हैदराबाद : ‘पुष्पा-२’च्या प्रीमियरदरम्यान महिलेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता अल्लू अर्जुनला तेलंगणा उच्च न्यायालयाने चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, त्यापूर्वी स्थानिक न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
अल्लू अर्जुनला शुक्रवारी सकाळी १२ वाजता त्याच्या घरातून अटक करण्यात आली व त्यानंतर ४ वाजता त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या आदेशानंतर अल्लू अर्जुनला कडक सुरक्षा व्यवस्थेत चंचलगुडा येथील तुरुंगात हलवण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अभिनेत्याने उच्च न्यायालयात अपील केले असता हायकोर्टाने पाच वाजता त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मंजूर करताना कोर्टाने अभिनेत्याला तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले.
उच्च न्यायालयात अल्लूच्या वकिलाने बचावात शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपट प्रकरणाचा उल्लेख केला. गुजरातमध्ये एका प्रमोशनदरम्यान खानने गर्दीवर टी-शर्ट फेकले होते. यानंतर चेंगराचेंगरी झाली. या प्रकरणात अभिनेत्यावर निर्दोष हत्येचा आरोप होता. मात्र, गुजरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने शाहरूखला दिलासा दिल्याचे वकिलाने सांगितले.
नेमके प्रकरण काय?
अल्लू अर्जुन ४ डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न कळवता पोहोचल्याचा आरोप आहे. त्यामुळे तेथे जमाव जमा झाला आणि चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक जण जखमी झाले, तर एका महिलेचा मृत्यू झाला.