प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
गेल्या रविवारी म्हणजे २३ ऑगस्टला जागतिक वडापाव दिन झाला. आता याला जागतिक का म्हणतात ? वगैरे चर्चेत न पडता, या चविष्ट व्यंजनाचा आपण आयुष्यभर फक्त आस्वाद घेत राहायचं. खरं तर गेल्या रविवारी याबद्दल लिहिणार होतो, पण पूर्णपणे विसर पडला. वडापावची मनोमन क्षमा मागून खास हा लेख वाचक, खवय्ये आणि वडापावप्रेमींसाठी..
एकेका पदार्थाचा काय महिमा असतो नाही? पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, बासुंदी, मणगणं.... प्रत्येक प्रांतातील नागरिकांना तिथल्या परंपरागत पदार्थांचा मनापासून अभिमान असतो आणि आपल्याकडे आलेल्या परप्रांतातील पाहुण्यांना हे पदार्थ ते आग्रहाने खाऊ घालतात.
आपल्या मुंबईकरांनाही अशाच एका चमचमीत पदार्थाने गेली कित्येक वर्षं वेड लावलेलं आहे. दिवसेंदिवस, महिनोन् महिने, वर्षोंवर्षं त्या पदार्थाची लोकप्रियता वाढतच आहे. त्या पदार्थाला खरंच मरण नाही. या पदार्थाची विक्री करणाऱ्या अनेक बेकारांना, अनेक घरांना त्याने बरकत आणून दिलीय. तो एक खाल्ला की दुसरा खाण्यासाठी जीभ चाळवतेच. त्या पदार्थाचं नाव- बटाटावडा आणि युतीचं वडापाव. परदेशातही काही मंडळींनी याची आऊटलेट्स सुरू करून तिकडच्या भारतीय खवय्यांना वड्याच्या चवीचा आनंद देऊ केला आहे.
वडा बटाटा संयुक्तं,
बेसन लेपन शोभितम्।
तैलपाके सुवर्णाभं,
भक्षयामि पुनः पुनः॥
किंवा
तैल पक्वं बटाटा च,
बेसन लेपितं शुभम्।
वडा नाम प्रीयते नित्यं,
भुक्त्वा तृप्यन्ति मानवाः॥
अशा या बटाटावड्याचं फक्त नाव जरी उच्चारलं तरी जीभ हुळहुळायला लागते, अचानक भूक वाढते, त्याचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहून, जिभेचा आणि पोटाचा त्रास वाढतो आणि अखेर त्याला घरी आणण्याशिवाय आणि त्याचा आस्वाद घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणजे पहा, नाव उच्चारताच एवढं सगळं घडतं, तर तो समोर दिसल्यावर त्याला टाळून पुढे जाणं शक्य होईल का..?
तसं पाहिलं तर आहे काय असं त्यात, ज्यामुळे आपण संमोहित होऊन जातो..? बटाट्याची भाजी आणि बेसनचं आवरण बस्स. परंतु कढईतल्या गरम तेलात त्याला सोडल्यावर, जे रूप घेऊन तो बाहेर येतो ना त्यावर, त्याच्या जीभखवळू गंधावर आणि फायनली त्याच्या खमंग स्वादावर आपण फिदा होऊन जातो.
आता बटाटावडा हा कुणाकडेही चविष्टच मिळतो म्हणाल, तर तसं अजिबात नाही. उदा. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये तो खाऊच नये. दोन भले मोठे गरगरीत बेचव वडे समोर येतात, अव्वाच्या सव्वा पैसे जातात आणि जीभखवळू आनंद जराही मिळत नाही.
बटाटावडा खायचा तर टपरी किंवा हातगाडीवरच खायला हवा. ती चार चाकांवर उभी असलेली गाडी, त्यावर ठेवलेल्या स्टोव्हवर चढवलेली मोठी काळीकुट्ट कढई, त्यात ओतलेलं, वड्याचा रंग चढलेलं कढईभर तेल, त्यात बुडालेला त्याच रंगाचा... म्हणजे काळाभोर झारा, समोर छोट्या काचेच्या कपाटात विसावलेली भजी, वडे, सामोसे, कपाटावर प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेल्या पावाच्या लाद्या. वडे तळणाऱ्याच्या हाताकडे असणारा कालवलेल्या बेसनाचा टोप, एका हाताने पटापट त्यात बुडवून तेलात सोडण्याचं त्याचं कसब आणि काही क्षणात तळून आणि सुवर्णरंग लेवून तेलावर येणारा तो बटाटावडा. सारंच जिभेला पाणी आणणारं.
