भोंदूबाबा आणि व्यवस्थेच्या बळी 
अक्षररंग

भोंदूबाबा आणि व्यवस्थेच्या बळी

श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या गुंत्यात होणारे महिलांचे शोषण आणि त्याविरुद्धचा लढा हा केवळ कायदेशीर नसून तो प्रस्थापित मानसिकतेविरुद्धचा एक अत्यंत विषम संघर्ष आहे. एका वाजूला भोंदू बुवांचे प्रस्थ आणि दुसरीकडे पिंजऱ्यात उभी केलेली पीडिता, अशा विदारक वास्तवावर भाष्य करणारा हा विशेष लेख.

नवशक्ती Web Desk

विशेष

मुक्ता दाभोलकर

श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या गुंत्यात होणारे महिलांचे शोषण आणि त्याविरुद्धचा लढा हा केवळ कायदेशीर नसून तो प्रस्थापित मानसिकतेविरुद्धचा एक अत्यंत विषम संघर्ष आहे. एका वाजूला भोंदू बुवांचे प्रस्थ आणि दुसरीकडे पिंजऱ्यात उभी केलेली पीडिता, अशा विदारक वास्तवावर भाष्य करणारा हा विशेष लेख.

कोणतीही लढाई खडतरच असते. बुवा आणि भक्त यांच्यात आढळणाऱ्या विशिष्ट नात्यामुळे बुवाने केलेल्या शोषणाविरुद्धची पीडित महिलेची लढाई अधिक खडतर असते. बहुतेकवेळा केवळ महिला नाही तर तिचे कुटुंबीय देखील एखाद्या भोंदूला गुरू मानून त्याच्या दरबारी जात असतात. कुटुंबाने गुरू मानलेला बाबा, बुवा, ज्योतिषी जेव्हा त्या कुटुंबातील स्त्रीवर लैंगिक अत्याचार करतो तेव्हा गुरुकृपेसाठी गुरूला संपूर्ण शरण जावे लागते हे गृहितक डोक्यात पक्के बसलेले असल्यामुळे भक्त महिला व तिचे कुटुंबीय हे त्या तथाकथित गुरूने केलेल्या लैंगिक अत्याचाराला गुन्हा न मानता तो गुरूचा 'कृपाप्रसाद' मानतात. जादूटोणाविरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या एका केसमध्ये सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावातील एका दोन खोल्यांच्या घरात करणी उतरविण्यासाठी पूजा करण्याच्या नावे एका भोंदूने कुटुंबातील तरुण सुनेवर बलात्कार केला. तेव्हा त्या पीडितेचा नवरा व बाकी सर्व कुटुंबीय बाहेरच्या खोलीत बसले होते. पीडित व्यक्ती जर हातातील मणामणाच्या बेड्यांना फुलांचे गजरे मानून घेत असेल तर स्वतःवर अत्याचार होतोय हे समजायला व ते मान्य व्हायला अशा व्यक्तीला वेळ लागतो. स्वतः व आजूबाजूच्या सर्वांनी गहाण टाकलेल्या चिकित्सक बुद्धीला पुन्हा झळाळी देऊन पीडितेला बुवाने केलेल्या शोषणाविरुद्धची लढाई सुरू करावी लागते. वर उल्लेख केलेल्या केसमध्ये भोंदूने आपल्याला पुरते फसवले आहे हे ध्यानात आल्यावर या तरुणीचा नवरा तिच्यासोबत उभा राहिला आणि या प्रकरणी त्या बुवाला शिक्षा देखील झाली. पण भोंदूविरुद्धच्या लढाईमध्ये प्रत्येक पीडितेला पतीची वा कुटुंबीयांची साथ मिळेलच असे नाही.

