बिजनोर : मेरठमधील एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याच्या बहाण्याने ‘वेलकम’ आणि ‘स्री-२’ या चित्रपटांमधील भूमिकांमुळे नावारूपास आलेले अभिनेते मुश्ताक खान यांचे अपहरण करण्यात आले, असे बुधवारी पोलिसांनी सांगितले. एक दिवस बंदिवासात राहिल्यानंतर मुश्ताक यांनी स्वत:ची सुटका करून घेतली.
याबाबत अभिनेत्याच्या व्यवस्थापकाने मंगळवारी बिजनोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. राहुल सैनी नावाच्या एका व्यक्तीने खान यांच्याशी संपर्क साधला आणि मेरठमधील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आणि त्यापोटी अग्रिम मानधनही दिले. सैनी यांनी खान यांना मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकिटही पाठविले.
दिल्ली विमानतळावर आल्यावर खान यांना नेण्यासाठी एक गाडी आली होती, त्यामध्ये चालकासह दोन प्रवासी होते. वाटेत खान यांना दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले, तेथे आणखी दोघे जण गाडीत आले. त्याला खान यांनी विरोध दर्शविला असता त्यांना धमकी देण्यात आली आणि अपहरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खान यांना एका वसाहतीमध्ये बंदिवासात ठेवण्यात आले आणि त्यांच्या भ्रमणध्वनीवरून दोन लाख रुपये अन्यत्र वर्ग करण्यात आले. त्यानंतर खान यांनी आपली सुटका करून घेतली आणि ते मुंबईला आले.