कथा
हार्दिका
मित्रांनी केलेली मस्करी कधी गंमत असते, तर कधी मनाला लागणारी टोचणी! पण आपलाच जिवलग मित्र त्या मस्करीत सामील झाला तर? हसायचं की रागवायचं? मैत्री टिकवायची की अबोला धरायचा?
ळेतून घरी आल्यावर आरवने दप्तर सोफ्यावर फेकलं आणि सरळ खोलीत गेला. आईने स्वयंपाकघरातूनच आवाज दिला.
“हात-पाय धुऊन घे. आधी दूध पी.”
“आई, प्लीज! आल्या आल्या सुरू नको होऊस.”
आई क्षणभर थांबली. गेल्या काही दिवसांत आरवच्या तोंडून ‘प्लीज’, ‘नको ना’, ‘तुला काय कळतं?’
असे शब्द जरा जास्तच ऐकायला मिळत होते.
आरवने खोलीचं दार लावून घेतलं. खरं तर त्याला आईचा राग आला नव्हता. पण सध्या कुणी काही विचारलं, बोललं किंवा नुसतं जवळ आलं तरी त्याची चिडचिड होत होती. स्वतःचंच वागणं त्याला समजत नव्हतं.
गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या मित्रांच्या ग्रुपवर एकच चर्चा सुरू होती. कुणीतरी आरवचा एक जुना फोटो काढून त्यावर मजेशीर मीम बनवला होता. त्यावरून सगळे त्याची मस्करी करत होते. सुरुवातीला आरवही हसला. त्यानेही हसण्याची इमोजी पाठवली. पण नंतर कमेंट्स वाढत गेल्या. प्रत्येकजण काही ना काही भर घालत होता. त्यात विहानचाही समावेश होता.
विहान! त्याचा सगळ्यात जवळचा मित्र. दोघं एकाच बेंचवर बसायचे. डबा शेअर करायचे, एकमेकांची गुपितं सांगायचे. कुणी एकाची चेष्टा केली तर दुसरा लगेच त्याच्या बाजूने उभा राहायचा. मग आज विहान असं कसं वागू शकतो?
शाळेत त्याने विहानला बाजूला घेऊन विचारलंही होतं.
“तू पण त्या ग्रुपवर कमेंट केलीस?”
“अरे, मजेत केलं. एवढं काय मनावर घेतोस?”
“पण बाकीचे सगळे करतायत म्हणून तूही करायचं?”
“मग काय झालं? तू पण हसत होतास ना!”
विहानचं हे उत्तर ऐकून आरव गप्प झाला. खरंच, सुरुवातीला आपणही हसलो होतो. मग आता अचानक एवढं वाईट का वाटतंय? पण स्वतःचा फोटो सगळ्यांनी फिरवणं आणि त्यावर हसणं वेगळं आणि आपला जवळचा मित्रही त्यात सामील होणं वेगळं... हे विहानला कसं समजावून सांगायचं?
घरी आल्यावर त्याने फोन उघडला. विहान ऑनलाइन होता. आरवने मेसेज टाइप केला, ‘तुला खरंच काही फरक पडत नाही का?’ पण पाठवण्याआधीच तो डिलीट केला. पुन्हा लिहिलं, ‘आपली मैत्री एवढीच होती का?’ हेही पुसून टाकलं.
मीच जास्त विचार करतोय का? विहानला खरंच काही वाटत नसेल? की बाकीच्यांसमोर त्याला माझी बाजू घ्यायची नव्हती?
रात्री जेवताना बाबांनी विचारलं, “काय रे, आजकाल अभ्यासात लक्ष नाहीये का?”
“आहे.”
“मग टेस्टमध्ये मार्क्स का
कमी झालेत?”
“माहीत नाही.”
“फोन कमी वापर. सारखा फोन हातात असतो.”
“बाबा, तुला प्रत्येक गोष्टीत फोनच दिसतो!”
“आम्ही तुझ्या भल्यासाठीच सांगतोय.”
“मला काही नकोय भलं-बिलं!”
ताट बाजूला सारून आरव उठला आणि तडक त्याच्या खोलीमध्ये गेला.
रात्री उशिरा त्याच्या खोलीच्या दारावर हलकीशी थाप पडली.
“आरव, झोपला आहेस? येऊ का आत?” आईने विचारलं.
“काय आहे?”
“काही नाही. पाणी ठेवतेय. म्हणत आई त्याच्या खोलीत गेली. आईने टेबलावर पाण्याचा ग्लास ठेवला. जाताना तिची नजर आरवच्या फोनवर पडली. स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता. ‘भावा, उद्या शाळेत भेट. आज जरा जास्तच झालं.’
आईने काही विचारलं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी आरव शाळेत जाण्यापूर्वी फोन शोधत होता. फोन आईच्या हातात होता.
“हा घे तुझा फोन. काल रात्री मेसेज आला होता.”
आरवने तिच्याकडे चमकून पाहिलं.
“तू माझे मेसेज वाचलेस?”
“नाही. स्क्रीनवर दिसला.”
“माझ्या फोनला हात लावू नकोस!”
“ठीक आहे.”
आईचं एवढंच उत्तर ऐकून आरव आणखी गोंधळला.
शाळेत पोहोचल्यावर विहान त्याच्याजवळ आला. “सॉरी रे. काल सगळे हसत होते म्हणून मीही हसलो. तुला वाईट वाटेल असं वाटलं नव्हतं.”
आरवने त्याच्याकडे पाहिलं. त्याला विहानला सांगायचं होतं की, प्रश्न
त्या फोटोचा नाहीच. प्रश्न आहे तो इतक्या वर्षांच्या मैत्रीचा. पण शब्दच फुटले नाहीत.
“चल, कॅन्टीनमध्ये जाऊ,”
विहान म्हणाला.
“आज नको. मला जरा एकटं बसायचंय.”
विहान निघून गेला.
घरी आल्यावर आरवने आईला
हाक मारली.
“आई, एक सांगू?”
“हं?”
“पण लगेच बाबांना सांगायचं नाही.”
आईने हातातलं काम थांबवलं.
“ठीक आहे. आधी सांग तर.”
आरव बोलायला लागला. त्याला स्वतःलाही कळत नव्हतं की, नेमकं काय सांगायचं आहे. आई फक्त ऐकत होती आणि आरवला पहिल्यांदाच जाणवलं, आपलं बोलणं पूर्ण होईपर्यंत कुणीतरी शांतपणे ऐकत राहिलं की बरं वाटतं. शेवटी आरवने विचारलं, “आई, एखादा मित्र दुखावतो, पण तोच आपला आवडता मित्र असतो. मग काय करायचं?”
आई म्हणाली, “कठीण आहे पण तूच शोध याचं उत्तर बघू.”
आरव हसला. मनातला गुंता थोडा सैल झाला होता; पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित होता... विहान पुन्हा पूर्वीसारखा त्याचा मित्र होईल का?
krantip183@gmail.com