ज्योतिषी अशोक खरातला अटक झाल्यानंतर 'बुवाबाजी आणि महिला' या विषयाबद्दलच्या चर्चेने समाज ढवळून निघत आहे. याबद्दलची विविध मते समोर येत आहेत. या मतांचा परामर्श घेतला तर स्त्रियाच

'तशा' असतात असे मानणारे बरेच लोक आजूबाजूला दिसतात. पीडिता एकीकडे कायदेशीर लढाई लढण्याचे कठीण काम करत असते तेव्हा पीडित स्त्री वरील अत्याचारासाठी तिलाच दोषी मानणाऱ्या या मानसिकतेशीही तिला झुंजावे लागते. 'ती स्वतःहून चालत गेली ना त्या बाबाकडे, कुणी उचलून तर नाही ना नेली?' किंवा 'लैंगिक अत्याचार घडतोय असे जाणवल्याक्षणी तिथून बाहेर का नाही पडली?' असे बोलून तिच्या मनात स्वतःच्या खरेपणाविषयी शंका निर्माण करणारे अनेक लोक तिच्या आजूबाजूला असतात. पीडित व्यक्तीप्रति असलेल्या लोकांच्या या प्रतिसादाला 'व्हिक्टिम ब्लेमिंग' म्हणतात आणि त्यामुळे गुन्हेगाराऐवजी दोषी व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. भोंदूने केलेल्या अत्याचाराविरुद्ध पीडित स्त्री लढायचे ठरवते तेव्हा मानसिक पातळीवर तिला काय सोसावे लागते हे समजण्यासाठी 'व्हिक्टिम ब्लेमिंग' ही संकल्पना समजणे उपयोगी ठरते.

सत्तरच्या दशकात अमेरिकेत व्हिक्टिम ब्लेमिंग ही संकल्पना सर्वप्रथम वापरली गेली. गरीब माणसे स्वतःच त्यांच्या गरिबीला जबाबदार असतात किंवा विशिष्ट जात, धर्म, वंशाच्या लोकांवर अत्याचार होत असतील तर त्याला त्यांचे वर्तनच जबाबदार असते ही भावना हे 'व्हिक्टिम ब्लेमिंग' आहे. हा मुद्दा ही संकल्पना वापरून स्पष्ट करण्यात आला. लैंगिक अत्याचार पीडित स्त्रियांना समाज कशा नजरेने बघतो हे स्पष्ट करून त्याला विरोध करण्यासाठी पुढील काळात स्त्रीवादी वकिलांनी ही संकल्पना सातत्याने वापरली. आपल्या देशात देखील गेल्या काही वर्षांत ही संकल्पना हळूहळू रुजते आहे, पण खरात प्रकरणात किती लोक पीडित महिलांना दोष देत आहेत ते बघितले की, आपल्या समाजात ही संकल्पना पुरेशी रुजलेली नाही हे जाणवते.

स्वतःच्या व कुटुंबीयांच्या मनातील बुवाशरणतेशी झुंजून पीडित स्त्रीला तिची लढाई सुरू करावी लागते आणि नंतर समाजाकडून होणाऱ्या व्हिक्टिम ब्लेमिंगमुळे मोडून न पडता भोंदूविरुद्धचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठावे लागते. त्यानंतर न्याय मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेला चालना देण्याची तिची लढाई सुरू होते. शोषण करणाऱ्या ज्योतिषी, बुवा, बाबांच्या पाठीशी धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता एकवटली असेल तर बहुतेकवेळा एकट्या पडलेल्या स्त्रीला त्याच्याविरुद्ध उभे राहणे किती कठीण जात असेल हे आपल्या लक्षात येऊ शकते.

इतकी विषम लढाई लढणे सोपे नसते. जगातल्या अनेक देशांमध्ये गंभीर गुन्ह्यांमधील फिर्यादी आणि साक्षीदारांना सरकारकडून संरक्षण पुरविण्याची कायदेशीर तरतूद आहे. अशा फिर्यादी आणि साक्षीदारांना नवीन जागी नेऊन वसवणे, त्यांना संपूर्ण नवी कायदेशीर ओळख तयार करून देणे अशा बाबी याखाली केल्या जातात. माझ्या माहितीनुसार २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार संरक्षणासंदर्भात दिलेले निर्देश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, पण फिर्यादी किंवा साक्षीदारांना संरक्षण देणारा कोणताही स्वतंत्र कायदा भारतात अस्तित्वात नाही. उद्या समजा असा कायदा झाला, तरी सरकारी यंत्रणा आपली एवढी मदत करेल यावर सामान्य भारतीय व्यक्ती विश्वास ठेवू शकेल का, याबद्दल शंका वाटते. ना मदत ना संरक्षण अशा परिस्थितीत ही विषम लढाई लढणे हे पीडितेसमोरील एक मोठे आव्हान ठरते. हे आव्हान पेलण्याची हिंमत दाखवणाऱ्या महिलेचं आपल्याला मनोमन कौतुक वाटायला हवं.

