ट्रीय जलचर प्राण्याचा दर्जा देण्यात आला आहे.

गंगेतल्या डॉल्फिन्समध्ये माद्या या नरांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. यांचा रंग चॉकलेटी, गडद करडा किंवा हलका निळा असतो. सागरातील डॉल्फिन्सप्रमाणेच यांचेही नाकाड लांब असते आणि या लांबलेल्या जबड्यात धारदार दात असतात. ते आपल्या भोपळ्यासारख्या गरगरीत डोक्याचा उपयोग ‘इकोलोकेशन’साठी, म्हणजेच आपल्या ध्वनींचे प्रतिसाद ऐकून अवतीभवती काय आहे हे जाणून घेण्यासाठी करतात. त्यांचे डोळे आकाराने लहान असतात आणि नजर थोडी कमजोर असते.

मात्र हे डॉल्फिन्स अनेक मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात आले आहेत. पावसाच्या कमी-जास्त प्रमाणामुळे बदलणारे नद्यांचे प्रवाह, मासेमारीच्या तंत्रात झालेले बदल, नद्यांमधील प्रदूषण, वाढत्या शेतीमुळे नदीतील पाण्याच्या पातळीवर होणारा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे या डॉल्फिन्सचा अधिवास आकुंचन पावतो आहे आणि त्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. २०२० मध्ये केंद्र सरकारतर्फे या गंगेतल्या डॉल्फिन्सचे संवर्धन व्हावे म्हणून ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ सुरू करण्यात आला आहे.

कवचधारी निशाचर - खवलेमांजर

निसर्गाला अनेकदा पाहाणाऱ्याची फसवणूक करायची लहर येते आणि मग खवल्या मांजरासारखे अनोखे प्राणी निर्माण होतात. एखाद्या प्रागैतिहासिक काळातील प्राण्याची आठवण करून देणाऱ्या खवल्या मांजराचं शरीर नावाप्रमाणेच खवल्यांनी आच्छादलेलं असतं, त्यामुळे पाहाणाऱ्याला हा एखादा मोठ्या आकाराचा सरिसृप म्हणजे सरपटणारा प्राणी असावा अशी समजूत होते; पण प्रत्यक्षात खवलेमांजर हा सस्तन प्राणी आहे. सस्तन प्राण्यांच्या वर्गीकरणात खास खवल्यामांजरासाठी ‘फोलिडोटा’ ही वेगळी ऑर्डर निर्माण करण्यात आली आहे. खवल्या मांजराला इंग्रजीत ‘पँगोलिन’ म्हणतात.

जगभरात आशिया आणि आफ्रिकामिळून खवल्या मांजराचे आठ प्रकार आढळतात. यापैकी भारतीय पँगोलिन आणि चायनिज पँगोलिन या दोन जाती भारतात आढळतात. मात्र खवलेमांजर निशाचर असल्याने सूर्यास्तानंतर अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतं आणि सूर्योदयापूर्वी आपल्या बिळात, खबदाडीत परत येतं, त्यामुळे याचे दर्शन फार दुर्मळ असते.

पँगोलिनच्या अंगावर जे खवले असतात ते सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे नसतात तर केराटिनचे असतात (याच पदार्थाने माणसाची नखे बनलेली असतात). या खवल्यांचे कवच पँगोलिनला आपला बचाव करायला उपयोगी पडते. संकटाची जाणीव झाली की पँगोलिन आपल्या शरीराची वळकटळी वळून जणू खवल्यांचाच चेंडू बनवतो, मग या चेंडूवर हल्ला करणे शक्य नसते. तोंडात एकही दात नसलेल्या खवले मांजराचे मुख्य खाणे म्हणजे मुंग्या, वाळवी. जमिनीतील वाळवीची मोठमोठी वारुळे आपल्या नख्यांनी फोडून, लांबलचक जिभेनं वारुळातील वाळव्या, मुंग्या, त्यांची अंडी यांचा फराळ करण्यात हे पटाईत असते. याची नजर आणि ऐकण्याची क्षमता तुलनेने कमजोर असते.

भारताच्या विविध भागांमध्ये जसे कोकण, गोवा, कर्नाटकपासून ते हिमालयातील जीम कॉर्बेट नॅशनल पार्कपर्यंत आढळणारे पँगोलिन धोक्यात आलेला प्राणी आहे. त्याच्या खवल्यांसाठी त्याची चोरटी शिकार केली जाती. चिपळूण येथील ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ ही संस्था गेली काही वर्षे कोकणातील खवले मांजराचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

महाकाय पतंग - ॲटलास मॉथ

फुलाफुलांवर उडणारी फुलपाखरं त्यांच्या चिमुकल्या आकारांमुळे आणि आकर्षक रंगसंगतीमुळे नजरेत भरतात. पण या फुलपाखरांचे चुलतभाऊ शोभतील अशा पतंगांच्या म्हणजे मॉथ्सच्या गटात मात्र भडक, जरा घाबरवणाऱ्या रंगसंगतीचे भिडू जसे बघायला मिळतात तसेच आकाराने प्रचंड मोठे पतंग पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचा ‘दादा’ म्हणजे ॲटलास मॉथ हा जगातला सर्वात मोठ्या आकाराचा पतंग. पंखाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे याची लांबी सव्वा ते दीड फूट इतकी असते. त्याचे रंगही तसे मोहक नसतात, पण त्याच्या पंखांच्या टोकावर जी नक्षी असते, जो आकार असतो तो सापाच्या डोक्यासारखा असतो. त्यामुळे पानांमागे दडलेल्या ॲटलास मॉथचा बचाव होतो, कारण समोरून बघणाऱ्या सरड्याला किंवा पक्ष्याला तिथे सापच बसला आहे असं वाटतं.

या पतंगाला कँटोनिज भाषेत जे नाव आहे त्याचा अर्थच ‘सापाच्या डोक्याचा पतंग’ असा होतो. इतर फुलपाखरं-पतंगाप्रमाणेच हादेखील अंडी, अळी, कोष आणि पतंग या चक्रातून जातो. हा पतंग रेशमाच्या पतंगाच्या गटात येतो. मात्र इतर रेशमाच्या पतंगाप्रमाणे याची व्यावसायिक पैदास केली जात नाही. या पतंगाला मुखावयव नसतात, अळी असताना त्याने जे खाल्लेलं असतं, त्यावर पतंग झाल्यावर तो गुजारा करतो. अर्थात त्याचं आयुष्य अगदी कमी म्हणजे फक्त काही दिवसांचं असतं. मादीशी मिलन झाल्यावर नर मरतो आणि मादी अंडी घातल्यानंतर प्राण सोडते. प्रकाश प्रदूषण, कीटकनाशके, अधिवासाचा नाश या सगळ्यामुळे ॲटलास मॉथही संकटात सापडलेला आहे. ठाणे, मुंबई, पनवेल, अंबरनाथ अशा शहरी भागातही सहज दिसणाऱ्या या जगातील सर्वात मोठ्या पतंगाचं संरक्षण ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.

भारतातील वन्य जीवनाचं वैविध्य थक्क करणारं आणि अफाट आहे. हा वनसंपदेचा ठेवा जतन करण्यासाठी दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो, त्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान

ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका; CJP नेत्यांची विमानातच धरपकड; दिल्लीत ७,००० जण ताब्यात; ..तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार!