मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘टॅरिफ’चा वापर शस्त्रासारखा करीत असून आता त्यांनी फ्रान्सला ‘टॅरिफ’ची धमकी दिली आहे. यामुळे जगभरात ‘टॅरिफ’ची दहशत पसरल्याने जागतिक बाजार कोसळले. याचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावरही झाल्याने सेन्सेक्स, निफ्टीने आपटी खाल्ली, तर रुपयाही लुडकला. त्याचवेळी सोने, चांदीचा भाव दिवसेंदिवस नवनवीन विक्रम करीत आहे.
जागतिक पातळीवर अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १ हजार अंकांनी गडगडला आहे, तर भारताचे चलन रुपयाने डॉलरच्या तुलनेत हाय खाल्ली आहे. रुपया ७ पैशांनी घसरला असून तो ९०.९७ वर बंद झाला. धातू आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढली असून परदेशी वित्तसंस्थाकडून शेअर बाजारात विक्रीचा मारा सुरू आहे.
शेअर बाजारात घसरण होत असतानाच सोने, चांदीच्या दराने विक्रम नोंदवला आहे. सोन्याच्या दरात मंगळवारी १० ग्रॅमला ५,१०० रुपये वाढ झाली असून ते १ लाख ५० हजारांवर गेले आहे, तर चांदीच्या दरात सोमवारी २०,४०० रुपयांची वाढ होऊन ती ३,२३,००० रुपये झाली.
‘फोरेक्स कॉम’च्या माहितीनुसार, सोन्याने आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच ४,७०० अमेरिकन डॉलर्स प्रति औंस असा दर गाठला आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात ६६.३८ डॉलर्सने वाढ होऊन तो ४,७३७.४० डॉलर्स प्रति औंस झाला. तर चांदीचा दर ९५.८८ डॉलर्स प्रति औंस झाला.
‘बोर्ड ऑफ पीस’ला नकार दिल्यास फ्रान्सवर २०० टक्के टॅरिफ लावू - ट्रम्प
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या मुद्द्यावरून आता फ्रान्सकडे मोर्चा वळवला आहे. ‘बोर्ड ऑफ पीस’ या ट्रम्प यांच्या जागतिक शांतता उपक्रमात सहभागी होण्यास फ्रान्सने नकार दिल्यास, फ्रेंच वाईन आणि शॅम्पेनवर २०० टक्के आयात शुल्क आकारण्याची धमकी ट्रम्प यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना दिली आहे.
युद्धग्रस्त गाझाच्या पुनर्बांधणीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी ‘बोर्ड ऑफ पीस’ स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, फ्रान्सने या उपक्रमात सहभागी होण्याबाबत निरुत्साह दाखवला असून ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारण्याचे संकेत दिले आहेत. यावरून संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर मॅक्रॉन यांच्यावर निशाणा साधला. मी त्यांच्या वाईन आणि शॅम्पेनवर २०० टक्के टॅरिफ लावेन, मग ते नक्कीच सहभागी होतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डिनरची ऑफर
दरम्यान, मॅक्रॉन यांनी ट्रम्प आणि इतर जी-७ नेत्यांना दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने भेटण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीसाठी त्यांनी युक्रेन, रशिया आणि डेन्मार्कच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, त्यांनी ट्रम्प यांना गुरुवारी रात्री डिनरसाठी एकत्र येण्याची ऑफरही दिली आहे. आता ट्रम्प यावर काय भूमिका घेतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
ट्रम्प यांचा डोळा आता दिएगो गार्सियावर
वॉशिंग्टन : ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपविरुद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेची धग आता भारताच्या प्रभावाखाली असलेल्या हिंद महासागरापर्यंत पसरताना दिसत आहे. ट्रम्प यांनी सोमवारी अचानक भूमिका बदलून अमेरिकेचा लष्करी तळ असलेले दिएगो गार्सिया हे बेट मॉरिशसकडे परत देण्याच्या युनायटेड किंगडमच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. भारताने यूके–मॉरिशस यांच्या कराराला याआधीच पाठिंबा दिलेला आहे. ‘आमचा नाटो सहयोगी ‘युनायटेड किंगडम’ सध्या दिएगो गार्सिया बेट, जिथे अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा लष्करी तळ आहे, ते मॉरिशसला देण्याची योजना आखत आहे आणि तेही कोणतेही कारण नसताना. या पूर्ण कृत्याकडे चीन आणि रशियाचे लक्ष गेले नाही असे होऊ शकत नाही,’ असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे आणि याचा संबंध त्यांनी ग्रीनलँड मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांशी जोडला आहे.