आपल्या देशात न्यायालयीन लढाई इतकी दीर्घकाळ चालते की पीडित महिलेला तिचे हे बळ किमान दहा-पंधरा वर्षे टिकवून ठेवावं लागतं. न्यायालयीन सुनावणीचा पाठपुरावा करताना आणि त्यासाठी उपस्थित राहताना तिला प्रत्येकवेळी जखमेवरची खपली निघण्याचा त्रास सोसावा लागतो. लढणाऱ्या व्यक्तीला अत्याचार आणि त्यातून झालेली वेदना विसरून पुढे जाण्याची मुभा नसते. न्यायालयीन लढाईसाठीचा खर्च, दगदग यामुळे होणारी ओढाताण तिला अनेक वर्षे सोसावी लागते. काळ जातो तसे साक्षीदार फुटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लढाईनंतर न्याय मिळेल याची खात्री नसते.

राम रहिम किंवा आसारामसारख्या दांडग्या बनलेल्या बाबा, बुवांबरोबर पीडितेची लढाई चालू असेल तर न्यायालयात तिच्या लढाईला यश आले व भोंदूला शिक्षा झाली तरी त्याचे प्रस्थ आणि समाजमनावरील त्याचा प्रभाव यांना ओहोटी लागल्याचे तिला अनुभवता येईल, असे नाही. राम रहीमच्या प्रकरणात तर त्याला शिक्षा झाल्यानंतर इतक्या वेळा पॅरोलवर तुरुंगाबाहेर सोडण्यात आले की, त्याची शिक्षा हा एक विनोद बनला. पीडितेच्या लढाईबद्दल निराशेचा सूर आळवण्यासाठी नाही तर पीडितेला किती विषम लढाई लढावी लागते हे अधोरेखित करण्यासाठी हे उदाहरण देत आहे.

लैंगिक शोषणाबद्दल समाज संवेदनशील असतो. त्यामुळे लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या पीडित महिलेला किमान काही सहानुभूती आणि मदत आपल्या समाजात मिळू शकते. पण ज्योतिषी, बुवा, बाबा यांच्यासारखे लोक महिलांचे दुःख कुशलतेने हाताळून त्यांना भावनिकदृष्ट्या आपल्या कह्यात घेतात तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या महिलांच्या शोषणाला कोणीच वाली नाही, अशी स्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोलेबाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका भोंदूबाबाच्या गाडीच्या टायरचा स्पर्श झालेली धूळ उचलण्यासाठी वाकलेल्या सुमारे शंभर भक्त महिला त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावल्या. यानंतर सदर बाबा फरार झाला. काही दिवसांनी गर्दीचे नीट नियोजन न केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक आणि काही अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून त्या बाबाला दोषमुक्त करण्यात आले. बाबाच्या भक्तीच्या नावाखाली स्वतःचा जीव गमावलेल्या या शंभर पीडित महिलांना त्यांची लढाई लढण्याची संधीही कधी मिळणार नाही.

लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर

Mumbai : 'कामा'त आनुवंशिक समुपदेशन विभाग सुरू होणार; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

Mumbai : नालेसफाईवर उपायुक्तांची नजर; आयुक्तांच्या आदेशानुसार 'ऑन दी स्पॉट' करणार पाहणी

वेळेत भूसंपादन न झाल्यास जमीन मालकाचीच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Mumbai : आता ज्येष्ठ डॉक्टरांकडेच प्रशासकीय पदभार; रुग्णालयातील पदांच्या नियुक्तीत पारदर्शकता आणणार