तो खुलेआम आपली जाहिरात करत, जीभखवळू गंध उधळत आपल्या अंतिम रूपात ट्रेमध्ये उतरतो. अनेक ठिकाणी मिळणारा वडा म्हणजे, व्यवस्थित न तळलेला, जाडजूड बेसनने वेढलेला आणि मोठ्या बटाट्याच्या तुकड्यांनी बनलेल्या बेचव भाजीने बनलेला असतो. अस्सल खवय्यांनी तिकडे फिरकूही नये. वड्याचं रूप थोडं लहान असलं तरी चालतं, पण चव मात्र जीभखवळू खमंगच हवी. त्यातली भाजी ही पंढरीफटक असून चालत नाही, तर हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, कढीपत्ता यांच्या ठेच्याने हिरवीगार न्हालेली हवी. वर बेसनचं आवरण पातळ असायला हवं आणि अखेर तेलातून काढताना त्याला छान गडद सोनेरी रंग चढायला हवा. असा बटाटावडा चविष्ट लागतो.
प्रत्येक शहरात विशिष्ट नावाने वडे प्रसिद्ध असतात. उदा. जोशी वडेवाले, गजानन वडेवाले, बबन वडापाव, पंडितांचा बटाटावडा इ. अनेक नावांनी विकले जाणारे वडे खवय्यांच्या पसंतीला उतरलेले असतात.
याचा संचार सर्वत्र असतो. हा कार्यक्रमाच्या मध्यंतरात दिसतो. सभा, मीटिंग आटोपल्यावर चहासोबत हा येतो. नाटकाची तालीम आटोपल्यावर याचा प्रवेश होतो. घरी पाहुणे येणार असले की हा आणि गोडाचा शिरा असा बेत सजतो. सहलीला जाताना प्रवासात भुकेला हा सोबत करतो. थोडक्यात या पदार्थाला सगळीकडे मुक्त प्रवेश असतो.
गरमागरम वडा खाण्याची मजा काही औरच असते. कढईतून झाऱ्यावरून तो ट्रेमध्ये उतरला की खवय्ये तयारच असतात. पटापट कागदी डिशमधून तो हाती येतो. प्लेटमधल्या त्याच्या गरमपणाला न जुमानता, हळुवार त्याला मधून उघडायचं. अर्धा तुकडा उचलायचा, बाजूच्या लसूण चटणीला चांगला चिकटवायचा आणि अलगद मुखात सोडायचा. ब्रम्हानंदी लागली टाळी... जीव्हेते कोण सांभाळी.... अशी अवस्था होऊन जाते. तोंड, वड्याच्या तिखट आणि लसणाच्या खमंग स्वादाने खवळून उठतं आणि दुसऱ्या वड्याची मागणी करू लागतं. या दोघांच्या सोबत चहा असेल तर त्या त्रिगुणानंदात आपण अक्षरशः न्हाऊन निघतो.
आता नुसता बटाटावडा खावा की वडापाव? तर माझी पसंती वडापावला जाते. गरीबाची भूक भागवणारा, खवय्यांना आनंद देणारा आणि रोजगार मिळवून देणारा हा बटाटावडा. टपरीवरच्या वड्याची चव घरच्या वड्याला नाही येत. जंक फूड म्हणून शंख करणाऱ्यांनी वड्याची चवच घेतलेली नसते.
शेवटी आयुष्यात कोणतीही गोष्ट असो तिचा अतिरेक टाळायचा. वड्यांना डोळ्यांनी पाहिलं, नाकाने गंध घेतला, मेंदूने तोंडाला पाणी आणलं आणि पायांना थांबण्याची आज्ञा दिली, तरी आपण फाट्यावर मारून पुढे निघून गेलो, तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार की नाही?
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com