मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आशिष वारंग यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम केले होते. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमिर खान आणि रणवीर सिंग अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. विशेषतः, पोलिसांच्या भूमिकेमुळे ते चित्रपटसृष्टीत ओळखले जात होते. ते गेल्या काही काळापासून आजारी होते, शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'सूर्यवंशी', 'सर्कस', 'मर्दानी', 'सिंबा' आणि 'एक व्हिलन रिटर्न्स' अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये आशिष वारंग यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांच्या सहाय्यक भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.