सलमान खान होस्ट करत असलेल्या लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस २०'ला अखेर धमाकेदार सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. ६) शोचा ग्रँड प्रीमियर पार पडला. यंदाच्या सीझनमध्ये अभिनेते, अभिनेत्री, गायक, रॅपर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते बॉक्सर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील चेहरे बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. मात्र, प्रीमियरआधी सर्वाधिक चर्चा रंगली होती ती जेन-झींच्या NEET आंदोलनातून चर्चेत आलेल्या रिया अहिर आणि लव गिल यांच्या एन्ट्रीची. दोघांपैकी नेमकं कोण बिग बॉसच्या घरात जाणार, याचा निर्णय पब्लिक वोटिंगवर सोपवण्यात आला होता. अखेर निकाल रियाच्या विरोधात गेला. कमी मतं मिळाल्याने तिचं बिग बॉसच्या घरात जाण्याचं स्वप्न पहिल्याच दिवशी भंगलं, तर लव गिलने घरात एन्ट्री मिळवली.
घरात जाण्यापूर्वीच रिया-लव आमनेसामने
ग्रँड प्रीमियरमध्ये रिया अहिर आणि लव गिल यांच्यापैकी एकालाच घरात प्रवेश मिळणार होता. अंतिम निर्णय पब्लिक वोटिंगवर सोपवण्यात आला होता. मात्र, निकालाआधीच सलमान खानच्या उपस्थितीत रिया आणि लवमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
NEET आंदोलनातील घटनेचा उल्लेख झाल्यानंतर रियाने आपण बस नव्हे, तर पोलिसांची व्हॅन रोखली होती, असं स्पष्ट केलं. त्यावर लव गिलने टोला लगावत, त्या दिवशी ड्रायव्हरने व्हॅन थांबवली नसती तर आज ही इथे नसती, असं म्हटलं. रिया अहिरनेही त्यावर प्रत्युत्तर देत, त्या आंदोलनात आपला जीव गेला असता तरी आपण ज्या उद्देशासाठी लढत होतो तो पूर्ण झाला असता, अशा आशयाचं वक्तव्य केलं. त्यावर लव गिलने रियाचं काम बिग बॉसच्या घराबाहेरच अधिक आहे, कारण घरातील प्रत्येक स्पर्धक स्वतःच्या हक्कासाठी लढू शकतो, असा टोला लगावला.
रिया आणि लव यांच्यातील या वादादरम्यान शोचा होस्ट सलमान खान शांतपणे दोघांचं म्हणणं ऐकत होता. त्याने कोणत्याही बाजूने प्रतिक्रिया न देता वादात हस्तक्षेप करणं टाळलं. अखेर पब्लिक वोटिंगचा निकाल रिया अहिरच्या विरोधात गेला. कमी मतं मिळाल्यामुळे तिला बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळाला नाही आणि स्टेजवरूनच परतावं लागलं. NEET आंदोलनातून चर्चेत आलेल्या रियाचा 'बिग बॉस २०'मधील प्रवास त्यामुळे सुरू होण्याआधीच संपुष्टात आला.
घरात कोण-कोण स्पर्धक?
रिया अहिरला घरात प्रवेश मिळाला नसला, तरी यंदाच्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक चर्चित चेहरे ‘बिग बॉस २०’मध्ये सहभागी झाले आहेत. माही विज, कनिका मान, आसिफ खान, अरिश्फा खान, काझी तौकीर, ईशा रिखी, रोहेद खान, लव गिल, मेरी कोम, तन्मय सिंग उर्फ ScoutOP, कुशल तन्वर उर्फ गुल्लू, अमन गांधी, उदिती सिंग, रिती तिवारी, आम्रपाली दुबे आणि हर्ष विजय माचारे उर्फ YUNG DSA यांचा यंदाच्या स्पर्धकांमध्ये समावेश आहे.
यंदाची थीम 'तथास-टू'
'बिग बॉस २०'ची थीम 'तथास-टू' असून, यंदा 'अतिरिक्त जीवनदायिनी' म्हणजेच एक्स्ट्रा लाइफलाइनचा ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०.३० वाजता पाहता येणार आहे.